सातवाहनकालीन सामाजिक, आर्थिक, धार्मिक जीवन व साहित्य आणि शासन पद्धती
सातवाहनकालीन सामाजिक जीवन:
शुंग, कण्व, सातवाहन, वाकाटक व कदंब हे राजवंश ब्राह्मण जातीचे होते.
सातवाहन कालखंडात वर्णव्यवस्था प्रचलित होतीच व या वर्णव्यवस्थेत ब्राह्मणांचा दर्जा श्रेष्ठ होता.
ब्राह्मणांची वेदाभ्यास, यज्ञ, धर्मोपदेश ही कामे होती तर क्षत्रियांची कामे शस्त्रग्रहण व प्रजारक्षण होते. व्यापार, सावकारी व शेती या व्यवसायात वैश्य होते.
ख्रिस्तपूर्व चौथ्या शतकापासून यवन, शक, पल्लव, कुशाण, हूण इ. परकियांची आक्रमणे भारतावर झाली. त्यांनी भारताच्या काही भागांत राज्ये स्थापन केली व ते भारतीय समाजात मिसळून गेले.
ब्राह्मण जातीच्या गौतमीपुत्र सातकर्णीने शक क्षत्रप रुद्रदामनची कन्या त्यांचा पुत्र वशिष्ठीपुत्र सातकर्णीला करून घेतली होती.
ब्राह्मणांचा परकियांशी वर्णसंकर झाला; परंतु त्यामुळे वर्णव्यवस्थेतील सातवाहनांचा दर्जा कमी झाला नाही.
सातवाहन कालखंडात आश्रमव्यवस्थेलाही महत्त्व होते. संयुक्त कुटुंबपद्धती अस्तित्वात होती. सातवाहन काळात सतीची पद्धत होती काय निश्चित सांगता येत नाही. पडदा पद्धत अस्तित्वात नसावी. कारण अमरावती (आंध्र प्रदेश) येथील शिल्पपट्ट्यात स्त्रियांना सार्वजनिक चैत्यगृहात पूजा करताना, वादविवादात, वाद्यात भाग घेताना दाखवले आहे.
विविध केशरचनेचे उल्लेख 'गाथा सप्तसई' या ग्रंथात आहे. स्त्रिया काजळ, चंदनलेप, सुगंधी लेप व चूर्ण लावून व पुष्पालंकार वापरून सुंदर दिसण्याचा प्रयत्न करीत.
सातवाहन राजे व पश्चिमी क्षत्रपांची जी शिल्पे उपलब्ध आहेत त्यावरून पाटलोण, कोट, लांब ओव्हरकोट, टोपी, पगडी ही तत्कालीन वेशभूषा होती.
स्त्रियांप्रमाणे पुरुषही अलंकार वापरत. पैंजण, कर्णफुले, बाहूवद, केयूर, कंगण, अंगठ्या, मोती किंवा रत्नाचे कमरपट्टे वगैरे स्त्रियांचे अलंकार होते.
सातवाहन काळात विविध प्रकारचे खेळ, उत्सव, नृत्य, गीत, वाद्य, द्यूत वगैरे करमणुकीचे प्रकार प्रचलित होते.
तत्कालीन धनिकांचे जीवन समृद्ध, सुसंस्कृत व सुखी होते याची कल्पना 'मृच्छकटिका'तील वसंतसेनेच्या वाड्यावरून येते.
X X
सातवाहनकालीन आर्थिक स्थिती:
सातवाहनांचा कालखंड आर्थिकदृष्ट्या अत्यंत वैभवाचा कालखंड होय.
पशुपालन, व्यापार हे सातवाहन काळातील प्रमुख व्यवसाय होते.
देशांतर्गत व परदेशी व्यापार हे सातवाहनांचे एक खास वैशिष्ट्य होते.
सातवाहन काळात तेर, नाशिक, जुन्नर, भोकरदन, पैठण, कराड, वैजयंती, नेवासे व कोल्हापूर इ. महत्त्वाची व्यापारी केंद्रे होती ती मोठमोठ्या व्यापारी केंद्रांशी व्यापारी बंदरांशी जोडली गेली होती.
भडोच, कल्याण, सोपारा, डहाणू ही व्यापारी बंदरे होती. या बंदरातून इजिप्त, इटाली, ग्रीस इ. देशांचा व्यापार चाले.
सातवाहन कालखंडात भारतातून तिळाचे तेल, साखर, प्राण्यांची कातडी, रेशमी वस्त्रे, मलमल, वेलदोडे, मसाल्याचे पदार्थ, हिरे, माणिक, मोती इ. वस्तूंची निर्यात होई तर आयातीत रोमन मद्य, तांबे, कथील, शिसे, काच, औषधी मलमे, हस्तिदंताच्या वस्तु, रोमन भांडी, रोमन दिवे, ब्राँझचे पुतळे आदींचा समावेश होता.
रोमन मद्यकुंभाचे अवशेष कोल्हापूर, नेवासे, तेर व पवनार येथे सापडले आहेत.
आंतरराष्ट्रीय व्यापार भारतास फारच फायद्याचा होता. कारण आयात कमी व निर्यात जास्त होती. परिणामा विदेशी संपत्तीचा ओघ भारताकडे येत होता.
सातवाहन सम्राटांना जमिनीचा सारा वस्तूंवर कर, जकात, अपराधी व्यक्तीवरील दंड, व्यापारी व धंदेवाइकावरील कर आदींपासून उत्पन्न मिळे.
सातवाहन काळात हल्लीप्रमाणेच भात, गहू, ज्वारी, ऊस, कडधान्ये, कापूस व गळिताची धान्ये इ. पिके घेतली जात.
सातवाहनकाळात व्यापार हा मुख्यतः श्रेणीच्या द्वारे केला जाई. धान्याचे व्यापारी, सुंगधी पदार्थाचे व्यापारी, पाथरवट, कुंभार, सोनार, विणकर इ. व्यावसायिकांच्याही श्रेण्या (Guilds) होत्या.
सातवाहनांचे साहित्याच्या क्षेत्रातील योगदान :
सातवाहन काळात विपुल साहित्यनिर्मिती झाली.
सातवाहन काळात जनसामान्यांची व राजदरबाराची भाषा प्राकृत होती.
सातवाहन राजा हाल याने 'गाथासप्तसई' हा प्राकृत भाषेतील ग्रंथ लिहिला.
राजा हाल याने १ कोटी गाथांमधून ७०० गाथा निवडून तो संग्रह प्रसिद्ध केला. हा ग्रंथ केव्हा लिहिला गेला याबाबत इतिहासकारांत मतभेद आहेत.
या ग्रंथातील काही गाथांची रचना स्त्रियांनी केली आहे. 'गाथासप्तसई' हा लोकगीतांचा संग्रह लोकपरंपरेशी अति प्रामाणिक असून त्यामध्ये लोकमताचे प्रतिबिंब उमटले आहे.
सातवाहन राजा हाल याच्या दरबारात अनेक कवी होते. त्यापैकी पालित्त, पोट्टिस, नंदिवृद्ध हे प्रसिद्ध होते.
आठ्यराज हा कवीही सातवाहनांच्या दरबारात होता.
सातवाहनकालीन विख्यात ग्रंथ म्हणजे 'बृहत्कथा' होय. हा ग्रंथ आज उपलब्ध नसला तरी त्याची फक्त रूपांतरे व त्यावर आधारित असे काही ग्रंथ उपलब्ध आहेत.
गुणाढ्याचा काळ व त्यास मिळालेला राजाश्रय याबाबत इतिहासकारांत मतभेद आहेत.
'बृहत्कथे'ची तीन संस्कृत रूपांतरे उपलब्ध आहेत.
१) सोमदेवाचा 'कथासरित्सागर'.
२) क्षेमेंद्रची 'बृहत्कथा मंजिरी'.
३) भोजाचे 'शृंगारप्रकाश'.
सातवाहनांचे धार्मिक धोरण:
सातवाहन सम्राट हे परधर्मसहिष्णू होते. सातवाहन काळात वैदिक, जैन व बौद्ध या तिन्ही परंपरांना सातवाहन राजांनी आश्रय दिला हे विशेष.
सातवाहनांनी ब्राह्मणवृंद व बौद्ध भिक्षुकांना महसूल व प्रशासकीय अधिकारासह जमिनी दान केल्या हे विशेष होय.
सातवाहन राजे स्वतः हिंदूधर्मीय होते. सातवाहन सम्राट श्री सातकर्णी व त्याची पत्नी नागनिका हिने अनेक श्रोतयज्ञ केल्याचा उल्लेख आहे.
श्री सातकर्णीने अश्वमेध यज्ञ दोनदा केला होता. श्रोतयज्ञाचे अनुष्ठान आणि पौराणिक देवांची पूजा ही संपूर्ण सातवाहन काळातच प्रचलित होती.
नागनिका ही सातवाहनांची राणी व गौतमीपुत्र सातकर्णीची वृद्ध आई गौतमी बलश्री या दोघीही व्रते, यज्ञ तप, नियम, उपवास करत व सत्यवचन, दान, क्षमा, अहिंसा यांचे निष्ठापूर्वक आचरण करत,सातवाहन वंशातील राज्यकर्त्यांनी बौद्ध धर्माला उदार आश्रय दिला होता. केवळ सातवाहन राजे, त्यांचे मांडलिक व सरदार यांनीच बौद्ध धर्माला देणग्या दिल्या असे नव्हे तर महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेनेही बौद्ध धर्माचा पुरस्कार केला होता.
विहार चैत्यगृह कोरणे व त्यासाठी शिल्पी संघाला देणगी देणे हे अत्यंत पुण्यकर्म असून ते करणारा माणूस स्वर्गलोकात आनंदाने राहतो असे अजिंठा येथील लेणी क्र २६ च्या लेखात म्हटले आहे.
सातवाहन काळात हिंदू धर्म व बौद्ध धर्म यांच्यात सामंजस्य व सलोखा झालेला दिसतो.
सातवाहन राजा कृष्ण हा वैदिक धर्माचा अनुयायी होता; पण त्याच्या महामात्राने बौद्ध भिक्षूंकरिता एक लेणे कोरविले होते.
गौतमी बलश्री वैदिक परंपरेचे आचरण करत असली तरी बौद्ध धर्मावर तिची निष्ठा होती. तिने आपला पुत्र सातकर्णी ('वशिष्ठीपुत्र' हे उपपद नावाच्या प्रारंभी लावणारा) याला सांगून नाशिकच्या भिक्षूंना ग्रामदान करविले होते व त्यांच्याकरिता एक विशाल लेणे कोरविले होते.
हिंदू व बौद्ध तत्त्वज्ञानाचे तात्त्विक वाद ग्रंथातून दिसत असले तरी प्रत्यक्ष व्यवहारातून मात्र त्यांच्यात सामंजस्य होते.
सातवाहन राजे प्रामुख्याने वैदिक धर्माचे पुरस्कर्ते होते. ते इंद्र, वासुदेव, सूर्य, चंद्र, शिव, नाग, गौरीची उपासना करत.
परधर्मसहिष्णुता हा सातवाहन सम्राटांचा विशेष होय.
X X
सातवाहनांची शासन पद्धती:
सातवाहनांची शासनपद्धती राजसत्ताक होती. तत्त्वतः सातवाहन सम्राट हे अनियंत्रित असून त्यांनी आपली सत्ता ईश्वरदत्त आहे असा दावा कधीच केला नाही. शास्त्र व रूढी याचा ते नेहमीच मान राखत.
सातवाहनांचा कारभार अगदी साधा असून धर्मशास्त्रांच्या नियमाप्रमाणे तंतोतंत चालत असे.
राजपदाची प्राप्ती पैतृक परंपरेने होई; परंतु राजसत्ता ही निरंकुश नव्हती. तिच्यावर नैतिक बंधने होती.
मौर्याप्रमाणेच सातवाहनांचे शासन श्रेणीबद्ध होते. प्रशासनाच्या सोयीसाठी साम्राज्याची विभागणी अनेक प्रांतांत केली होती. त्यास अग्राहार म्हणत.
आग्राहारावर अमात्याची नेमणूक केली जात असे. अमात्याखेरीज महामात्र, भाडागारिक (कोषाध्यक्ष), दूत वगैरे अधिकाऱ्यांचा उल्लेख शिलालेखात आहे.
तत्कालीन ग्रामीण शासन व्यवस्थेची कल्पना गाथासप्तसईवरून येते.
सातवाहनांच्या काळात महाराष्ट्रात नगरे, व्यापारी केंद्रे भरभराटीस आली होती.
सातवाहनकालीन नगरांमध्ये शासनपद्धती कशा प्रकारची होती याची फारशी कल्पना येत नाही तरी नगरांचा कारभार पाहण्यासाठी निगमसभा असाव्यात.
नगरातील न्यायालय, शिक्षापद्धती यासंबंधीची माहिती शूद्रकाच्या 'मृच्छकटिक' व हालच्या 'गाथासप्तई' वरून येते.
X X
सातवाहनांची नाणी:
सातवाहनांच्या ४६० वर्षांच्या प्रदीर्घ राजवटीत अनेक प्रकारची नाणी चलनात आली.
सातवाहन राजांनी नाण्यासाठी शिसे, तांबे, चांदी व सोने या धातूंचा उपयोग केला. म्हणजेच धातुविविधता हे त्यांच्या नाण्याचे वैशिष्ट्य होय.
नाण्यांच्या आकारही चौकोनी, गोल, पंचकोनी, बदामाच्या आकाराचा, जाड, पातळ, पूर्ण वर्तुळाकार अशा विविध प्रकारचा होता.
त्यांच्या नाण्यांचे लेखविरहित, लेखयुक्त व मुखवटा असणारी अशा तीन गटांत वर्गीकरण करता येते.
सातवाहनांच्या नावावर वृषभ, गज, अश्व, चक्र, कमळ, लक्ष्मी, उज्जैन चिन्ह आदी चित्रे आढळतात.
एकंदरीत सातवाहनकालीन सांस्कृतिक जीवन अत्यंत समृद्ध होते.
2 Comments
Very nice sir
ReplyDeleteNice sirji
ReplyDelete