Subscribe Us

header ads

Sri Aurobindo: Indian Philosopher, Yogi, Maharishi, Poet, Indian Nationalist and Journalist

Sri Aurobindo: Indian Philosopher, Yogi, Maharishi, Poet,  Indian Nationalist and Journalist

ऑरोबिंदो ऊर्फ महायोगी अरविंद घोष ऊर्फ श्रीअरविंद: 

विसाव्या शतकातील एक महान क्रांतिकारी व युगप्रवर्तक तत्त्वज्ञ,महायोगी,स्वातंत्र्य-सेनानी, शिक्षणतज्‍ज्ञ

15 ऑगस्ट : जन्मदिन 

स्मृतिदिन: 5 डिसेंबर 


बालपण आणि शिक्षण:

ऑरोबिंदो ऊर्फ महायोगी अरविंद घोष ऊर्फ श्रीअरविंद हे विसाव्या शतकातील एक महान क्रांतिकारी व युगप्रवर्तक तत्त्वज्ञ,महायोगी,स्वातंत्र्य-सेनानी, शिक्षणतज्‍ज्ञ, भाषांतरकार, लेखक, संपादक आणि महाकवी यांचा जन्म 15 ऑगस्ट 1872 रोजी पश्चिम बंगालमधील कोलकत्ता येथे डॉ. कृष्णधन घोष आणि स्वर्णलतादेवी या दांपत्याच्या पोटी झाला. त्यांचे वडील हे पाश्चात्त्य संस्कृतीचे समर्थक होते. 

आपल्या मुलाचे प्राथमिक शिक्षणसुद्धा इंग्रजी सरकारातच व्हावे म्हणून अरविंद आणि त्यांचे दोन बंधू यांना दार्जिलिंगाच्या लोरंटो विद्यापीठात घातले.

 पाश्चिमात्त्यांच्या मुलांसाठी ही संस्था होती. भारतीय भाषांचे तेथे अध्ययन होत नव्हते. अरविंद यावेळी फक्त पाच वर्षांचे होते. 

अरविंद सात वर्षांचे असताना त्यांच्या बंधूंसह त्यांना वडीलांनी इंग्लंडला नेले. तेथे श्री व सौ. विल्यम ड्रेवेट यांच्या नियंत्रणाखाली शिक्षणासाठी ठेवले.

 त्यांच्या मार्गदर्शनाखाली अरविंदांनी बायबल, शेक्सपिअर, होले, कीटस इत्यादिकांचा सखोल अभ्यास केला. आपल्या कुशाग्र बुद्धीमत्तेच्या बळावर त्यांनी वयाच्या 17व्या वर्षी सिनीअर क्लासिकल स्कॉलरशिप संपादन करून केंब्रिज येथील किंग्ज कॉलेजात प्रवेश मिळवला. 



महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच त्यांनी इंग्रजी व फ्रेंच वाङमयाचा आणि युरोपच्या इतिहासाचा अभ्यास केला. इटालियन व जर्मन भाषाही शिकल्या.

 भारतीय संस्कृतीच्या व जीवनपद्धतीच्या ओढीने 1893 मध्ये ते भारतात आले. तेरा वर्षे त्यांनी बडौदा संस्थानात नोकरी केली. 

सुरुवातीला काही काळ त्यांनी प्रशासनात नोकरी केली. परंतु नंतर बडोदा कॉलेजमध्ये फ्रेंच भाषेचे इंग्रजी विषयाचे अधिव्याख्याते म्हणून अध्यापनाचे कार्य केले. 

बडौदा संस्थानात नोकरीत असल्यामुळे उघड व प्रत्यक्ष स्वातंत्र्य चळवळीत भाग घेणे त्यांना शक्य नव्हते. यामुळे या काळात त्यांनी निनावी लेखन केले. 

1907 मध्ये बंगालमधील जहालांचे नेतृत्व अरविंद घोष यांच्याकडे होते. 1907 च्या सुरत अधिवेशनातील कॉंग्रेसच्या दुफळीनंतर त्यांनी जहालाच्या सभेत मातृभूमीच्या सारसर्वस्व अर्पण करण्याची व पूर्ण स्वातंत्र्य मिळेपर्यंत न थांबण्याची शपथ उपस्थितांना दिली. अरविंद या सभेच्या अध्यक्षस्थानी होते. 

त्यांच्या नेतृत्वाला यातून नवी झळाळी प्राप्त झाली. परंतु यामुळे ब्रिटिश शासनाचा रोष त्यांना पत्करावा लागला.

 त्यांना माणिकताळा येथे सापडलेल्या बॉम्ब फॅक्टरीच्या संदर्भात अटक झाली. यावेळी त्यांच्याविरूद्ध चाललेला खटला “अलिपूर खटला" या नावाने प्रसिद्ध आहे.



 प्रत्यक्ष सक्रीय राजकारणाच्या धकाधकीपासून या पर्वात ते दूर पाँडेचरी येथे असले तरी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घडामोडींकडे त्यांचे लक्ष होते.

 जनसामान्यांबद्दलची आस्था तशीच होती. भारत स्वतंत्र होताच पत्रक काढून त्यांनी समाधान व्यक्त केले. 

भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या दिवशी श्रीअरविंदांचा 75 वा वाढदिवस होता. 

14 ऑगस्ट 1947 रोजी, श्रीअरविंदांनी दिलेला संदेश तिरूचिरापल्लीच्या "ऑल इंडिया रेडिओ’" वरून प्रसारित करण्यात आला.



X X

अध्यात्मिक विचारांचा प्रभाव व प्रेरणा : 

पाश्चिमात्त्य आणि भारतीय संस्कार त्यांच्यावर झालेले असले तरी रामकृष्ण, विवेकानंद यांच्या अध्यात्मिक विचारांनी ते भारावून गेले. 1905 ते 1910 या कालखंडात त्यांचा राष्ट्रीय चळवळींशी संबंध आला. 

राजकीय नेता आणि लेखक या नात्यांनी त्यांनी प्राचिन वेदांत व आधुनिक युरोपियन राजकीय तत्त्वज्ञान यांच्यात समन्वय निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 

त्यातून त्यांचा राजकीय वेदांत विकसित झाला. अरविंद घोष यांना अध्यात्मिक विचाराची प्रेरणा तुरुंगात मिळाली. 



एका निरामय शांततेची प्रचिती त्यांना झाली. तुरुंग त्यांना बंदिवास वाटला नाही तर ते अध्यात्मिक प्रगतीचे मंदीर वाटले. यामुळे त्यांनी भौतिक जीवनाऐवजी अध्यात्मिक जीवन जगण्याचे ठरविले.

X X

 प्रत्यक्ष राजकीय परिस्थितीचा अनुभव : राजकीय विचार

बडौदा संस्थानात नोकरी करीत असताना अरविंद घोष यांचा संबंध क्रांतीकारकांशी आला होता. 

पुढे काँग्रेसच्या अधिवेशनास उपस्थित राहून संपूर्ण स्वराज्याच्या ध्येयकडे काँग्रेसवाल्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या लिखाणामुळे ब्रिटिश शासनाने त्यांना अनेक वेळेस अटक केली परंतु त्या सर्वांमधून त्यांची निर्दोष सुटका झाली आहे.

अरविंद घोष यांनी प्रत्यक्ष राजकीय वास्तव्याच्या चिंतनातून व राजकारणातील प्रत्यक्ष सहभागामुळे भारतातील राजकीय समस्यासंबंधी व त्यावरील उपाययोजनेविषयी सुसंगतपणे विचार केलेला आहे. 

ज्या काळात त्यांनी राजकीय विषयानंतर विचारात व लिखाणात प्राधान्य दिले. हा काळ त्यांच्या आयुष्यात अत्यल्प असला तरी त्या काळात आधुनिक भारतीय राजकीय विचारक्षेत्रात घातलेली भर मोलाची आहे. 

त्यांनी विविध नियतकालिकांमधून केलेल्या लिखाणातून त्यांचे राजकीय विचार व्यक्त होतात.

X X

अरविंद घोष यांचा अध्यात्मिक राष्ट्रवाद

अरविंद घोष यांच्या लिखाणातून व वक्तव्यातून व्याप्त होणारी राष्ट्रकल्पना व पाश्चात्त्य राष्ट्रकल्पना यामध्ये फार मोठा फरक आहे. त्यांचा राष्ट्रवादासंबंधीचा विचार नवीन आणि अद्वितीय स्वरूपाचा आहे. 

भौगोलिक ओळख असलेल्या भारताची त्यांनी अध्यात्मिक ओळख प्राप्त करून दिली आहे. त्यांच्या मते राष्ट्र म्हणजे ईश्वराने दिलेला धर्म होय. 

अरविंद घोष याचा राष्ट्रवाद म्हणजे केवळ देशभक्ती नसून त्याचे स्वरूप अधिक व्यापक व सर्वसमावेशक आहे. 

आयर्लंडमधील राष्ट्रीय चळवळ व जोसेफ मॅझिनीच्या विचारांच्या प्रभावातून त्यांनी राष्ट्रवादाची मांडणी करून त्यास नैतिक अधिष्ठान प्राप्त करून दिले आहे. 

त्यांना भारत हा एक भूप्रदेशाचा तुकडा नव्हता तर “दैवी माता" होता. त्यांचा राष्ट्रवाद धार्मिक, अध्यात्मिक तर होताच पण या व्यतिरिक्त त्याचे अनेक पैलू. 

 1) राष्ट्रवाद हा धर्म : 

अरविंद घोष यांची राष्ट्रवादाची कल्पना केवळ भौगोलिक क्षेत्रफळाचा विचार करणारी नसून पाश्चात्त्य राष्ट्रवादाच्या कल्पनेपेक्षा वेगळी होती. 

त्यांनी भारतीय राष्ट्रवादास नैतिक व धार्मिक विचार पुरवला. त्यांनी राष्ट्रास “दैवी माता” संबोधले. 

राष्ट्र ही दैवी माता आहे. तिची सेवा, बलिदान आवश्यक आहे. त्यांच्यामते राष्ट्रवाद ही केवळ राजकीय गतीविधी कार्यक्रम, उपक्रम नाही तर तो एक धर्म आहे. ज्याची निर्मिती ईश्वराने केलेली आहे. 

राष्ट्रवादासाठी आपण केलेली कृती धार्मिक स्वरूपाची असते. 

धर्मासाठी आपण बलिदान करतो तेच राष्ट्रासाठी केले पाहिजे. आपण केवळ ईश्वराच्या हातातील एक साधन आहोत.

ईश्वर व धर्म यावर त्यांचा विश्वास होता. यामुळेच ते राष्ट्रमुक्तीस धर्मकार्य समजत होते. 

धर्मकार्य म्हणजे कृतीशिलता, राष्ट्रमुक्तीचे कार्य म्हणजे धर्मकृती नैतिक कृती होय. त्यांचा धर्माचा अर्थ नुसते अर्थहीन कर्मकांड असा नव्हता तर मुक्तीसाठी कृती असा होता. 

X X

2) ऐतिहासिक अध्यात्मवाद राष्ट्रवादाचा पाया : 

 इतिहासातील घटना दैवी इच्छा निर्धारीत करीत असते. इतिहास म्हणजे ब्रह्म्याचे प्रागतिक स्वप्रकटीकरण आहे. 

फ्रेंच राज्यक्रांती ईश्वराच्या इच्छेचे मूर्तरूप आहे. भारत राष्ट्राचा आकार घेत आहे. कारण ती दैवी इच्छा आहे. 

जन्म व मृत्युचे चमू कालीमातेच्या पदन्यासाचा परिणाम आहे. माताच निर्माता आहे व संहारकर्ताही आहे. 

सर्व महान व्यक्तींची कृती ही मातेची इच्छा म्हणून या व्यक्तीमधून अभिव्यक्त होत असते. जेव्हा या महान व्यक्ती मातेच्या कृतीत त्यांचा अहंभाव, त्यांचे हितसंबंध व महत्त्वाकांक्षा मिसळतात तेव्हा त्यांना इतिहासातून दूर करते. त्यांचे ऐतिहासिक कार्य थांबते.

राष्ट्रवादाचा पाया अध्यात्मवाद आहे. अध्यात्मवाद हे धर्माचे अविभाज्य अंग आहे. अध्यात्म कायम आहे. तेव्हा राष्ट्रवाद कायम आहे. 

अरविंदांच्या मते भारतात सनातनधर्मच राष्ट्रवाद आहे. राष्ट्राचा जन्म सनातन धर्मातून होतो. तसेच त्यांचा विकास व गतिशिलता राष्ट्राबरोबर होत असते. 

सनातन धर्म म्हणजे कोणत्याही प्रदेशाची समाजघटकापेक्षा व्यापक आहे. 

राष्ट्रवाद वैश्विक व कायम स्वरूपाची संकल्पना आहे. राष्ट्रवाद कधीच समाप्त करता येत नाही. राष्ट्रवाद हा ईश्वरी शक्तीवर जगत असतो. त्यास कधीच समाप्त करता येत नाही. 

कोणतेच शस्त्र, ताकद, त्यास समाप्त करू शकणार नाही. राष्ट्रवाद अमर्त्य आहे. तो अविनाशी आहे. कारण तो अपौरूषेय आहे.

अरविंद घोष यांच्या मते, भारत हा दास्यत्वाच्या शृंखलेत आहे. तेव्हा त्यास पारतंत्र्यातून मुक्त करण्यासाठी संघर्ष केला पाहिजे. 

ब्रिटिशांशी सर्व प्रकारचा संघर्ष सर्व पातळीवर करून भारतमातेस मुक्त केले पाहिजे. राष्ट्रासाठी आपणाजवळ जे काही आहे ते सर्व तिच्या मुक्ततेसाठी दिल्या गेले पाहिजे. 

व्यक्तीने, कुटुंबाने, समाज घटकांनी सर्वांनी बलिदान केले पाहिजे. त्यांनी राष्ट्रवादाची संकल्पना सेंद्रिय सिद्धांताच्या आधारे मांडली आहे. 

व्यक्तीस पूर्णत्व प्राप्त होईल जेव्हा तो स्वतःस राष्ट्राचा अविभाज्य अनिवार्य भाग समजेल. राष्ट्रइच्छाच फक्त त्यांच्या गरजाच पूर्ण करू शकते.

X X

3) राष्ट्रवादाचे उदार स्वरूप :

अरविंदाचा राष्ट्रवाद हा उदार व व्यापक होता. तो जातीय, धार्मिक, मुलतत्त्ववादी व संकीर्ण, आक्रमण नव्हता. त्यांच्या मते भारताचा अध्यात्मिक राष्ट्रवाद जगास समता प्रदान करेल. जागतिक एकता निर्माण करेल. राष्ट्रवाद कधीच मालकाप्रमाणे वागणार नाही. 

राष्ट्रवाद ही एक सामाजिक व राजकीय उत्क्रांतीची गरज आहे. मानवी प्रगतीची ती पायरी आहे. अध्यात्मिक राष्ट्रवाद जगाच एकत्र आणू शकते. नवराष्ट्रवादाचा या अर्थाने ते जनक आहेत.

X X

आंतरराष्ट्रवाद/ मानवी एकतेविषयी विचार :

अरविंद घोष यांनी “दि आयडीयल ऑफ ह्युमन यूनिटी" या ग्रंथात जागतिक इतिहासाविषयी व व्यवस्थेविषयी मत व्यक्त केले आहे. 

त्यांच्या मते वर्तमान राजकीय व्यवस्था ही राजनय, आर्थिक प्रतिबंध व युद्धाच्या भीतीवर उभी आहे. राष्ट्राराष्ट्रातील संबंध संशयपूर्ण व तणावपूर्ण झाले आहेत. यामुळे त्यांनी बंधूत्व, समता व सदभावनेच्या पायावर उभी असलेल्या नव्या जागतिक व्यवस्थेचा विचार केला आहे. या व्यवस्थेचा पाया अध्यात्म आहे. चांगला परिपूर्ण समाज आहे.

X X

अरविंदाच्या जागतिक व्यवस्थेच्या बाजू:

1) जागतिक संघटना :

जागतिक एकता, जागतिक संघटना त्यांना शक्तीच्या जोरावर निर्माण करावयाची नव्हती. 

राष्ट्र व राष्ट्रीयत्व जेथे समाप्त होईल ती जागतिक व्यवस्था त्यांना अभिप्रेत नव्हती. त्यांना अशा प्रकारची जागतिक एकता निर्माण करावयाची आहे. ज्यात राष्ट्र स्वतंत्र असतील. राष्ट्रा-राष्ट्रात असमानता असणार नाही. पारतंत्र्यात कोणतेही राष्ट्र असणार नाही. तेथे प्रत्येक राष्ट्र समान असेल. राष्ट्राची कृती मानवी एकतेच्या मूल्यांसाठी असेल. तेच त्याचे मार्गदर्शक तत्त्व असेल. नव्या जागतिक व्यवस्थेत सर्वांना मान्य करावे लागेल की, ते ईश्वराचा अंश आहे. सर्व एकाच शक्तीचे भाग आहेत. 

संयुक्त राष्ट्रसंघाने निर्माण केलेली एकता वास्तव व स्थिरतेची नाही. राजनय व शक्तीच्या माध्यमातून निर्माण केलेले जागतिक संघटन शाश्वत असणार नाही. जागतिक संघटन शाश्वत करण्यासाठी ते अध्यात्मिक संघटनेवर व मानवी एकतेवर असले पाहिजे.


X X

2) विविधतेत एकता : 

जागतिक एकतेसाठी प्रत्येक राष्ट्राने आपली स्वतंत्र ओळख ठेवणे आवश्यक आहे. 

राष्ट्रीय सीमा समाप्तीस व स्वतंत्र देशाच्या अस्तित्वास त्यांनी कधीच मान्यता दिली नाही. प्रत्येक देशास स्वनिर्णयाचा अधिकार असावा या मताचे ते होते. 

जगातील लोकांनी प्रत्येक जनसमुहास कसे रहावे याचे स्वातंत्र्य द्यावे. वैश्विक एकतेस प्राधान्य द्यावे. पण त्या एकतेस स्वतंत्र राष्ट्राचा आधार असावा. 

जगातील सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, विविधतेमुळे मानवी एकतेसाठी अडथळा निर्माण होऊ शकतो. परंतु हा प्रश्न सोडविण्यासाठी बळाचा वापर केला जाऊ नये. हा प्रश्न चर्चेनी व विचारविनिमयानी सोडविला जावा.

विविधतेच्या व प्रत्येक राष्ट्राच्या स्वयंनिर्णयाच्या तत्त्वावर हे संघटीकरण आधारलेले आहे. 

जगातील सर्व मानव मात्रांना भौगोलिक, वांशिक, सांस्कृतिक विभाजन आणि आर्थिक सोयी यानुसार स्वतःचे संघटन बांधण्याचे स्वातंत्र्य असावे. जगातील सर्व राष्ट्रांचे संघराज्य असावे. त्यामुळे मानवी एकतेचे अनेक प्रश्न सुटतील. पण हे करीत असताना राष्ट्राच्या स्वयंनिर्णयाच्या तत्त्वाचा त्याग करू नये. 

प्रत्येक देशास अंतर्गत प्रश्नाच्या बाबतीत पूर्ण स्वातंत्र्य असावे. सर्वांना समान अधिकार, स्वयंनिर्णयाचा अधिकार दिला तर वैश्विक एकता निर्माण होईल.

X X

3) आक्रमक राष्ट्रवाद : 

 अरविंद राष्ट्रवादाचे कट्टर समर्थक होते. त्यांनी भारतास स्वातंत्र्य प्राप्त करून देण्यासाठी क्रांतीचा मार्ग स्वीकारला. पण त्यांचा राष्ट्रवाद अध्यात्मिक व लोकशाहीवादी होता. त्यांनी आक्रमक व संकीर्ण राष्ट्रवादास कधीच पाठिंबा दिला नाही. त्यांनी दुसऱ्या महायुद्धात नाझी व जर्मनीच्या आक्रमणाचा निषेध केला. 

राष्ट्रास मजबूत करण्यासाठी, स्वतंत्र करण्यासाठी काम करावे. यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रवाद मांडला. यामध्ये मानवी कल्याण हाच त्यांचा उद्देश होता.

X X

 मानवी एकतेचा आदर्श : 

अरविंद घोष यांचा जीवनाकडे बघण्याचा विशिष्ट असा दृष्टिकोन आहे. 

व्यक्ती हे दैवी शक्तीचे अभिन्न अंग आहे. तसेच प्रत्येक व्यक्ती दैवीशक्तीचे प्रकटीकरण आहे. विविधतेचे प्रकटीकरण आहे. तेव्हा सर्व व्यक्तींचा एकच उद्देश आहे. तो म्हणजे अध्यात्मिक स्वातंत्र्य मिळवणे. यामुळे व्यक्तीव्यक्तीमधील अहंगड समाप्त होतो.

 स्वतःस इतरांच्या ठिकाणी पाहतो. यातून मानवी एकता अस्तित्वात येते. परामत्मभावाचा विकास झाला की, बौद्धिक, मानसिक, सांस्कृतिक एकता स्वाभाविकपणे साकार होण्यास सुरुवात होते व त्यातून राष्ट्रा-राष्ट्रामध्ये एकीकरण सुरू होते. 

प्रत्येक देश मानवी कल्याणात योगदान देईल यासाठी दुहेरी नागरिकत्वाची कल्पना सूचवितात. 

यामुळे अनेक देशातील नागरिकात संवाद प्रक्रिया सुरु होईल व जागतिकीकरण वास्तवात येईल.

X X

अरविंद घोष यांचा वैश्विक बंधूभाव :

अरविंद घोष यांना मानवी एकतेतून जागतिक एकता निर्माण करावयाची होती. 

समाजाची ओळख समता, स्वातंत्र्य व बंधूभावावर व्हावी असे त्यांचे मत होते. समता व स्वातंत्र्य या संकल्पना अतिशय तांत्रिक पद्धतीने आणण्याचा प्रयत्न आपण करीत आहोत. परंतु अशा पद्धतीने जे स्वातंत्र्य व समता प्रस्थापित केली जाते ते वास्तविक स्वातंत्र्य नसते.

X X

 समता तर नसतेच. कारण बंधूभावाशिवाय समताच असू शकत नाही. जोपर्यंत 'स्व' चा अधिक विचार आहे. तोपर्यंत बंधूभाव येणार नाही. कारण इतरांना कमी लेखण्याच्या प्रवृत्तीमधूनच अहंभाव निर्माण होतो. 

वास्तविक बंधूभावाने फक्त अहंभाव, गर्व यांचे प्रश्न सोडवू शकतो. 

जागतिक बंधूभावाची अवस्था केवळ अध्यात्मानेच येऊ शकते. अध्यात्मानेच निर्माण केलेला बंधूभाव हा कायम असेल. वास्तव असेल त्यात कृत्रिमता असणार नाही. अध्यात्मिक एकताच मानसिक एकता निर्माण करेल. 

कायदा व संविधानाने तांत्रिक पद्धतीने निर्माण केलेली एकता आपोआप समाप्त होईल. अध्यात्मिक एकता व्यक्तिस उदार बनवेल. त्यामुळे प्रत्येक व्यक्ती हा स्वहितापेक्षा समाजहितास प्राधान्य देईल व वैश्विक भावना यामधून साकार होईल. 

अशा समाजात व्यक्तिस अध्यात्मिक विकासासाठी जे स्वातंत्र्य हवे असते ते देण्याचा प्रयत्न समाज करेल. 

व्यक्ती व समाज परस्परांना विकासासाठी सहकार्य करतील. परिणामतः वैश्विक एकता अस्तित्वात येईल.

X X

धर्म व मानवता : 

जागतिकीकरणाची पूर्वअट म्हणजे मानवधर्माची वाढ मानवधर्म असे समजतो की, आपण सर्व समान व एक आहोत. आपल्यातील विविधता दैवी शक्तीची निर्मिती आहे. मानवी धर्म व्यक्तीचा आत्मा जागवतो.त्याची पूजा करण्यास सांगतो.

 मानवधर्म असे सांगतो की, प्रत्येक व्यक्तीची पूजा करावी. यातून सत्याची ओळख होऊ शकते. याद्वारेच व्यक्तीस सुखी व समृद्ध जीवनाचा अनुभव घेता येऊ शकतो.

 व्यक्ती शारीरिक सुखापेक्षा मानसिक सुखाचाच विचार करेल, यासाठी तो अध्यात्मिक मार्गाचा स्वीकार करेल व जागतिक एकता साकार होईल.

X X

अरविंदाचे साध्य "भारत भारतीयांसाठी":

संपूर्ण स्वायत्त स्वराज्याचे उद्दिष्ट :  

स्वराज्याचे उद्दिष्ट म्हणजे इंग्रजी सत्तेपासून व नियंत्रणापासून संपूर्ण स्वायत्ततेचे आहे. जगातल्या प्रत्येक राष्ट्राला स्वतःचे जीवन स्वतःच्या शक्तीच्या बळावर, स्वतःच्या स्वभावानुसार व आदर्शानुसार व्यतित करावयाचा हक्क असावा असे अरविंदांचे मत होते. 

आमच्या सभ्यतेपेक्षा निम्न दर्जाची सभ्यता आमच्यावर लादण्याचा व आम्हाला आमच्या वारसापासून स्वतःच्या तथाकथित श्रेष्ठत्वाच्या जोरावर वंचित ठेवण्याचा राज्यकर्त्यांचा अधिकार आम्हाला मान्य नाही. यामुळे भारतीयांनी फक्त स्वातंत्र्यप्राप्तीसाठी प्रयत्न करावे असे त्यांना वाटत होते. 

X X

मानवमात्राच्या अध्यात्मिक उन्नतीसाठी स्वराज्य व प्रगतीसाठी स्वातंत्र्य :

भारतातील मवाळ नेत्यांना अरविंदांनी स्वराज्याची मागणी करणे हे दिवास्वप्न वाटत असले तरी अरविंदांच्या राजकारणाकडे बघण्याचा अध्यात्मिक दृष्टिकोनात याचे उत्तर मिळते.

 त्यांच्या मते भारताचे स्वराज्य म्हणजे प्राचीन परीपूर्ण जीवनाचे पुनरागमन असेल. त्यांच्या राष्ट्रीय महात्मतेचे ते पुनःप्रकटीकरण असेल. स्वराज्य प्राप्तीनंतर भारत स्वार्थी व संकुचित हेतू बाजूला ठेवून चिरंतन व अभिनव धर्म जगाला देईल. 

यामधून संपूर्ण मानवमात्राची अध्यात्मिक उन्नती घडून येईल. स्वातंत्र्य हे अरविंदांसाठी केवळ एक राजकीय साध्य नव्हते. केवळ घटनात्मक तरतूदीची फेररचना नव्हती. तर ती एक सखोल आणि मूलभूत स्वरूपाची अध्यात्मिक गरज होती. स्वातंत्र्याशिवाय भारताचे राष्ट्र म्हणून अस्तित्वच नष्ट होईल आणि अध्यात्मिक प्रकाशाला संपूर्ण जग मुकेला.

X X

पाश्चात्त्यांच्या प्रभावातून मुक्तता: 

अरविंदांच्या मते देशाचा सामाजिक, आर्थिक, राजकीय, प्रशासकीय क्षेत्रातील विकास जोपर्यंत हा देश परकीय राजवटीतून संपूर्णपणे मुक्त होत नाही तोपर्यंत घडून येणे अशक्य आहे.

 कोणत्याही प्रगतीचे मूळ राजकीय स्वातंत्र्य आहे. म्हणून सामाजिक, आर्थिक सुधारणांची मागणी करून वेळ घालविण्यापेक्षा राजकीय स्वातंत्र्यावर त्यांनी आपले लक्ष केंद्रित केले.

अरविंद घोष म्हणतात , राजकीय स्वातंत्र्य हे राष्ट्राचे जीवन सर्वस्व असते. या आद्य व सर्वश्रेष्ठ साध्याकडे दुर्लक्ष करून नैतिक, सामाजिक, शैक्षणिक सुधारणांचा वा औद्योगिक विकासाचा प्रयत्न करणे ही अज्ञपणाची परीसीमा असून निरर्थक आहे. अशा प्रयत्नामधून निराशा व अपयश याशिवाय काहीही मिळत नाही.

अरविंदांच्या मते," नव्या चळवळीची मध्यवर्ती कल्पना ही पाश्चात्त्य प्रभूत्व कोणत्याही स्वरूपात राहू नये ही आहे. कारण सामाजिक, आर्थिक, धार्मिक, बौद्धिक, प्रभूत्व कायम राहणे हे आत्मज्ञान झालेल्या भारताच्या उत्थापनाशी व विकासाशी विसंगत ठरेल. ब्रिटिश शासनावर कोणत्याही प्रकारे विसंबून न राहता आपली प्रगती हे राष्ट्र निश्चितपणे करू शके. 'भारत भारतीयांसाठी' हे नव्या चळवळीचे ब्रीदवाक्य होते.

X X

स्वातंत्र्यासाठी योग्य राजकीय साधने : 

राजकीय साध्याबाबत मवाळ -जहालामध्ये मतभेद होते. तसेच साधनाबाबतही फार मोठी भिन्नता होती.

 अरविंद घोष यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागी करून स्वातंत्र्यासाठी कोणताही मार्ग योग्य आहे अशी त्यांची भूमिका होती.

 त्यांच्या मते भारत माता पारतंत्र्यात आहे. त्यामुळे तिची सामाजिक व आर्थिक ओळख अंधूक झाली आहे. ती पुसण्याचा प्रयत्न ब्रिटिश करीत आहेत. व्यक्तिचा प्राण वाचविण्यासाठी कोणता मार्ग असतो? भारतीयांनी मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी कोणताही मार्ग त्याज्य समजू नये. 

ज्या मार्गाने भारताला स्वातंत्र्य देणे राज्यकर्त्यांना भाग पडेल असे स्वाभिमानी मार्ग या चळवळीने अवलंबिले पाहिजेत. 

X X

1) भारताचा गौरवशाली इतिहास : 

अरविंदांच्या मते राष्ट्राचे सुप्त चैतन्य जागे करून राष्ट्रबांधवांच्या मनात स्वातंत्र्य होण्याची अदम्य उर्मी उफाळून आणणे हा तो मार्ग आहे. त्याशिवाय जनतेचे शैथिल्य, अनास्था, नैराश्य व निष्कर्तव्यता नाहीशी होऊन ती क्रीयाशील होणार नाही.

 जनतेची ही तत्कालीन अवस्था हाच मोठा मानसिक अडथळा या देशाच्या स्वातंत्र्य प्रयत्नाच्या वाटेत असल्याचे त्यांना जाणवले. त्यामुळेच आमची मने प्रथम स्वतंत्र केली पाहिजे असे त्यांचे मत होते.

 यासाठी देशातील जनतेच्या मनात आपल्या उज्वल सांस्कृतिक वारशासंबंधी जाज्वल्य अभियान निर्माण करणे. 

प्राचीन काळात भारत विविध कला, राजकीय व सामाजिक संघटन, राजकारण इत्यादी असंख्य क्षेत्रात भारताने मिळवलेल्या यशाची जाणीव करून देणे हाच होता. 

X X

2) प्रत्यक्ष क्रांती व संघटित सशस्त्र उठाव :

अरविंद घोष यांच्या मते चळवळीची साधने ही परिस्थिती सापेक्ष असतात किंवा तशी ती असावीत. 

गुलामगिरीची जी अवस्था व जशी स्थिती असेल त्यानुसार योग्य साधने अमलात आणली गेल्यास उद्देश साध्य होऊ शकतो. देशमुक्तीसाठी हिंसेचा मार्ग त्यांना मान्य होता. स्वातंत्र्य म्हणजे देशासाठी श्वास आहे. तो प्राणवायू आहे. त्याचा अभाव मृत्युकडे नेत असतो.

चळवळीच्या अनेक मार्गांपैकी सशस्त्र उठाव हा एक मार्ग आहे. जगाच्या इतिहासात अनेक गुलामांनी व पीडीतांनी या मार्गाचा अवलंब केला होता आणि जेव्हा जेव्हा यशाची खात्री असेल तेव्हा तेव्हा तो मार्ग नेहमीच अवलंबिला जाणार आहे. कारण तो अत्यंत सोयीचा व गतीमान मार्ग आहे. 

तसेच परिणामाच्या दृष्टीने विलक्षण प्रभावी आहे. जनतेकडून दीर्घकालीन सहनशक्तीची व छळ सोसण्याची अपेक्षा तो ठेवीत नाही. तसेच कमीत कमी व अल्पकाळ बलिदानाने तो यशस्वी होऊ शकतो. अशी त्या मार्गासंबंधी अरविंदाची धारणा होती.

अरविंदाच्या मते प्रस्थापित सरकारे स्वतःच जुलमी असतात. तीच प्रामुख्याने प्रजेने अवलंबिलेल्या सगळ्या हिंसात्मक मार्गांना भयंकर गुन्हे ठरवून दडपीत असतात. 

परंतु या दडपशाहीतून त्यांना संकट टाळता येत नाही. त्यांना जरी हे मार्ग मान्य नसले तरी मानवी सद्सद्विवेक बुद्धीला ते मान्य आहेत.

जेव्हा राष्ट्राच्या जीवावर कुणी उठतो तेव्हा आत्मसंरक्षणार्थ कोणत्याही आणि शक्य त्या प्रत्येक मार्गाचा अवलंब योग्य आणि समर्थनीय आहे. दमन जेवढे अधिक तेवढाच प्रतिकाराचा मार्गही प्रभावी होत जाणे स्वाभाविक आहे. 

रशिया आणि आयलँड या दोन्ही राष्ट्राच्या इतिहासावरून हेच दिसून येते. साधनाच्या परिस्थिती सापेक्षतेबद्दल अरविंदांनी जे मत वर मांडण्यात आले आहे त्या दृष्टीने ते सशस्त्र क्रांतीचे समर्थन करतात.

X X

ब) दहशतवाद :

अरविंद घोष यांनी स्वातंत्र्यासाठी दहशतवादास पाठिंबा दिला. त्याचे समर्थन केले. त्यांच्या मते राज्यकर्ते आपल्या दडपशाहीच्या धोरणामुळे शांततापूर्ण राजकीय घडामोडी अशक्य करून सोडीत असल्यामुळे उग्र दहशतवादी कारवायांना चालना मिळते व बळ प्राप्त होते. 

या संदर्भात ते रशियन राज्यक्रांतीचे उदाहरण देतात. परंतु याचबरोबरोबर ते म्हणतात की, केवळ अशा तुरळक भूमिगत प्रयत्नांनी या देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही. तर त्यासाठी ही चळवळ व्यापक, अधिक उघड व सर्वस्पर्शी होणे आवश्यक आहे.

X X

3) सविनय प्रतिकार :

अरविंद घोष यांनी सविनय प्रतिकार यासाठी "बचावाला प्रतिकार" अशी संज्ञा वापरली आहे. हा भारताच्या मुक्तीसंग्रामासाठी सर्वोत्तम मार्ग आहे असे त्यांना वाटते. कारण या मार्गाने राज्यकर्त्यांना पकडता येते. 

पण या देशातील नागरिकांवरही स्वावलंबनाचे व आत्मनिर्भरतेचे संस्कार केले जाऊ शकतात. या दोन गुणांशिवाय स्वातंत्र्यलढा यशस्वी होऊ शकत नाही.

“दि ड्रोक्ट्रिन ऑफ पॅसिव्ह रेझिटन्स" या नावाने ग्रंथबद्ध करण्यात आलेल्या या ग्रंथात सविनय प्रतिकाराचा हेतू सांगताना अरिवंद म्हणतात की, सविनय प्रतिकारासाठी तात्कालीन हेतू असू शकतो. 

आक्रमक व बचावात्मक प्रतिकारामधील फरक स्पष्ट करताना अरविंद लिहितात की, जेव्हा प्रतिकार आक्रमक असतो तेव्हा प्रतिकारकर्ता अशा काही गोष्टी करतो की, ज्यामुळे शासनाला भरीव स्वरूपाचे नुकसान होईल. 

या उलट बचावात्मक अथव सविनय प्रतिकारकर्ता अशा गोष्टी करण्यापासून परावृत्त होतो ज्या केल्या असता शासनाला वठणीवर आणणे. 

जेथील शासन हे जनतेच्या इच्छेवर चालते तेथे सविनय प्रतिकाराची पद्धत विशेष उचित ठरते.

भारतावरील इंग्रजी राजवटीचा पाठिंबा व मुकसंमती जर काढून घेतली तर ती राजवट या देशात चालू राहणे अशक्यप्राय होऊन जाईल व तिच्या मुळावरच घाव बसेल. 

भारताचे शोषण करणाऱ्या ब्रिटिश व्यापाराला वा या देशावर प्रशासन करणाऱ्या ब्रिटिश नोकरशाहीला मदत होईल अशी कोणतीही गोष्ट करण्यास संघटितपणे नकार देऊन व्यापार व प्रशासन अशक्यप्राय करून सोडावे आणि जोपर्यंत परिस्थितीत लोकांना अपेक्षित बदल, अपेक्षित प्रमाणात घडून येत नाही तोपर्यंत हे असेच चालू ठेवावे. 

याला बहिष्कार असे म्हणता येईल. या बहिष्काराच्या अवलंबनातून भारत जगासमोर नैतिक शक्ती व शांततापूर्ण मार्गाने क्रांती घडवून आणण्याचे एक अभूतपूर्व उदाहरण ठेवू शकतो असे अरविंदांचे मत होते. 

X X

सविनय प्रतिकारासाठी पाच मार्गांचा अवलंब :

1) आर्थिक बहिष्कार/ स्वदेशी:

ब्रिटिशांची भारतात सत्ता स्थिरावण्यामागे प्रमुख प्रेरणा आर्थिक शोषणाची आहे. या शोषणप्रक्रियेला ज्या ज्या प्रक्रियेने भारतीयांचे सहकार्य व सहाय्य होत असेल ते बंद करणे. हे या देशातील सविनय प्रतिकारकार्याचे आद्य कर्तव्य आहे असे त्यांचे मत होते. 

या दृष्टिने महत्त्वाचे पाऊल म्हणजे विदेशी विशेषतः इंग्रजी मालावर बहिष्कार टाकणे. तो माल मुळीच विकत न घेणे आवश्यक आहे. 

X X

ब्रिटिश मालावरील संघटित आणि अविश्रांत बहिष्काराच्या मार्गाने देशाची पिळवणूक यापुढे अशक्य करून सोडण्याचा याद्वारे प्रयत्न केले जाणार आहेत.

आर्थिक बहिष्काराच्या या साधनामागील दोन गृहीत तत्त्वे म्हणजे इंग्रजी सत्तेचे या देशातील धोरणाचे मुख्य सूत्र या देशाचे आर्थिक शोषण करणे हे आहे. 

यामुळे या देशातील नागरिकांनी जर निर्धारपूर्वक स्वेच्छेने परदेशी मालावर बहिष्कार घातला तर हे शोषण ते बंद करू शकतात.

बहिष्कार कार्यक्रमाची दुसरी बाजू म्हणजे स्वदेशी होय. स्वदेशी म्हणजे लोकांच्या गरजा भागविण्यासाठी स्वतःच्या देशात स्वप्रयत्नांनी आवश्यक त्या गोष्टी तयार करणे ही दीर्घकाळ व संथ चालणारी प्रक्रिया आहे. 

कारण आर्थिक स्वावलंबनाशिवाय आर्थिक बहिष्कार आवश्यक आहे. यामुळे एतद्देशीय उद्योगधंद्याचा विकास करणे आवश्यक आहे.आर्थिक बहिष्काराची दोन उद्दिष्टे होती. 

एका बाजूने ब्रिटिश साम्राज्याची मुळे खिळखिळी करणे आणि दुसऱ्या बाजूने या राष्ट्राच्या स्वावलंबनाधिष्ठित आर्थिक पुनरूज्जीवनाची पायाभरणी करणे यावर अरविंद घोष यांचा भर होता.

X X

2) शैक्षणिक बहिष्कार / राष्ट्रीय शिक्षण :

 राष्ट्रातील जनतेच्या मनात राष्ट्रहिताची जाणीव राष्ट्रीय शिक्षणातून आकार घेत असते. परंतु ब्रिटिश काळात भारतात दिल्या जाणाऱ्या शिक्षणातून पाश्चात्त्य संस्कृती व पाश्चात्त्य दृष्टिकोन आणि सभ्यता यांचे संस्कार होत असल्याने ब्रिटिश शासनास सहकार्य करणारा वर्ग तयार होत होता. 

या शिक्षणपद्धतीतून स्वतःचे स्वत्व गमावून इतरांचे अंधानुकरण करण्यात स्वतःला धन्य समजणारा वर्ग तयार होत असल्याने अरविंद घोष यांनी यावर टिका केली आणि या शिक्षण पद्धतीवर बहिष्काराचा मार्ग सूचविला. 

या शैक्षणिक बहिष्कारामुळे राष्ट्रीय चळवळीचे सामर्थ्य अनेक पटीने वाढेल यावर त्यांचा विश्वास होता. या बहिष्काराचा संबंध विद्यार्थी या घटकाशी येणार होता. 

विद्यार्थी ही समाजातील संख्येने सर्वात मोठी व प्रभावाने सर्वश्रेष्ठ अशी प्रक्षिप्त शक्ती आहे. ती जर जागी झाली व तिने बहिष्कारास पाठिंबा दिला तर अशक्य ते शक्य करण्याचे सामर्थ्य राष्ट्रीय चळवळीच्या अंगी येण्यास वेळ लागणार नाही.

अरविंद घोष यांच्या मते सरकारी वा सरकार पुरस्कृत शाळांमधून मुलामुलींना पाढवायचे नाही म्हणजे राष्ट्रीय शिक्षणाची सोय करून घेणे व त्यासाठी भारताच्या प्राचीन आदर्शावर अनेक शाळा सुरू करणे आवश्यक ठरते. त्याशिवाय शैक्षणिक बहिष्कार यशस्वी होऊ शकत नाही. 

X X

3) न्यायालयीन बहिष्कार आणि राष्ट्रीय लवाद न्यायालये : 

आम्ही न्यायप्रशासनाबद्दल असंतुष्ट आहोत. सनदी क्षेत्रातील न्यायव्यवस्थेची महर्गता व फौजदारी क्षेत्रातील शिक्षाचे क्रुर व पाशवी स्वरूप, न्यायव्यवस्थेचे पक्षपाती स्वरूप आणि राजकीय हेतूने ताबेदारी पत्करण्याची तिची वृत्ती याबद्दल असामधान आहे. 

त्यामुळे आम्ही परकीय न्यायालयात जाण्यास नकार देतो आणि ही स्थिती अशीच असेपर्यंत सुसंघटित न्यायालयीन बहिष्काराच्या मार्गाने नोकरशाही पद्धतीचे हे न्यायप्रशासन अशक्य करून सोडण्याचा निर्धार करतो. 

अशा शब्दात अरविंद घोष यांनी न्यायालयीन बहिष्काराचे समर्थन केले आहे. शासनाशी कोणत्याही प्रकारचे सहकार्य करायचे नाही या व्यापक बहिष्कार सिद्धांताशी ते सुसंगत आहे.

 अरविंदांना याची पुरेपूर जाणीव होती की, इतर क्षेत्रातील बहिष्काराइतके यश न्यायक्षेत्रातील बहिष्काराला मिळणे शक्य नाही.

X X

4) कार्यकारी सत्तेवर बहिष्कार आणि राष्ट्रीय संघटना : 

 अरविंदांच्या बहिष्कार कार्यक्रमात कार्यकारी सत्तेवरील बहिष्काराला अत्यंत महत्त्वाचे स्थान होते. कारण शासनाचे हे महत्त्वाचे अंग अधिकाधिक जनसंपर्कात येत असते. कार्यपालिकेशी जनतेचा नित्य संबंध येत असतो.

अरविंद घोष यांच्या मते भारतीय  कर्तव्यच ठरते. 

X X

5) सामाजिक बहिष्कार : 

बहिष्कार यशस्वी होण्यासाठी पाठबळाची आवश्यकता आहे. जे भारतीय लोक राष्ट्रीय चळवळीत भाग घेणार नाहीत किंवा बहिष्कारात भाग घेण्याऐवजी इंग्रज शासनाशी सहकार्य करतील अशा राष्ट्रहित विरोधकांना वठणीवर आणण्यासाठी उपाययोजना करणे हे बहिष्काराच्या चळवळीचे एक महत्त्वाचे अंग ठरते.

 म्हणून अरविंदांनी सामाजिक बहिष्काराच्या तंत्राचा पुरस्कार केला आहे. जनतेची इच्छा प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने त्यांना हे शस्त्र अत्यावश्यक वाटते. 

बहिष्कार चळवळीची प्रतारणा करणाऱ्याविरूद्ध प्रभावी कृती करण्याचा तो एक अत्यंत परिणामकारक मार्ग असल्याचे ते सांगतात. 

अशा लोकांसोबत कोणत्याच प्रकारचे सामाजिक संबंध इतरांनी ठेऊ नये. यामुळे चळवळीशी प्रतारणा केल्याचा त्यांना ज्यायोगे पश्चात्ताप होईल.

अशा सामाजिक बहिष्काराचा सर्वात मोठा फायदा हा आहे की यात कुठेही कायद्याचा भंग नाही. त्यामुळे बहिष्काराचा हा मार्ग परिणामाच्या दृष्टीने अत्यंत प्रभावी ठरतो.

X X

श्रीअरविंदांचे राष्ट्रीय शिक्षणविषयक विचार:

हिंदुस्थानातील पहिल्या नॅशनल कॉलेजचे म्हणजे बेंगाल नॅशनल कॉलेजचे (सध्याचे जादवपूर विद्यापीठ) प्राचार्य झाले. त्यांनी मांडलेल्या शिक्षणविषयक विचारांमुळे ते शिक्षणतज्‍ज्ञ म्हणून ओळखले जातात.

श्रीअरविंद यांनी राष्ट्रीय शिक्षणाला महत्त्व दिले आहे. भूतकाळ हा आपला पाया, वर्तमान हे आपले साहित्य आणि भविष्य हे आपले उद्दिष्ट आणि शिखर असते.

शिक्षणाच्या राष्ट्रीय पद्धतीमध्ये प्रत्येकाला त्याची जागा, त्याचे योग्य स्थान मिळाले पाहिजे. अशी त्यांची विचारसरणी होती.

श्रीअरविंद यांनी राष्ट्रीय शिक्षणाला प्रतिपादित केलेली त्रिसूत्री:

1. काहीही शिकविता येत नाही हे खऱ्या शिक्षणाचे पहिले तत्त्व आहे. शिक्षक हा माहिती देणारा किंवा मुलांना काम करायला लावणारा (गृहपाठ देणारा) नसतो तर तो मदतनीस आणि मार्गदर्शक असतो. लादणे नाही तर सुचविणे हे त्याचे काम असते. तो खरंतर विद्यार्थ्याचे मन घडवित नाही. ज्ञानसाधने परिपूर्ण कशी बनवायची हे तो दाखवितो आणि या प्रकियेत तो विद्यार्थ्याला मदत करतो, प्रोत्साहन देतो. तो विद्यार्थ्यांना ज्ञान देत नाही तर स्वयंअध्ययन करून ज्ञान कसे मिळवायचे याची पद्धत तो शिकवितो. विद्यार्थ्यांच्या अंतरात दडलेल्या ज्ञानाचे तो कारण ठरत नाही तर ते ज्ञान कोठे दडलेले आहे आणि त्याला पृष्ठभागावर आणण्याची सवय कशी लावायची हे तो दाखवितो.

X X

2. मनाच्या विकासासाठी मन विचारात घेणे आवश्यक आहे हे दुसरे तत्त्व आहे. आईवडिलांच्या किंवा शिक्षकाच्या इच्छेनुसार विद्यार्थ्याला ठाकूनठोकून घडविणे, त्याला आकार देणे ही कल्पना म्हणजे एक क्रूर आणि अडाणीपणाची अंधश्रद्धाच आहे. त्याचा जो मूळ स्वभाव आहे, प्रकृती आहे त्याचा स्वाभाविक विकास घडविण्यासाठी त्याने स्वतःलाच प्रवृत्त केले पाहिजे. एखाद्या पूर्वनियोजित (पालकांनी ठरविलेल्या) व्यवसायासाठी त्याला तयार करणे किंवा आपल्या मुलाने हे विशिष्ट गुण, क्षमता, कल्पना, सद्गुण संपादित केले पाहिजेत असे पालकांनी आधीच ठरविणे ही पालकांची घोडचूक ठरेल.विकसनशील जीवामधील जे सर्वोत्तम आहे ते (प्रकट होणे) बाहेर काढणे आणि त्याचा भल्या(चांगल्या, उमद्या) कामासाठी उपयोग होण्यासाठी ते विकसित करणे हेच शिक्षणाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

3. जवळून दूराकडे, जे आहे त्याकडून जे पाहिजे त्याकडे वाटचाल हे शिक्षणाचे तिसरे तत्त्व आहे.

X X

श्रीअरविंदांचे तत्त्वज्ञान:

अतिमानसाच्या उच्चतम शिखरावर पोहोचून त्याचा साक्षात्कार करून घेणे आणि जडभौतिक अस्तित्वामध्ये त्याचे अवतरण घडविणे हे श्रीअरविंदांच्या पूर्णयोगाचे ध्येय होते. कर्म, ज्ञान, आणि भक्ती यांच्या समन्वयावर आधारित 'पूर्णयोगा'ची मांडणी त्यांनी केली. पूर्णयोग तत्त्वज्ञानामध्ये ज्ञान, कर्म आणि भक्ती यांच्या समन्वयातून, भौतिक जीवनामध्ये दिव्यत्व आणण्याच्या प्रयत्न करण्यावर भर आहे. 'माणूस हा उत्क्रांतीतील शेवटचा टप्पा नाही, त्यानंतर अतिमानसाचा (Supermind) उदय व्हायचा आहे'; यासंबधीची तार्किक आणि तात्त्विक मांडणी त्यांनी 'दिव्य जीवन' या ग्रंथातून केली आहे.

श्रीअरविंद हे एक समन्वयकारी, संश्लेषणकारी आणि समग्रतेने विचार करणारे विचारवंत आहेत. ते पूर्व व पश्चिम, बुद्धिवाद व धर्म, विज्ञान व अध्यात्म, शरीर व आत्मा, इहलोक व परलोक, आधिभौतिक व आध्यात्मिक यांच्यात भेद व द्वैत आहे असे मनात असले तरी त्यांच्यात विरोध व वैर आहे असे ते मानत नाहीत. उलट ही सर्व परस्परपूरक बनली पाहिजेत आणि त्यांनी परस्परांना पूरक व पोषक भूमिका असली पाहिजे असते त्यांचे मत आहे.

त्यांच्या तत्त्वचिंतनात वेदांताचा परमात्मा व परमेश्वर तसेच अचल, स्थिर, अविकारी, अविनाशी परब्रह्म, त्रिगुणातीतता, सांख्यांची प्रकृती, शाक्तांची शक्ती आणि शक्तीशीलत्व, वैष्णवांचा वासुदेव, बौद्धांचे अप्रतिहत परिवर्तन व संभवन या सर्वांना परस्परांशी विरोध न होता स्थान मिळालेले आहे.

X X

ग्रंथ संपदा/निर्मिती:

1. The Synthesis of Yoga (योगसमन्वय)

2. Essays on the Gita (गीतेवरील निबंध)

3. Isha Upanishad (ईश-उपनिषदावरील भाष्य)

4. The Life Divine (दिव्य जीवन)

5. The spirit and forms of Indian polity

6. Supermam

7. Evolution

8. The foundation of Indian Culture (भारतीय संस्कृतीचा पाया)

9. The secret of the Veda (वेदरहस्य) 

10. The ideal of human Unity (मानवी एकतेचा आदर्श) 

X X

11. Savitri (सावित्री) : एक आख्यायिका आणि एक प्रतीक. सुमारे 24 हजार ओळींचे हे खंडकाव्य प्रसिद्ध महाकाव्य सुमारे 50 वर्ष ‘सावित्री’चे इंग्रजीत लेखन सुरू होते.मराठीसह अनेक भाषांमध्ये त्याचे अनुवाद.

12. Collected Works of Sri Aurobindo या नावाने 36 खंडांमध्ये श्रीअरविंद घोष यांचे साहित्य, प्रकाशित , पृष्ठसंख्या 21500 .


X X

श्रीअरविंद आश्रम पुददुचेरी:

 फ्रान्सच्या ताब्यात असलेल्या पाँडेचरी येथे 4 एप्रिल 1910 रोजी अरविंद घोष गेले आणि तिथेच त्यांच्या आयुष्याचे अखेरचे पर्व सुरू झाले. 1920 साली मिसेस मीरा अल्फासा या पॉंडिचेरी येथे कायमस्वरूपी वास्तव्यास आल्या आणि त्यांच्या सहयोगाने 1926 साली श्रीअरविंद आश्रम याची स्थापना झाली. आश्रमाची सारी सूत्रे त्यांनी श्रीमाताजींकडे सोपविली आणि ते उच्चतर साधनेसाठी एकांतात गेले.

श्रीमती मार्गारेट वूड्रो विल्सन- श्रीमती निष्ठा या नावाने संबोधले जात असे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मि.वूड्रो विल्सन यांच्या या कन्या होत्या.1938 साली श्रीअरविंद आश्रमात वास्तव्यास आल्या आणि अखेरपर्यंत तेथेच राहिल्या. 



X X

श्रीअरविंद घोष यांचे अनुयायी:

1. श्री. निरोदबरन -एडिनबर्ग येथून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेले डॉक्टर Correspondence with Sri Aurobindo (दोन भाग) आणि Talks with Sri Aurobindo (तीन भाग), Twelve years with Sri Aurobindo ही त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. श्रीअरविंद यांच्या 'सावित्री' या महाकाव्याचे लेखनिक .

2. श्री. माधव पु. पंडित-आध्यात्मिक लेखक, शिक्षक आणि संस्कृत पंडित.

3. श्री. पवित्र- मूळ नाव - फिलीप बार्बियर सेंट हिलरी (Philippe Barbier Saint-Hilaire)पॅरिस निवासी, शिक्षण व व्यवसायाने अभियंता होते. झेन आणि तंत्रशास्त्राचा अभ्यास करून 1935 साली श्रीअरविंद आश्रमात आले आणि पुढील सर्व जीवन तेथेच व्यतीत केले. नव्याने स्थापन केलेल्या Sri Aurobindo International University Centre च्या संचालकपदाची जबाबदारी श्रीमाताजींनी त्यांच्याकडे सोपविली, ती त्यांनी 18 वर्षे सांभाळली. श्रीअरविंद आश्रमाचे जनरल सेक्रेटरी म्हणूनही कार्यरत होते. 

4. श्री. दिलीपकुमार रॉय-बंगाली गायक, कादंबरीकार, कवी आणि निबंधकार.

X X

श्रीअरविंदांचे प्रतीक (Symbol):

श्रीअरविंदांचे प्रतीक असणाऱ्या ह्या चिन्हामध्ये अधोमुख त्रिकोण हा सत्-चित्-आनंद यांचे प्रतीक आहे. तर त्याच्या स्वीकारासाठी उन्मुख असणारी प्राण, प्रकाश व प्रेम या स्वरूपातील पार्थिव तत्त्वाची अभीप्सा, ऊर्ध्वमुख त्रिकोणाने दर्शविली आहे. दोन्ही त्रिकोण जेथे मिळतात तो मध्यावरील चौरस म्हणजे संपूर्ण आविष्काराचा दर्शक आहे, त्याच्या केंद्रस्थानी असणारे कमळ हे परमश्रेष्ठाचा अवतार आहे. चौरसातील पाणी हे वैविध्यपूर्ण निर्मितीचे, सृष्टीचे प्रतीक आहे.

X X

श्रीअरविंद यांची महासमाधी:

भारताचा महायोगी श्रीअरविंद यांनी 5 डिसेंबर 1950 रोजी त्यांनी देह ठेवला. त्यांच्या निधनानंतरही 4 दिवसपर्यंत त्यांचा देह विघटन न होता, तसाच सचेत अवस्थेमध्ये टिकून होता. 9 डिसेंबर 1950 रोजी श्रीअरविंद आश्रमात त्यांची समाधी बांधण्यात आली.1973 सालापर्यंत श्रीमाताजींनी श्रीअरविंद यांच्या कार्याची धुरा सांभाळली.


                   श्रीमाताजी

श्रीअरविंदांचे प्रतीक








X X

View, Comments and share....

X X



Post a Comment

5 Comments