Janapadas -3: Mahajanapadas and the rise of Magadha-3
जनपद व महाजनपदे आणि मगधचा उदय: 3
'जनपद' व 'महाजनपद' असा उल्लेख तत्कालीन साहित्यात येतो. अनेक गावे व शहरे मिळून जनपद तयार होई.
अनेक लहान लहान जनपदे मोठ्या जनपदांत विलीन होत असत.
मोठ्या 'जनपदाला'च 'महाजनपद' असे म्हणत असत, जैन भगवती सूत्रात १६ महाजनपदांची नावे आहेत तर 'महागोविंद सूत्र' या ग्रंथात ७ महाजनपदांच्या राजधानीचे संदर्भ आहेत.
'अंगुत्तरनिकाय' या बौद्ध ग्रंथात १६ महाजनपदांची माहिती आहे. या १६ महाजनपदांच्या भौगोलिक सीमा, राजांची नावे इ. त्यांच्यातील सत्तास्पर्धा व संबंध आदींबाबतचा इतिहास जुळवण्याचे काम इतिहासकारांनी केलेले आहे.
१६ महाजनपदांचा अभ्यास खालीलप्रमाणे करता येईल.
XX
५) चेदी :
आजच्या बुंदेलखंड परिसरात चेदीचे राज्य होते. यमुना नदीच्या नजीक कुरू व वत्स या दोन महाजनपदांमध्ये चेदीचे राज्य होते.
जातककथांत 'सोभवती' ही चेदीची राजधानी होती, असे म्हटले आहे. चेदीचे दोन भाग असावेत. एक भाग सावेत व दुसरा नेपाळच्या डोंगरदऱ्यांमध्ये असावा.
महाभारतात 'शुक्तिमत' ही चेंदीची राजधानी होती अशी नोंद आहे. चेंदी हे फारसे प्रभावी महाजनपद नसल्यामुळे ते मगधने जिंकून घेतले.
६) वत्स :
महाभारत कालखंडापासून 'वत्स' हे गणराज्य अस्तित्वात असल्याचे दिसते. वत्स या राज्याची राजधानी कोसंबी होती.
आजच्या अलाहाबाद व बांदा जिल्ह्याचा प्रदेश महाजनपदाच्या अधिपत्याखाली होता. आजच्या अलाहाबादजवळील कोशलनगर म्हणजेच त्या काळातील कोसंबी होय.
वत्स या राज्याचा राजा उदयन हा गौतम बुद्धाचा समकालीन होता. तो अतिशय पराक्रमी, महत्त्वाकांक्षी व साम्राज्यवादी होता.
उदयनविषयीच्या अनेक आख्यायिका बौद्ध साहित्यात आल्या आहेत. तत्कालीन नाटकातून उदयन व वासवदत्ता यांच्या प्रेमकथा आल्या आहेत.
राजा उदयनचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने अनेक राजकन्यांशी विवाह करून अनेक महाजनपदांशी आपली नाती जोडली व स्वतःचे गणराज्य मजबूत केले.
डॉ. के. पी. जयस्वालांच्या मते, “अशा वैवाहिक संबंधातूनच उदयनने आपले साम्राज्य टिकवले होते."
उदयनने राज्याच्या अनेक भागांत किल्ले बांधले होते. प्रारंभी त्याने बौद्ध धर्माला विरोध केला असला तरी नंतर मात्र बौद्ध धर्माचा स्वीकार करून राजाश्रयही दिला होता.
कोसंबी हे बौद्ध धर्माचे केंद्र बनले होते. कोसंबी हे शहर तलम कापड निर्मिती व ते विक्रीचे मोठे केंद्र होते. उदयनव्यतिरिक्त या गणराज्याची फारशी माहिती उपलब्ध नाही.
७) मत्स :(मात्स्य)
मध्ययुगीन जयपूर म्हणजेच प्राचीन काळातील मत्स हे गणराज्य होय. हे गणराज्य कुरूंच्या दक्षिणेला होते.
मत्सची राजधानी विराटनगर (सध्याचे वैराट) असावी. मत्स हे महाभारतकालीन विराटचे राज्य होते. या राज्याचा विस्तार चंबळच्या डोंगरदन्यांपासून ते सरस्वती नदीच्या जंगली प्रदेशापर्यंत झाला असावा: प्रारंभी हे गणराज्य वेदी राज्याचे अंग असावे.
महाजनसतांच्या सत्तासंघर्षपासून हे गणराज्य दूर राहिल्याने त्याचा प्रभाव राजकारणावर पडला नाही. मगधमध्ये हे गणराज्य विलीन झाले असावे.
XX
८) अवंती :
अवंती हे पश्चिम भारतातील एक महत्वाचे गणराज्य होते.
गुजरात, राजस्थान व मध्य प्रदेशाचा काही भाग अवंतीच्या सीमारेषेत येत असावा.
या गणराज्यातील पर्वतांमुळे अवंतीचे दोन भागात विभाजन झाले होते. उत्तरेची राजधानी उज्जैन तर दक्षिणेची माहिस्मती होती.
गौतम बुद्धाच्या काळात अवंती हे प्रसिद्ध शहर होते. सुपीक प्रदेश व्यापारी मार्गावरील मोक्याचे स्थान, कर्तबगार राजे आदीमुळे अवंतीचे राज्य प्रबळ बनले होते.
गौतम बुद्धाच्या काळात चंडप्रद्योत हा अत्यंत शक्तिशाली सम्राट अवंतीत होऊन गेला.
त्याने आपली एक कन्या वत्स महाजनपदाचा राजा उदयन याला दिली तर दुसरी कन्या मथुरेचा शूरसेन यास दिली. या वैवाहिक संबंधांमुळे खंडप्रद्योतचे व अवंतीचे महत्त्वही वाढले.
त्याने बौद्ध धर्म स्वीकारला व बौद्ध धर्मप्रसारास उत्तेजनही दिले होते. अवंतीचा प्रदेश हा बौद्ध धर्माचे आश्रयस्थान बनला होता.
चंडप्रद्योतनंतरचे राजे कमकुवत निघाल्याने ते राज्य लयास गेले व मगध साम्राज्यात विलीन झाले. चंडप्रद्योतनंतरचा अवंतीचा इतिहासही उपलब्ध नाही.
९) मल्ल:
महाभारतात पूर्व भारतातील अंग, वंग, कलिंग यांच्याबरोबर मल्लांचा उल्लेख आढळतो. हे द्विकेंद्री गणराज्य होते. कुशीनगर व पावा ही या गणराज्यातील दोन राजधानीची केंद्रे होती.
कुशीनगर म्हणजे गोरखपूरजवळचे कसिया व पावा म्हणजे कसियाजवळचे 'पद्रोना' होय. ही दोन्ही स्थळे बौद्ध धर्मीयांची पवित्र स्थळे होत.
गौतम बुद्धाने आपले अंतिम भोजन पावा येथे घेतले. तेथेच ते कुशी (कुशीनगर) येथे मृत्यू पावले.
मल्ल व लिच्छवी यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध होते व अधूनमधून संघर्षही होई. पुढे मगध साम्राज्यापुढे मल्लचा निभाव लागला नाही व ते गणराज्य मगधमध्ये विलीन झाले.
XX
१०) कुरू:
कुरू हे महाजनपद सर्वात प्राचीन व विस्ताराने ११२ योजनेएवढे मोठे होते.
आजच्या दिल्ली व मिरत या यमुनेच्या सुपीक पट्ट्यात कुरूंचे राज्य होते व हस्तिनापूर ही त्याची राजधानी होती.
महाभारत हा कुरूंचा इतिहास आहे. महाभारत काळात कुरूंना जे महत्त्व व प्रतिष्ठा होती ती बुद्धकाळात नव्हती.
बुद्ध जातककथांतून कुरुंच्या काही राजा व राजकुमारांचे उल्लेख आले असले तरी ते राज्य कमकुवत झाले असावे व शेवटी मगधने ते जिंकून घेतले.
Comment and share
1 Comments
Very nice information
ReplyDelete