डॉ. व्हर्गिस कुरियन : भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक
Verghese Kurien: "Father of the White Revolution" in India
जन्मदिन: 26 नोव्हेंबर
स्मृतीदिन: 9 सप्टेंबर
बालपण आणि शिक्षण
भारतातील धवल क्रांतीचे जनक म्हणून डॉ. व्हर्गिस कुरियन (Verghese Kurien) यांचा जन्म 26 नोव्हेंबर 1921 केरळ राज्यातील कोझिकोड (कालिकत) शहरात झाला.
त्यांचे शालेय शिक्षण तामिळनाडूतील जिल्हा इरोड गोबीचेट्टीपालयम गावात डायमंड जुबिली हायर सेकंडरी स्कूलमध्ये झाले. त्यांचे वडील सरकारी रूग्णालयात शल्यतज्ज्ञ होते.
कुरियन यांनी मद्रासच्या लॉयोला कॉलेजमधून भौतिकशास्त्रातील पदवी मिळविली. विद्यार्थी दशेत त्यांनी लॉयोला कॉलेजचे क्रिकेट, बॅडमिंटन, मुष्टियुद्ध आणि टेनिसमध्ये प्रतिनिधित्व केले होते.
त्यांनी गिंडी येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि मद्रास (सध्याच्या चेन्नई) विश्वविद्यालयाची यंत्र अभियांत्रिकी (मेकॅनिकल इंजिनीअरिंग) पदवी मिळविली.
अल्प काळासाठी टाटा आयर्न अँड स्टील कंपनीत (TISCO) नोकरी करून त्यांनी इंपिरियल इन्स्टिट्यूट ऑफ ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी इंजिनीअरिंगसाठी प्रवेश घेतला. सध्या ही संस्था बंगळूरूत असून आता या संस्थेचे नाव नॅशनल डेअरी रिसर्च इन्स्टिट्यूट सदर्न रिजनल सेंटर आहे.
डेअरी टेक्नॉलॉजी अभ्यासक्रमासाठी त्यांना मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीत प्रवेश हवा होता. प्रवेशासाठी कुरियन यांना भारत सरकारची शिष्यवृत्ती मिळाली होती. पण प्रवेशपूर्व अट म्हणून मेटॅलर्जीत अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवीबरोबर डेअरी इंजिनीअरिंग हा दुय्यम विषय घेणे अनिवार्य होते. या अटींची पूर्तता करून मिशिगनमधून मास्टर्सची पदवी मिळवून ते भारतात परतले. आणंदच्या गव्हर्नमेंट रिसर्च क्रीमरीत पाच वर्षांच्या कालावधीसाठी रुजू झाले. तेथे त्यांचा गांधी विचारांचा पगडा असलेले कार्यकर्ते त्रिभुवनदास पटेल यांच्याशी परिचय झाला.
X X
त्रिभुवन भाई पटेल यांच्या सहकार्यानं खेडा जिल्हा सहकारी संस्था
त्रिभुवनदास यांना त्याकाळी लहान दूध उत्पादकांसाठी आणंद येथे सहकारी दूध संघटना स्थापन करायची होती. मध्यंतरीच्या काळात 1952-53 मध्ये डॉ. कुरियन यांनी भारत सरकारच्या पुरस्काराने न्यूझीलंडमध्येही दुग्ध यांत्रिकी शिक्षण घेतले. तसेच न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामधील सहकारी दूध व्यवस्थेचाही अभ्यास केला.
त्रिभुवनदास पटेल यांचा उपक्रम भावल्यामुळे सुरक्षित सरकारी नोकरी सोडून कुरियन यांनी खेडा जिल्ह्यातील चळवळीत उडी घेतली.
डॉ. कुरियन यांनी न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात केलेल्या सहकारी दूध व्यवस्थेच्या अभ्यासाचा खेडा डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह मिल्क प्रॉड्युसर्स युनियन लिमिटेड (KDCMPUL) म्हणजेच अमूलची बांधणी करण्यासाठी उपयोग केला.
पंडित जवाहरलाल नेहरूंच्या हस्ते अमूल डेअरी प्रकल्पाचे उद्घाटन झाले आणि खुद्द पंतप्रधानांनी आपल्या भाषणात त्यांचे कौतुक केले. त्यामुळे डॉ. कुरियन यांना काम करण्यास आणखी हुरूप आला आणि त्यांनी अमूलच्या स्थापनेत आणि वाढीत मोलाची जबाबदारी पार पाडली. त्यांच्या प्रयत्नाने अमूलसारख्या संस्था ठिकठिकाणी उभ्या करून भारतात लाखो लहान दूध उत्पादकांच्या एकत्रित परिश्रमाने दूध उत्पादन प्रचंड प्रमाणात वाढविता आले. तसेच दुधाची त्वरित फायदेशीर विक्री होऊ लागली.
शेतकरी आणि ग्राहक अशा दोघांचा फायदा झाला. या धवल क्रांतीमुळे अक्षरश: लाखो ग्रामीण, अर्ध-नागरी भागातील लोकांना विशेषतः महिलांना घरात वा घराजवळ रोजगार मिळाला. कुपोषण आणि गरीबी कमी होण्यास मदत झाली.
भारत दूध उत्पादनात अग्रेसर होऊन अमूल आणंद हा तीस लाख लहान दूध उत्पादकांचा समूह देशासाठी दुधाचा कटोरा ठरला. स्वस्त आणि शुद्ध दुधाच्या पुरवठ्यामुळे नेस्ले आणि पोलसन सारख्या आंतरराष्ट्रीय दूध उत्पादकांची मक्तेदारी संपली.
X X
म्हशीच्या दुधाची भुकटी तयार करण्याची किमया
दूध उत्पादनात तूट असलेला देश ते जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश हे भारताचे स्थित्यंतर घडवून आणण्यात वर्गीस कुरियन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
डॉ. कुरियन यांच्या नेतृत्वाखाली 'एनडीडीबी' ने 'ऑपरेशन फ्लड' (धवल क्रांती) सुरु केलं. अवघ्या चार दशकांतच भारत हा जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश बनला.
डॉ. कुरियन यांनी गुजरात सहकारी दुग्ध पणन महासंघाची (जीसीएमएमएफ) स्थापना केली. 2007 पर्यंत सलग 34 वर्षे ते या महासंघाच्या अध्यक्षपदी होते. ही संस्था 'अमूल' डेअरी उत्पादनांची निर्मिती करते.
सारे जग गाईच्या दुधापासून बनवलेली भुकटी वापरत होते. तर भारतात विशेषतः उत्तर व मध्य भारतात म्हशी पालनाचे प्रमाण मोठे आहे. ही बाब जाणून डॉ. कुरियन यांनी म्हशीच्या दुधाची भुकटी तयार करण्याची किमया साधली. यामुळे भारतात दूध प्रक्रिया क्षेत्रात क्रांती झाली. यामुळे जगात अग्रेसर असलेल्या 'नेस्ले' कंपनीला 'अमूल' टक्कर देऊ शकली. डॉ. कुरियन यांनी केलेल्या या नव्या प्रयोगामुळे त्यांना 'मिल्कमॅन ऑफ इंडिया'चा किताब मिळाला.
डॉ. कुरियन यांनी 1955 मध्ये न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियात केलेल्या अभ्यासातून प्रेरणा घेऊन जगातील पहिला म्हशीच्या दुधाची पावडर बनवण्याचा प्रकल्प आणंदमध्ये केला.
दुधातील पाण्याचे प्रमाण कमी करून अतिशय दाट (कन्डेस्ड) टिकाऊ दूध बनवण्याचे तंत्र कुरियन यांचे अमेरिकेत राहणारे अभियंता वर्गमित्र, एच. एम. दलाया यांनी विकसित केले होते. म्हशीच्या दुधाची भुकटी आणि दूध दाट टिकाऊ करणे या दोन्ही प्रकल्पांतही त्यांना एच. एम. दलाया यांची मदत झाली.
X X
डॉ. कुरियन: ऑपरेशन फ्लड उर्फ धवल क्रांती चे जनक
सहकारी दूध चळवळीचा देशभर विकास करण्याच्या हेतूने भारत सरकारने 1965 साली लाल बहादूर शास्त्री पंतप्रधान असताना नॅशनल डेअरी डेव्हलपमेन्ट बोर्ड ही संस्था स्थापन करण्यात आली. या बोर्डावर डॉ. कुरियन यांची संस्थापक अध्यक्ष म्हणून नेमणूक केली.
त्यांनी दुधाचा महापूर ही योजना अमलात आणली. त्यानुसार तब्बल 700 शहर आणि जवळची गाव यातून दुधाचे जाळं निर्माण केलं. "ऑपरेशन फ्लड उर्फ धवल क्रांती" नावाने प्रसिद्ध अशा या उपक्रमामुळे भारतातील दूध उत्पादन लक्षणीयरित्या वाढले.
पूर्वी लहान प्रमाणात दूध उत्पादन करणाऱ्याना दूध थंड जागी साठविण्यास, मुंबईसारख्या मोठ्या, खात्रीच्या आणि वाढत्या पण दूरच्या बाजारात दूध वाहून नेण्यास मोठ्या दूध उत्पादकांच्या मर्जीवर अवलंबून रहावे लागे. ते अर्थातच आडवणूक आणि नफेखोरी करत. त्यातून छोट्या दूध उत्पादकांमध्ये प्रचंड असंतोष होता.
गुजरात सहकारी दूध विक्री महासंघाचा अमूल प्रकल्प आकाराला आल्यावर अल्प दूध उत्पादकांना न्याय मिळू लागला. ‘अमूल’ हा शब्द त्यांच्या संस्थेने बऱ्याच विचारमंथनानंतर अमूल्य अशा अर्थी पण बोलायला, लिहायला सोपा म्हणून स्वीकारला होता.
अमूलच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार भारतातील दूध उत्पादन 1960 मध्ये दरवर्षी 200 लाख मेट्रिक टन होते. ते पन्नास वर्षात वाढून 2011 मध्ये सहा पट म्हणजे 1200 लाख मेट्रिक टन झाले.
एके काळी दुधाचे दुर्भिक्ष्य असलेला भारत योग्य धोरण आणि काही दशकांचे प्रयत्न यामुळे दूध उत्पादनात अग्रेसर ठरला.
डॉ. कुरियन यांना भारतासारख्या देशातील दूध उत्पादन लक्षणीयरित्या वाढविण्याच्या कामगिरीबद्दल " वर्ल्ड फूड प्राइझ फाउंडेशन"तर्फे 1989 चे "वर्ल्ड फूड प्राइझ" देण्यात आले.
या संस्थेला त्यांचा जनतेला पोषण पुरवताना उत्पादनवाढी इतकेच प्रभावी व्यवस्थापन आणि वितरणही महत्त्वाचे आहे, हा विचार आवडला.
डॉ. कुरियन यांनी 1970 मध्ये "ऑपरेशन फ्लड" म्हणजेच "दूधाचा महापूर" ही योजना राबवली. या योजनेमुळे भारतात " श्वेत क्रांती" संकल्पना उदयास आली. भारत जगात सर्वात जास्त दूध उत्पादन करणारा देश म्हणून ओळखला जाऊ लागला.
X X
डॉ. व्हर्गिस कुरियन: संस्थाची स्थापना
डॉ.कुरियन यांनी त्यांच्या कारकिर्दीमध्ये 30 हून अधिक संस्थाची स्थापना केली.
डॉ. कुरियन यांनी व्यावसायिक विशेषज्ञ निवडून अमूलसाठी व्यापारी चिन्ह तयार करवून घेतले. त्या चिन्हाची 1957 साली अधिकृत नोंदणी केली. या चिन्हाद्वारे एक छोटी, मिश्कील, चुणचुणीत मुलगी 1967 पासून अमूलची लाडकी प्रतिनिधी म्हणून ग्राहकांसमोर आणली. तिच्या तोंडचे ‘अटरली बटरली डेलिशियस’ ऐकत, वाचत ग्राहक अमूलचे लोणी देशभर खरेदी करू लागले.
1979 मध्ये डॉ. कुरियन यांनी "इन्स्टिटयूट ऑफ रुरल मॅनेजमेंट, आणंद" अशी संस्था सुरू करून सहकारी संस्था व्यावसायिक कुशलतेने चालविल्या जातील यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची व्यवस्था करून ठेवली. डॉ. कुरियन यांच्या कर्तबगारीचा लाभ गुजरात बाहेरही अनेकांना झाला.
कर्नाटकमधील नंदिनी, राजस्थान मधील सरस, बिहार येथील सुधा या व्यापारी नावांनी किफायतशीर किमतीला विकले जाणारे दूध ही कुरियन यांची किमया आहे.
भारताचे शेजारी देश पाकिस्तान, चीन, श्रीलंका तसेच रशिया यांनाही कुरियन यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा त्यांच्या दूध पुरवठा योजना सुधारण्यात झाला.
कुरियन यांची योजकता केवळ दुधापुरतीच मर्यादित राहिली नाही. तेलबिया आणि खाद्य तेलाच्या बाबतीतही भारत स्वयंपूर्ण व्हावा अशी भारत सरकारची आकांक्षा होती. पूर्वानुभवामुळे कुरियन यांना हे केवळ तीन वर्षांत साध्य झाले.
गुजरात मध्ये तेलीया राजा नावाने ओळखल्या जाणाऱ्या काही मोजक्या कुटुंबांकडे खाद्य तेलाच्या व्यापाराची सूत्रे होती. डॉ. कुरियननी कठोरपणे त्यांची मक्तेदारी मोडून काढली.
जुने, आजारी, वापरात नसलेले पण परवाना धारक तेल कारखाने ताब्यात घेऊन कार्यान्वित केले. थोड्याच काळात " धारा" या व्यापारी नावाने माफक किमतीला ग्राहकांना अधिक मागणी असलेले शेंगदाणा तेल मिळू लागले. तेल आयातीवर खर्च होणारे महागडे परकीय चलन वाचू लागले.
X X
पुरस्कार व सन्मान
डॉ.कुरियन यांना प्रदान करण्यात आलेले प्रतिष्ठेचे पुरस्कार
2. 1965 -पद्मश्री - भारत सरकार
3. 1966 -पद्मभूषण- भारत सरकार
4. 1986 -कृषि रत्न- भारत सरकार
5. 1986 -वाटलर शांति पुरस्कार- कार्नेगी फाउंडेशन
6. 1989 -डॉ.कुरियन यांना भारतासारख्या देशातील दूध उत्पादन लक्षणीयरित्या वाढविण्याच्या कामगिरीबद्दल " वर्ल्ड फूड प्राइझ फाउंडेशन"तर्फे 1989 चे "वर्ल्ड फूड प्राइझ" देण्यात आले.
7. 1991 -Distinguished Alumni -मिशिगन स्टेट विश्वविद्यालय
8. 1993- इंटरनेशनल पर्सन ऑफ़ द इयर- वर्ल्ड डेरी एक्सपो
9. 1999- पद्म विभूषण- भारत सरकार
डॉ.कुरियन यांना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे जनसामान्यांच्या लेखी ते भारताचे दुग्धपुरूष होते.
देशात 'दुधाचा महापूर' योजनेची संकल्पना त्यांनीच मांडली. कुरीयन यांचा जन्मदिवस 'नॅशनल मिल्क डे' म्हणून साजरा केला जातो.
X X
ग्रंथ निर्मिती
डॉ.कुरियन यांनी आपल्या आठवणी आणि विचार तीन पुस्तकांत नोंदवून ठेवल्या आहेत. त्यांच्या पुस्तकांची नावे .
1. ‘आय टू हॅड ड्रीम’
2. ‘द मॅन हू मेड द एलिफंट डान्स’
3. ‘ॲन अनफिनिश्ड ड्रीम’
X X
निधन
भारताचे दुग्धपुरूष ( मिल्कमॅन ऑफ इंडिया') तथा भारतीय दुग्ध क्रांतीचे जनक डॉ. व्हर्गिस कुरियन यांचा गुजरातेतील नडियाद येथे मूत्रपिंडांच्या आजारामुळे रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरु असताना 9 सप्टेंबर 2012 त्यांचे रुग्णालयात निधन झाले.
View,comments and Share
8 Comments
Nice
ReplyDeleteUseful Information
ReplyDeleteVery nice
ReplyDelete👍
ReplyDelete💐
ReplyDelete👍👍
ReplyDeleteNice 👍
ReplyDeleteप्रेरणा देणारा लेख
ReplyDelete