अण्णाभाऊ साठे : साहित्यसम्राट, लोकशाहीरलेखक, कवी व समाजसुधारक
जयंती: 1आगस्ट
स्मृतिदिन: 18 जुलै
लघुकथा
भाग-3
अण्णा भाऊंच्या कथांचे साधारणपणे खालील प्रकारांमध्ये विभागणी होते.
1. सामाजिक, ऐतिहासिक, राजकीय व दलित जीवनावरील कथा.
2. कलात्मक व विनोदी कथा.
क्रमशः..
3. शोकान्त व हृदयद्रावक कथा/दुःखान्त कथा
विनोदी कथांबरोबरच अण्णा भाऊंनी हृदयद्रावक अशा दुःखान्त कथासुद्धा लिहिलेल्या आहेत.
या दुःखान्त कथांपैकी महत्त्वाच्या कथा म्हणजे 'टिळा लावते मी रक्ताचा', 'डोळे', 'जखम', 'कोकिळा', 'स्मशानातील सोनं', 'प्रायश्चित्त' आणि 'भिवा रामोशी'. (या कथांपैकी 'टिळा लावते मी रक्ताचा' या कथेवरच अण्णा भाऊंनी नंतर 'आवडी' ही कादंबरी लिहिली.)
1.आपल्याकडून नकळत गोत्रगमन होऊन नैतिकतेचा भंग झाल्याने चार व्यक्ती प्रायश्चित्त म्हणून कशा प्रकारे आत्महत्त्या करतात, याचे चित्रण 'बरबाद्या कंजारी' या कथासंग्रहातील 'प्रायश्चित्त' या कथेत येते.
2.'रेडं झुंज' हीसुद्धा 'बरबाद्या कंजारी' या कथासंग्रहातीलच कथा. उत्तर प्रदेशातून मुंबईत दुधाचा व्यवसाय करण्यासाठी आलेल्या सुकर्ण आणि बाबालाल या दोन भैय्यांमधील व्यावसायिक आणि भांडवलदारी स्पर्धेचे चित्रण या कथेत आहे. या स्पर्धेमुळे हे दोघेजण एकेक रेडा पाळतात. आपल्या रेड्यांच्या माध्यमातून एकमेकांचा पराभव करण्याचा त्यांचा विचार असतो. या हेतूने ते या रेड्यांची झुंज लावतात - तीही एका लाकडी पुलावर! हे रेडे इतक्या जोराने झुंजतात, की त्यांच्या हालचालींमुळे आणि वजनामुळे तो लाकडी पूल मोडतो, दोन्ही रेडे खालून वहात असलेल्या नदीतील खडकावर आपटतात आणि जागच्या जागी मरून जातात.
3.'दुर्दैवी' ही कथा 'नवती' या संग्रहातील आहे. सयाजीराव भोसले हा एक सालस आणि प्रामाणिक माणूस असतो. बाळा चौगुले आणि त्याची पत्नी हे दुष्ट प्रवृत्तीचे असतात. ते दोघे सयाजीराव भोसलेच्या मुलांना आणि सुनांना सयाजीरावविरुद्ध फितवतात. चौगुले पति-पत्नी सयाजीराव भोसलेचे सुखी आयुष्य कशा पद्धतीने विस्कटून टाकतात, याची ही कथा आहे.
X X
4. आत्मचरित्रात्मक कथा
अण्णा भाऊंच्या कथासंग्रहातील एक आकर्षक विभाग म्हणजे त्यांनी लिहिलेल्या आत्मचरित्रात्मक कथा.
या कथांमधून आपल्याला अण्णा भाऊ एक माणूस म्हणून कसे होते हे दिसते. त्यांची जीवनशैली, धाडस, उदात्तता, त्यांनी केलेले त्याग, त्यांचा प्रामाणिकपणा, जिद्द, नैतिकता, प्रेमळपणा, निर्णय घेण्याची त्यांची पद्धत यांचे दर्शन होते.
आपल्या लेखनशैलीबद्दल अण्णा भाऊंनी म्हटले आहे:
“मला माणसं खूप आवडतात. त्यांना विद्रूप करणं मला आवडत नाही. जे मी स्वतः जगलो आहे, पाहिलं आहे आणि अनुभवलं आहे, तेच मी शब्दांत मांडण्याचा प्रयत्न केला आहे. माझ्या साहित्यातील बऱ्याचशा व्यक्तिरेखा मला प्रत्यक्षात भेटलेल्या आहेत. माझ्या लेखनातील अनेक व्यक्तिरेखा खऱ्या आहेत."
1.'लाडी' या कथासंग्रहातील 'संकट' या कथेत निवेदक आपल्या धूम्रपानाच्या व्यसनामुळे कसा संकटात सापडतो हे दाखवले आहे. गावातील इतर गुराख्यांबरोबर तो आपली गाय चारण्यासाठी घेऊन जात असतो, तेव्हा त्याला हे व्यसन लागते.
2.'आबी' या कथासंग्रहातील 'डोळे' ही एका तरुणीची शोकात्मकथा आहे. मानेवाडीच्या गीता या विवाहित तरुणीचे डोळे खूप सुंदर असतात. ती सुंदर असल्याने तिच्या नवऱ्याला तिच्या चारित्र्याबद्दल संशय असतो, या संशयापोटी तिचा नवरा आणि सासरचे लोक तिचा खूप छळ करीत असतात. एके दिवशी ती आपले सासर सोडून आपल्या माहेरी येते, आणि जाणूनबुजून आपल्या डोळ्यांत विष घालते. तिची दृष्टी जाते. आपले सुंदर डोळे हेच आपल्या जीवनातील त्रासाला आणि नवऱ्याच्या संशयाला कारणीभूत आहेत असे वाटल्याने ती ही अघोरी कृती करते.
3.'कृष्णाकाठच्या कथा' या संग्रहातील 'शिकार' ही कथा, एक संस्थानिक साधी एका रानडुकराची शिकार करण्यातही असमर्थ असतो यावर टीका करणारी असली, तरी ती आत्मचरित्माकही आहे. या कथेतील गंगाराम माहूत हा अण्णा भाऊंचा मित्र होता, आणि गंगारामनेच त्यांना महाराजांच्या नेतृत्त्वाखाली जाणार असलेल्या शिकारीच्या मोहिमेत बरोबर नेले होते.
X X
5. गुन्हेगारी जीवनाचे चित्रण करणाऱ्या कथा
मराठी साहित्यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तिरेखा खलनायक म्हणूनच आल्या आहेत. परंतु या व्यक्तिरेखा आणि त्यांच्याशी संबंधित घटना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्यावर कथा लिहिण्याच्या कौशल्यात अण्णा भाऊंची बरोबरी करणारे लेखक विरळाच.
1.'खुळंवाडी' संग्रहातील 'मेंढा' या कथेतल्या सांगावच्या लखूजी माने याने एक मजबूत आणि लढाऊ मेंढा पाळलेला असतो. हा मेंढा लखूजीच्या आक्रमक स्वभावाचे जिवंत प्रतीक म्हणूनच येतो. हा मेंढा त्याच्या लढतीसाठी आणि दमासाठी प्रसिद्ध असतो. पण तो कुणीतरी चोरून नेतो. आपला मेंढा कुणी बरे चोरला असेल असा विचार करताना लखूजीला वाटते, की माणगांवच्या पंढरी पाटील या आपल्या प्रतिस्पर्ध्यानेच तो चोरला असावा. त्यामुळे पंढरीच्या या दुष्कृत्याचा बदला घेण्यासाठी लखूजी पंढरीचा मेंढा मारतो, आणि पुन्हा याचा बदला घेण्यासाठी पंढरीची माणसे लखूजीचा खून करतात.
2.'गजाआड' संग्रहातील 'तरस' या कथेत अनेक स्त्रियांवर बलात्कार करणाऱ्या, तरसासारख्या एका माणसाचे चित्रण आहे. त्याच्या शरीरामध्ये व्यंग असल्याने तो एखाद्या तरसाप्रमाणेच चालत असतो. शिवाय त्याचे वागणेसुद्धा एखाद्या तरसाप्रमाणेच असते.
वास्तव जसे अनुभवले, तसेच चित्रित करण्याच्या अण्णा भाऊंच्या धोरणामुळे ते गुन्हेगार महिलांचे चित्रण करण्यातही मागेपुढे पहात नाहीत. उदा.
3.'हौशी' ही कथा घेता येईल. या कथेत लख्या बारपुत्याच्या हौशी या चंचल मनोवृत्तीच्या आणि सारासार विवेक नसलेल्या प्रेयसीचे चित्रण आहे. लख्या या आपल्या प्रियकरासाठी हौशी आपल्या पतीचा खून करते. त्यामुळे तिला अटक होते. कैदेतून सुटल्यावर ती लख्याला विसरते आणि राजा नांवाच्या तरुणाबरोबर पळून जाते. अशा या बेलगाम तरुणीचे चित्रण या कथेत केलेले आहे.
4.‘रानगा' या कथासंग्रहातील 'दारुबंदी' ही कथासुद्धा गुन्हेगारी जीवनाचे चित्रण करणारी आहे. हीच कथा 'गजाआड' यो संग्रहात 'काळू' या शीर्षकाने प्रकाशित झालेली आहे. काळू, काळूची प्रेयसी फातमा आणि काळूचा प्रतिस्पर्धी अकबर अशा तीन अट्टल गुन्हेगारांच्या गन्हेगारी कृत्यांचे चित्रण या कथेत दिसते.
5.'आबी' या संग्रहातील 'आडवा आक्या' या कथेचा नायक आहे भिकारवाडीचा आक्या. आक्याचे आचार आणि विचार गावकऱ्यांच्या आचार-विचारांच्या अगदी विरुद्ध असे असतात. त्यामुळे गावातील लोक त्याला 'आडवा आक्या' असे म्हणत असतात. आक्याने तीन प्राणी पाळलेले असतात एक कुत्रा, एक गाय व एक बैल. हे सारे प्राणी त्यांच्या मालकाप्रमाणेच उपद्रवी आणि त्रासदायक असतात. त्यामुळे सारा गाव वैतागतो आणि आक्याला व त्याच्या 'प्रिय' प्राण्यांना धडा शिकवतो.
X X
6.‘हिकमत' ही ‘गुऱ्हाळ' या संग्रहामधील कथा रावजी राघोजी (रामोशी) आणि रघू ठोमरे हे गावकऱ्यांची कशी फसवणूक करतात, याचे चित्रण करते. लोकांना नकली सोने देऊन आपले खरे सोने शाबूत ठेवण्यासाठी गावच्या देशमुखाने या दोघांना नोकरीला ठेवलेले असते. ते अनेकांची फसवणूक करतात. सर्वसामान्य खेडुतांचे अज्ञान आणि त्याचा धूर्त लोकांनी घेतलेला फायदा या कथेत दाखवला आहे.
7.'गघडा भिक्या' ही 'गुऱ्हाळ' या संग्रहातील कथा भिक्या अरपाट नांवाच्या एका उद्धट, विकृत आणि बेजबाबदार माणसाबद्दलची आहे. तो गाढवासारखा मूर्खपणाने वागत असल्याने त्याला गावकरी 'गघडा' म्हणत असतात. काही दिवसांनंतर गावच्या जत्रेत भिक्याची त्याचा शत्रू सदू नाईकडा याच्याशी मारामारी होते. सदू या मारामारीत भिक्याचा जीव घेतो.
8.'हेड्या हैबती' ही 'गुऱ्हाळ' संग्रहातील कथा हैबती या हेड्याचे व्यक्तिचित्र आहे. हेडा म्हणजे गुरांच्या बाजारातील दलाल. इतरांना फसवण्यावरच त्याचा व्यवस्या चालतो. गुरांच्या बाजारात दलाल म्हणून काम करून तो विक्रेता आणि ग्राहक अशा दोघांकडूनही दलाली कमावतो. आपल्या या व्यवसायासाठी तो खोटे बोलायलाही कचरत नाही. प्रत्यक्षात तो एका फडक्यात बांधलेल्या वहाणांच्या जोडावर हात ठेवून शपथ घेतो, पण बोलताना मात्र 'भाकरीवर हात ठेवून शपथ घेतोय्' असे सांगतो,
9.'घोडगोंधळ' ही 'गुन्हाळ' संग्रहातील कथा दोन बायकांच्या नवऱ्याचे व्यक्तिचित्र आहे. दोघीही त्याला त्रास देत असतात. त्यांना सरळ करण्यासाठी त्याला हिंसक आणि आक्रमक मार्गाचा अवलंब करावा लागतो. जिथे स्त्रियांवर फक्त हिंसा आणि धमक्या यांच्या सहाय्यानेच नियंत्रण ठेवता येते, अशा ग्रामीण जीवनाचे चित्रण या कथेत केलेले आढळते.
10.'हुबळवाडीची भानगड' या 'नवती' या संग्रहातील कथेत गुन्हेगारीच्या टोकावर पोचलेल्या व्यक्तिरेखांच्या काररायंचे चित्रण आढळते.
11.'दे. भ. चं भूत' ही 'ठासलेल्या बंदुका' या कथासंग्रहातील कथा 1942 सालच्या भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवरील आहे. भुतासारखा दिसणारा महादेव (गावकरी तुच्छतेने त्याला 'महाद्या' म्हणत) आणि अण्णा थोरात हे गावकऱ्यांना घाबरवून आपला मतलब साधण्यासाठी स्वातंत्र्यलढ्याची संधी वापरतात. व्यापक अर्थाने विचार केला, तर स्वातंत्र्यलढ्याचा वापरसुद्धा काही लोकांनी स्वार्थ साधण्यासाठी करून घेतला. ते लोक खऱ्या अर्थाने देशभक्त नव्हते, तर या भुतांप्रमाणे नकली देशभक्त होते, असे दिसते.
12.‘इरेनं गाढव खाल्लं’ या ‘कृष्णाकाठच्या कथा' या संग्रहातील कथेत अवाजवी गर्व असलेल्या तुका नांवाच्या एका माणसाचे चित्रण आहे. त्यामुळे तो स्वतःचे आणि इतरांचे जीवन उद्ध्वस्त करतो. तो स्वतः अशिक्षित असूनही एका सुशिक्षित पत्नीमुळे त्याला न्यूनगंड वाटू लागतो. पण हा न्यूनगंड लपवण्यासाठी तो आपल्या पत्नीला मारहाण करू लागतो. शेवटी तो आपले कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक जीवन उद्ध्वस्त करून घेतो, कारण त्याची पत्नी त्याला कायमची सोडून जाते.
X X
13.'चिरागनगरची भुतं' मधील 'गेंडा' या कथेत लोकांना आपल्या डोक्याने गेंड्यासारख्या धडका देणाऱ्या एका अतिशय रासवट आणि बेपर्वा माणसाचे व्यक्तिचित्र आहे. या धाडसामुळेच तो सुकड्या, नानको आणि आबऱ्या या तीन गुंडांना बेदम मारतो, कारण त्याने हस्तक्षेप केला नसता, तर एका झोपडपट्टीतील विमल नांवाच्या एका असहाय मुलीवर त्यांनी नक्कीच बलात्कार केला असता. 'गेंडा' तिच्या मदतीला येऊन तिच्या चारित्र्याचे रक्षण करतो. शेवटी गेंडा आणि विमल यांचे लग्न होते.
X X
6. अंधश्रद्धांविरुद्धच्या कथा
अण्णा भाऊंच्या एकूण कथांपैकी बऱ्याच कथांना अंधश्रद्धांविरुद्धच्या कथा म्हणता येईल.
या कथा म्हणजे 'तीन भाकरी', 'बोलकं मुंडकं', 'भुतांचा वाडा', 'सूड', 'चालतं मढ' आणि 'मरीआईचा गाडा' यांच्यासारख्या कथा. अण्णा भाऊ हे वैज्ञानिक दृष्टी असलेले लेखक होते असे या कथा सूचित करतात.
1.'मरीआईचा गाडा' या 'कृष्णाकाठच्या कथा' या संग्रहातील कथेत जीवनाबद्दलचा प्रामाणिक, वैज्ञानिक आणि नवा दृष्टिकोन कशा प्रकारे जुन्या, अशास्त्रीय व अंधश्रद्धेवर आधारित दृष्टिकोनावर विजय मिळवतो हे दाखवले आहे. या कथेतील नाना हे शास्त्रीय दृष्टिकोनाचे प्रवक्ते आहेत; तर सटवाजी, केरू नलावडा, भाऊ बाबाजी आणि म्हादबा हे जुन्या, अशास्त्रीय आणि अंधश्रद्धेवर आधारलेल्या दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्त्व करणारे आहेत. नाना ही व्यक्तिरेखा ब्रिटिशांविरुद्ध बंडखोरी करणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यावर आधारलेली आहे असे म्हटले जाते. क्रांतिसिंह नाना पाटील हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध कम्युनिस्ट नेते होते. मरीआई नांवाची एक देवी कॉलरा वगैरे रोगांच्या साथी सुरू करते. तिला शांत करण्यासाठी तिची पूजा करून तिचा गाडा शेजारच्या घावच्या हद्दीत सोडल्यास त्या साथी आपल्या गावातून शेजारच्या गावात जातात, अशी एक अंधश्रद्धा महाराष्ट्रात प्रचलित होती. मरीआईसंबंधीच्या समजाचे समर्थन करणाऱ्यांचे मुद्दे कसे निरर्थक आहेत हे या कथेतील नाना स्पष्ट करतात. शेवटी हा अर्थहीन रिवाज चालू ठेवणे हा मूर्खपणा आहे हे लोकांना पटवून देण्यात नाना यशस्वी होतात.
7. प्रेमकथा
अण्णा भाऊंच्या कादंबऱ्यांप्रमाणेच त्यांनी लिहिलेल्या प्रेमकथांनाही जाणिवेचा स्पर्श आहे.
1.'कोकिळा' ही एका निष्पाप प्रेमाची दुःखान्त कथा आहे. 'वेडा वारा' ही एकूणच मराठी कथा-साहित्यात आपल्या वेगळेपणामुळे उठून दिसणारी कथा आहे; कारण मराठी साहित्यातील बहुतेक कथांमधील विवाहित तरुणी सासरहून माहेरी पळून जातात; परंतु 'वेडा वारा' मधील विवाहित तरुणी गंगू याच्या अगदी उलट वागते. पतीच्या प्रेमासाठी व्याकुळ झालेली गंगू माहेराहून सासरला पळून येते.
2.'राणी' या कथेत भाऊ पैलवान, मारुती रामोशी आणि राणी असा प्रेमाचा त्रिकोण आहे. भाऊ पैलवान आणि राणी यांचे एकमेकांवर प्रेम आहे. मारुतीच्या उद्धटपणामुळे भाऊ पैलवानाकडून त्याचा खून होतो. राणी आणि भाऊ पैलवान हे एकमेकांच्या इतके प्रेमात असतात, की खुन्याला पकडण्याची वेळ येते, तेव्हा भाऊ आणि राणी दोघेही एकमेकांना पुढील त्रासापासून वाचवण्यासाठी खुनाचा आरोप आपल्यावर घेऊ पहातात.
3."तमाशा' ही बापू आणि त्याच्या दोन प्रेयसी गोजा आणि नवटाक यांच्यामधील आदर्श प्रेमाची कहाणी आहे. एरवी एकाच पुरुषावर प्रेम करीत असलेल्या दोन स्त्रिया एकमेकींचा मत्सर करतात, पण गोजा आणि नवटाक या मात्र तसा मत्सर करीत नाहीत. बापूवर आपला एकटीचाच हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न गोजा किंवा नवटाक करीत नाहीत.
4.'रंभा' या कथेतील रंभा ही एक सुंदर ग्रामीण तरुणी आहे. ती मीरा नांवाच्या देखण्या तरुणाच्या प्रेमात पडते. 'मीरा' हा पुरुष असूनही तमाशात नाच्याची भूमिका करीत असतो. रंभा ही मीराच्या पिळदार शरीरामुळे त्याच्याकडे आकर्षित झालेली असते. त्याच्याबद्दलचे तिचे प्रेम इतके उत्कट आणि पक्के असते, की वेळ आल्यावर ती आपले घर आणि आपले आईवडील यांना सोडून त्याच्यामागे जाते.
5.'मंजुळा' या कथाची नायिका मंजुळा शूर आहे. आपल्या प्रियकरासाठी आपल्या वडिलांवर आणि इतर नातेवाईकांवरही कुऱ्हाडीने वार करायला ती मागेपुढे पहात नाही. याउलट तिचा प्रियकर शिलाजी हा समर्थ तरीही समतोल असतो.
X X
6.'बिलवरी' ही कथा बिलवरी आणि अमीन यांच्यातील प्रेमाची कथा आहे. अमीन हा श्रीमंत अशा देशमुखांच्या पदरी काम करणारा एक गरीब कामगार असतो. या कथेतील सर्वात आकर्षक असे भाग म्हणजे देशमुखाने देऊ केलेली प्रचंड संपत्ती बिलवरीने नाकारणे; देशमुखाचा विरोध असूनही बिलवरीने अमीनवर प्रेम करीत रहाणे; त्यामुळे आपले, आपल्या वडिलांचे व आपल्या जमातीचे जीवन धोक्यात घालणे, पण अमीनला धोका न देणे.
7.'पिला' ही 'पिला' नांवाची कोळी समाजातील एक स्त्री आणि उत्तम नांवाचा एक सुशिक्षित कुंभार यांच्यामधील प्रेमाची कथा आहे. पिला आंधळी होते व उत्तमला वायुसेनेत नोकरी मिळते, तरी त्यांच्यातील प्रेमाचे बंधन कायम रहाते.
8.'मानकी' ही 'चिरागनगरची भुतं' या संग्रहातील कथा प्रेमाची एक वेगळीच छटा दाखवते. दादू धावडा आणि बाबू चाकूवाला या आपल्या दोन प्रेमिकांपैकी एकाशीही मानकी एकनिष्ठ नसते. प्रियकर निवडण्यासाठी तिचा निकष असतो त्याचा धाडसीपणा. ती तुरुंगात गेल्यावर आपला पहिला प्रेमिक बाबू चाकूवाला याच्याकडे पाठ फिरवते व दादू धावडा याच्यावर प्रेम करू लागते.
9.'बोलकं मुंडकं' ही कथा प्रेमभंगामुळे उद्ध्वस्त आणि वेडा झालेल्या एका तरुणाची कथा आहे. पिऱ्या हा तरुण गुणी नांवाच्या सुंदर मुलीच्या प्रेमात पडतो, पण त्याचे प्रेम यशस्वी होत नाही. त्यामुळे तो 'ताऱ्या' नांवाचं वाद्य वाजवीत, वेगवेगळ्या प्राण्या-पक्षांचे आवाज काढीत गावात भीक मागत फिरू लागतो. गावातली पोरेसोरे त्याची थट्टा करू लागतात, त्याला दगड मारू लागतात. यामुळे वैतागून, दगडांचा त्रास वाचवण्यासाठी पिऱ्या नदीकाठच्या वाळवंटात आपले मानेपर्यंतचे शरीर पुरून घेतो. गावकऱ्यांना जेव्हा वाळूतून वर आलेले फक्त एक मानवी मुंडके तेवढे दिसते, आणि ते बोलते आहे हे त्यांच्या लक्षात येते, तेव्हा ते त्याला 'बोलकं मुंडकं' असे म्हणू लागतात.
10.'फरारी' ही जशी शौर्यकथा आहे, तशीच प्रेमकथाही आहे. शिवा आणि त्याची बायको येसू यांच्यामधील प्रेमाची ही कथा आहे.
X X
8. कौटुंबिक जीवनावरील कथा
अण्णा भाऊंच्या कथांपैकी सर्वांत महत्त्वाच्या कथा म्हणजे 'पाझर' आणि 'दाभाड्यांचा वाद'.
1.'पाझर' ही कथा स्त्रीच्या हृदयाला मायेचा पाझर कसा फुटतो याची कथा आहे. एक गोड मूल तिला स्वतःची आई मानते, तेव्हा तिला मायेचा पाझर फुटतो. ते मूल खूप लहान असतानाच त्याची आई दिवंगत झालेली असते.
2. कुटुंबियांमधील मायेचे चित्रण 'दाभाड्यांची वाद' या 'गुन्हाळ' या कथासंग्रहातील कथेत सापडते. दाभाडे कुटुंबातील थोरला भाऊ जिजाबा दाभाडे आणि धाकटा भाऊ हणमा दाभाडे हे अगदी लहानसहान गोष्टींवरून वाद घालीत असतात. आईची काळजी घेणे, जिजाबाच्या बकरीने हणमाच्या सगळ्या भाकरी खाणे, घरांवर कौले घालणे, हणमाच्या कुत्र्याने जिजाबाच्या भाकरी पळवणे अशा लहानसहान गोष्टींवरून ते वाद घालीत असतात. पण जेव्हा हणमाला पोलीस अटक करणार आहेत असे जिजाबाला समजते, तेव्हा हणमाच्या सगळ्या चुका माफ करून तो त्याच्या बाजूने उभा रहातो आणि त्याला वाचवतो.
डॉ. भोसले यांनी संपादित केलेल्या अण्णा भाऊंच्या प्रातिनिधिक कथांच्या संग्रहाला त्यांनी लिहिलेली वीस पृष्ठांची प्रस्तावना वाचायला हवी. या प्रस्तावनेत एके ठिकाणी डॉ. भोसले लिहितात, 'फुले-आंबेडकरांचा वारसा घेऊन उभे राहिलेले, मराठी साहित्य-संस्कृतीची परंपरा न नाकारणारे अण्णा भाऊ हे पहिले दलित बंडखोर लेखक झाले...'
असे असले तरी अण्णा भाऊंनी मराठी कथासाहित्याला दिलेल्या योगदानाच्या मूल्यमापनाचा निष्कर्ष काढताना असे म्हणता येईल, की माणसापेक्षाही हीन दर्जाचे जीवन जगणाऱ्या माणसांचे त्यांनी साहित्यात चित्रण केले. उपेक्षितांच्या, पददलितांच्या व पिळल्या जाणाऱ्या माणसांच्या जीवनाला त्यांच्याइतक्या जवळून इतर कुठल्याही लेखकाने स्पर्श केला नव्हता, त्यांचे अंतरंग इतक्या तपशीलवारपणे कुणीच उलगडून दाखवले नव्हते केले. अण्णा भाऊंनी नेमके हेच महत्त्वाचे कार्य केले.
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/08/2.html
👆
अण्णाभाऊ साठे : साहित्यसम्राट, लोकशाहीरलेखक, कवी व समाजसुधारक
स्मृतिदिन: 18 जुलै
लघुकथा (भाग 2 )
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/08/4.html
👆
अण्णाभाऊ साठे : साहित्यसम्राट, लोकशाहीरलेखक, कवी व समाजसुधारक
जयंती: 1आगस्ट
स्मृतिदिन: 18 जुलै
लोकनाट्ये, नाटके व नाटिका
भाग-4
View, Comment and share..
X X


2 Comments
Nice
ReplyDeleteखूप छान माहिती सर
ReplyDelete