Subscribe Us

header ads

Prabodhankar Thackeray or Keshav Sitaram Thackeray: Indian Author,Indian Social Reformer

प्रबोधनकार ठाकरे ऊर्फ केशव सीताराम ठाकरे   : मराठी पत्रकार,समाजसुधारक, वक्ते व इतिहासकार,संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी-जयंती 

जन्मदिन- 17 सप्टेंबर 

स्मृतीदिन: 20 नोव्हेंबर


बालपण आणि शिक्षण :

प्रबोधनकार ठाकरे या नावाने महाराष्ट्राला परिचित असलेले मराठी पत्रकार,समाजसुधारक, वक्ते व इतिहासकार,  संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी केशव सीताराम ठाकरे जन्म 17 सप्टेंबर 1885 कुलाबा (रायगड) जिल्ह्यातील पनवेल येथे झाला होता.

 त्यांचे शिक्षण पनवेल व देवास येथे मॅट्रीक पर्यंत झाले.  ज्ञानेच्छू वृत्तीने इंग्रजी-मराठी भाषांवर प्रभुत्व संपादन करून त्यांतील उत्तोमोत्तम ग्रंथांचे स्वतंत्रपणे अध्ययन त्यांनी केले होते. 

पनवेल येथे असताना केरळकोकिळकार कृ. ना. आठल्ये ह्यांचा प्रेरक सहवास त्यांना लाभला. आठल्यांना ते आपले लेखनगुरू मानीत. ठाकऱ्यांच्या स्वभाव महत्वाकांशी आणि हरहुन्नरी होता. 

केशव सीताराम ठाकरे यांनी काही काळ सरकारी नोकरी केली. टंकलेखन, छायाचित्रकार, तैलचित्रकार, जाहिरातपटू, विमा कंपनीचे प्रचारक, नाटक कंपनीचे चालक असे अनेक उद्योगही केले. 

 समाजसुधारणेच्या आणि समतेच्या तळमळीतून केलेली झुंजार पत्रकारी, तसेच प्रभावी वक्तृत्व व इतिहाससंशोधन ही त्यांच्या कर्तृत्वाची ठळक वैशिष्ट्ये होत. 

X X

स्फूर्तिस्थाने/आदर्श:

महात्मा फुले, लोकहितवादी आणि आगरकर ही त्यांची स्फूर्तिस्थाने होती.

 महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी साहित्याचा अभ्यास केल्यानंतर समाजसुधारणांबाबतच्या त्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या. म्हणूनच महात्मा फुले यांचा पुण्यातील कट्टर सनातन्यांकडून छळ झाल्यानंतरच्या काळात त्यांचा लढा पुढे चालविण्यासाठीच प्रबोधनकार पुण्यात स्थायिक झाले. या कार्यात त्यांच्या विरोधकांनी आणलेले अडथळे पार करत त्यांनी साऱ्यांची दाणादाण उडवून दिली.

सामाजिक सुधारणा हेच त्यांच्या जीवनाचे ध्येय होते. त्यांनी ध्येयप्राप्तीसाठी कधीच कोणतीही तडजोड केली नाही. मग भले बालविवाह व विधवांच्या केशवपनाची अभद्र रूढी असो, देवळांमधील ब्राह्मण पुजाऱ्यांची अरेरावी, हुकूमशाही असो, अस्पृश्यतेचा प्रश्र्न असो किंवा हुंडाप्रथेचा प्रश्र्न असो ते या सर्व आघाड्यांवर अखेरपर्यंत त्वेषाने लढत राहिले. 

त्यांच्या लढ्यापासून, तत्त्वांपासून त्यांना परावृत्त करण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. अनेक आमिषे दाखविली पण प्रबोधनकारांनी कशालाही दाद दिली नाही.

राजर्षी शाहू महाराजांबद्दल त्यांना नितांत आदर होता. शाहू महाराजांच्या ब्राह्मणेतर चळवळीत ते हिरिरीने पडले.त्यांच्या कार्यख्यातीमुळे ते राजर्षी शाहू महाराजांच्या संपर्कात आले. 

शाहू महाराज हे स्वतः सुधारणावादी व महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचे पुरस्कर्ते होते. त्यामुळे ते प्रबोधनकारांचे चाहते झाले. 

त्यांनी प्रबोधनकारांची परीक्षाही घेतली व नंतर जाहीरपणे सांगितले की, लाच देऊन ज्याला वश करता येणार नाही किंवा विकत घेता येणार नाही अशी एकच व्यक्ती मी पाहिली आहे, ती म्हणजे प्रबोधनकार होय.

 अस्पृश्यता निवारण, हुंडाविरोध, ह्यांसारख्या सामाजिक सुधारणांसाठी त्यांनी आपली वाणी व लेखणी राबविली ग. भा. वैद्यांच्या ‘हिंदू मिशनरी सोसायटी’च्या कार्याला हातभार लावला. 

X X

पत्रकारिता: 

तत्त्वविवेचक या छापखान्यात 1908 च्या सुमारास असिस्टंट शास्त्री अर्थात मुद्रितशोधक या नात्याने ठाकरे यांचा वृत्तपत्राशी प्रथम संबंध आला. 

त्यानतंर, दोन-तीन साप्ताहिके, विविध वृत्त व इंदुप्रकाश पत्रात ते लेखन करत असत. ठाण्याच्या जगत्समाचार साठीही ते लेख लिहित असत. 

जलशांच्या निमित्ताने ठाकरे जळगावला गेले. तेथे काव्यरत्नावलीकार नारायण नरसिंह फडणीस यांच्याशी त्यांचा परिचय झाला. ठाकरे यांनी तेथे सारथी हे मासिक सुरू केले. 

सारथी, लोकहितवादी आणि प्रबोधन ह्या त्यांनी चालविलेल्या नियतकालिकांची नावेही बोलकी आहेत. 

त्यांपैकी खऱ्या राष्ट्रोद्धारार्थ ‘सामाजिक आणि धार्मिक गुलामगिरीचा नायनाट’ करण्यासाठी काढलेल्या प्रबोधनाशी त्यांचे नाव कायमचे निगडित राहिले. 

X X

प्रबोधन पाक्षिक:

प्रबोधन पाक्षिक काढण्यापूर्वी ठाकरे यांच्या सार्वजनिक कार्यांची चर्चा सर्वत्र झाली होती. 

सामाजिक अन्यायाविरुद्ध उभे राहण्याचा ठाकरे यांचा निर्णय अभ्यासपूर्ण होता.वृत्तपत्रासारखे साधन हवे. या जाणिवेतून वृत्तपत्र सुरू करण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला. त्यावेळी ते सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्यात नोकरी करत होते. 

सरकारी नोकरांना वृत्तपत्र चालविण्यास बंदी होती. पण ठाकरे यांनी तशी परवानगी मिळवली. त्यानंतर 16 ऑक्टोबर 1921 रोजी केशव सीताराम ठाकरे यांच्या प्रबोधन पत्राचा पहिला अंक प्रसिद्ध झाला. पत्र पाक्षिक होते. 

पत्राच्या नावाबरोबरच "उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान्निबोधत" असे संस्कृत वचन होते. 

त्याबरोबरच सामाजिक, धार्मिक आणि नैतिक गोष्टींना हे पत्र वाहिले असल्याचा उल्लेखही इंग्रजीत होता.

प्रबोधनचा अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रात प्रसार झाला. 1923 मध्ये मुंबईत बसलेले बस्तान मोडून प्रबोधन साताऱ्यात स्थलांतरित झाले.

पुण्यात छापखाना उभारून ठाकरे यांनी प्रबोधन मासिक स्वरूपात आणि लोकहितवादी हे साप्ताहिक सुरू केले.

अखेर कंटाळून त्यांनी पुणे सोडले. मासिक व साप्ताहिकही 1926 मध्ये बंद पडले. ते मुंबईला परतले. त्यानंतर त्यांनी स्वत वर्तमानपत्र काढले नाही. पण अनेक वृत्तपत्रांत ते वेळोवेळी लिहीत राहिले.

या प्रबोधन मासिकामुळे के.सी. ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरे म्हणून ओळखले जाऊ लागले.

X X

संयुक्त महाराष्ट्र चळवळ सहभाग:

बहुजनसमाजोद्धाराच्या आंदोलनांप्रमाणेच संयुक्त महाराष्ट्राची चळवळ हा त्यांच्या जीवनातील सर्वांत महत्त्वाचा लढा होता. या वेळी त्यांचे वयही बरेच झाले होते.

 अशा प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी या चळवळीला नेतृत्व दिले, काही काळ कारावासही भोगला. 

या चळवळीतील त्यांच्या योगदानाची बरोबरी फक्त प्रल्हाद केशव अत्रे आणि कॉम्रेड डांगे यांच्याशीच करता येईल. 

या चळवळीत त्यांनी वेगवेगळ्या विचारांच्या व्यक्ती आणि पक्ष यांना एकत्र बांधून ठेवण्यात यश मिळवले. ते कुशल संघटकही होते.

X X

परप्रातीयांना विरोध:

मुंबईत परप्रांतीय, विशेषत दाक्षिणात्य मंडळी मोठ्या संख्येने येऊ लागली. त्यामुळे मराठी माणसांची गैरसोय होऊ लागली. त्याला प्रबोधनने 1922 मध्ये सर्वप्रथम तोंड फोडले.

X X

साहित्य निर्मिती:

1. ग्रंथ संपदा:

1. कुमारिकांचे शाप ( 1919)

2. भिक्षुकशाहीचे बंड (1921) 

हे त्यांची सामाजसुधारणाविषयक उल्लेखनीय पुस्तके. 


2. नाट्य लेखन:

1. खरा ब्राह्मण (1933)

2. विधिनिषेध (1934) 

3. टाकलेले पोर (1939) 

त्यांची 'खरा ब्राह्मण' आणि 'टाकलेले पोर' ही दोन्ही नाटके समाजसुधारणांसाठी क्रांतिकारकच ठरली.

 खरा ब्राम्हण या नाटकाच्या प्रयोगाला परवानगी देऊ नये अशी मागणी पुण्यातील ब्राम्हणांनी न्यायालयाकडे केली असता, न्यायाधीशांनी प्रबोधनकारांच्या बाजूने निकाल दिला होता.

ह्या त्यांच्या नाटकांतूनही त्यांच्यातील समाजसुधारक प्रकर्षाने व्यक्‍त झालेला आहे.

X X

3. इतिहास लेखन:

1. मराठ्यांच्या इतिहासाचा त्यांना फार मोठा अभिमान होता. साताऱ्याच्या प्रतापसिंह महाराजांच्या पदच्युतीचा, इंग्रजांनी त्यांच्या केलेल्या अवहेलनेचा आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी थेट लंडनपर्यंत गेलेला त्यांचा निष्ठावंत सेवक रंगो बापूजी ह्यांच्या त्यागाचा साद्यंत इतिहास "प्रतापसिंह छत्रपति आणि रंगो बापुजी" (1948) हा ग्रंथ लिहून महाराष्ट्रापुढे प्रथम त्यांनी मांडला. 

2. ग्रामण्याचा साद्यंत इतिहास ( 1919)
3. हिंदवी स्वराज्याचा खून (1922)
4. कोदंडाचा टणत्कार ( दुसरी आवृ. 1925)
5. रायगड (1951) 
ही त्यांची इतिहासविषयक पुस्तके. 
X X

4. चरित्रात्मक साहित्य:

1. संत रामदास (1918)
2. संत गाडगे महाराज (1952)
3. पंडिता रमाबाई (1950)
ही चरित्रे त्यांनी लिहिली. संत रामदासांचे चरित्र इंग्रजीत लिहिलेले आहे. 

5. आत्मचरित्र/स्मरणिका:

1. मार्मिक मधून माझी जीवनगाथा (1973) हे आपले आत्मचरित्र प्रबोधनकारांनी लिहिले. 

8. जुन्या आठवणी (1948) ह्या त्यांनी लिहिलेल्या प्रसिद्ध संस्मरणिका होत.

X X

निधन:

मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, इतिहासकार, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे 20 नोव्हेंबर 1973 रोजी  यांचा मृत्यू  मुंबई येथे झाला.

X X

स्मरणार्थ पुरस्कार:

प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाने अनेक स्मरणार्थ पुरस्कार दिले जातात."मारवाडी फाऊंडेशनचा" "प्रबोधनकार ठाकरे समाज प्रबोधन पुरस्कार"  मिळालेल्या काही व्यक्ती 

1.  डॉ. आ.ह. साळुंखे (2011)
2. गिरीश कुबेर (2017)
3. पन्नालाल सुराणा (2009)
4. बाबा आढाव (2010)
5. भा.ल. भोळे,  (2014)
6. शरद जोशी (2014)
7. सदानंद मोरे (2015)







X X

View, comments and Share 

Post a Comment

1 Comments