Mahatma Jyotiba Phule or Jyotirao Phule: Indian Social Activist, Thinker, Anti-caste social reformer and writer
महात्मा जोतीराव गोविंदराव फुले :
पहिली शिवजयंती साजरी करणारे थोर समाजसुधारक, ज्ञानसूर्य शिक्षणाचे जनक, क्रांतिसूर्य
जन्म: 11 एप्रिल
स्मृतिदिन: 28 नोव्हेंबर
X X
महाराष्ट्रातील भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते.
अस्पृश्यता, जातिव्यवस्थेचे निर्मूलन, स्त्रियांना आणि मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे अशा अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी कार्य केले.
महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले हे दोघे भारतातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते आहेत.
जोतिरावांनी 1848 मध्ये पुण्यात तात्यासाहेब भिडे यांच्या निवासस्थानी किंवा भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली.
खालच्या जातीतील लोकांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपल्या अनुयायांसह सत्यशोधक समाजाची स्थापना केली. शोषित वर्गाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या या संघटनेचे भाग सर्व धर्म आणि जातीचे लोक बनू शकत होते.
महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणा चळवळीतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणून फुले यांची ओळख आहे. त्यांना 1888 मध्ये महाराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वांदेकर यांनी सन्माननीय महात्मा (संस्कृत: "महान आत्मा", "पूज्य") पदवी प्रदान केली होती.
महाराष्ट्राला तीन प्रमुख समाजसुधारकांचा वैचारिक वारसा लाभला असल्यामुळे या राज्यास "फुले-शाहू-आंबेडकरांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र" असे म्हणतात.
'शेतकऱ्यांचे आसूड' हा महात्मा फुले यांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. तत्कालीन समाजातील जातिभेद अनिष्ट प्रथा, तसेच समाजातील उच्चवर्णीयांची मक्तेदारी याविरुद्धची प्रतिक्रिया महात्मा फुले यांच्या साहित्यातून उमटलेली होती.
त्याकाळच्या समाजाला प्रबोधनाची व सामाजिक परिवर्तनाची वाट दाखविण्यासाठी त्यांनी लिहिलेले ग्रंथ हे मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरले.
समताधिष्ठित समाजाच्या निर्मितीमध्ये महात्मा फुले यांनी मोलाचे योगदान दिलेले आहे. त्यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी असल्याचे सर्वमान्य आहे.
X X
महात्मा फुले यांचे बालपण आणि शिक्षण :
ज्योतीबा फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील कटगुण हे होते. त्याच गावी महात्मा फुल्यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी झाला.
जोतिबांच्या वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते.
पेशव्यांच्या शेवटच्या काळात महात्मा फुले यांचे वडील आणि दोन चुलते फुले पुरवण्याचे काम करीत होते, त्यामुळे गोरे हे त्यांचे मूळ आडनाव असले तरी, पुढे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले व तेच नाव पुढे रूढ झाले.
कटगुणहून त्यांचा परिवार पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे आला. तेथे घर असून, त्यांच्या नावे सातबाराचा उतारा आहे. खानवडी येथे फुले आडनावाची बरीच कुटुंबे आहेत.
जोतीराव केवळ नऊ महिन्यांचे होते, तेव्हा त्यांच्या आईचे निधन झाले. जोतीबांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी 1840 मध्ये नायगावच्या खंडोजी नेवासे पाटील यांच्या कन्या सावित्रीबाई यांच्याशी झाला. सावित्रीबाई चे वय त्यावेळी नऊ वर्षाचे होते.
प्राथमिक शिक्षणानंतर काही काळ त्यांनी भाजी विक्रीचा व्यवसाय केला. ज्योतिबाची शिक्षणातील प्रगती खूप चांगली होती परंतु त्यांच्या वडिलांनी त्यांचे शिक्षण बंद करून बाग कामात लावले. पण त्यानंतर मुळशी बॅग व लिजिट यांच्या आग्रहामुळे ज्योतिबांचे शिक्षण पुन्हा सुरू झाले. 1842 मध्ये माध्यमिक शिक्षणासाठी पुण्याच्या स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. बुद्धी अतिशय तल्लख, त्यामुळे पाच-सहा वर्षातच त्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला.
ग्रामची या प्रसिद्ध तत्ववेत्त्याने महात्मा फुले यांना 'सेंद्रिय बुद्धिवंत' असे संबोधले आहे. जोतीराव करारी वृत्तीचे होते. त्यांस गुरुजनांविषयी व वडीलधाऱ्या माणसांविषयी फार आदर वाटत असे. ते आपला अभ्यास मन लावून करत असत. परीक्षेत त्यांना पहिल्या श्रेणीचे गुण मिळत असत. शाळेतील शिस्तप्रिय, हुशार विद्यार्थी म्हणून त्यांचा नावलौकिक होता.
त्यावेळी पुण्यात बरेच कबीरपंथी फकीर येत असत. चांगले लिहायला व वाचायला येणाऱ्या जोतीकडून काही कबीरपंथी फकीर रोज महात्मा कबीरांचा 'बीजमती' हा ग्रंथ वाचून घेत असत. त्यामुळे जोतीरावांच्या मनावर कबीराच्या विचारांची शिकवण चांगलीच बिंबली व कबीराचे अनेक दोहे त्यांना पाठ झाले. त्यातील एक "नाना वर्ण एक गाय, एक रंग है दूध, तुम कैसे बम्मन हं, कैसे सूद "
1847 मध्ये थॉमस पेन यांचा "राइट्स ऑफ मॅन" नावाचा ग्रंथ महात्मा फुले यांच्या वाचनात आला. त्यांना हिंदू समाजातील व धर्मातील विषमता ईश्वरनिर्मित नसून मानवनिर्मित आहे हे कळून आले. त्यातून त्यांच्या परांजपे नावाच्या मित्राच्या लग्नात वराती मधून जाताना त्यांना एका सनातनी माणसाने शूद्र म्हणून तिथून निघून जायला सांगितले. या अपमानाने त्यांना जातीयवादाची तीव्रता समजली आणि शूद्रांना शिक्षण देण्याचे विचार त्यांच्या मनात सुरू झाले.
X X
महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य :
महात्मा फुले यांच्या शिक्षणाचे महत्त्व पटवून देणाऱ्या खालील ओळी प्रसिद्ध आहेत:
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
बहुजन समाजाचे अज्ञान, दारिद्ऱ्य आणि समाजातील जातिभेद पाहून त्यांनी ही सामाजिक परिस्थिती सुधारण्याचा निश्चय केला.
त्यांनी 1848 साली पुण्यामध्ये बुधवार पेठेतील भिडे यांच्या वाड्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली मराठी शाळा काढून तेथील शिक्षिकेची जबाबदारी पत्नी-सावित्रीबाईंवर सोपविली. आणि यानंतर जोतीबांनी अस्पृश्यांसाठी शाळा सुरू केल्या.
महात्मा फुलेंनी शिक्षणाची प्रेरणा अहमदनगरच्या मिस फरार यांच्याकडून घेतली होती (मेजर कॅंडी फुलेंच्या शाळेला पुस्तके पुरवत असत).
त्यांनी मुलींच्या शिक्षणासाठी अतोनात प्रयत्न केले. त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्याचं त्याच बरोबर अस्पृश्य मुलांसाठी देखील शाळा सुरू केलीत. महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणाची प्रेरणा मावस बहीण -सगुणाबाई क्षिरसागर यांच्याकडून मिळाली.
जोतीराव जसे सार्वजनिक ठिकाणी उपदेशपर भाषणे करीत, तसेच ते शाळांतील शिक्षकांना आदर्श पाठ देऊन शिक्षकांनी मुलांच्या हिताच्या दृष्टीने योग्य ती साधने नि उपकरणे वापरावी म्हणून शिक्षकांनाही उत्तेजन देत असत.
1852 मध्ये शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्यकर्त्याबद्दल मे. कॅन्डी यांच्या अध्यक्षतेखाली विश्रामबाग वाड्यात महात्मा फुले यांचा जाहीर सत्कार करण्यात आला.
महात्मा फुले यांनी 1851 मध्ये रास्ता पेठ व वेताळ पेठ या ठिकाणी दोन मुलींच्या शाळा सुरू केल्या होत्या .1852 मध्ये पुण्याच्या वेताळ पेठेत अस्पृश्यांच्या मुलांसाठी दोन शाळा उघडल्या होत्या. 1853 मध्ये आपल्या काही मित्रांच्या सहकार्याने "महार, मांग इत्यादी लोकास विद्या शिकविण्याकरिता मंडळी "या नावाची एक संस्था त्यांनी स्थापन केली.
X X
महात्मा फुले यांचे सामाजिक कार्य :
मानवी हक्कावर 1847 मध्ये थॉमस पेन यांनी लिहिलेले पुस्तक ,त्याचा प्रभाव त्यांच्या मनावर झाला.
सामाजिक न्यायाबाबत त्यांच्या मनात विचार येऊ लागले. त्यामुळेच विषमता दूर करण्यासाठी स्त्रीशिक्षण आणि मागासलेल्या जातीतील मुलामुलींच्या शिक्षण यावर त्यांनी भर देण्याचे ठरवले.
सामाजिक भेदभाव त्यामुळे कमी होईल असे त्यांचे निश्चित मत आणि अनुमान होते.
‘कोणताही धर्म ईश्वराने निर्माण केलेला नाही आणि चातुर्वण्य व जातिभेद ही निर्मिती मानवाचीच आहे’ असे रोखठोकपणे बोलताना मात्र या विश्वाची निर्मिती करणारी कोणती तरी शक्ती आहे अशी त्यांची (अस्तिक्यवादी) विचारसरणी होती.
मानवाने गुण्यागोविंदाने रहावे असे त्यांचे मत होते. त्यांनी लिहिलेल्या शेतकऱ्याचा आसूड या पुस्तकातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची विदारक दुर्दशा आणि दारिद्र्याची वास्तवता विशद केली आहे.
या पुस्तकाद्वारे विशाल दृष्टिकोनाचा क्रांतिकारक म्हणूनही जोतीरावांचे दर्शन होते. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व होते.
महात्मा फुलेंनी सामाजिक प्रबोधन करण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड इ. ग्रंथ लिहून सामाजिक प्रबोधन केले.
मूलभूत मानवी हक्कांच्या आधारावरून विश्वकुटुंब कसे निर्माण होईल व त्याकरिता कशा प्रकारचा वर्तनक्रम व वैचारिक भूमिका स्वीकारली पाहिजे हे ज्योतीराव फुलेंनी आपल्या ' सार्वजनिक सत्यधर्म ' संहितेत अनेक वचनांच्या आधारे मांडली आहे.
X X
त्यातील काही महत्त्वाची वचने लिहिली.
1.संसाराविषयी फुले यांचा दृष्टिकोन अर्थातच आशावादी होता. कष्टपूर्वक चालणाऱ्या गृहस्थाश्रमाला ते फार मान देत. कौटुंबिक जीवनाची व समाजाची खरी प्रगती परिश्रमाची वाढ होऊनच होणार आहे. 'कष्टाने जगण्याची ज्यांना धमक नाही, असे लोक संन्यासी व भिक्षुक होतात व प्रपंच खरा नाही, व्य्रर्थ आहे असा भ्रम प्रपंचातील लोकांच्या बुद्धीत उत्पन्न करतात. असे करण्यात त्यांचा आळशी-धूर्तपणाच असतो', असे त्यांचे मत होते.
2.सर्व गावाच्या, प्रांताच्या, देशाच्या, खंडाच्या संबंधात अथवा कोणत्याही धर्मातील स्वतःच्या संबंधात, स्त्री आणि पुरुष या उभयतांनी अथवा सर्व स्त्रियांनी एकमेकात कोणत्याही प्रकारची आवडनिवड (भेदभाव) न करता या भूखंडावर आपले एक कुटंब समजून एकमताने सत्यवर्तन करून राहावे.
3.आपणां सर्वांच्या निर्माणकर्त्याने एकंदर सर्व प्राणिमात्रांना उत्पन्न करतेवेळी मनुष्यास जन्मतःच स्वतंत्र प्राणी म्हणून निर्माण केले आहे आणि त्यास आपापसात साऱ्या हक्कांचा उपभोग घेण्यास समर्थ केले आहे.
4.आपणा सर्वांच्या निर्माणकर्त्याने सर्व मानवी स्त्री - पुरुषांस धर्म व राजकीय स्वतंत्रता दिली आहे. जो आपल्यापासून दुसऱ्या एखाद्या व्यक्तीस कोणत्याही तऱ्हेचे नुकसान देत नाही, अथवा जो कोणी आपल्यावरून दुसऱ्या मानवांचे हक्क समजून इतरांना पीडा देत नाही त्याला 'सत्यवर्तन करणारा' म्हणावे.
5.आपल्या सर्वांच्या निर्मिकाने एकंदर सर्व स्त्री - पुरुषांस एकंदर सर्व मानवी अधिकारांचे मुख्य धनी केले आहे. त्यातून एखादा मानव अथवा काही मानवांची टोळी एखाद्या व्यक्तिवर जबरी करू शकत नाही, त्याप्रमाणे जबरी न करणाऱ्या सत्यवर्तन करणारे म्हणावे.
6.स्त्री अथवा पुरुष जे आपल्या कुटुंबासह, आपल्या भाऊबंदांस, आपल्या सोयऱ्याधायऱ्यांस आणि आपल्या इष्टमित्र साथींना मोठ्या तोऱ्याने पिढीजात श्रेष्ठ मानून आपल्यास पवित्र मानीत नाहीत, आणि एकंदर सर्व मानवी प्राण्यास पिढीजात कपटाने अपवित्र मानून त्यास नीच मानीत नाहीत, त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावे.
7.स्त्री अथवा पुरुष जे शेतकरी अथवा कलाकौशल्य करून पोटे भरण्यास श्रेष्ठ मानतात, परंतु शेतकरी वगैरे यांना मदत करणाऱ्यांचा आदरसत्कार करतात त्यास सत्यवर्तन करणारे म्हणावे.
8.आधुनिक भारतामध्ये सामाजिक पुनर्घटनेसाठी चळवळ सुरू करणारी पहिली संस्था म्हणजे सत्यशोधक समाज होय. सत्यशोधक समाजाने सामाजिक गुलामगिरीविरुद्ध आवाज उठवला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. सत्यशोधक समाजाचा आवाज ही हिंदुस्थानात अनेक शतके दडपून टाकलेल्या कनिष्ठ समाजाची किंकाळी होय.
X X
सत्यशोधक समाजाची स्थापना:
24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा जोतिराव फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
समाजातील विषमता नष्ट करणे व तळागाळातील समाजापर्यंत शिक्षण पोहचवणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
सत्यशोधक समाज सोसायटीचे ते पहिले अध्यक्ष आणि खजिनदार होते. वेदांना झुगारून त्यांनी हे कार्य करण्यास सुरुवात केली. त्यांनी जातीय भेद आणि चातुर्वर्णीय भेदभावास विरोध करण्यास सुरुवात केली.
महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली तेव्हा स्त्री विभागाचे नेतृत्व सावित्रीबाई यांनी केले. सावित्रीबाई यांच्याबरोबर 19 स्त्रियांनी सत्यशोधक समाजाचे कार्य करीत होत्या. त्याचवेळी सावित्रीबाई ह्या एका कन्याशाळेच्या शिक्षिकाही होत्या.
दीनबंधू प्रकाशनाने सत्यशोधक चळवळीच्यावेळी लेखन-प्रकाशनचे काम केले. महाराष्ट्रातील तळागाळापर्यंत चळवळ पोचली. छत्रपती शाहू महाराजांनी सत्यशोधक चळवळीस पाठिंबा दिला.
न्यायापासून, अत्याचारांपासून व गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.
"सर्वसाक्षी जगत्पती । त्याला नकोच मध्यस्ती ॥ "
हे या समाजाचे घोषवाक्य होते.
सत्यशोधक समाजाने गुलामगिरीविरुद्ध आवाज उठविला आणि सामाजिक न्यायाची व सामाजिक पुनर्रचनेची मागणी केली. या समाजातर्फे पुरोहितांशिवाय विवाह लावण्यास सुरुवात केली. मराठीत मंगलाष्टके रचली.
X X
बालहत्या प्रतिबंधक गृह:
फुले दांपत्यांनी 863 मध्ये पुण्यात बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली या ग्राहक प्रसिद्ध झालेल्या एका ब्राह्मण विधवा काशीबाई हिचे मुल त्यांनी दत्तक घेतले त्याचे नाव यशवंत हे होते.
X X
महात्मा फुले यांचे लेखन साहित्य :
'सार्वजनिक सत्यधर्म' हा सत्यशोधक समाजाचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून दीनबंधू हे साप्ताहिक चालविले जाई.
तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगांच्या धर्तीवर त्यांनी अनेक 'अखंड' रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते.
आपला 'गुलामगिरी' ग्रंथ अमेरिकेतील कृष्णवर्णीयांना त्यांनी समर्पित केला.
'अस्पृश्यांची कैफियत' हा महात्मा फुलेंचा अप्रकाशित ग्रंथ आहे.
'सार्वजनिक सत्यधर्म' हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर 1891 मध्ये प्रकाशित झाला.
'सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक' हा फुले यांचा शेवटच ग्रंथ. तत्वज्ञ म्हणून त्यांचे थोरपण या ग्रंथातून लक्षात येते.
'सत्यमेव जयते' हे बीजसूत्र घेऊन साकारलेला हा ग्रंथ सत्यावर आधारलेल्या नव्या सर्वसमावेशक धर्माच्या तत्वज्ञानाची मांडणी करणारा ग्रंथ आहे.
प्रस्थापित हिंदू धर्मातील सनातनी ब्राम्हण्यावादी तत्वज्ञाने निर्माण केलेल्या शोषण व्यवस्थेने बहुजन समाज समूह पूर्णतः नागवला गेला होता. त्याला नवा जीवनमार्ग दाखवण्यासाठीच 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली आणि या सत्यशोधक समाजासाठी आचारधर्म सांगण्याच्या आवश्यकतेतून सार्वजनिक 'सत्य धर्म पुस्तका' ची निर्मिती झाली आहे.
डॉ. नागनाथ कोतापल्ले म्हणतात, "सार्वजनिक सत्य धर्म पुस्तक म्हणजे सत्याशोधाकांचा आचारधर्मच होय. परंतु हा आचारधर्म कर्मकांडाच्या पातळीवरील नाही तर एकूण माणसाला सुखाकडे नेहरा, विचारशक्तीला प्राधान्य देणारा, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मूल्यांना केद्रवर्ती स्थान देणारा असा आहे. पारलौकिक विश्व फुले यांना मान्यच नाही. तेव्हा याच लौकिक जीवनाच्या सुखाचा शोध घेणारा असा हा सत्य धर्म आहे." त्यामुळेच माणसाच्या सुखाचे चिंतन प्रकट करणारा हा ग्रंथ मौलिक आहे.
‘सारसंग्राहक’ या पुस्तकात सार्वजनिक सत्यधर्म या पुस्तकाचे सार एकत्र केले आहे. पहिल्या प्रकरणात सार दिले असून दुसऱ्या प्रकरणात फुले यांचे धर्मपर विचार दिले आहेत. एकेश्वर फुले, एकेश्वर समाजवाद, महात्मा फुले व ब्राह्मधर्म या प्रकरणांतून हे सर्व सार समजते.
महात्मा फुले यांचं समग्र लेखन आणि साहित्य हे समाजाला दिशादर्शक आणि प्रेरणादायी असंच आहे लोकशाही राज्यव्यवस्थेत वर्तमानपत्र ही लोकशाही चे आधारस्तंभ मानले जातात.
तत्कालीन स्थितीमध्ये हे वर्तमानपत्र लिहिणारे वर्तमानपत्रांचा अधिकार हा उच्चवर्णीय समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडणारा होता. त्यामुळे या काळात महात्मा फुले यांनी तत्कालीन पत्रकारितेवर टीका केली. त्याचप्रमाणे पत्रकारिता कशी असावी याविषयीचा मापदंड देखील त्यांनी घालून दिला.
एक मूलगामी विचारवंत म्हणून महात्मा फुले यांनी मोठी ग्रंथसंपदा निर्माण केली. त्याचबरोबर बहुजन समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्या काळामध्ये वृत्तपत्र लिखाणदेखील केले.
क्रांतिकारी व सुधारणावादी लेखक या नात्याने महात्मा फुले यांनी समग्र वाङ्मय लिहिले आहे त्यांच्या 'शेतकऱ्यांचा असूड', 'गुलामगिरी' या ग्रंथांतून सामाजिक स्थिती व त्यातून बाहेर पडण्यासाठीचा मार्ग याचे समग्र चित्रण महात्मा फुले यांनी केले आहे.
त्यांच्या लिखाणात तत्कालीन निद्रिस्त उपेक्षित समाजाला जागृत करून, त्या समाजामध्ये शोषणाविरुद्ध बंड करण्याची ताकत निर्माण करण्याची क्षमता होती. यामुळेच महात्मा फुले यांचे लिखाण हे निर्विवाद क्रांतिकारी आहे.
जोतिबा फुले यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन लोकांनी त्याना मुंबईतील सेभेत 1888 मध्ये ‘महात्मा’ ही उपाधी दिली. त्यामुळे ज्योतिबा फुले हे महात्मा फुले या नावाने ओळखले जाऊ लागले.
X X
जोतिबा फुले यांची पुस्तके:
1. 1855 नाटक "तृतीय रत्न"
2. जून 1869 पोवाडा "छत्रपती शिवाजीराजे भोसले यांचा पोवाडा"
3. जून 1869 पोवाडा "विद्याखात्यातील ब्राह्मण पंतोजी"
4. 1869 पुस्तक "ब्राह्मणांचे कसब"
5. 1873 पुस्तक "गुलामगिरी"
6. 24 सप्टेंबर 1876 अहवाल "सत्यशोधक समाजाची तिसऱ्या वार्षिक समारंभाची हकीकत"
7. 20 मार्च 1877 अहवाल "पुणे सत्यशोधक समाजाचा रिपोर्ट"
8. 12 एप्रिल 1889 निबंध "पुणे सत्यशोधक समाजाचा निबंध व वक्तृत्व समारंभ"
9. 24 मे 1877 पत्रक "दुष्काळविषयक पत्रक"
10. 19 ऑक्टोबर 1882 निवेदन "हंटर शिक्षण आयोगापुढे सादर केलेले निवेदन"
11. 18 जुलै 1883 पुस्तक "शेतकऱ्याचा असूड"
12. 4 डिसेंबर 1884 निबंध "महात्मा फुले यांचे मलबारींच्या दोन टिपणांविषयीचे मत"
13. 11 जून 1885 पत्र "मराठी ग्रंथागार सभेस पत्र"
14. 13 जून 1885 पुस्तक "सत्सार अंक 1"
15. ऑक्टोंबर 1885 पुस्तक "सत्सार अंक 2"
16. 1 ऑक्टोंबर 1885 पुस्तक "इशारा"
17. 29 मार्च 1886 जाहीर प्रकटन "ग्रामजोश्यांसंबंधी जाहीर खबर"
18. 2 जून 1886 पत्र "मामा परमानंद यांस पत्र"
19. जून 1887 पुस्तक "सत्यशोधक समाजोक्त मंगलाष्टकासह सर्व पूजा-विधी"
20. 1887 काव्यरचना "अखंडादी काव्य रचना"
21. 10 जुलै 1887 मृत्युपत्र "महात्मा फुले यांचे उईलपत्र"
22. 1891 (प्रकाशन) पुस्तक "सार्वजनिक सत्यधर्म पुस्तक "
23. महात्मा ज्योतिबा फुले यांनी दीनबंधू या साप्ताहिकातून वृत्तपत्रातूनही आपले विपुल लिखाण केले होते.
X X
पुरस्कार:
महात्मा ज्योतिराव फुले यांचा मुंबईमध्ये 1888 मध्ये स्त्रिया, शूद्र, उपेक्षित व शोषित यांच्या विषयी केलेल्या महानिय कार्याबद्दल फार मोठा सत्कार करण्यात आला व त्यांना या कार्यक्रमात जनतेने "महात्मा" ही पदवी बहाल केली.
X X
निधन:
महात्मा ज्योतिराव फुले यांचा मृत्यु 28 नोव्हेंबर 1890 रोजी झाला.
X X
महाराष्टाचे वैचारिक संचित घडवुन ,सामाजिक परिवर्तनाचे चक्र गतिमान ठेवणारे ,बहुजनांच्या इतिहासाची पुनर्मांडणी करणारे बहुजनांचे आद्य इतिहासकार,सत्यशोधक, क्रांतिसूर्य, स्त्री-शुद्रतिशूद्रांचे संघटक,शिक्षणातून समाजपरिवर्तन घडवणारे कर्ते समाजसुधारक,शेतकऱयांचे पाहिले कैवारी,प्रचलित व्यवस्थेला हादरा देणारे क्रांतिकारक, इश्वरालाही मानवापेक्षा गौण ठरवणारे मानवकेंद्री विचारक,अंधश्रद्धानिर्मूलनातून नवसमाजनिर्मिती घडवणारे विज्ञानवादी राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त सर्व भारतीयांना मनःपूर्वक शुभेच्छा ......
महाविद्यालयात महात्मा फुले जयंती साजरी करताना सर्व कर्मचारी प्राध्यापक व शिक्षकेतर
X X
Comment and share







8 Comments
Very nice information
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice information sir
ReplyDeleteSir
ReplyDeleteVery nice information
सत्य-शोधक 🌺🌻🌹🌷
ReplyDelete👍👍
ReplyDeleteNice
ReplyDeleteछानच
ReplyDelete