Karmaveer Bhaurao Patil: Social Activist and Educator in Maharashtra,India
कर्मवीर भाऊराव पाटील: महाराष्ट्रातील ग्रामीण शिक्षण चळवळीचे जनक
22 सप्टेंबर: जयंती
9 मे: स्मृति दिन
बालपण आणि शिक्षण:
भाऊराव पायगोंडा पाटील यांचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी कुंभोज, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे जैन जातीत झाला.
कुंभोज हे भाऊरावांचे आजोळ होते. त्यांचे वडील पायगोंडा हे रोड कारकून होते व त्यांचा सातारा जिल्ह्यात बदलीच्या निमित्ताने सतत प्रवास होई. रोड कारकून म्हणून त्यांच्या वडिलांचा खालच्या वर्गातील लोकांशी संबंध येई.
लोकांची गरिबी पाहून बालवयातील भाऊरावांचे मन गहिवरून येई. सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांना पाणी भरता येत नसे हे पाहूनही त्यांचे अंत:करण कळवळे.
भाऊरावांचे प्राथमिक शिक्षण विटे, दहीवडी अशा वडिलांच्या बदलीच्या ठिकाणी झाले. भाऊरावांच्या इंग्रजी शिक्षणाची सुरुवात कोल्हापूर येथील प्रायव्हेट हायस्कूलमध्ये झाली.
1902 ते 1907 या वर्षी ते कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये शिकले. शाळेत पहिल्या दिवशी त्यांचे बाह्य रूप पाहून विद्यार्थी हसले.
शाळेत अभ्यासात मागे असले तरी कुस्ती, पोहणे, मल्लखांब या क्रीडाक्षेत्रात ते पटाईत होते. ते इंग्रजी 6 वी म्हणजे हल्लीची दहावी शिकले. दहावी नापास असलेल्या या विद्यार्थ्याने ज्ञानाची गंगा खेड्यापाड्यांपर्यंत नेली.
कोल्हापुरात असताना भाऊराव कोल्हापूर येथील दिगंबर जैन बोर्डिंगमध्ये राहत होते. ही बोर्डिंग 1905 मध्ये राजर्षी शाहूंनी सुरू केली व तिचे अधीक्षक दिवाणबहादूर लठ्ठे होते.
पण 1908 मध्ये मिस क्लार्क होस्टेल या अस्पृश्य मुलीच्या वसतिगृहाच्या उद्घाटन कार्यक्रमास ते गेले. कार्यक्रमानंतर ते आपल्या बोर्डिंगमध्ये आले तेव्हा अधीक्षक ए. बी. लठ्ठे यांनी त्यांना दुसऱ्यांदा स्नान करावे. हा आदेश न पाळल्यामुळे त्यांना वसतिगृहातून काढून टाकले गेले. वसतिगृह त्यांना सोडावे लागले. ते गावाकडे निघाले.पण त्यांचे नशीब मोठे
बाळासाहेब खानविलकर या त्यांच्या मित्राने हा झाला प्रकार ऐकून भाऊरावांना शाहू महाराजांच्या वाड्यावर आणले व राजवाड्यातील विद्यार्थी कक्षात भाऊरावांची राहण्याची व्यवस्था केली.
X X
तीन महान व्यक्तींचा जीवनावर प्रभाव:
कोल्हापूर शिक्षण घेत असताना तीन महान व्यक्तींचा त्यांच्या मनावर फार खोलवर परिणाम झाला होता. त्या व्यक्ती म्हणजे म. फुले, राजर्षी शाहू महाराज व राष्ट्रपिता म. गांधी. या तीन व्यक्तींमुळेच भाऊरावांच्या अंतःकरणात समाजसेवेचे शुद्ध बीज अंकुरित झाले.
शिक्षण हाच सर्व सुधारणांचा पाया आहे अशी त्यांची खात्री झाली. शिक्षणाच्या अभावामुळेच आपली पीछेहाट झाली आहे याची त्यांना अगदी तरुणवयातच जाणीव झाली.
1909 मध्ये त्यांनी काही मित्रांच्या सहकार्याने वाळवे तालुक्यातील दुधगाव येथे 'दुधगाव विद्यार्थी आश्रम' ही छोटीशी संस्था काढली व भाऊरावांच्या शैक्षणिक कार्यास प्रारंभ झाला. त्यांनी स्थापन केलेल्या या आश्रमात मराठा, महार, मुसलमान, मांग वगैरे सर्व जातींच्या विद्यार्थ्याची राहण्याची व अभ्यासाची सोय होती.
यानंतर असाच प्रयोग काले, ता. कऱ्हाड व नेर्ले ता. वाळवा याठिकाणी भाऊरावांनी केला.
प्रत्येक घरातून दररोज मूठभर धान्य घेऊन त्यांनी ते वसतिगृहातील विद्यार्थ्यांना दिले.
इस्लामपूर येथे एक अस्पृश्य विद्यार्थी शाळेच्या वर्गाच्या बाहेरच बसून शिक्षण घेताना दिसला. तो अस्पृश्य असल्याने त्याला वर्गाबाहेर बसवलेले होते हे त्यांच्या लक्षात आले. भाऊरावांनी त्या विद्यार्थ्यास कोल्हापुरात नेले व 'मिस क्लार्क होस्टेल'मध्ये दाखल केले. हा विद्यार्थी म्हणजे ज्ञानदेव घोलप होय, जो पुढे मुंबई कायदे मंडळाचा सदस्य झाला व 'मूकनायक' या पत्राचा संपादक झाला होता.
X X
रयत शिक्षण संस्थेची स्थापना :
काले या सातारा जिल्ह्यातील कऱ्हाड गावाजवळ 1919 मध्ये सत्यशोधक परिषदेचे अधिवेशन भरले होते.
ग्रामीण जनतेच्या शिक्षणासाठी शिक्षण संस्था स्थापन करावी अशी सूचना भाऊरावांनी त्या परिषदेत केली होती व ती मान्यही झाली.
दीन, दलित, बहुजन समाजातील मुलांना शिक्षण दिले पाहिजे असा विचार त्यांनी मांडला होता. शेतकरी म्हणजे रयत.
रयतेला शिक्षण देण्यासाठी संस्था 5 ऑक्टोबर 1919 मध्ये काढली म्हणून 'रयत शिक्षण संस्था' हे नाव देण्याचे सर्वानुमते ठरले.
X X
संस्थेची उद्दिष्टे:
1) मागासलेल्या जातींत शिक्षणाची अभिरुची उत्पन्न करणे.
2) मागासलेल्या जातींतील अत्यंत गरीब विद्यार्थ्यांना शक्य तर मोफत शिक्षण देणे.
3) सामान्य स्थितीतील विद्यार्थ्यांनी स्वखर्चाने किंवा निम्या खर्चाने संस्थेत शिक्षणासाठी ठेवणे.
4) ज्यांची सांपत्तिक स्थिती चांगली त्यांनी स्वतःच्या खर्चाने संस्थेत राहणे.
5) मुले काटकसरीने नियमित, स्वावलंबी, उद्योगी, उत्साही, शीलवान बनविणे.
संस्थेच्या अद्ययावत घटनेनुसार संस्था राजकारणापासून अलिप्त राहील, शिक्षण शक्य तेवढे मोफत राहील असेही स्पष्ट केले आहे.
भारतातील विशेषत: महाराष्ट्रातील भावी पिढ्यांना पूर्व प्राथमिक, प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षण देणे त्यामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, तांत्रिक, शेतीविषयक व व्यापारविषयक, औद्योगिक व शरीरसंवर्धनात्मक बाबींचा उल्लेख असेल असे संस्थेच्या घटनेत ध्येयधोरणाबाबत म्हटले आहे.
X
X
श्रम, स्वावलंबन व समता या 3 तत्त्वांवर त्यांच्या शैक्षणिक कार्याचा वटवृक्ष आधारलेला होता. शिक्षणामध्ये शारीरिक श्रमाची प्रतिष्ठा प्रस्थापित करण्याचा यशस्वी प्रयत्न भाऊरावांनी केला.
कामापाठोपाठ पैसा येतो, विद्यार्थ्यांनी शिक्षण घेताच काम केले पाहिजे व त्यातून शिक्षणाचा खर्च भागविला पाहिजे असे ते म्हणत. ज्याच्या हाताला घट्टा व चट्टा नाही तो स्वावलंबी विद्यार्थी नव्हे असे भाऊराव म्हणत.
संस्थेचा दैनंदिन कारभार पाहणे शक्य व्हावे म्हणून त्यांनी किर्लोस्कर कारखान्यातील नोकरीचा राजीनामा दिला. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना भोजन, पुस्तके, वह्या, पाटी हा खर्च भागवण्यासाठी लोकांचा सहभाग व आस्था मिळवण्याचा प्रयत्न केला.
गावागावांतून, घराघरांतून त्यांनी मुष्टी फंड योजना सुरू केली.
प्रत्येकाच्या घरातील जात्यावर एक पिशवी टांगलेली असे. धान्य दळायला बाई बसली की त्या पिशवीत मूठभर धान्य टाकावयाचे. आठवड्याच्या शेवटी वसतिगृहातील विद्यार्थी त्या पिशवीतील धान्य एकत्र जमा करत.
सुगीच्या दिवसांत वसतिगृहातील विद्यार्थी व शिक्षक खळ्यांवर जाऊन धान्य गोळा करीत तसेच जमिनीचा सारा वसूल करताना शाळेकरिता देणगी गोळा केली जाई.
लग्नसोहळा असेल तेथेही शाळेसाठी पावती फाडली जाई व अशा प्रकारे लोकसहभागातून संस्थेचा खर्च भागविला जाई. दुधगाव, काले व नेलें या 3 ठिकाणी प्रथम जी वसतिगृहे स्थापन केली होती. त्यांच्या खर्चासाठी म्हणून त्यांनी प्रसंगी आपली पत्नी लक्ष्मी हिचे मंगळसूत्र विकले होते.
1923 च्या 'सा. प्रबोधन' मधून 'कुन्हाड' या नावाचे साप्ताहिक काढण्याची घोषणा भाऊराव पाटील यांनी केली होती. त्यात ते स्वतःला 'कुन्हाडीचा दांडा' म्हणून घेत होते. पण या पत्राचे अंक उपलब्ध नाहीत. ते अल्प काळातच बंद पडले.
X X
रयत शिक्षण संस्थेचा विस्तार :
1919 मध्ये रयत शिक्षण संस्थेची स्थापना झाली असली तरी आपल्या कार्यास व्यापक रूप देण्यासाठी म्हणून 1924 मध्ये भाऊरावांनी सातारा येथे सर्व धर्माच्या, पंथाच्या व जातीच्या विद्यार्थ्यांसाठी एक वसतिगृह काढले.
राष्ट्रपिता म. गांधींनी या वसतिगृहास 1927 मध्ये भेट दिली होती. वसतिगृहात स्पृश्य-अस्पृश्य विद्यार्थी व हिंदू-मुस्लिम विद्यार्थी एकत्र राहतात हे पाहून गांधीजींना आनंद वाटला होता.
म. गांधींची रयत शिक्षण संस्थेला भेट ही अनेक दृष्टीनी क्रांतिकारक ठरली. गांधीजींनी सातारा येथील वसतिगृहास 1934 मध्ये हरिजन सेवक वेल्फेअर फंडातून तीन वर्षे अनुदान दिले होते.
भाऊरावांच्या पत्नीनेही वसतिगृहाच्या कामात लक्ष देण्याचे ठरविले. पुढे तर त्यांच्या पत्नीने आपले सर्व जीवनच संस्थेसाठी व्यतीत केले.
1932 मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांनी 'युनियन बोर्डिंग हाऊस' या नावाने वसतिगृह पुणे येथे फर्ग्युसन टेकडीच्या मागे असलेल्या वडार वस्तीजवळ झोपड्या बांधून सुरू केले.
4 एप्रिल 1933 रोजी बडोद्याचे संस्थानिक सयाजीराव महाराज गायकवाड हे सातारा येथे आले तेव्हा शाहू बोर्डिंगला भेट दिली.
महाराजांनी विद्यार्थ्यांची विचारपूस केली. तेथील भाकर व पिठले याचा आस्वादही घेतला. ते स्वतः शिक्षणाचे चाहते होते. त्यांनी भाऊरावांना 4000 रु. चा चेक दिला व त्यातून बहुजन समाजाला महागडे इंग्रजी शिक्षण मोफत मिळाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
शाहू बोर्डिंगमध्ये गायकवाडांचा सत्कार झाला होता.
1935 मध्ये सिल्व्हर ज्युबिली रुरल ट्रेनिंग कॉलेज त्यांनी सातारा येथे सुरू केले. 'म. फुले अध्यापक विद्यालय' हे त्या विद्यालयाचे नाव होते. हे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील पहिले खासगी अध्यापक विद्यालय होय.
1922 मध्ये सातारा जिल्ह्यातील अंगापूर येथे प्राथमिक शिक्षकांची एक परिषद भरली होती. शिक्षणमहर्षी भाऊराव पाटील हे त्या परिषदेचे अध्यक्ष होते.
X X
त्यांनी अध्यापक विद्यालयाचे महत्त्व सांगताना म्हटले होते, 'शास्त्रशुद्ध अशा योग्य पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षण मिळाले पाहिजे, शिकवण्याची शिक्षकांना योग्य दिशा मिळाली पाहिजे. त्याकरिता मी लवकरच ट्रेनिंग कॉलेज सुरू करणार आहे.' पण प्रत्यक्षात हे कॉलेज 1935 मध्ये अस्तित्वात आले.
1940 मध्ये रयत शिक्षण संस्थेच्या वतीने पहिले माध्यमिक विद्यालय 'महाराजा सयाजीराव गायकवाड फ्री ॲण्ड रेसिडेन्शियल हायस्कूल' सुरू झाले. त्यासाठी फलटणचे राजेसाहेब श्रीमंत मालोजीराव नाईक निंबाळकर यांनी 10 एकर जमीन, एक बंगला व रोख 5000 रु. देणगी दिली होती.
सातारा येथे रावबहादूर रा. रा. काळे यांच्या नावाने त्यांनी 1936 मध्ये पहिली शाळा सुरू केली.
1938 मध्ये रयत शिक्षण संस्थेतर्फे पहिली व्हॉलंटरी प्राथमिक शाळा डोंगराळ भागातील यवतेश्वर या खेडेगावी सुरू केली.
संस्थेतर्फे 572 प्राथमिक शाळा डोंगराळ व दुष्काळी भागांत सुरू केल्या.
1942 मध्ये जिजामाता अध्यापिका विद्यालय सुरू केले.
1947 मध्ये सातारा येथे महाराष्ट्राचे दैवत शिवाजी महाराजांच्या नावाचे उच्च शिक्षण देणारे मुंबई प्रांतातील ग्रामीण भागातील पहिले महाविद्यालय सुरू केले.
1954 मध्ये संत गाडगे महाराज यांच्या नावाने कराड या तालुक्याच्या ठिकाणी दुसरे महाविद्यालय सुरू केले.
1955 मध्ये मौलाना आझाद यांच्या नावाने सातारा येथे सेकंडरी टीचर्सना प्रशिक्षित करण्यासाठी बी.एड. कॉलेज सुरू केले.
यशवंतराव चव्हाण यांच्या वडिलांच्या नावे विटा जि. सांगली येथे बळवंत महाविद्यालय सुरू केले आहे.
भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा व महाविद्यालयांमध्ये 'कमवा व शिका' (स्वावलंबी शिक्षण योजना) योजना सुरू करून श्रमप्रतिष्ठेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले. स्वावलंबी शिक्षण योजना हा प्रयोग देशात पहिलाच असावा.
सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सोलापूर, बेळगाव, पुणे, ठाणे, रायगड, मुंबई, अहमदनगर, नाशिक, बीड या 14 जिल्ह्यांत संस्थेचा शाखाविस्तार झालेला आहे.
X
X
रयत शिक्षण संस्थेची आज 320 हायस्कूल्स, 29 महाविद्यालये, 572 प्राथमिक शाळा व वसतिगृहे आहेत.
रयत शिक्षण संस्था, सातारा ही फक्त महाराष्ट्रात किंवा भारतातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे असे नव्हे तर संपूर्ण आशिया खंडात एवढी मोठी शाखात्मक विस्तार असलेली संस्था नाही.
सातारा येथे संस्थेची कार्यालयाची वास्तू 5 मजली आहे. या वास्तूमध्ये संस्थेची सर्व कार्यालये असून बाहेरगावांहून येणाऱ्या सेवकांच्या निवासाची सर्वसोयींनी युक्त अशी सोय आहे.
X X
रयत शिक्षण संस्थेचे अनुदान बंद :
म.गांधी यांच्या हत्येनंतर सातारा येथे गांधीजीना श्रद्धांजली वाहण्यासाठी झालेल्या सभेत तत्कालीन मुख्यमंत्री बाळासाहेब खेर यांच्याविरोधात अपशब्द काढले म्हणून श्री. खेर यांनी भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेचे अनुदान 1948 मध्ये बंद करायचा निर्णय घेतला होता.
अत्यंत परिश्रमाने वाढवलेली रयत शिक्षण संस्था बंद पडण्याचा धोका निर्माण झाला. मोरारजी देसाई (मुंबई प्रांताचे तेव्हाचे गृहमंत्री) यांनीही भाऊरावांचा एका सभेत 'सैतान' म्हणून उल्लेख केला होता.
भाऊराव पाटील यांनी म्हटले होते की, "जनतेच्या सहकार्यावर अनुदान बंद झाले असतानाही आपण रयत शिक्षण संस्था चालूच ठेवू."
त्यांनी स्वतः तसेच शंकरराव मोरे, केशवराव जेधे, बापूजी साळुंखे आदींनी महाराष्ट्रात झंझावाती दौरा करून रयत शिक्षण संस्थेसाठी देणग्यांच्या रूपाने पैशाचा पाऊसच पाडला.
भाऊरावांनी आपली बाजू जनतेपुढे मांडली. 52 दिवसांत 53000 रु. संस्थेला देणगी मिळाली. शेवटी 30 जानेवारी 1949 रोजी रयत शिक्षण संस्थेचे अनुदान सरकारने सुरू केले.
X X
शिक्षणासंबंधीचे चिंतन:
भाऊराव पाटील यांनी शिक्षणासंबंधी चिंतन करुन स्वतःची मते मांडली .
1) शिक्षण साध्य नसून एक साधन आहे. शिक्षणातून नवचैतन्य, नवसंस्कृती, नवमानव व नवसमाज निर्माण झाला पाहिजे.
2) शिक्षण हे माणसाच्या जीवनाचा पाया आहे. मानवजातीच्या उत्कर्षाचे ते एक प्रभावी साधन आहे. मानवाच्या अवनतीचे कारण हे शिक्षणाच्या अभावात आहे. प्रभावी शिक्षण हे बलशाही राष्ट्र निर्माण करू शकते.
3) शिक्षण घ्या, शहाणे व्हा, पालकांचे दारिद्र्य आड येऊ देऊ नका, घाम गाळून शिका, समाजाच्या उपयोगासाठी शिका.
4) शिक्षक हा खेड्याचा आदर्श ग्रामसेवक आणि प्रभावी ग्रामनायक असला पाहिजे. केवळ डिगऱ्यांचे ओझे वाहणारा शिक्षक त्यांना नको होता. खेड्यापाड्यांत काम करू इच्छिणारा, कर्तव्यनिष्ठ, मन व मनगट मजबूत असलेला, बहुजनांना ज्ञान देण्याच्या ध्येयाने प्रेरित झालेला शिक्षक त्यांना अभिप्रेत होता. शाळा ही शिक्षकाची पोट भरण्याची जागा नाही. तर अज्ञानी मुलांना नव विचारांचे पाठ देणारी ती एक जागा आहे असे ते म्हणत.
5) शिक्षण हे माणसाच्या विकासाचे मूळ साधन आहे. शिक्षणामुळे माणूस बहुश्रूत होतो.
6) 'स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद' हे रयत शिक्षण संस्थेचे ब्रीद होते. श्रम हीच आमची पूजा आणि श्रमांच्या मोबदल्यात मोफत शिक्षण हेच आमचे घोषवाक्य, समाजाच्या खालच्या थरापर्यंत शिक्षणप्रसार करणे हेच माझे जीवित ध्येय आहे. असे ते म्हणत.
7) शिक्षण संस्थेतून बाहेर पडणारे विद्यार्थी, सुसंस्कृत चारित्र्यवान व जबाबदार नागरिक बनले पाहिजेत. प्रभावी शिक्षण हे बलशाही राष्ट्र निर्माण करू शकते. म्हणून शिक्षण हे सुलभतेने गरीब विद्यार्थ्यांना देणे ही फार मोठी राष्ट्रीय गरज आहे. प्रत्येक खेड्यात शाळा असलीच पाहिजे असे ते म्हणत.
8) कोणाचेही मिंधेपण न स्वीकारता, लाचारी न पत्करता मनगटाच्या जोरावर काम करून स्वावलंबनातून शिक्षण घ्या. Earn while you Learn या तत्त्वाचा विद्यार्थ्यांनी अवलंब करावा.
9) पददलित समाज सुशिक्षित झाल्याशिवाय आपल्यात खरे स्थैर्य येणार नाही.बहुजन समाजामध्ये बहुसंख्येने असलेला शेतकरी व कामगार यांना ज्ञानाची संजीवनी दिल्याशिवाय खराखुरा समाजवाद देशात येणार नाही. राष्ट्राच्या उत्कर्षाचा मूळ पाया शिक्षण आहे. विद्यामंदिरे व शिक्षण संस्था ही पोट भरण्याची साधने न होता ती विचारांची व विकासाची उगमस्थाने झाली पाहिजेत.
10) समाजाची सर्वांगीण प्रगती हा शिक्षणाचा हेतू आहे. राष्ट्रप्रेम, समता, बंधुत्व व स्वावलंबन या गुणांची वाढ होणारे शिक्षण विद्यालयातून मिळाले पाहिजे. विद्यार्थी हा समाजाचा एक घटक आहे, एक नागरिक आहे, समाजाची बांधीलकी मानणारा नागरिक शिक्षणातून तयार झाला पाहिजे.
11) 'जसा शिक्षक तसा विद्यार्थी' असे ते म्हणत. शिक्षणामध्ये शिक्षक हा केंद्रबिंदू आहे. शिक्षकाच्या चालण्याचा, बोलण्याचा, वागण्याचा विद्यार्थ्यांवर प्रभावी प्रभाव पडतो.
X X
वसतिगृहातील विद्यार्थ्यांसाठी नियम:
1) विद्यार्थी ज्ञानाची अभिलाषा धरणारा असावा.
2) विद्यार्थ्यांनी स्वावलंबनाची आवड असावी.
3) विद्यार्थ्याने जातपात, धर्म, पंथ, गरीब-श्रीमंत आदी भेद पाळू नयेत.
4) विद्यार्थ्यांनी राहणी साधी ठेवावी, तो रूढीप्रिय असू नये.
5) विद्यार्थ्याने अस्पृश्यता मानता कामा नये, त्याच्या ठिकाणी भ्रातृभाव असावा.
6) विद्यार्थी चारित्र्यसंपन्न, सद्गुणी असावा. त्याचे वर्तन स्वाभिमानाचे असावे.
X X
'स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद' हे रयत शिक्षण संस्थेचे बोधवाक्य होते. पहाटे 4:30 ते रात्री 10:30 पर्यंत वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी कोणते वेळापत्रक पाळावे याचे नियम केले होते.
विद्यार्थ्यांनी पहाटे/सकाळी झोपू नये. या वेळात तुम्ही झोपाल तर तुमचे नशीबही कायमचे झोपेल असे ते म्हणत.
वसतिगृहातील विद्यार्थ्यांना कोणतेही व्यसन लागू नये याबाबत ते दक्ष असत.
भाऊराव पाटील यांचे शैक्षणिक तत्त्वज्ञान त्यांनी शाळा, महाविद्यालये व वसतिगृहे यात केलेल्या प्रयोगातून निर्माण झाले आहे. त्यांचे तत्त्वज्ञान हे मानवतावादावर आधारलेले होते.
वसतिगृहयुक्त शाळा हा त्यांच्या शैक्षणिक कार्याचा कणा होता. जातिभेद नष्ट करणे, संस्कारांची देवाण-घेवाण, समाजात एकजिनसीपणा निर्माण करणे, श्रमाची प्रतिष्ठा वाढविणे, राष्ट्रीय वृत्ती जोपासणे यासाठी वसतिगृहासारखे साधन नाही असे ते म्हणत.
X X
प्रभावी व्यक्तिमत्व व व्यक्तिवैशिष्ट्ये :
भाऊरावांची राहणी अत्यंत साधी होती. 1910 पासून भाऊरावांनी खादीचे कपडे स्वीकारले व अखेरपर्यंत पालन केले.
त्यांचे वर्षाचे कपडे म्हणजे चार नेहरू शर्ट चार धोतरे, दोन पंचे, खांद्यावर घोंगडी असे. हातात काठी असे. भव्य देहयष्टी, छातीवर रूळणारी पांढरी शुभ्र दाढी, प्रभावी व्यक्तिमत्त्व, पहाडी आवाज, अमोघ वक्तृत्व ही त्यांची वैशिष्ट्ये होती.
1910 मध्ये म. गांधीजींच्या उपस्थितीत स्वदेशी प्रचाराच्या एका कार्यक्रमात त्यांनी अंगावरील परदेशी कपड्याची होळी केली व खादीचे कापड वापरण्याची व अनवाणी फिरण्याची शपथ घेतली होती.
X X
सन्मान व पुरस्कार :
1.भारत सरकारने 26 जानेवारी 1959 रोजी त्यांना 'पद्मभूषण' ही पदवी दिली; पण भाऊरावांनी तेव्हा म्हटले होते, 'मला जनताजनार्दनाने दिलेली 'कर्मवीर' ही पदवी त्याहून श्रेष्ठ आहे.' ते आपल्या नावाखाली 'रयतसेवक' अशी पदवी लावत. शिक्षणाला एक नवी दृष्टी भाऊरावांनी दिली. 'श्रम करा व शिका', 'स्वावलंबी शिक्षण' हे त्यांच्या शिक्षणकार्यातील नवे तत्त्वज्ञान होते. शिक्षणाच्या आड गरिबी येत नाही हा एक नवा विचारच त्यांनी आपल्या कार्यातून मांडला.
2.पुणे विद्यापीठाने D. Litt ही पदवी भाऊराव पाटील यांना गव्हर्नर श्री. प्रकाश यांच्या हस्ते दिली. ही पदवी देण्यासाठी ससून हॉस्पिटलमध्ये कुलगुरू रँग्लर परांजपे व विद्यापीठाचे रजिस्ट्रार गेले होते.
अनेक स्थानिक स्वराज्यसंस्थांनी भाऊराव पाटील यांना मानपत्र देऊन व सत्कार करू त्यांचा गौरव केला होता.
X X
संस्थेसाठी मिळालेल्या देणग्या:
1. बडोद्याचे संस्थानिक सयाजीराव महाराज गायकवाड हे सातारा येथे आले.त्यांनी भाऊरावांना 4000 रु. चा चेक दिला व त्यातून बहुजन समाजाला महागडे इंग्रजी शिक्षण मोफत मिळाले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त केली.
2. 1959 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील जनतेने 1 लक्ष देऊन त्यांचा गौरव केला.
3. किर्लोस्कर ब्रदर्स लि. किर्लोस्करवाडी, जि. सांगली या कारखान्यातील कामगारांनी इ.स. 1952 मध्ये भाऊरावांना रु. 25000/- ची थैली देऊन त्यांचा सत्कार केला.
4. कोल्हापूर येथील व्यापाऱ्यांनी भाऊरावांना 25000/- ची थैली देऊन त्यांचा सत्कार केला.
5. फलटणचे राजेसाहेब श्रीमंत मालोजीराव नाईक निंबाळकर यांनी 10 एकर जमीन, एक बंगला व रोख 5000 रु. देणगी दिली
6.भारत सेवक समाजाचे अग्रणी पूज्य ठक्करबाप्पा यांनी भाऊराव पाटील यांच्या संस्थेला तेव्हा 500 रु. देणगी दिली.
X X
मुलांना परदेशी शिक्षण:
भाऊरावांनी अनेक मुले शिक्षणासाठी परदेशांत पाठविली. परदेशांत विद्याविभूषित होऊन आलेले विद्यार्थी पुन्हा संस्थेमध्ये काम करू लागले.
बॅ. पी.जी. पाटील यांना बॅरिस्टर होण्यासाठी त्यांनीच इंग्लंडला पाठविले होते. बी.ए. बागवान, बी.के. पाटील, एस.बी. चव्हाण, मेघाजीराव कांबळे, ए.डी. आत्तार, ए.के. उनवणे वगैरेंना त्यांनी उच्च शिक्षणासाठ परदेशांत पाठविले होते.
X X
निधन:
भाऊराव पाटील यांना रक्तदाबाचा आजार होता व उपचारांसाठी 1944 मध्ये मुंबईत हॉस्पिटलमध्ये होते. ते आपल्या प्रकृतीकडे फारसे लक्ष देत नसत. थोडीशी प्रकृती बरी झाली की ते पुन्हा कामाला लागत. अखेर थोर शिक्षण महर्षि कर्मवीर भाऊराव पाटील यांचे 9 मे 1959 रोजी पुण्यात निधन झाले.
X X
अभिप्राय व मान्यवरांची मते :
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारखा लोकोत्तर पुरुष 100-150 वर्षांत झाला नाही. ग्रामीण भागातील शिक्षणाची गरज त्यांनी 100 वर्षांपूर्वीच ओळखली होती.
पंडित नेहरूंच्या मते, 'कर्मवीर भाऊराव पाटील यांनी महाराष्ट्राच्या शैक्षणिक जगतात फार मोठी क्रांती केली आहे. श्रमातून शिक्षण प्राप्त करण्याचा महान मूलमंत्र त्यांनी जनतेला दिला व मानवी समतेचा दिव्य आदर्श जनतेपुढे ठेवला. '
यशवंतराव चव्हाण यांच्या मते, 'जनता शिक्षणाचा नवा पायंडा पाडून बहुजन समाजात शिक्षणाने सांस्कृतिक क्रांती घडवून आणणे हे त्यांचे ध्येय होते. सामर्थ्यवान व गुणवत्तेने युक्त अशी माणसे तयार करण्यासाठी तळमळीने प्रयत्न केले.'
यशवंतराव मोहिते यांच्या मते, 'शिक्षणप्रसाराचे काम करताना या संस्थेने विद्याप्रसारात नवीन आदर्श निर्माण केले आहेत.'
नरहर कुरुंदकर यांच्या मते, 'समाज शिकवणे, जागा करणे, हलविणे, त्यांच्यात सामाजिक व राजकीय नेतृत्व निर्माण करणे असे समाजपरिवर्तनाचे काम भाऊराव पाटील यांनी केले आहे. '
क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या मते, 'भाऊरावांनी बहुजन समाजाची प्रामाणिकपणे सेवा केली. जातिभेद तोडून टाकण्याची शिकस्त केली. समाजावर ज्ञानामृताचा वर्षाव केला.'
आचार्य प्र. के. अत्रे यांच्या मते, 'श्रम, स्वावलंबन व समता या तीन तत्त्वांवर भाऊरावांचे जनता शिक्षणाचे कार्य आधारलेले होते.'
ना.ग. गोरे (समाजवादी पक्ष नेते) यांच्या मते, 'कर्मवीर भाऊराव पाटील म्हणजे महाराष्ट्राला लाभलेले विश्वामित्र होत. शून्यातून ब्रह्मांड निर्माण करण्याची करामत भाऊरावांनी करून दाखवून महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेवर अनंत उपकार केले आहेत.'
ह. रा. महाजनीच्या मते, 'भाऊराव पाटील हे महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टनच होत.'
X X
https://gyaaniinfo.blogspot.com/2024/08/september-22-day-of-special-dinvishesh.html
👆
September 22- Day of Special (Dinvishesh)
सप्टेंबर 22 : दिनविशेष
View, comments and Share
7 Comments
Nice sir
ReplyDeleteNice
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteUseful information
ReplyDeleteNice
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteVery nice information 😊
ReplyDelete