Subscribe Us

header ads

Lonar Lake ( लोणार सरोवर) (District: Buldhana, Maharashtra State, India): The mystery of Lonar—a cataclysmic impact from the sky.

लोणार सरोवर (जिल्हा: बुलढाणा, महाराष्ट्र राज्य, भारत) : लोणारचे रहस्य आकाशातून कोसळलेला प्रलय 

Lonar Lake (District: Buldhana, Maharashtra State, India): The mystery of Lonar—a cataclysmic impact from the sky


       जगाच्या पाठीवर निसर्गाची अनेक गूढ रहस्ये दडलेली आहेत, पण दख्खनच्या पठारावरील 'लोणार'सारखे जागतिक पातळीवरील आश्चर्य आणि मानवी श्रद्धेचे एवढे भयंकर द्वंद्व या संपूर्ण पृथ्वीवर दुसरीकडे कुठेही पाहायला मिळत नाही. आज हे केवळ महाराष्ट्रातील किंवा भारतातील एक ठिकाण राहिलेले नाही, तर जगभरातील खगोलशास्त्रज्ञ आणि अध्यात्मिक अभ्यासकांसाठी ते एक कधीही न सुटणारे, अस्वस्थ करणारे प्रश्नचिन्ह बनले आहे. लोणार सरोवराच्या या परिसराजवळ पोहोचताच, मानवी मनाला एका अशा विलक्षण अनुभवाचा सामना करावा लागतो, जिथे आधुनिक विज्ञान आणि प्राचीन अध्यात्म एकमेकांचा विरोध करत नाहीत, तर एकमेकांचा हात धरून चालताना दिसतात.

चुंबकीय' हनुमानाची गूढ गाथा! :


          जेव्हा आपण येथील एका प्राचीन मंदिरात निद्रिस्त अवस्थेत असलेल्या महाकाय मारुतीच्या मूर्तीसमोर उभे राहतो, तेव्हा आपल्या हातातील होकायंत्राची (Compass) सुई अचानक दिशाहीन होऊन सैरावैरा फिरू लागते आणि चुंबकत्व आपली ओळख विसरते. जगातील प्रगत आधुनिक विज्ञान या थक्क करणाऱ्या घटनेला 'मॅग्नेटिक अ‍ॅनोमली' (Magnetic Anomaly) म्हणजेच 'चुंबकीय विसंगती' असे नाव देते. आजपासून सुमारे पन्नास हजार वर्षांपूर्वीच्या 'प्लाइस्टोसीन' कालखंडात जेव्हा आकाशाच्या अनंत पोकळीतून एक प्रचंड मोठा, लाखो टनांचा 'हायपरव्हेलोसिटी' (Hypervelocity) उल्कापिंड ताशी हजारो किलोमीटरच्या वेगाने या दख्खनच्या अत्यंत कठीण बेसॉल्ट खडकावर आदळला, तेव्हा त्यातून अथांग 'कायनेटिक एनर्जी' (Kinetic Energy) निर्माण झाली. नासा (NASA) आणि जगभरातील वैज्ञानिकांच्या कसोटीवर हे सिद्ध झाले आहे की, अंतराळातून आलेल्या त्या महाकाय उल्केमध्ये लोह आणि निकेलचे प्रमाण अत्यंत जास्त होते, ज्यामुळे या संपूर्ण परिसरातील पाषाणात जीवघेणे चुंबकीय गुणधर्म उतरले. पण इथेच अध्यात्माचे गूढ विज्ञानाच्या खांद्याला खांदा लावून उभे राहते आणि थेट जागतिक बुद्धिमत्तेला आव्हान देते की, हजारो वर्षांपूर्वीच्या आपल्या पूर्वजांनी मारुतीरायाची ही महाकाय मूर्ती कोरण्यासाठी अचूकपणे याच अंतराळातून आलेल्या, विशिष्ट चुंबकीय ऊर्जा असलेल्या उल्केच्या पाषाणाची निवड कशी केली असेल? हा केवळ एक योगायोग होता, की त्या काळातील ऋषीमुनींना या परिसरातील चुंबकीय क्षेत्राचे (Magnetic Field) आणि अतींद्रिय ऊर्जेचे एवढे सखोल ज्ञान होते जे आजच्या आधुनिक विज्ञानालाही थक्क करते?

        या जागतिक आणि खगोलशास्त्रीय चमत्काराला आपल्या पूर्वजांनी केवळ विज्ञानाच्या एकांगी चौकटीत न पाहता, त्याला एका अत्यंत थरारक पौराणिक कथेची आणि अध्यात्माची जोड दिली. स्कंद पुराणातील आख्यायिकेनुसार, याच दंडकारण्याच्या खोल, अंधाऱ्या पाताळात 'लवणासुर' नावाच्या एका अत्यंत क्रूर राक्षसाने आपले मायावी साम्राज्य उभे केले होते. त्याच्या पाशवी अत्याचारांनी त्रस्त होऊन जेव्हा देवांनी धावा केला, तेव्हा भगवान विष्णूंनी 'दैत्यसूदन' हे रौद्र रूप धारण करून या विस्तीर्ण भूमीत प्रवेश केला. त्या दोन महाकाय शक्तींमध्ये झालेले ते महायुद्ध केवळ शब्दांत मांडणे अशक्य आहे. शेवटी भगवान विष्णूंनी लवणासुराच्या छातीवर पाय देऊन त्याला जमिनीच्या अत्यंत खोल पोटात कायमचे गाडून टाकले, ज्यामुळे हा प्रचंड खड्डा (Crater) तयार झाला. राक्षसाचे रक्त तिथे सांडले आणि त्या रक्ताचेच तिथल्या पाण्यात रूपांतर झाले. म्हणूनच आजही या सरोवराचे पाणी अत्यंत क्षारयुक्त आणि अल्कधर्मी (Hyper-saline and Alkaline) आहे आणि तिथल्या हवेत गंधकाचा एक उग्र, कुबट दर्प जाणवतो. आता जर आधुनिक विज्ञानाच्या नजरेतून पाहिले, तर उल्कापाताच्या प्रचंड उष्णतेमुळे आणि रासायनिक प्रक्रियेमुळे या विवरातील पाण्याची आणि मातीची रचना बदलली, हे जागतिक सत्य आहे. पण मग पुन्हा मनात एक प्रश्नचिन्ह उभे राहते की, ज्या भौगोलिक घटनेला आजचे जग 'रासायनिक विसंगती' आणि 'हायपर-सलाईन क्रेटर लेक' म्हणते, तिलाच आपल्या पूर्वजांनी लवणासुराच्या रक्ताची आख्यायिका का जोडली? हा केवळ एका कल्पनेचा विलास होता, की निसर्गाच्या त्या महाभयंकर प्रलयाला आणि पर्यावरणातील बदलांना सोप्या भाषेत मानवी भावनेशी जोडण्याचा तो एक आध्यात्मिक प्रयत्न होता? या भयंकर युद्धानंतर, येथील नकारात्मक ऊर्जा शांत करण्यासाठी साक्षात मारुतीरायांनी या उल्केच्या चुंबकीय पाषाणात आपले संरक्षक रूप धारण केले अथवा त्यांची प्राणप्रतिष्ठा केल्या गेली , ही अथांग श्रद्धा आणि विज्ञानाचे चुंबकीय सत्य एकमेकांत इतके बेमालूमपणे मिसळले आहे की दोन्हींमधील सीमारेषाच पुसली जाते.

        या सरोवराच्या दिशेने अरुंद पायवाटेने खाली उतरताना एक वेगळाच थरार अंगावर शहारे आणतो. जसे जसे आपण खाली उतरत जातो, तसतसा बाहेरच्या जगाचा कोलाहल कायमचा मागे पडतो आणि एक भयाण, जीवघेणी गूढ शांतता आपल्याला चारही बाजूंनी विळखा घालते. आजूबाजूला वाढलेली ती घनदाट, शेकडो वर्षे जुनी झाडी आणि वाऱ्याने सुकलेल्या पानांची होणारी ती रहस्यमय सळसळ मनातील भीती आणि उत्सुकता एकाच वेळी वाढवते. या नैसर्गिक आणि वैज्ञानिक गूढतेभोवती मानवाने आपल्या असीम श्रद्धेची आणि अप्रतिम कलेची अत्यंत सुरेख गुंफण घातलेली आहे. 

            लोणार गावातच असलेले दैत्यसूदनाचे प्राचीन मंदिर ही वास्तुकलेची एक साक्षात जिवंत कविता आहे. काळ्या पाषाणात कोरलेल्या या हेमाडपंती मंदिराची नक्षत्राच्या आकारावर आधारित असलेली खगोलशास्त्रीय रचना पाहून आजचे #वास्तुविशारदही थक्क होतात. मंदिराच्या बाह्य भिंतींवरील देव आणि गंधर्वांच्या मूर्ती इतक्या जिवंत वाटतात, की त्या विज्ञानाच्या या कठोर सत्यातही एक भावनिक ओलावा निर्माण करतात. याव्यतिरिक्त, सरोवराच्या अगदी काठावर, त्या घनदाट झाडीत लपलेले कमलजा मातेचे मंदिर हे एक दुसरे मोठे जागतिक आश्चर्य आहे. एका बाजूला सरोवराचे ते अल्कधर्मी, जीवघेणे पाणी आणि अगदी शेजारी गोमुखातून अखंडपणे वाहणारी गोड्या पाण्याची ती शीतल, जिवंत धार! हा भूगर्भीय चमत्कार आहे की निसर्गाची एखादी आध्यात्मिक लीला? या प्रश्नाचे अचूक उत्तर आजच्या प्रगत विज्ञानाकडेही पूर्णपणे नाही.

                लोणार हे केवळ एक पाण्याचे सरोवर नाही, तर तो अंतराळातील अथांग विज्ञान, पृथ्वीवरील रौद्र निसर्ग, मानवी श्रद्धा आणि प्राचीन वास्तुकला यांचा एक अत्यंत जिवंत आणि जगाला भुरळ घालणारा कूटप्रश्न आहे. आकाशातून कोसळलेल्या त्या एका क्षणाच्या प्रलयाने जमिनीवर जो कायमचा व्रण उमटवला, त्याला काळाच्या ओघात अध्यात्म आणि विज्ञानाने मिळून एक अलौकिक वलय प्राप्त करून दिले. इथे येणारा जगभरातील प्रत्येक प्रवासी जेव्हा त्या चुंबकीय हनुमानासमोर आणि सरोवराच्या काठावर उभा राहतो, तेव्हा त्याच्या मनात विचारांचे एक नवे वादळ सुरू होते. एकीकडे अथांग अंतराळातून आलेली ती 'हायपरव्हेलोसिटी' उल्का आणि तिचे वैज्ञानिक चुंबकत्व, तर दुसरीकडे पिढ्यानपिढ्या चालत आलेली लवणासुराची थरारक कथा आणि मारुतीरायांची अढळ भक्ती! या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या हातात हात घालून उभ्या आहेत. जसजशी संध्याकाळ होते, सरोवरावर अंधार दाटू लागतो आणि पाण्याचा रंग अधिकच गडद, काळाभोर होतो, तेव्हा त्या शांततेत वाहणारा वारा जणू आपल्याला विचारू लागतो की, तुम्ही ज्याला विज्ञान समजता ते अध्यात्माचेच दुसरे रूप आहे की ज्याला अध्यात्म मानता ते विज्ञानाच्या पुढचे पाऊल आहे? हे अथांग रहस्य जोपर्यंत तो निसर्ग स्वतः उकलत नाही, तोपर्यंत लोणारच्या या पाण्यातील विज्ञान आणि त्या चुंबकीय पाषाणातील ते गूढ थरारपण संपूर्ण जगाला असेच अखंडपणे कोड्यात टाकत राहील.

---------------------------------------

कुमारेश्वर मंदिर, लोणार, बुलढाणा 

जगप्रसिद्ध लोणार सरोवराच्या सभोवताली अनेक प्राचीन मंदिरे विखुरलेली आहेत. या मंदिरांमध्ये आपल्या वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यरचनेमुळे कुमारेश्वर मंदिर विशेष लक्ष वेधून घेते. लोणार सरोवराच्या परिसरातील प्राचीन मंदिरसमूहाचा हा एक महत्त्वाचा भाग असून, मंदिराची दगडी रचना आजही तत्कालीन स्थापत्यकलेची साक्ष देत उभी आहे.

कुमारेश्वर मंदिराची बाह्य रचना पाहिल्यावर ते एखाद्या पिरॅमिडसारखे भासते. मोठमोठ्या दगडी घडीव शिळा एकावर एक रचत मंदिराचा उंचवटा तयार करण्यात आला आहे. मंदिराच्या पायथ्यापासून वरच्या भागाकडे जाताना त्याची रचना क्रमाक्रमाने निमुळती होत जाते. त्यामुळे दूरून पाहतानाही मंदिराचे वेगळेपण लगेच जाणवते.

मंदिराच्या रचनेमध्ये सभामंडप, अंतराळ आणि गर्भगृह असे प्रमुख भाग आढळतात. सभामंडपात दगडी स्तंभ असून त्यावर सुबक नक्षीकाम पाहायला मिळते. मंदिराच्या प्रवेशद्वारावर तसेच विविध भागांमध्ये देवदेवतांची आणि इतर अलंकारिक शिल्पे कोरलेली आहेत. गर्भगृहात कुमारेश्वराचे शिवलिंग विराजमान आहे.

या मंदिराच्या इतिहासाबाबत विविध मते आणि स्थानिक परंपरा आढळतात. काही अभ्यासकांच्या मते मंदिराचा संबंध राष्ट्रकूट काळाशी जोडला जातो, तर पुढील काळात यादव राजवटीत परिसरातील मंदिरांच्या बांधकामात व संरक्षणात भर पडल्याचे मानले जाते. मंदिराच्या नेमक्या कालखंडाबाबत मात्र वेगवेगळ्या स्रोतांमध्ये मतभेद आढळतात.

कुमारेश्वर मंदिराशी संबंधित काही स्थानिक धार्मिक आख्यायिकाही प्रचलित आहेत. वनवासाच्या काळात श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांनी या परिसराला भेट दिली आणि कुमारेश्वराचे दर्शन घेतले, अशी स्थानिक श्रद्धा आहे. मंदिराच्या परिसरातील सीतान्हाणी या ठिकाणाचाही या परंपरेशी संबंध जोडला जातो.

काळाच्या ओघात मंदिराच्या वास्तूची झीज झाली असली, तरी त्याची भव्य दगडी बांधणी, वैशिष्ट्यपूर्ण पिरॅमिडसदृश रचना आणि प्राचीन स्थापत्य आजही पाहणाऱ्याचे लक्ष वेधून घेतात. लोणार सरोवर हे केवळ नैसर्गिक आश्चर्य नाही, तर त्याच्या परिसरात जपला गेलेला हा प्राचीन मंदिरवारसाही तितकाच महत्त्वाचा आहे.

-------------------------------------

यज्ञेश्वर मंदिर / शुक्राचार्य वेधशाळा, लोणार, बुलढाणा


शुक्राचार्य वेधशाळा

लोणार सरोवर हे पृथ्वीच्या नाभीस्थानी असल्याची धार्मिक मान्यता असल्याने या परिसराला ‘नाभीतीर्थ’ असेही म्हटले जाते. याच परिसरात प्राचीन अष्टकोनी वेधशाळा असल्याचे सांगितले जाते. सध्या या ठिकाणी केवळ शिवपिंड शिल्लक आहे.

सरोवराच्या ईशान्य दिशेला असलेले हे मंदिर पश्चिमाभिमुख आहे. मंदिराची बांधणी यादवकालीन हेमाडपंती शैलीतील असून, अष्टदिक्पालांच्या प्रतिमा आणि अप्रतिम कोरीवकाम हे त्याचे वैशिष्ट्य आहे. मंदिरावरील गोलाकार छताची रचनाही विशेष लक्षवेधी आहे.

यज्ञेश्वर मंदिर म्हणजेच शुक्राचार्यांची शाळा असल्याची मान्यता आहे. येथे शुक्राचार्यांनी अनेक यज्ञ केले होते, असे सांगितले जाते. त्यामुळे हे मंदिर ‘यज्ञेश्वर’ या नावाने ओळखले जाते. ध्यानधारणेसाठीही हे ठिकाण योग्य मानले जाते.

या मंदिराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, नेहमी चौकोनी किंवा चौरस आकाराचा असणारा सभामंडप येथे वर्तुळाकार होता आणि त्याचे छत उघडे होते. या रचनेमुळे आकाशातील ग्रह, तारे आणि नक्षत्रांचे निरीक्षण करणे शक्य होत असावे. शुक्राचार्य हे खगोलशास्त्र आणि ज्योतिषशास्त्राचे अभ्यासक होते, अशी पौराणिक मान्यता आहे.

या स्थळाला पौराणिक आणि ऐतिहासिक संदर्भही आहेत. ऋग्वेद, पद्मपुराण आणि स्कंदपुराणात लोणार परिसराचा उल्लेख आढळतो. स्कंदपुराणानुसार ब्रह्मदेव, नारद मुनी, कपिल मुनी, अगस्त्य ऋषी, भृगू ऋषी, याज्ञवल्क्य आणि शुक्राचार्य यांसारख्या ऋषी-मुनींनी लोणार सरोवर परिसरात तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते. हा परिसर ‘दंडकारण्य’ म्हणूनही ओळखला जात असल्याचे उल्लेख आढळतात.

याज्ञवल्केश्वर मंदिर:

हेमाडपंती शैलीतील याज्ञवल्केश्वर मंदिर सध्या जीर्ण अवस्थेत असून, त्याचा सभामंडप ढासळलेला आहे. गर्भगृहात भव्य शिवलिंग असून, गाभाऱ्यात मोठी घुंगरमाळ असलेला नंदी आहे. नंदी आणि समोरील भव्य शिवपिंड आजही शाबूत आहेत. मंदिराजवळील कुंड मात्र हळूहळू बुजत चालले आहे.


याज्ञवल्क्य ऋषी हे आयुर्वेदाचे जाणकार होते, अशी मान्यता आहे. त्यांनी येथील वनस्पतींचा अभ्यास करून विविध आजारांवरील औषधांचा शोध घेतल्याचे सांगितले जाते. त्यांनी तयार केलेल्या औषधांच्या भट्टीची राख जवळच टाकली होती, अशीही स्थानिक आख्यायिका आहे. आजही काही लोक अर्धशिशीच्या (अर्धडोकेदुखीच्या) उपचारासाठी येथील माती औषधी म्हणून घेऊन जातात.

----------------------------------------

 दैत्यसुदन मंदिर, लोणार, बुलढाणा


लोणारमधला अजून एक अत्यंत वैभवशाली ठेवा म्हणजे दैत्यसुदन मंदिर! कोरीव आणि कलात्मक दगडी कलेचा हा एक अलौकिक आविष्कार आहे.

आपण केवळ ताजमहाल, ताजमहाल करत बसतो; पण आपल्या भारतात आणि त्यातल्या त्यात महाराष्ट्रात अशी अनेक अचंबित करणारी आश्चर्ये आहेत की, त्यांची गणती करणेही मुश्कील होईल. दैत्यसुदन मंदिर हे या यादीत अग्रस्थानी असावे.

हे मंदिर खऱ्या अर्थाने समजून घ्यायचे असेल, तर संपूर्ण एक आठवडाही कमी पडेल. मंदिराच्या प्रत्येक खांबावर, प्रत्येक दगडी शिल्पामागे एक इतिहास आहे, एक कथा आहे. त्यातील प्रत्येक बारकावा समजून घ्यायचा असेल, तर वेळ कधीच पुरणार नाही.

मंदिर स्थापत्यशास्त्राचा एक आदर्श नमुना म्हणून या मंदिराची नोंद व्हावी, इतके हे मंदिर सुंदर आणि कलात्मक आहे. विशेष म्हणजे येथे फारसे पर्यटक फिरकत नाहीत. आम्ही गेलो तेव्हा मंदिर परिसरात अक्षरशः कोणीही नव्हते.

चालुक्य काळातील, साधारणपणे सहाव्या ते बाराव्या शतकादरम्यान हे मंदिर उभारले गेले, असे मानले जाते. हेमाडपंथी इंटरलॉकिंग पद्धतीचे दगडी बांधकाम असलेले हे मंदिर गर्भगृह आणि सभामंडप अशा प्रमुख भागांत रचले गेले आहे.

या मंदिरात श्री विष्णूंची मूर्ती आहे. ती दिसायला काळ्या पाषाणाची वाटत असली, तरी प्रत्यक्षात ती धातूची आहे. मुख्य म्हणजे ही मूळ मूर्ती नसून, नंतर नागपूरच्या एका ज्येष्ठ कलाकाराकडून तयार करून घेण्यात आलेली मूर्ती आहे. मूळ मूर्ती परकीय आक्रमणांपासून वाचवण्यासाठी कुठेतरी लपवून ठेवण्यात आली, मात्र तिचा अद्याप ठावठिकाणा माहीत नाही.

श्री विष्णूंच्या पायाशी लवणासुर नावाचा राक्षस हात जोडून शरण आलेला दाखवण्यात आला आहे. याविषयीची कथा गोमुख नावाच्या लेखात यापूर्वी लिहिलेली आहेच. श्री विष्णूंचा पाय लवणासुरच्या नाभीवर असून, तो हात जोडून मुक्तीसाठी प्रार्थना करत असल्याचे शिल्पात दाखवले आहे.

काळाच्या ओघात मंदिराचे बरेच नुकसान झाले आहे. मंदिरातील सभामंडपाचा आतील भाग मंदिर स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने अजिबात सुसंगत वाटत नाही. हा भाग परकीय आक्रमणांदरम्यान बदलण्यात आला असावा, असे जाणवते. मंदिराच्या मूळ रचनेत असा भाग कधीच नसावा, हे बारकाईने पाहिल्यावर लगेच लक्षात येते. कोणीतरी जाणीवपूर्वक या मंदिराच्या मूळ रचनेत बदल करण्याचा प्रयत्न केला असावा, असे स्पष्टपणे जाणवते.

जवळपास पंधराशे वर्षांपूर्वीच्या या मंदिराचा सखोल अभ्यास करायचा ठरवला, तर खंडच्या खंड लिहून होतील, इतकी माहिती या मंदिराच्या प्रत्येक खांबात, दगडात आणि शिल्पात दडलेली आहे. या मंदिराला भेट दिल्यापासून मंदिराचा सखोल अभ्यास सुरू करावा की काय? हा विचारही डोक्यात सुरू झाला आहे.

या मंदिराच्या गाभाऱ्यातील छताच्या चारही कोपऱ्यांत एक-एक शिल्प उलटे कोरलेले आहे. म्हणजेच त्या कोरीव शिल्पांतील चेहरे जमिनीच्या दिशेने आहेत. आपल्याला ती शिल्पे नीट पाहायची असतील, तर एका विशिष्ट कोनात उभे राहून वर मान करावी लागते. तेव्हाच त्या शिल्पांमध्ये नेमके काय कोरले आहे, हे स्पष्टपणे समजते. मी त्यांचे फोटो काढले; मात्र छायाचित्रांमध्येही ती शिल्पे तितकी स्पष्टपणे दिसली नाहीत. ही एक-एक शिल्पे म्हणजे जणू एक संपूर्ण कथा आहे.

मंदिरात प्रवेश करण्याआधी त्याच्या पायाभागाकडे आवर्जून पाहा. सात थरांमध्ये नक्षीकाम केलेले दगडी स्तर असून, मंदिराची उभारणी त्यावर करण्यात आली आहे. हे नक्षीकाम इतके बारकाईने, कलात्मक आणि एकसंध पद्धतीने केलेले आहे की, आजच्या संगणकाच्या युगातही इतके अचूक काम करणे शक्य होईल का, अशी शंका मनात येते.

शक्यतो सूर्यास्ताच्या वेळी या मंदिराला भेट देण्याचा प्रयत्न करा. मावळत्या सूर्याच्या प्रकाशात मंदिराच्या दगडी शिल्पांवर पडणारी किरणे आणि त्यातून निर्माण होणारा नजारा खरोखरच अफलातून असतो.


(स




          

Post a Comment

0 Comments