Dadoba Pandurang Tarkhadkar: Social reformer
दादोबा पांडुरंग तर्खडकर: रावबहादूर,मराठी व्याकरणाचे पाणिनी, समाजसुधारक
स्मृतिदिन- 17 ऑक्टोबर
जन्मदीन -9 मे
बालपण आणि शिक्षण:
संपूर्ण भारतात प्रसिद्ध असलेले आद्य मराठी व्याकरणकर्ते , आधुनिक महाराष्ट्रातील प्रारंभीच्या काळातील एक समाजसुधारक म्हणून प्रसिद्ध होते. तासेच ते धर्मचिंतक व धर्मसुधारकही होते.
मानवधर्म सभा, परमहंस सभा, ज्ञानप्रसारक सभा स्थापन करून समाजाला आपल्या धर्माचे सत्य स्वरूप दाखविण्याचे काम त्यांनी केले.
दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म 9 मे 1814 रोजी खेतवाडी, मुंबई येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव पांडुरंग तर आईचे नाव यशोदा होते. त्यांचे मूळचे घराणे वसईजवळ तर्खड या गावचे होते. या गावावरूनच ते 'तर्खडकर' या आडनावाने ओळखले जातात. त्यांच्या वडिलांची खूप गरिबी होती. पण आपल्या उद्योगाने व श्रमाने त्यांच्या वडिलांनी चांगल्यापैकी संसार केला.
दादोबांना दोन भाऊ होते. एक भास्करराव व दुसरे डॉ. आत्माराम. त्यांचे वडील मुंबईस जमशेटजी जीजीभॉय बाटलीवाला यांच्या पेढीवर चाकरी करीत असत. त्यांच्या घरात धार्मिक वातावरण होते. त्यांचे वडील व्यक्तिगत जीवनात धार्मिक असले तरी प्रागतिक अधूनिक विचाराचे होते. तर्खडकर हे वैश्य होते.
दररोज सकाळी देवपूजा, संध्याकाळी पुराण, कीर्तन ऐकणे हा त्यांच्या आईचा नित्यक्रम होता. त्यांचे वडील विठ्ठलभक्त होते.
दादोबांचे प्राथमिक शिक्षण पंतोजीच्या शाळेत झाले. इंग्रजी शिक्षणासाठी Bombay Native Education Society च्या शाळेत झाले. शिक्षण सुरू असतानाच 1828 मध्ये त्यांचा विवाह झाला.
तसेच शिक्षण सुरू असतानाच त्यांनी मराठी भाषेच्या व्याकरणाचे पुस्तक लिहिले होते.
X X
वैयक्तिक जीवन:
सुरुवातीला माळवा गावातील जावरा संस्थानच्या नवाबाचे इंग्रजी शिक्षक म्हणुन 1837 पासून त्यांनी नोकरी केली.
इंग्रजी विषय शिकवण्यासाठी 150 रु. पगारावर त्यांची नेमणूक झाली होती. जावरा येथे असतानाच त्यांनी फारसी भाषेचा अभ्यास केला होता.
एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये 1840 ला असिस्टंट इंग्रजी टीचर म्हणून ते दाखल झाले. नंतर सुरतला त्यांची बदली झाली.
बाळशास्त्री जांभेकरांच्या 1846 ला त्यांच्या मृत्यूनंतर ट्रेनिंग कॉलेजच्या डायरेक्टर पदाच्या जागेवर त्यांची नियुक्ती करण्यात आली.
सरकारी मुलकी अधिकारी म्हणून निरनिराळ्या जबाबदारीच्या जागेवर त्यांनी उत्कृष्टपणे कामे केली.
जावरा येथे असताना भिल्लांनी 1847 मध्ये बंड केले होते ते बंड मोठ्या कौशल्याने त्यांनी मोडून काढले होते.
त्यांच्या एकंदर सर्व कामगिरीचा विचार करून सरकारने त्यांना 'रावबहादूर' ही पदवी दिली होती.
xx xx
आद्य मराठी व्याकरणकर्ते:
दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी मराठी व्याकरण, मराठी टीका व मराठी आत्मचरित्र या तीन क्षेत्रांत त्यांना आद्यत्वाचा मान मिळाला. त्यांनी मराठी भाषेचे व्याकरण अत्यंत परिश्रमपूर्वक तयार केले. त्यामुळेच 'मराठी भाषेचे पाणिनी' गौरवास ते पात्र ठरले.
मोरोपंतांच्या केकावलीवर त्यांनी लिहिलेली 'यशोदा पांडुरंगी' ही टीका म्हणजे मराठी समीक्षेची सुरुवात होय. त्यांनी लिहिलेले आत्मचरित्र हे अव्वल इंग्रजी युगातील पहिले आत्मचरित्र होय.
पण ते पूर्ण झाले नाही. जो भाग त्यांनी हस्तलिखित स्वरूपात पूर्ण केला होता तो ह.भ.प.ल.रा. पांगारकर यांनी 'विविध ज्ञानविस्तार' या मासिकातून 1928 मध्ये प्रसिद्ध केला.
पुढे प्रा. अ.का. प्रियोळकर यांनी ते संपादित करुन व त्यांच्या चरित्राच्या दृष्टीने इतर माहितीची भर घालून 1947 मध्ये 'चरित्र व आत्मचरित्र' या स्वरूपात ते प्रकाशित केले.
X X
सामाजिक व धार्मिक सुधारणेचे कार्य :
नोकरी सांभाळत दादोबा पांडुरंग यांनी सार्वजनिक कार्याकडे लक्ष दिले. राजकारण, समाजकारण व धर्मकारण यात त्यांनी भाग घेतला.
संस्था स्थापनेतील योगदान:
2) परमहंस सभा
3) ज्ञानप्रसारक सभा.
1. मानवधर्म सभा :
दादोबा पांडुरंग व दुर्गाराम मन्साराम यांनी सुरत येथे 22 जून 1844 रोजी 'मानवधर्म सभा' स्थापन केली. या संघटनेत दलपतराय भगुभाई, दिनमणिशंकर हे पण सामील झाले होते.
पण 1846 मध्ये दादोबांची मुंबईला व 1852 मध्ये दुर्गारामची राजकोटला बदली झाल्याने मानवधर्मचे कार्य कमी होत अखेर संपुष्टात आले.
तरीही मर्यादित क्षेत्रात का असेना धर्मसुधारणा व समाजसुधारणा या कार्यास चालना दिली गेली.
विश्वधर्म व बुद्धिप्रामाण्य या दोन प्रमुख संकल्पना मानवधर्मसभेच्या होत्या.
X X
मानवधर्म सभेची मूलभूत तत्त्वे :
2) ईश्वरभक्ती हाच धर्म आहे.
3) प्रत्येक व्यक्तीला विचार करण्याचे स्वातंत्र्य आहे.
4) जातिभेद पाळू नये.
5) नित्य कर्म विवेकास अनुसरून असावे.
6) व्यक्तीचे श्रेष्ठत्व गुणावर अवलंबून असते, कर्मावर नव्हे.
xx xx
2. परमहंस सभा :
परमहंस सभेची स्थापन 1848 मध्ये झाली. या सभेच्या स्थापनेचे प्रवर्तक सर रामचंद्र बाळकृष्ण जयकर, भिकोबादादा चव्हाण, लक्ष्मणशास्त्री हळबे, आत्माराम पांडुरंग, दादोबा पांडुरंग, मोरोबा विनोबा, मदन श्रीकृष्ण आदी सुधारकप्रिय मंडळी होती.
परमहंस सभेचे अध्यक्ष बॅ. रामचंद्र बाळकृष्ण जयकर बरीच वर्षे होते. जातीय विषमतेवर प्रहार करण्यासाठी व धार्मिक बाबतीत सुधारणा करण्यासाठी ही सभा स्थापन करण्यात आली होती.
‘प्रभाकर' पत्राचे संपादक भाऊ महाजन हे या सभेचे पुरस्कर्ते होते. पुणे, अहमदनगर, रत्नागिरी, सातारा, बेळगाव या शहरांतही या सभेच्या शाखा काढण्यात आल्या. या संस्थेच्या सभासदांची एकुण संख्या 1000 पर्यंत होती.
X X
परमहंस सभेचे तत्त्वज्ञान :
2) मूर्तिपूजा करू नये.
3) एकेश्वरवादाचा पुरस्कार करावा. फक्त एकाच ईश्वराची भक्ती करावी.
4) सर्वाशी बंधुत्वाच्या भावनेने वागावे.
5) स्पृश्यास्पृश्य भेद पाळू नये.
6) स्त्रियांना पुनर्विवाह करू द्यावेत.
7) स्त्रिया, महारमांगादी लोकांना विद्या द्यावी.
8) मनुष्यांची गुणवत्ता त्याच्या कुळावरून नव्हे तर गुणांवरून ठरवावी.
9) विवेकास अनुसरून कर्म करावे.
परमहंस सभेच्या तत्त्वदृष्टीचे विवरण दादोबा पांडुरंग यांनी 20 अभंगांतून केले आहे.
असो कृष्ण गीता। किंवा ख्रिस्त-गीता। महम्मदाची वार्ता । असेना का ।।
असो बोधाचार्य किंवा जनाचार्य शंकर आचार्य । कबीरही ।।
तत्त्वज्ञान एक। एक त्यांचे जरी । न कां ते पदरीं । द्यावे आम्ही ||
परमहंस सभेचे सभासद करून घेताना प्रथम एक प्रार्थना वाचावयास सांगत.
वर्षातून एकदा किंवा अनेक वेळा निरनिराळ्या जातींच्या लोकांचे मिळून सहभोजन होई पण ते गुप्तपणे होत असे.
कठोर धर्मबंधनांनी व जातिनिर्बंधांनी जखडलेल्या समाजात सुधारकांचा जो छळ झाला तो विचारात घेऊनच सामाजिक व धार्मिक बंधनांविरुद्ध बंड करण्यासाठी गुप्त संस्था स्थापन करण्याचा विचार पुढे आला असावा. या सभेच्या कार्यपद्धतीत मोठे वैगुण्य होते व तेच सभेच्या नाशाला कारणीभूत ठरले.
सभेचे कार्य गुप्तपणे चाले. एके दिवशी 1860 मध्ये सभासदांच्या नावाची यादी कोणी तरी पळविली. ती वृत्तपत्रात प्रकाशित झाली. त्यामुळे आपण जातिबहिष्कृत होऊ अशा भीतीने सभासदांनी सभेचा संबंधच तोडून टाकला.
परमहंस सभेची उद्दिष्टे उदात्त होती पण तिच्या कार्यपद्धतीमुळे ती अपेक्षेएवढे कार्य करू शकली नाही.
तिच्या तत्त्वप्रणालीमुळे महाराष्ट्रातील सुधारणावादी मंडळी प्रभावित झाली होती असे मत डॉ. रामकृष्ण भांडारकर मांडतात.
प्रत्येक मनुष्याला विचारस्वातंत्र्य आहे. माणसाची एकच ज्ञाती आहे या विचारांचा प्रचार या सभेने केला.
या परमहंस सभेचेच पुढे प्रार्थना समाजात रूपांतर झाले. या संघटनेच्या नेत्यांकडे संघटनकौशल्याचा अभाव असल्यामुळे 10 वर्षातच ही संघटना अस्तगत झाली.
परमहंस सभेला जरी अपयश आले तरी ज्या धार्मिक व सामाजिक सुधारणेच्या उन्नत तत्त्वांचा तिने गुप्त रीतीने का होईना पुरस्कार व प्रचार केला ती तत्त्वे मात्र चांगली होती. ख्रिश्चन धर्माचा तिच्यावर प्रभाव होता.
X X
1867 मध्ये स्थापन झालेला प्रार्थना समाज व 1873 मध्ये पुणे येथे स्थापन झालेला सत्यशोधक समाज हे परमहंस सभेचेच नव्या परिस्थितीत व नव्या स्वरूपात झालेले पुनरुत्थान होते असे म्हटले जाते.
परमहंस सभेचे धुरीण दादोबा पांडुरंग हे परमहंस सभेच्या गुप्त सभांना हजर राहत नसत; पण एक 'जगद्वासी आर्य' या टोपणनावाने त्यांनी लिहिलेले 'धर्मविवेचन’ नावाचे हस्तलिखित सभासदांना वाचावयास दिले जाई.
'प्रभाकर' पत्राचे संपादक भाऊ महाजन या सभेची स्तुती करत असले तरी तेही या सभेच्या बैठकीला हजर राहत नसत.
दादोबा पांडुरंग हे ख्रिश्चन धर्माकडे खूपच आकर्षित झाले होते; पण ते सुरत येथे इंग्रजी शाळेत शिक्षक असताना तेथील शाळेचे मुख्याध्यापक हेन्री ग्रीन हे अज्ञेयवादी व ख्रिश्चन धर्मावर विश्वास न ठेवणारे होते. त्यांनीच दादोबा पांडुरंग यांना हिंदू धर्माप्रमाणे ख्रिश्चन धर्मातही दोष आहे. हे समजावून सांगितल्याने त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचा निर्णय बाजूस ठेवला.
परमहंस सभेच्या सभासदांमध्ये मुसलमान व ख्रिश्चन लोकही होते हे विशेष.
दादोबा पांडुरंग यांनी ‘धर्मविवेचन' या पुस्तकावर लेखक म्हणून 'एक जगवासी आर्य' असे टोपण नाव टाकले होते आणि 'पारमहंसिक ब्राह्मणधर्म' या दोन पुस्तिका लिहून परमहंस सभेसाठी धर्मतत्त्वविचारांची आधुनिक पद्धतीने मांडणी केली; परंतु आपले विचार कृतीत उतरविण्यासाठी आवश्यक असलेले नीतिधैर्य त्यांच्या अंगी नव्हते. त्यामुळे परमहंस सभेच्या प्रत्यक्ष कार्यात त्यांनी अधिकृतपणे व उत्साहाने कधीच भाग घेतला नाही.
xx xx
3. ज्ञानप्रसारक सभा :
मुंबईत एल्फिन्स्टन कॉलेजच्या काही विद्यार्थ्यांनी 'ज्ञानप्रसारक सभा' या नावाची संस्था स्थापन 1848 मध्ये केली होती.
दादोबा पांडुरंग या संस्थेचे अध्यक्ष होते. आपल्या देशबांधवांत ज्ञानाचा प्रसार करणे व सामाजिक जागृती घडवून आणणे ही ज्ञानप्रसारक सभेची प्रमुख उद्दिष्टे होती.
या संस्थेत सामाजिक व धार्मिक विषयांतील चर्चेला प्राधान्य दिले जाई.
X X
दादोबा पांडुरंग यांचे बंधू व त्यांची कामगिरी:
दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्या अंगी धैर्य व निर्भीडपणा नसावा, त्याच कारणामुळे आपल्या मतांच्या प्रसारासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले नाहीत असे दिसते. ते सहिष्णू, सात्त्विक, रसिक होते.
दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे धाकटे बंधू भास्कर पांडुरंग तर्खडकर हे जहाल मताचे होते. वसाहतवाद विरोधी विचारांचे ते आद्यप्रवर्तक होते.
बॉम्बे गॅझेट मधून 'एक हिंदू' या नावाने लेखन केले व ब्रिटिश शासनावर कडक टीका केली.
दादोबा पांडुरंग तर्खडकरयांचे एक बंधू आत्माराम हे डॉक्टर होते. डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खडकर हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. ते ग्रँट मेडिकल कॉलेजमधून पदवी घेऊन बाहेर पडले.
भिवंडीत त्यांनी दवाखाना काढला. त्यांनी आपल्या सर्व मुलांना आधुनिक शिक्षण दिले.
प्रार्थना समाजाचे ते पहिले अध्यक्ष होते. 'बॉम्बे गॅझेट' या पत्रातून इंग्रजी राजवटीवर त्यांनी टीका केली होती. "ब्रिटिश हे दरोडेखोर पेंढाऱ्यापेक्षा वाईट आहेत, दुटप्पी आहेत." असे लिखाण त्यांनी केले.
X X
ग्रंथ संपदा:
दादोबा पांडुरंग यांना साहित्यिक दृष्टी होती. 'मराठी व्याकरणाचे पाणिनी' अशी पदवी त्यांना दिली गेली होती.
त्यांचे ग्रंथ :
2) "मराठी नकाशांचे पुस्तक"
3) "विद्येच्या लाभाविषयी"
4) "केकावती यशोदा पांडुरंगी टीकेसह प्रस्तावना"
5) 'पारमहंसिक ब्रह्मधर्म' हा तर्खडकरांचा केवळ 20 कविताबद्ध ग्रंथ आहे व त्यात त्यांनी पुढील उपदेश केला होता. 1) जातिभेद सोडा. 2) अभिमान सोडा. 3) सर्वाशी बंधुभावाने वागा.4) निराकार ईश्वराची पूजा करावी.
6) "आत्मचरित्र"
7) "शिशिबोध"
8) "मराठी लघुव्याकरण"
९) "धर्मविवेचन" (1843) या ग्रंथातही त्यांनी पुढील उपदेश केला होता. 2) नीतिपूर्वक सप्रेम ईश्वरभक्ती हाच धर्म आहे.
2) प्रत्येक मनुष्यास विचारस्वातंत्र्य आहे.
10) 'यमुना पर्यटन' या बाबा पद्मनजी यांनी लिहिलेल्या कादंबरीवर दादोबा पांडुरंग यांनी पुनर्विवाहविषयक संस्कृत भाषेत लेख लिहिला होता.
11) "विधवाश्रमार्जन" त्यापैकी मराठी भाषेचे व्याकरण या ग्रंथाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या.
xx xx
निधन:
दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे निधन 17ऑक्टोबर 1882 रोजी झाला.
X X
दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचे चरित्रकार अ. का. प्रियोळकर लिहितात,
'19 व्या शतकाच्या पूर्वार्धात त्यांनी ज्याप्रमाणे मराठी व्याकरणाच्याद्वारे मराठी भाषेला नवे व इष्ट वळण लावले तसेच परमहंस सभा स्थापून नव्या महाराष्ट्राच्या धार्मिक प्रवृत्तीला नवी दिशा दिली यात शंका नाही. '
न्या. रानडे यांच्या मते,
'धर्म जिज्ञासा करणाऱ्या तत्त्वचिंतकांच्या श्रेणीत दादोबा पांडुरंग यांना अत्युच्च स्थान देण्यात यावे अशी त्यांची योग्यता आहे.'
X X
View, comments and Share....


4 Comments
Nice
ReplyDelete👍👍
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteNice
ReplyDelete