Subscribe Us

header ads

Vasudev Balwant Phadke: Father of Indian Armed Rebellion

Vasudev Balwant Phadke: Father of Indian Armed Rebellion ,Indian independence activist and revolutionary 

वासुदेव बळवंत फडके: भारतीय आद्य क्रांतिकारक 

 जन्मदिन- 4 नोव्हेंबर

सृतिदिन: 17 फेब्रुवारी

बालपण आणि शिक्षण :

वासुदेव बळवंत फडके यांचा जन्म कुलाबा जिल्ह्यात शिराढोण येथे 4 नोव्हेंबर 1845 रोजी झाला. शरीरप्रकृतीतील धडाकटपणा, अवयवांचा रेखीवपणा, सरळ नाक, गोरा रंग, घारे डोळे ही त्यांची वैशिष्ट्ये होती. त्यांचे कल्याण येथील ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या शाळेत प्राथमिक शिक्षण पुर्ण झाले.1857 च्या उठावाच्या वेळी ते 12 वर्षांचे होते. 1857 च्या उठावात देशात क्रांतिकारी आंदोलनात सहभाग नोंदवून इंग्रजांच्या विरोधात उठाव करणारे देशभक्त नानासाहेब पेशवा, तात्या टोपे, झाशीची राणी यांच्या वीरतेच्या गोष्टी ऐकूण फडके यांच्या मनात स्वातंत्र्याची भावना निर्माण झाली होती. पनवेल येथील दाजीसाहेब सोमण यांची कन्या सईबाईशी त्यांचा विवाह वयाच्या १५ व्या वर्षी झाला होता.


ब्रिटिशांची नोकरी व राजीनामा:

 रेल्वेच्या ऑडिट कचेरीत दरमहा 20 रु. पगाराची नोकरी वासुदेव फडके यांना लागली होती. पण त्या कचेरीतील येथील हेड क्लार्क त्यांच्याशी व इतर कारकुनांशीही अत्यंत तुसडेपणाने वागत असे. पण कार्यालयातील कामकाज व सुंदर हस्ताक्षरामुळे त्यांनी वरिष्ठांची मर्जी संपादन केली होती. कामातील नियमितपणा पाहून त्यांच्या वरिष्ठांनी त्यांचा पगार 60 रु. महिन्यापर्यंत वाढवला होता. ऑफिसच्या कामांत ते अत्यंत दक्ष व नियमित काम करत होते. गावाकडे आई आजारी असल्याची त्यांना बातमी मिळाली व तिच्या भेटीसाठी गावाकडे जावयाचे होते त्यामुळे त्यांनी आपला रजेचा अर्ज आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे दिला पण तो वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मंजूर केला नाही. त्यामुळे त्यांना आपल्या गावी जाता आले नाही त्यांच्या आईचे शेवटचे दर्शनही त्यांना घेता आले नाही. त्यामुळे ते खूप संतप्त झाले. ब्रिटिशांबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रचंड चीड निर्माण झाली. ब्रिटिश अधिकारी हे भावना शून्य आहेत. त्यांची शिस्त याचा त्यांना राग आला. वासुदेव बळवंत फडके यांनी तात्काळ त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. कारण त्यांना पगारापेक्षा स्वाभिमानाने नोकरी करावी असा विचार होता. 

X X

प्रारंभीचे लोकजागृतीचे कार्य:

 न्या. रानडे, सार्वजनिक काका ऊर्फ गणेश वासुदेव जोशी ही मंडळी पुणे सार्वजनिक सभेच्या माध्यमातून सार्वजनिक कार्यात पुण्यात सक्रिय होती. पण ती मवाळ मंडळी होती. ब्रिटिश सरकार विरुद्ध बंड करणे हे त्यांना मुळीच मान्य नव्हते. पण वासुदेव बळवंत फडके यांना आपल्या देशबांधवांच्या हिताची तळमळ होती. त्यावेळच्या दुष्काळामुळे जनतेची अन्नान्न दशा झाली होती. ब्रिटिश सरकारवर अवलंबून नसलेली व राष्ट्रीय शिक्षण देण्यासाठी Poona Native Institute ही संस्था स्थापन करून त्यांनी नवीन विद्यालय स्थापन केले होते. पण वासुदेव फडक्यांची क्रांतिकारक मते प्रसिद्ध असल्याने कित्येक काही पालक या शाळेत आपली मुले पाठवीत नसत. 

इंग्रज अधिकाऱ्यांच्या प्रचंड पगारावर फडके यांनी टीका केली होती. आपण इंग्रजांना त्यांच्या देशात परत पाठविले गेले पाहिजे. आपला देश स्वतंत्र झाला पाहिजे असे ते जाहीरपणे सांगत. इंग्रज सरकारची दडपशाही व अन्याय यावर ते जाहीर व्याख्याने देऊ लागले. सुशिक्षित लोक देशासाठी काही करत नाहीत याचे त्यांना दुःख होई. पुणे सार्वजनिक सभेच्या माध्यमातून त्यांनी लोकजागृतीचे काम केले.


ब्रिटिश सत्तेविरुद्धरामोशी लोकांची संघटना:

महाराष्ट्रात 1876 मध्ये दंगे उसळले होते. कर्जबाजारी लोकांनी सावकारांविरुद्ध हे दंगे सुरू होते. महाराष्ट्रात 1877-78 या वर्षात भयंकर दुष्काळ पडला होता. लोकांची अन्नान्न दशा झाली होती. कॉलरा, देवी या रोगांनीही महाराष्ट्रात थैमान घातले होते. वासुदेव फडक्यांनी सर्व मराठी मुलुखांचा महाराष्ट्र दौरा केला. लोकांची दयनीय स्थिती पाहून त्यांना अत्यंत वाईट वाटले होते. ब्रिटिश सत्तेविरुद्ध उठाव केला पाहिजे असे त्यांना नेहमी वाटू लागले. त्यांचा लष्करी सामर्थ्यावर विश्वास होता. म्हणून ते शस्त्र विद्या शिकू लागले. तलवार, दांडपट्टा, भाला, नेमबाजी, बरची, बंदूक इत्यादी हत्यारे चालविण्याचे प्रशिक्षण त्यांनी पुण्यातील वेताळपेठेत राहणारे लहुजी साळवे मांग व राणबा महार यांच्याकडून घेतले. पांढरपेशा सुशिक्षित वर्ग हा आपल्या विचारांना प्रतिसाद देत नाही हे लक्षात आल्यामुळे त्यांनी रामोशी व भिल्ल लोकांशी संपर्क करुन त्यांची संघटना निर्माण केली. सरकारी खजिने लुटण्यापेक्षा श्रीमंतांची घरे लुटण्यावर भर दिला. कारण सरकारी खजिन्यांवर ब्रिटिशांच्या लष्कराचा कडक बंदोबस्त असे. सावकारांच्या घरांवर दरोडे घालून त्यांच्याकडील पैसा व धान्य लुटायचे व ते गरिबांना वाटायचे हे काम त्यांनी मोठ्या प्रमाणावर केले. 


फडक्यांचा जाहीरनामा :

फडके यांच्या दरोड्यांची दखल ब्रिटिश सरकारने घेतली. पुण्याचा पोलीसप्रमुख मेजर डॅनियलने शोधमोहीम हाती घेतली. मेजर डॅनियलने फडकेवर पकड वॉरंट काढले. मुंबई सरकारने वासुदेव फडकेला पकडून देणारास 4000 रु. बक्षीस जाहीर केले. पण त्याचा काही फायदा झाला नाही. त्यास उत्तर म्हणून फडके यांनी मुंबईचा गव्हर्नर रिचर्ड टेपलचे डोके कापून आणून देणारास 5000 रु. चे बक्षीस दिले जाईल असा जाहीरनामा पेशव्यांचा नवा पंतप्रधान या नात्याने जाहीर केला. हा जाहीरनामा इंग्रज सरकारची झोप उडवणारा होता व त्याचा प्रभाव महाराष्ट्रीयन जनतेवरही पडला होता. फडक्यांचे नाव महाराष्ट्रात घराघरांत पोहचले होते. त्याच्या पराक्रमाच्या कथा लोक अभिमानाने सांगू लागले.

X X

क्रांतिकारक सेनेची स्थापना :

वासुदेव फडक्यांनी 20 फेब्रुवारी 1879 रोजी त्यांचे विश्वासू अनुयायी व सहकारी पुण्याजवळ लोणीकंद येथे जमले व उठावाची तयारी सुरू केली. त्याच वेळी क्रांतिकारक सेनेची स्थापना करण्यात आली. यासाठी लोणीकंद येथे 200 पेक्षा अधिक लोक जमा झाले होते. त्यावेळी उपस्थित लोकांना पागोटी, फेटे व पैसाही दिला गेला. त्यावेळी वासुदेव फडक्यांनी केलेल्या क्रांतिकारी भाषणामुळे सर्व जण उत्साहित व प्रेरित झाले होते. आपला लढा सध्या सरकार, पोलीस व सावकार यांच्याशी असून आपणास शस्त्रे व पैसा पाहिजे असे त्यांनी भाषणात सांगितले. तलवारी, बंदुका वगैरे शस्त्रास्त्रांनी सज्ज असलेल्या क्रांतिसेनेने ठामरी गावातील श्रीमंत मारवाड्यांची घरे त्यावेळेस लुटली .1879 च्या फेब्रुवारी व मार्चमध्ये वासुदेव बळवंतांच्या नेतृत्वाखाली लुटीचे सत्र चालूच होते. त्यांच्या क्रांतिकारक सेनेतील बहुतांश जण इंग्रज सत्तेचा द्वेष करत होते. त्यांच्या क्रांतिसेनेत 300 लोक होते. त्यात प्रामुख्याने रामोशी, कुणबी, मांग, कोळी, धनगर, चांभार, ब्राह्मण यांचा समावेश होता. आपल्या लुटीच्या धडसात्रात स्त्रियांवर व लहान मुलांवर अत्याचार होऊ नये याची ते काळजी घेत होते. मराठी मुलखातील प्रत्येक गावच्या श्रीमंतांची यादी त्यांच्याकडे होती. ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड करण्यात त्यांना कोणताही पश्चात्ताप झाला नाही. 

अमृत बझार पत्रिकेने नोव्हेंबर 1879 मध्ये म्हटले होते, 'फडके म्हणजे देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तम महापुरुष.


वासुदेव बळवंत फडके यांना कैद व काळ्या पाण्याची शिक्षा :

वासुदेव बळवंत फडके यांच्या सर्व हालचाली व दरोडे यांची वृत्ते सर्व भारतभर वर्तमानपत्रांद्वारा प्रसिद्ध झाली. त्यांच्या क्रांतिसेनेतील बंडखोर हे लढवय्ये होते. गोपाळ मोरेश्वर साठे, विष्णु विनायक गद्रे, सीताराम गोकाक, गो.ह. कर्वे हे त्यांचे काही नामवंत सहकारी होते. क्रांतिसेनेतील प्रत्येकाला कामगीरी प्रमाणे 4 ते 16 रु. पगार मिळत होता. त्यांनी शस्त्रास्त्रे सरकारी तिजोरीवर हल्ला करून ती लुटण्याचा बेत ठरला होता पण या गुप्त कटात व दारूगोळा पुरविण्याचे काम स्वतः वासुदेवरावांनी आपल्याकडे घेतले होते, खेड येथील सरकारी तिजोरी व हल्ला करून ती लुटण्याचा बेत ठरला होता पण या गुप्त कटात वरकरणी सामील झाल्याचे दाखवून सरकारला ही माहिती आगाऊ पुरवून एका मुसलमानाने हा बेत हाणून पाडला. ब्रिटिश सरकारने वासुदेव फडक्यांविरुद्ध प्रचारमोहीम चालविली. त्यांची लुटारू दरोडेखोर,अत्याचारी माथेफिरू अशा शब्दांत संभावना केली. त्यांना पकडण्याचे काम मे. डॅनियल यांच्याकडे सोपविले होते. त्याचा शोध घेण्यासाठी मे. डॅनियल सशस्त्र फौजेसह फिरू लागला. ते गाणगापूरला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. गावाच्या बाहेर एक बुद्ध विहार होते. तेथे ते गाढ झोपले असताना त्यांना मेजर डॅनियलने पकडले. पुण्यात बेड्या घालून आणले व त्यांच्यावर खटला भरला. 

सरकारतर्फे त्यांच्यावर पुढील आरोप ठेवले होते. 

1) अनधिकृत माणसे जमविणे

2) दरोडे घालणे

3) शस्त्रे बाळगणे 

4) दारूगोळा जमविणे

5) लोकांच्या मनात सरकारबद्दल द्वेष निर्माण करणे पुण्याच्या कोर्टात त्यांचे वकीलपत्र सार्वजनिक काका ऊर्फ वासुदेव गणेश जोशी यांनी घेतले होते. त्यांच्यावरील खटल्याचे काम चालू असताना लोक कोर्टात गर्दी करत असत. राष्ट्रवादी भावनेच्या निर्मितीचेच ते जणू चिन्ह होते. सरकारतर्फे अनेकांच्या साक्षी झाल्या. पण वासुदेवातर्फे कोणाचीही साक्ष झाली नाही. त्यांनी स्वतः आपले निवेदन कोर्टात देऊन ब्रिटिश सरकार भारतीयांवर कसा अन्याय करते याचा पाढाच जणू वाचला. दुष्काळाच्या प्रश्नांकडे ब्रिटिश सरकार कसे दुर्लक्ष करते हेही त्यांनी स्पष्टपणे मांडले. पण न्यायालयाने त्यांना काळ्या पाण्याची (जन्मठेप) शिक्षा ठोठावली. वासुदेव बळवंतांना ही शिक्षा ऐकूण काहीच वाटले नाही. त्यांची बेडर वृत्ती पाहून न्यायाधीश पण स्तिमीत झाले. फडक्यांचे अपीलही नामंजूर करण्यात आले. त्यांना 3 जानेवारी 1880 जन्मठेपेसाठी अंदमानात पाठविण्यात आले. त्यांचा देशाभिमान व धैर्य यामुळे भारतीयच नव्हे तर युरोपियन लोकांच्याही मनावर छाप पडली होती. वासुदेव बळवंतांच्या शिक्षेबरोबरच बाकीच्या आरोपींना वेगवेगळ्या मुदतीच्या सश्रम कारावासाच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या होत्या.

X X

ग्रंथ प्रकाशित:

वासुदेव बळवंत फडके यांनी 'दत्त माहात्म्य' हा 7000 ओव्यांचा ग्रंथ लिहिला आहे.



वासुदेव बळवंत फडके यांचे निधन:

एडन येथील तुरुंगात असताना येथील हवामान अत्यंत उष्ण असल्याने ते त्यांना मानवले नाही. एडनच्या तुरुंगातून पळून जाण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण तो यशस्वी झाला नाही. त्यांना कडक बंदोबस्तात ठेवले गेले. त्यांच्या आजारपणाकडे सुध्दा फारसे लक्ष दिले नाही. तुरुंगातील जीवनाचा त्यांना वीट आला होता. 17 फेब्रुवारी 1883 रोजी एडनच्या तुरुंगातच त्यांचे निधन झाले. तुरुंगातील अधिकाऱ्यांनीच एडन येथे त्यांच्या प्रेतावर अग्निसंस्कार केला. वासुदेव फडक्यांना नैसर्गिक मरण आले या गोष्टींवर जनतेने मात्र विश्वास ठेवला नाही. इंग्रजांनी त्यांना गोळी घालूनच ठार केले असावे असाच संशय लोकांच्या मनात होता.आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांचे जीवन म्हणजे एक वीरगाथाच होय. ब्रिटिश सत्तेविरुद्ध त्यांनी केलेले बंड हे अपूर्व असेच होते. 

त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सहकाऱ्यांची पण वाताहत झाली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी गोपिकाबाई फडके यांनी प्रदीर्घ काळ 1940 पर्यंत वैधव्यात जीवन काढले. 

इंग्रज राज्यकर्त्यांनी फडके यांना 'आद्य क्रांतिकारकच' मानले होते. ज्या काळात 'स्वातंत्र्य' हा शब्दच उच्चारण्याची परवानगी नसताना ते ध्येय त्यांनी उघड घोषित करून ब्रिटिश सत्तेविरुद्ध बंड केले. 

वासुदेव बळवंतांच्या बंडाचा इंग्रज राज्यकर्त्यावर झालेला परिणाम म्हणजे त्यांच्यापैकी ए.ओ. ह्यूम यांनी केलेली कॉंग्रेसची स्थापना होय. 

फडके यांच्या बंडामुळेच आपण परकीय सत्तेविरुद्ध लढा देऊ शकतो ही भावना लोकांच्या मनात निर्माण होण्यास मदत झाली. फडके यांच्या कार्यामुळे, त्यागामुळेच स्वातंत्र्यवाद्यांची एक पिढीच निर्माण होण्यास मदत झाली.  

ब्रिटिश राज्यकर्त्यांनी वासुदेव बळवंतला हिंदुस्थानच्या स्वातंत्र्यासाठी बंड करणारे पहिले क्रांतिकारकच मानले होते. त्यांच्या देशभक्तीमुळेच त्यांच्यानंतरचे कित्येक क्रांतिकारक त्यांना आपले स्फूर्तिस्थान मानत. दामोदरपंत चापेकर, वि.दा. सावरकर यांनी त्यांच्यापासून प्रेरणा घेतली होती. 

वासुदेव बळवंत फडके यांनी पेटेवलेली स्वातंत्र्याकांक्षेची ज्योतच पुढे महाराष्ट्र व भारतातील पुढील कित्येक पिढीतील तरुणांच्या मनात रोवली गेली. 

लॉर्ड माऊंटबॅटन यांनी हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या चळवळीचा उगम टिळकांच्या नव्हे तर वासुदेव बळवंत फडक्यांच्या कार्यात आहे असे म्हटले होते. फडके यांचे बंड अयशस्वी झाले पण त्यामुळे त्याचे महत्त्व कमी होत नाही.त्यांच्या क्रांतिकार्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली.

प्रख्यात इतिहासकार रामचंद्र मुजुमदार म्हणतात, ' 1857 सालच्या उठावानंतरच्या काळात हिंदुस्थानातील ब्रिटिश राज्य उलथून पाडण्याच्या उघडउघड उद्दिष्टाने पहिली गुप्त क्रांतिसंस्था संघटित करण्याचे श्रेय वासुदेव बळवंत फडके यांचेच आहे.' ‘महाराष्ट्राचा रॉबिनहूड' म्हणून ते ओळखले जातात. पुण्यातील नागरिक त्यांना 'दुसरा शिवाजी' म्हणत. 'क्रांतिकारकांचा जनक' म्हणून ते ओळखले जातात.













View, Comments and share.....

Post a Comment

2 Comments