Vikram Sarabhai: Indian Scientists
भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक: प्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. विक्रम साराभाई ( भौतिकशास्त्रज्ञ )
12 ऑगस्ट : जन्मदिन
30 डिसेंबर: स्मृतिदिन
प्रसिद्ध वैज्ञानिक आणि भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक. डॉ. विक्रम साराभाई यांचा जन्म 12 ऑगस्ट 1919 रोजी गुजरात मधील अहमदाबाद येथील एका नामवंत उद्योजक घराण्यात झाला.
त्यांच्या वडिलांचे नाव श्री अंबालाल साराभाई आणि आईचे नाव श्रीमती सरला साराभाई होते.
विक्रम साराभाई यांचे प्रारंभिक शिक्षण त्यांच्या आई सरला साराभाई यांनी मॅडम मारिया मॉन्टेसरी यांच्यासारख्या कौटुंबिक शाळेत झाले.
त्यांनी आपले सुरुवातीचे महाविद्यालयीन शिक्षण अहमदाबाद येथील गुजरात महाविद्यालयातून घेतले. त्यानंतर त्यांनी इंग्लंडमधील केंब्रिज येथील सेंट जॉन्स महाविद्यालयात प्रवेश घेतला व तेथून नैसर्गिक विज्ञान (नॅचरल सायन्सेस) या शाखेतील 'ट्रायपॉस' हा मान प्राप्त केला.
x x
संशोधन:
दुसऱ्या महायुद्धास सुरुवात झाल्याने ते इ.स. 1940 साली भारतात परतले आणि त्यांनी बंगलोर (बंगळुरू) येथील 'भारतीय विज्ञान संस्थे'त नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या संशोधनास सुरुवात केली.
महायुद्ध संपल्यावर 1945 साली साराभाई पुनः केंब्रिज येथे रवाना झाले आणि पीएच.डी. ही पदवी प्राप्त करून 1947 साली ते भारतात परतले.
डॉ. साराभाई यांचा पीएच.डी.चा प्रबंध हा विषुववृत्ताजवळील प्रदेशातून केल्या गेलेल्या निरीक्षणांवर आधारित आहे.
X X
वैज्ञानिक कामगिरी:
भारतात परतल्यावर त्याच वर्षी डॉ. साराभाई यांनी अहमदाबाद येथे 'फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी'ची (पी.आर.एल.) स्थापना केली. या संस्थेच्या मुख्य इमारतीची पायाभरणी 1952 साली डॉ. रमण यांच्या हस्ते झाली.
सुरुवातीस वैश्विक किरण आणि वातावरणाच्या वरच्या थरांच्या गुणधर्मांशी संबंधित संशोधनावर लक्ष केंद्रित करणाऱ्या या प्रयोगशाळेत त्यानंतर सैद्धान्तिक भौतिकशास्त्र, रेडिओभौतिकशास्त्र, तसेच ग्रहविज्ञान, सौरखगोलशास्त्र अशा अनेक शाखांतील संशोधन केले जाऊ लागले.
अहमदाबादमधील एका महाविद्यालयातील दोन खोल्यांत 1947 साली स्थापन झालेली ही प्रयोगशाळा आता भौतिकशास्त्रातील आघाडीवरची प्रयोगशाळा म्हणून नावारूपास आली आहे.
साराभाईंनी वैश्विक किरणांचा अभ्यास करण्यासाठी अहमदाबादबरोबरच त्रिवेंद्रम, कोडाईकनाल आणि गुलमर्ग येथेही विशेष वेधशाळा उभारल्या.
वैश्विक किरण हे आंतरग्रहीय पोकळीचा अभ्यास करण्याच्या दृष्टीने अतिशय उपयुक्त असे निर्देशक आहेत.
x x
भौतिकशास्त्र संशोधन प्रयोगशाळेत 'विविध दिशांनी पृथ्वीवर आदळणाऱ्या वैश्विक किरणांत आढळणारा अल्पसा दिशानुरूप फरक हा या किरणांनी ज्या प्रदेशातून मार्गक्रमण केले, त्या प्रदेशातील , विद्युत्चुंबकीय गुणधर्मांवर अवलंबून असतो, या तर्काला डॉ.साराभाईंनी केलेल्या संशोधनातून पुष्टी मिळाली.
साराभाईंनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या संशोधनाद्वारे वैश्विक किरणांच्या तीव्रतेत सौरचक्रानुसार व सूर्याच्या स्वत:भोवती फिरण्यानुसार होणाऱ्या बदलांचाही मागोवा घेतला गेला.
सूर्य-पृथ्वी यांच्यातल्या संबंधांशी निगडित असे हे संशोधन होते. पृथ्वीभोवतालच्या चुंबकीय आवरणाचा अभ्यास इई करण्याच्या दृष्टीने पृथ्वीवरील चुंबकीय वैषुविकवृत्तावरून केलेली निरीक्षणे महत्त्वाची ठरतात.
दक्षिण भारतातून हे चुंबकीय वैषुविकवृत्त जात असल्यामुळे डॉ.साराभाईंनी या प्रदेशातून अग्निबाण सोडून त्याद्वारे ही निरीक्षणे करण्याचे ठरवले.
वैश्विक किरणांवरील या संशोधनाबरोबरच दळणवळण, नैसर्गिक साधनसंपत्तीचा शोध, शिक्षणाचा प्रसार यांसाठीही अंतराळशास्त्राचा उपयोग होणार असल्याने, दूरदृष्टीच्या डॉ. साराभाईंनी अग्निबाण प्रक्षेपणाचे तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरजा ओळखली.
1962 साली अंतराळसंशोधनासाठी अणुशक्ती विभागाच्या अखत्यारीतली राष्ट्रीय समिती स्थापन झाली आणि भारतातील अंतराळकार्यक्रमाल डॉ. साराभाई यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात झाली. या कार्यक्रमाद्वारे डॉ. साराभाईनी थिरुवअनंतपुरमजवळील थुंबा येथे वैषुविक अग्निबाण प्रक्षेपण स्थानक उभारले. या स्थानकावरून दि. 21 नोव्हेंबर, 1963 साली पहिल्या अग्निबाणाचे प्रक्षेपण केले गेले.
1969 साली अणुऊर्जा विभागाच्या अंतर्गत 'भारतीय अंतराळ संशोधन संघटने'ची निर्मिती केली गेली.
भविष्यात अतिशय यशस्वी ठरलेल्या 'इन्सॅट' या बहुउद्देशीय उपग्रह मालिकेचा प्राथमिक आराखडा डॉ. साराभाईच्याच पुढाकारातून तयार झाला.
x x
सन्मान व पुरस्कार:
डॉ. साराभाई यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरची अनेक महत्त्वाची पदे सांभाळली होती.
डॉ. होमी भाभा यांच्या 1966 साली झालेल्या अपघाती मृत्यूनंतर डॉ.साराभाई यांच्याकडे अणुशक्ती आयोगाचे अध्यक्षपद सोपवण्यात आले.
डॉ. साराभाई हे संयुक्त राष्ट्रसंघाच्या वैज्ञानिक सल्लागार समितीचेही सदस्य होते, तसेच 1968 साली संयुक्त राष्ट्रसंघाने विएन्ना (ऑस्ट्रिया) येथे आयोजित केलेल्या पहिल्या अंतराळविषयक परिषदेचे ते उपाध्यक्ष होते.
1970 सालच्या विएन्ना येथीलच आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या सर्वसाधारण सभेचे अध्यक्षपद आणि 1971 साली जिनिव्हा येथे संयुक्त राष्ट्रसंघातर्फे आयोजित केल्या गेलेल्या अणुऊर्जेच्या शांततामय उपयोगांसंबंधीच्या चौथ्या परिषदेचे उपाध्यक्षपदही साराभाईंनी भूषवले होते.
डॉ. साराभाईंनी केलेल्या वैश्विक किरणांशी संबंधित अशा संशोधनामुळे त्यांना आंतरराष्ट्रीय 'शुद्ध आणि उपयोजित भौतिकशास्त्र संघटने'चे सदस्यपद तर मिळालेच; पण याच संघटनेने स्थापन केलेल्या वैश्विक किरणांच्या स्वरूपांत विविध कारणांनी होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यासाठी स्थापन झालेल्या उपआयोगाच्या सचिवपदीही त्यांची नियुक्ती केली गेली.
भारतीय विज्ञान काँग्रेसचे 1962 मध्ये भौतिकशास्त्र विभागाचे अध्यक्ष होते. डॉ. साराभाई हे 1962 सालच्या भटनागर पारितोषिकाचे मानकरी होते. 1966 साली त्यांना 'पद्मभूषण' हा सन्मान बहाल करण्यात आला.
सरकारी संस्थांबरोबरच खाजगी संस्था व उद्योगांच्या उभारणीतही डॉ. साराभाईंचा सहभाग होता. यात कापड उद्योगात संशोधन करणाऱ्या 'अँटिरा' आणि व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देणाऱ्या 'भारतीय व्यवस्थापन संस्था' (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) या अहमदाबाद येथील संस्थांचा समावेश आहे.
रसायनांच्या व औषधांच्या दर्जाचे महत्त्व जाणणारे साराभाई है या क्षेत्रातील उद्योगांशीही संबंधित होते. विज्ञानाचा फायदा हा समाजातील सर्व स्तरांना मिळावा यासाठी डॉ. विक्रम साराभाईचा कटाक्ष होता.
मुलांच्यात आणि इतर जनसामान्यांत विज्ञानाची रुची निर्माण होण्याच्या दृष्टीने त्यांनी अहमदाबाद येथे विज्ञान केंद्रही (विक्रम ए. साराभाई कम्युनिटी सायन्स सेंटर ) स्थापन केले.
विज्ञानाबरोबरच इतर अनेक अभिजात कलांत रस घेणाऱ्या डॉ. साराभाई यांनी नृत्यकलेत निपुण असणाऱ्या आपल्या पत्नी मृणालिनी यांच्या सहकायनि अहमदाबाद 'दर्पण' कलाविषयांना वाहिलेली अकादमी स्थापन केली.
भारतीय अंतराळ कार्यक्रमातील साराभाईंच्या अतुलनीय योगदानाबद्दल इ.स. 1972 साली त्यांना 'पद्मविभूषण' या सन्मानाने मृत्युपश्चात गौरवण्यात आले.
X X
डॉ. साराभाई: महान संस्था निर्माते:
डॉ. साराभाई एक महान संस्था निर्माते होते. विविध क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संस्था स्थापन करण्यात त्यांनी योगदान दिले.
साराभाईंनी सर्वप्रथम अहमदाबाद टेक्सटाईल इंडस्ट्री रिसर्च असोसिएशन (ATIRA) च्या स्थापनेत योगदान दिले. कॉस्मिक रे फिजिक्समध्ये डॉक्टरेट घेऊन केंब्रिजहून परतल्यानंतर त्यांनी हे काम हाती घेतले.
ATIRA ची निर्मिती हे भारतातील वस्त्रोद्योगाच्या आधुनिकीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल होते. त्यावेळी बहुतांश कापड गिरण्यांमध्ये गुणवत्ता नियंत्रण तंत्रज्ञान नव्हते.
x x
डॉ. साराभाईंनी स्थापन केलेल्या काही नामांकित संस्थां:
1. भौतिकशास्त्र संशोधन प्रयोगशाळा(पीआरएल), अहमदाबाद
2. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) अहमदाबाद
3. समुदाय विज्ञान केंद्र, अहमदाबाद
दर्पण अकादमी फॉर परफॉर्मिंग आर्ट्स, अहमदाबाद
4. विक्रम साराभाई स्पेस सेंटर , तिरुवनंतपुरम
5. स्पेस ॲप्लिकेशन सेंटर, अहमदाबाद
6. फास्टर ब्रीडर टेस्ट रिएक्टर (FBTR) कल्पक्कम
7. व्हेरिएबल एनर्जी सायक्लोट्रॉन प्रकल्प, कोलकाता
8. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (ECIL) हैदराबाद
9. युरेनियम कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (UCIL) जादुगुडा, बिहार
x x
विज्ञान आणि तंत्रज्ञान:
डॉ. साराभाई यांनी स्थापन केलेल्या अहमदाबादच्या भौतिक संशोधन प्रयोगशाळेने अंतराळ विज्ञान आणि नंतर अंतराळ तंत्रज्ञानामध्ये संशोधन केले.
साराभाईंनी देशाचे रॉकेट तंत्रज्ञानही पुढे नेले. भारतात सॅटेलाइट टेलिव्हिजन प्रसारणाच्या विकासातही त्यांनी प्रमुख भूमिका बजावली .
x x
निधन:
वैज्ञानिक संशोधन, उद्योग आणि कला अशा वेगवेगळ्या क्षेत्रांत भरीव कामगिरी करणाऱ्या डॉ. साराभाईंना वयाच्या अवघ्या त्रेपन्नाव्या वर्षी 30 डिसेंबर 1971 रोजी कोवलम , तिरुवनंतपुरम ( केरळ ) येथे निधन झाले.
X X
सन्मानार्थ:
थुंबा इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन (TERLS) या महान शास्त्रज्ञाच्या सन्मानार्थ तिरुअनंतपुरम आणि संबंधित अंतराळ संस्थांना "विक्रम साराभाई स्पेस सेंटर" असे नामकरण करण्यात आले .
हे भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) चे प्रमुख अंतराळ संशोधन केंद्र म्हणून उदयास आले आहे .
1974 मध्ये, सिडनी स्थित इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियनने निर्णय घेतला की, 'सी ऑफ सेरेनिटी' वर स्थित बासेल येथील मून क्रेटर आता साराभाई क्रेटर म्हणून ओळखले जाईल.
1972 मध्ये त्यांच्या मृत्यूच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त भारतीय टपाल विभागाने एक टपाल तिकीट जारी केले होते.
View, Comment and share
x x



7 Comments
Nice sirji
ReplyDeleteNice
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteNice sir
ReplyDeleteNice 👍
ReplyDeleteVery nice info
ReplyDeleteNice
ReplyDelete