Gopal Ganesh Agarkar :
Social reformer, Educationist and Thinker
गोपाळ गणेश आगरकर : विचारवंत,शिक्षणतज्ञ व सामाजिक सुधारक
14 जुलै : जन्मदिन
17 जून : स्मृतिदिन
बालपण आणि शिक्षण:
गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील कराडजवळील टेंभू या गावी 14 जुलै, 1856 रोजी झाला.
त्यांच्या वडिलांची परिस्थिती अतिशय गरिबीची होती.
घरच्या गरिबीमुळे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी गोपाळ आगरकरांवर कन्हाड, रत्नागिरी, अकोला अशा वेगवेगळ्या गावी फिरावे लागते.
इ.स. 1875 मध्ये आगरकर मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. इ.स. 1878 मध्ये ते बी.ए. ची परीक्षा पुणे येथे असताना उत्तीर्ण झाले.
त्यानंतर इ.स. 1880 मध्ये एम.ए. ची पदवीही त्यांनी संपादन केली.
तत्पूर्वीच 1877 साली आगरकरांचा 'यशोदा' सोबत विवाह झाला होता.
X X
विचारवंतांचा प्रभाव:
हर्बर्ट स्पेन्सर व जॉन स्टुअर्ट मिल या विचारवंतांचा गोपाळ गणेश आगरकरांवर मोठा प्रभाव पडला होता.
तसेच आगरकरांवर चिपळूणकरांच्या निबंधमालेचा सुद्धा प्रभाव अधिक झाला होता. त्यामुळेच पुढे महाराष्ट्रातील एक ख्यातनाम श्रेष्ठ निबंधकार म्हणून निर्माण झाले.
शैक्षणिक क्षेत्रातील कार्य:
विष्णुशास्त्री चिपळूणकर, टिळक व आगरकर यांनी इ.स. 1880 मध्ये पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली.
टिळक-आगरकरांनी पुणे येथे इ.स. 1884 मध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या सोसायटीच्या स्थापनेत आगरकरांचा प्रामुख्याने पुढाकार होता. तसेच या संस्थेच्या वतीने पुण्यातच इ.स. 1885 मध्ये फर्ग्युसन कॉलेज उघडण्यात आले.
पुढे फर्ग्युसन कॉलेजचे पहिले प्राचार्य वा. शि. आपटे 1892 साली अचानक निधन पावले. त्यानंतर 1892 पासून आगरकरांची प्राचार्यपदी निवड झाली. अखेरपर्यंत ते त्या स्थानावर होते. आगरकर हे हाडाचा शिक्षक, विद्वान प्राध्यापक व कर्तव्यदक्ष प्राचार्य असा त्यांचा उल्लेख केला जातो.
वृत्तपत्र क्षेत्रातील कामगिरी:
टिळक व आगरकर यांनी मराठी भाषेत इ.स. 1881 मध्ये 'केसरी' व इंग्रजी भाषेत 'मराठा' ही वृत्तपत्रे सुरू केली. 'केसरी' च्या संपादकपदाची जबाबदारी आगरकरांवर येऊन पडली. आगरकर हे केसरीचे पहिले संपादक होते.
दिवसेंदिवस वरील वृत्तपत्रे अधिकाधिक लोकप्रिय होऊ लागली.
त्यातूनच कोल्हापूर दिवाण बर्वे यांच्या गैरकारभारावर टीका केली, त्यामुळे त्यांच्यावर बर्वे यांनी अब्रुनुकसानीचा खटला भरला. तो बर्वेनी जिंकला व टिळक-आगरकरांना 1882 साली 101 दिवसांची कैदेची शिक्षा झाली. त्यांना मुंबईला डोंगरी येथील तुरूंगात ठेवले.
या शिक्षेच्या काळात आगरकरांनी शेक्सपियरच्या 'हॅम्लेट' या नाटकाचे 'विकार विलसित' या नावाने मराठीत भाषांतर केले. तसेच तुरुंगात अनुभव आले, त्याचे वर्णन करणारे 'डोंगरीच्या तुरुंगातील आमचे 101 दिवस' या नावाचे छोटेसे पुस्तक सुटका झाल्यावर त्यांनी लिहिले.
X X
'केसरी ' संपादकपदाचा राजीनामा:
केसरी' व 'मराठा' या वृत्तपत्रांतून टिळक हे सामाजिक जागृतीपेक्षा राजकीय जागृतीलाच अधिक महत्त्व देऊ लागले होते.
आगरकरांनी सामाजिक सुधारणेला प्राधान्य देण्याचे ठरवले होते. आधी सामाजिक सुधारणा की राजकीय सुधारणा या मुद्द्यांवर आगरकरांचे टिळकांशी मतभेद झाले.
त्यामुळे इ.स. 1887 मध्ये 'केसरी' च्या संपादकपदाचा त्यांनी राजीनामा दिला. व डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि केसरी व मराठा या वृत्तपत्रांचा संबंध त्यांनी कायमचा तोडून टाकला.
'सुधारक' स्वतंत्र साप्ताहिक निर्मिती:
त्यानंतर इ.स. 1888 मध्ये त्यांनी 'सुधारक' नावाचे आपले स्वतंत्र साप्ताहिक सुरू केले. या साप्ताहिकाच्या मराठी आवृत्तीचे ते स्वतः होते.
'सुधारक' मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांतून प्रसिद्ध केले जात होते.
त्यांच्या मराठी आवृत्तीच्या संपादनाची जबाबदारी आगरकरांनी, तर इंग्रजी आवृत्तीच्या संपादनाची जबाबदारी गोपाळ कृष्ण गोखलेंनी सांभाळली होती.
'सुधारक' वृत्तपत्रातून आपले समाजसुधारणेचे विचार त्यांनी अगदी लढाऊ भाषेत मांडले.
सामाजिक कार्यातील योगदान:
आगरकरांनी भारतीय समाजातील बालविवाह, केशवपन, जातिभेद, अस्पृश्यता यांसारख्या अनेक अनिष्ट चालीरीती व रुढींना विरोध केला होता.
'सुधारक' या आपल्या वृत्तपत्रातून बालविवाह केशव पण जातिभेद अस्पृश्यता अशा चालीरीतींना विरोध करून आपली परखड मते वृत्तपत्राच्या माध्यमातून व्यक्त करत असत.
बालविवाहाची चाल बंद करण्यासाठी कायदा करण्याच्या आवश्यकतेचे प्रतिपादन त्यांनी आपल्या वृत्तपत्रातून प्रसिद्ध केले होते. बालविवाह, बालविधवा यासारख्या परंपरांचे निर्माण करण्यासाठी त्यांनी बंड पुकारले होते.
हिंदुस्थानातील दारिद्र्य विषयी त्यांना विशेष दुःख वाटत असे, त्यामुळे ते आपल्या वृत्तपत्रातून नेहमी व्यक्त करत असत.
आगरकरांचा बुद्धिवादी तत्त्वज्ञ म्हणून सुद्धा उल्लेख प्रामुख्याने केला जातो. कारण ' हिंदुस्तानचे राज्य कोणासाठी ? 'या त्यांनी लिहिलेल्या आपल्या निबंधात ब्रिटिश सरकार स्वार्थी असल्याचे स्पष्ट केले होते.
'राजकीय स्वातंत्र्य मिळणे सोपे आहे, परंतु सामाजिक व धार्मिक बाबी संबंधी गुलामगिरीतून समाजास मुक्त करणे खूप अवघड आहे.' असे स्पष्ट मत सुद्धा ते आपण आपल्या वृत्तपत्रातून मांडत असत.
'इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार' हे त्यांचे ब्रीदवाक्य होते.
ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त वि. स. खांडेकरांनी असे म्हटले आहे की, "विष्णुशास्त्री चिपळूणकर व गोपाळ गणेश आगरकर हे मराठी भाषेतील पहिले दोन श्रेष्ठ निबंधकार आहेत."
X X
ग्रंथसंपदा:
1. विकार विलसित (तुरुंगात असताना आगरकरांनी शेक्सपियरच्या 'हॅम्लेट' या नाटकाचे 'विकार विलसित' या नावाने मराठीत भाषांतर)
2. डोंगरीच्या तुरूंगातील 101 दिवस ( तुरुंगात असताना त्यांना आलेले अनुभव पुस्तक रूपाने प्रसिद्ध)
3. अलंकार मीमांसा
4. फुटके नशीब (आत्मचरित्र)
निधन:
गोपाळ गणेश आगरकर यांचे 17 जून, 1895 रोजी वयाच्या 39 व्या वर्षी दम्याच्या विकाराने पुण्यात निधन झाले.
विशेष म्हणजे आगरकरांनी आपल्या मृत्यूनंतर प्रेतदहनासाठी पुरचुंडीत 20 रुपये बांधून ठेवले होते.
असा हा महाराष्ट्रातील नव्हे तर देशातील बुद्धीवादी तत्त्वज्ञ, समाज सुधारक, विचारवंत, शिक्षण तज्ञ, संपादक , प्राचार्य, निबंधकार होता.
View, Comments and share.....
1 Comments
Nice 👍
ReplyDelete