ह्याच जिजाऊ ज्यांनी घडविले राजे शिवछत्रपती ॥
राजमाता, जिजामाता, जिजाऊ, मॉंसाहेब, वीरमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले :
मराठा साम्राज्याचे (स्वराज्य) संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईसाहेब
जिजाऊ जयंती :12 जानेवारी
स्मृतिदिन: 17 जून
जिजामाता, जिजाऊ, राजमाता, मॉंसाहेब, वीरमाता जिजाबाई ह्या मराठा साम्राज्याचे (स्वराज्य) संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई होत्या.
जिजाऊचा जन्म जानेवारी 12, इ.स. 1558 सिंदखेडराजा, बुलढाणा येथे झाला.
सिंदखेडचे लखुजीराव जाधव हे जिजाबाईंचे वडील व आईचे नाव म्हाळसाबाई उर्फ गिरिजाबाई होते. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते.
डिसेंबर इ.स. 1605 मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.
X X
भोसले व जाधवांचे वैर :
लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला. एकदा एक हत्ती पिसाळला होता, हत्तीस पकडण्यास 2 पथके तयार केली.
1. पहिले जाधवांचे पथक त्याचे नेतॄत्व दत्ताजीराव जाधव ,लखुजी जाधव यांचा मुलगा व जिजाबाई यांचा भाऊ.
2. दुसरे पथक भोसले यांचे त्याचे नेतृत्व संभाजी भोसले शहाजीराजे भोसले यांचे बंधू करत होते.
यात दोघांचे भांडण झाले व संभाजी भोसले यांनी दत्ताजीराव जाधवास ठार केले. हे लखुजी जाधवास समजताच त्यांनी रागाने संभाजी भोसले यांस ठार केले.हे सर्व शहाजीराजांना समजताच ते समशेर घेऊन सासर्यावर चालून आले. यात शहाजीराजे भोसल्यांच्या दंडावर वार लागला.
या प्रसंगानंतर जिजाबाईंनी आपल्या पती सोबत राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले. नात्यांना, भावनांना बाजूला सारून आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीरपणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपूर उतरला होता.
X X
अपत्ये :
जिजाबाईंना एकूण सहा (6) अपत्ये होती. त्यापैकी 4 दगावली (मतभेद आहेत) व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती.
जिजाबाईंना पहिले अपत्य झाले त्याचे नाव तो सहा महिन्याचा झाल्यानंतर आपल्या मृत दीराच्या नावाप्रमाणे संभाजी ठेवले.
त्यानंतर त्यांना 4 मुले झाली; चारही दगावली. 7 वर्षाचा काळ निघून गेला.
19 फेब्रुवारी 1630, फाल्गुन वद्य तृतीया, शके 1551 या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी शिवनेरी येथे जिजाबाई यांना मुलगा झाला. मुलाचे नाव शिवाजी ठेवले.
X X
मुलाचे संगोपन व राजकारभार :
शिवाजी महाराज 14 वर्षांचे असताना शहाजीराजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली.
कुशल अधिकार्यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी पुण्यात येऊन दाखल झाले. निजामशाही, आदिलशाही आणि मुघलांच्या सततच्या स्वार्यांमुळे पुण्याची अवस्था अतिशय भीषण होती.
अशा प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी जबाबदार अधिकारी यांच्या सोबत नेटाने पुणे शहराचा पुनर्विकास केला. सोन्याचा नांगर घडवून त्यांनी शेतजमीन नांगरली, स्थानिक लोकांना अभय दिले.
शिवाजीच्या राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाबाईंनी शिवाजीला पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या रामायण, महाभारतातील गोष्टी सांगितल्या.
सीतेचे हरण करणार्या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता.
जिजाबाईंनी दिलेल्या या संस्कारांमुळेच शिवाजीराजे घडले.
जिजाबाईंनी नुसत्या गोष्टीच सांगितल्या नाहीत तर सदरेवर शेजारी बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.
शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाबाईंनी त्यांना राजनीतीही शिकविली.
समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले .
शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, अफजलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाबाईंचे मार्गदर्शन लाभले.
शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाबाई राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वतः तंटे सोडवत.
X X
जीवन व कार्य :
शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली.
सईबाईंच्या पश्चात संभाजी राजांचीही संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली.
राजांच्या प्रथम पत्नी सईबाईंचे भाऊ बजाजी निंबाळकर यांना जुलमाने बाटवण्यात आले होते. त्यांची हिंदू धर्मात परत येण्याची इच्छा होती, राजांचाही त्याला पाठिंबा होता. या धर्मराजकारणात जिजाबाई राजांच्या पाठीशी ठाम उभ्या राहिल्या.
एवढेच नव्हे तर राजांची कन्या सखुबाईंना, बजाजी निंबाळकरांच्या मुलाला देऊन त्यांनी राज-सोयरीक साधली आणि बजाजींना पूर्णपणे धर्मात परत घेतले. या संपूर्ण प्रकरणात त्यांचा द्रष्टेपणा व सहिष्णूता दिसून येते.
राजांच्या सर्व स्वार्यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वतः राज्याची धुरा वहात.
शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना स्वराज्याच्या सीमा वाढवत रांगणा किल्ला जिंकून घेतला.
जिजाबाईंनी पूर्णत: जबाबदारी उतारवयातही कौशल्याने निभावून नेली.
शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी 17 जून 1674 ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला.
आपल्या वयाच्या 76 व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले. या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.
जिजाबाई ही आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्या राजमाता आहेत.
X X
जगाला दिशा देणारी जगत्जननी राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब :
राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब सन 1635 ला पुण्यात लाल महाल बांधून पुणे मुक्कामी राहू लागल्या.
आदिलशाहीचा सरदार पंडित मुरार जगदेव कुलकर्णी याने पुणे उजाड केले होते.
पुण्याच्या याच जमिनीवर गाढवाचा नांगर फिरवून जागोजागी पहारी रोवून त्यावर तुटलेली चप्पल बांधून जो ही जमीन नांगरेल तो निर्वंश होईल असा शाप दिलेली भूमी अवघ्या पाच वर्षे वयाच्या शिवबांच्या हातात सोन्याचा फाळ असलेला नांगर बनवून ती भूमी नांगरली.
सोबत रायनाक या दलिताचा मुलगा, रामोश्याचा, मातंगाचा आणि लोहाराचा एक अश्या पाच बालकांनी नांगर चालवून शापित भूमी नांगरली.
महाराष्ट्रातील गोरगरीब जनता उपाशी मरू देणार नाही. समतेचे, न्यायाचे, ममतेचे राज्य निर्माणासाठी वाट्टेल ते भोगण्याची माझी तयारी असल्याचे ठणकावून सांगितले.
राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्याच प्रेरणेने कानंद, गुंजन, वेळगंड मोसे खोर्यातील वीर बाजी पासलकर, झुंजारराव मारळ, तानाजी मालुसरे आदी अठरापगड जातीच्या 600 तरूण संवगड्यांना सोबत रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली.
मोठ्या युक्तीने जिजाऊंच्या मार्गदर्शनामध्ये अत्यंत मुत्सद्देगिरीने बिना लढाई किल्लेदार पळून गेला. असे आदिलशाहीला कळवून पहिला किल्ला तोरणा ताब्यात घेतला.
तोरण्याची डागडुजी सुरू असतांना देवदेवतांच्या सोन्याच्या मुर्ती सापडल्या, या मुर्तींचे काय जिजाऊंनी सल्ला दिला,
“या मुर्ती देवाच्या असल्या तरी सोन्याच्या आहेत हे विसरू नका, या मुर्ती वितळवा आणि स्वराज्यतील मावळेरुपी जिवंत देव घडवा, हा महाराष्ट्र मुक्त करा.”
पुढे निजामशाहीचा किल्लेदार फिरंगोजी नरसाळा ह्याच्याशी स्वराज्य उभारणीबाबत चर्चा करुन नरसाळा किल्ला मिळविला.
चाकणचा किल्लेदार सुद्धा स्वराज्याच्याच विचाराने प्रेरित होऊन स्वराज्यात दाखल झाला.
रक्ताचा थेंबही न सांडता तीन किल्ले लोकांच्या उस्फुर्त पाठींब्यातुन मिळाले.
लोकांना स्वराज्य पाहिजे आहे हे स्पष्ट झाले. पुढे कोंढाण्याच्या मुसलमान किल्लेदाराला भरपूर पैसे देऊन गड ताब्यात घेतला.
शहाजीराजांची परंपरागत जहाँगिरी होती पुणे, सुपे, बारामती, इंदापूर आणि शिरोळ.
या जहाँगिरीच्या सुरक्षिततेसाठी पुरंदर किल्ला स्वराज्यात असणे किती गरजेचे आहे, हे माँसाहेब जिजाऊंनी पटवून दिले.
ऐन दिवाळीच्या दिवशीच पुरंदरचा किल्ला स्वराज्यात आला. व जिजाऊ माँसाहेबांच्या उपस्थितीत शिवरायांनी खरीखुरी दिवाळी साजरी केली.
त्यामुळे शहाजीराजे शिवरायांना मदत करीत असल्याचा संशय आला व जिंजीच्या मोहिमेवर गेलेल्या शहाजीराजांना वेल्लोर येथे अचानक झडप घालून आदिलशाहाने कैद करविले.
आदिलशहाने दोन्ही पुत्रांचा बंदोबस्त करण्यासाठी मुर्रादखान व फतेहखान यांना पाठविले.
फतेहखानाने बाळाजी हैबतराव या ब्राम्हण सरदाराच्या मदतीने अगदी सहज सुभानमंगळ किल्ला जिंकला म्हणून मोठ्या आनंदाने विजयोत्सव साजरा करुन झोपले.
अश्या वेळी मल्हार कावजीच्या नेतृत्वात मावळ्यांनी अर्ध्या तासात बाळाजी हैबतरावची फौज कापून काढली.
स्वतः मल्हार कावजीच्या भाल्याने बाळाजी हैबतराव खाली पडला. उरलेले खानाचे सैन्य पळु लागले जे जीवंत सापडले ते शरण आले व स्वराज्यात मावळे म्हणून दाखल झाले.
खानाचा खजिना, नव्या दमाचे 500 घोडे मिळाले व हीच रसद पुढे खानाच्या पराभवासाठी वापरली. महाराजांनी खानाच्या बोलसद, शिरवळ छावणीवर हल्ले करुन खानाला डिवचले. खानाने पुरंदरवर चाल केली, खानाचे सैन्य पुरंदरवर अर्ध्यापर्यंत चढल्यावर अचानक दरवाजा उघडून खानाच्या सैन्यावर हल्ला चढविला आणि खानाचे सैन्य कापून काढले. खानाचा सासवडपर्यंत पाठलाग केला,
तिकडे संभाजी राजांनी सुद्धा हिंदू राजांना एकत्रित करून फर्राबखानाची धुळधाण उडविली.
अश्याप्रकारे आदिलशहाला जिजाऊ माँसाहेबांच्या दोन्ही पुत्रांनी तडाखेबंद उत्तर दिले.
जिजाऊंच्या सल्ल्यानुसार शिवाजी महाराजांनी मोगलांचा दक्षिणेतील सुभेदार मुराद बक्ष यांच्याशी संधान साधले व आदिलशाहीला मोगलांकडून फर्मान आले “ शहाजीराजे भोसले आमचा माणूस आहे, शिवाजी भोसले आमच्या सेवेत आहे, त्याचे वडील शहाजीराजे यांना तातडीने मुक्त करावे”
त्यामुळे शहाजीराजेंची सन्मानपूर्वक सुटका करण्यात आली.
आदिलशहाला मोठी चूक झाल्याचे कळून चुकले आणि त्याने शहाजीराजेंना दरबारात बढती देऊन फर्जंद पदावर घेतले.
या संपूर्ण प्रकरणामागे माँसाहेब जिजाऊंची मुत्सद्दीगिरी कारणीभूत ठरली.
25 जुलै 1629 ला निजामाने विश्वासघाताने भर दरबारात वडील राजे लखुजीराव, भाऊ अचलोजी व राघोजी आणि भाचा यशवंतराव या चौघा कुटुंबियांचा एकाच वेळी खुन केला.
तेव्हापासून जिजाऊ माँसाहेबांनी स्वराज्य निर्मितीचा ध्यास घेवून अखंड सावधानता बाळगली.
X X
निजामाच्या दरबाराची पुन्हा पुनरावृत्ती होऊ नये म्हणून एकाच वेळी चार ठिकाणी स्वराज्याचे चारधाम चार शक्तिस्थळे निर्माण केली.
1) शहाजीराजेंना कर्नाटक प्रांतात छोटे छोटे हिंदू राजे एकत्र करुन कर्नाटकात त्या राजांना सहकार्य करण्याची भूमिका.
2) मोठ्या मुलगा संभाजी राजांना बंंगलूर या शहरात 15,000 फौजेनिशी कारभार सोपविला.
3) सावत्र मुलगा व्यंकोजीराजे ( तुकाईचा मुलगा ) ला तंजावर येथे शहाजीराजे व संभाजीच्या आश्रयाखाली सुरक्षित वातावरणात ठेवले.
4 ) इकडे अठरापगड जातींच्या मावळ्यांसह जिजाऊ व शिवाजी महाराजांनी अभेद्य राजगडाला राजधानी बनवून महाराजांना सुरक्षित केले. यामुळे जिजाऊ माँसाहेब जिवंत असेपर्यंत कधीही शहाजीराजे, संभाजीराजे, व्यंकोजीराजे, शिवाजी महाराजांवर प्राणघातक हल्ला परतवून लावण्यामध्ये मावळ्यांच्या सहकार्यांने यश मिळत गेले.
X X
जिजाऊ वंदना
जिजा माऊली गे, तुला वंदना ही
तुझ्या प्रेरणेने, दिशा मुक्त दाही ।।धृ।।
भयातुन मुक्ती, मिळाली जनांना ।
गुलामी कुणाला, कुणाचीच नाही ||१||
नसे दुःख कोणा, नसे व्यून कोणा ।
फुलांना मुलांना, नसे दैन्य काही ||२||
जिजा माऊली गे ...
जशी पार्वती ती, प्रिया शंकरास ।
तशी प्रेरिका गे, शहाजीस तूही ||३||
जसा संविभागी, बळी पुर्वकाळी ।
शिवाजी जनांच्या, तसे चित्तदेही ||४||
जिजा माऊली गे...
तुझ्या संस्कृतीने, तुझ्या जागृतीने ।
प्रकाशात न्हाती, मने ही प्रवाही ||५||
तुला वंदिताना, सुखी अंग अंग ।
खरा धर्म आता, शिवाचाच पाही ||६||
खरा धर्म आता, शिवाचाच पाही
जिजा माऊली गे...
जय जय जय जय जिजाऊ...
जय जय जय जय जिजाऊ:
XX
X X
Comment and share



7 Comments
Nice
ReplyDeleteNice
ReplyDeleteNice
ReplyDeleteVery nice information
ReplyDeleteNice information
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteV nice info
ReplyDelete