Subscribe Us

header ads

Tamil kingdom: chol,cher and Padya

तामिळ राज्ये: चेर, चौल व पांड्य


            राजा करिकाल चौल


कृष्णा व तुंगभद्रा या नद्यांच्या दक्षिणेकडील प्रदेश तामिळ देश म्हणून ओळखला जातो. हा भाग द्रविड संस्कृतीचे केंद्रस्थान म्हणून ओळखला जातो. 

अगस्ती ऋषीने उत्तरेतून येऊन या भागात आर्य संस्कृतीचा प्रसार केला असे तामिळ परंपरा सांगते. 

चेर, चौल व पांड्य या तीन तामिळ राज्यांमध्ये राजकीय वर्चस्वासाठी सतत लढा चालू होता. त्यांच्यात शाश्वत विजय कोणासही मिळाला नाही. 

राजाच्या कर्तबगारीप्रमाणे तामिळ राष्ट्राचे सार्वभौमत्व आलटून पालटून या तीन राज्यांकडे होते.

X X

1) चेर राजवंश :

केरळ देशावर राज्य करणारा हा पहिला राजवंश होय.

 भारताचा कोचीन, मलबार किनारा या भागात चेर वंशाचे राज्य मोर्योत्तर कालखंडात प्रस्थापित झाले होते. 

अशोकाच्या शिलालेखात त्यांचा 'केरळपुत्र' असा उल्लेख आहे. मौर्योत्तर काळात केरळ प्रांतात चेर राजवंश प्रसिद्ध पावला. 

इ.स.पू. च्या पहिल्या ते इ.स.वी पहिले शतक या 200 वर्षांच्या काळात चौल राजांनी चेर व पांड्य यांच्यावर वर्चस्व प्रस्थापित केले होते. पण पुढे चेर वंश बलवान झाला व काही काळ त्याने प्रभुत्व गाजविले. 

इ.स. च्या पहिल्या शतकात चेर या प्रबळ राजवंशाची सत्ता संबंध केरळवर प्रस्थापित झाली होती. चेरांची राजधानी तिरवंचिक्कुलम् येथे होती. 

करिकाल चौल याने एका चेर राजाचा पराभव केला होता असे म्हणतात. पण त्याने आपली कन्या चेर राजाला देऊन त्याच्याशी मैत्री केली. 

त्या चौल राजकन्येचा पुत्र म्हणजे चेरम शेंगटटुवान हा होता. त्याने कोईमतूर जिंकले होते. त्याने दक्षिण भारताच्या विस्तृत प्रदेशावर राज्य केले.

या वंशातील प्रसिद्ध राजा चेरल आदन हा एक होय. तो करिकाल चौल याचा समकालीन होता. त्याने कदंबू प्रदेश जिंकला व अनेक राजांना पराभूत करून ‘अधिराजर' ही पदवी घेतली. पण पुढे करिकालने त्याचा पराभव केला. त्यामुळे लज्जित होऊन त्याने राजक्षेत्रातच आत्महत्या केली असे वर्णन अनेक तामिळ ग्रंथांत आहे. 

चेरण शेंगटटुवान याने समुद्रावरील चाचेगिरीचा बंदोबस्त करून संबंध मलवार किनारा व्यापारासाठी सुरक्षित केला.

 तो धर्माचा व विद्येचा मोठा भोक्ता होता. त्याने अनेक विद्वानांना आश्रय दिला होता. त्याचा धाकटा भाऊ अदिगल याने 'चिलप्पादिकारम्' या नावाचे तामिळ महाकाव्य लिहिले.


इ.स.च्या दुसऱ्या शतकापासून ते 9 व्या शतकापर्यंत केरळात पेरूमल राजवंशाची सत्ता होती. पण त्यांचे आलेख, नाणी उपलब्ध नसल्याने त्यांच्या (राजाच्या) नामावलीशिवाय त्यांचा इतिहास उपलब्ध नाही.

X X

2) पांड्य राजवंश :

बेल्लार नदीच्या दक्षिणेला पटुकोटापासून कन्याकुमारीपर्यंत पांड्य वंशाचे राज्य पसरलेले होते. 

त्यात तिन्नेवेल्ली, मदुरा व रामनाड हे जिल्हे व तिरुवितांकुरचा दक्षिण भाग एवढा प्रदेश होता.

 मदुरा ही त्यांची राजधानी होती. रामायण, महाभारत व बृहत्संहिता, महावंश इ. ग्रंथांत पांड्यांचे उल्लेख आहेत.

 बुद्धाच्या निर्वाणानंतर काही दिवसांनी लंकेचा राजकुमार विजय व पांड्य राजकुमारी यांचा विवाह झाला असे महावंश बौद्ध ग्रंथात म्हटले आहे. 

कात्याध्यानाने 'पांडू' या शब्दापासून 'पांड्य' या नावाची व्युत्पत्ती झाल्याचे सांगितले आहे. 

पांडवांनी पांड्य कुळाचा संबंध जोडण्याच्या काही आख्यायिका दक्षिण भारतात आहेत. 

पांड्यकनसचे मोती व मदुरेकडील सुती वस्त्रे यांचा उल्लेख कौटिल्याने केला आहे.

 मौर्य सम्राट अशोक याच्या शिलालेखात दक्षिणेकडील शेजारील राज्य म्हणून पांड्य देशाचे उल्लेख आढळतात. 

अशोकाने पांड्य देशात मनुष्य व पशू यांच्यासाठी चिकित्सालये उघडली होती व बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी दूत पाठविले होते. 

कलिंग राजा खारवेलला पांड्य राज्याकडून मोती, मणी व रत्ने मिळाली होती. 

स्टॅबो व टॉलेमी यांच्या ग्रंथांत व पेरिप्लसच्या ग्रंथातही पांड्यांचा उल्लेख आहे. त्याकाळी पांड्यांचा मोठा व्यापार परदेशांशी होता.


नेडुजेलियन पांड्य : 

हा राजा इ.स.च्या तिसऱ्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेला. तो लहान वयातच गादीवर आला. 

त्यामुळे चौल, चेर व इतर अनेक राजांनी संगनमताने पांड्य देशावर आक्रमण केले. परंतु नेडुजेळियन पांड्य याने त्या सर्वांचा पराभव केला होता. 

संपूर्ण तामिळ देशावर त्याने आपली अधिसत्ता प्रस्थापित केली होती. तो वैदिक धर्माचा पुरस्कर्ता. होता. त्याने अनेक यज्ञयाग केले होते. 

यौद्धा व पराक्रमी राजा म्हणून तामिळनाडूच्या इतिहासात त्याची नोंद आहे. तो स्वतः कवी होता व अनेक कवींना त्याने आश्रय दिला होता. 

 आश्रित कवींनी नेडुजेळियन या आश्रयदात्या राजावर पुष्कळ गीते रचून त्याचे नाव अमर केले. त्याच्या प्रेरणेने व आश्रयाने मदुरा येथे तिसरी विद्वत्तसभा (संगम) भरली.

 पांड्य वंशातील उग्रनामक राजानंतर इ.स.च्या तिसऱ्या शतकाच्या अखेरीस त्या वंशाची सत्ता नष्ट झाली. ती इ. स. च्या 6 व्या शतकाच्या अखेरीस पुन्हा प्रस्थापित झाली.

 मधल्या 300 वर्षाच्या कालखंडात तेथे उत्तरेकडून आलेल्या कलभ्रांचे प्रभुत्व असावे, पण त्या काळातला इतिहास अज्ञातच आहे.

 पण पांड्य वंशातील कंडुगोण (इ.स. 590-620) व त्याचा पुत्र मारवर्या अवनिशुळामणी (इ.स. 620- 645) यांनी कलभ्रांची सत्ता नष्ट करून पांड्य वंशाचे राज्य पुन्हा सुरू केले. 

जयंतवर्मा (इ.स. 645 -670) हा अत्यंत शूर व न्यायी म्हणून प्रसिद्ध होता. त्याने चेर राजाचा पराभव केला होता. पुढे 16 व्या शतकापर्यंत पांड्यांचे राज्य अस्तित्वात होते.

X X

(3) चौल राजवंश - 

तामिळनाडूतील हा इतिहासप्रसिद्ध असा पहिला राजवंश होय. महाभारतात, मॅगेस्थेनिसच्या 'इंडिका' ग्रंथामध्ये व अशोकाच्या शिलालेखात त्या राजवंशाचा उल्लेख आहे.

 टॉलेमीच्या ग्रंथातही चौलांची माहिती आहे. चौलांचा मूळ प्रदेश तामिळनाडूतील तंजावर, त्रिचनापल्ली, चेन्नई परिसर होता. 

तामिळनाडूत चौल राजवंशात होऊन गेलेला सर्वात प्रसिद्ध राजा म्हणजे करिकाल चौल हा होय.

 तो पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात होऊन गेला. त्याच्याविषयी तामिळ कवींनी अनेक गौरवगीते लिहिली आहेत. तो चतुर शासनकर्ता व कुशल सेनापती होता. 

त्याने चेर व पांड्य राजांच्या संघटित सेनेचा एका युद्धात पराभव करून तामिळनाडूवर आपले प्रभुत्व प्रस्थापित केले.

 एवढेच नव्हे तर त्याने हिमालयापर्यंत स्वाऱ्या करून वज्र, मगध, अवंती ही राज्ये जिंकली असे वर्णन 'शिलाधिकारास' या महाकाव्यात आढळते. 

कांचीच्या पल्लव राजाचा त्याने पराभव करून आंध्र प्रदेशावरही आक्रमण केले. तो वैदिक धर्माचा अनुयायी होता. त्याने अनेक यज्ञ केले होते.

करिकालची कारकीर्द गाजली ती प्रामुख्याने नवी शहरे वसवणे, जमिनी लागवडीखाली आणणे व शेतीस पाणीपुरवठा करणे या कामांमुळे. त्याने जंगले तोडून शेती नव्याने लागवडीखाली आणण्याचे काम हाती घेतले होते.

 कावेरीपट्टम ही नगरी त्यानेच निर्माण केली. ती नगरी कावेरी नदीच्या मुखाशी असल्याने एक देशांतर्गत व्यापाराचे व आंतरराष्ट्रीय व्यापाराचे केंद्र म्हणून ते शहर प्रसिद्ध पावले.

 त्याने व्यापार, उद्योगधंदे व कला यास प्रोत्साहन दिले. तामिळ वाङ्मयासही त्याने प्रोत्साहन दिले. 

त्याने लंकेतील राजाचा पराभव करून तेथील 12000 सिंहली नागरिकांना पकडून आणले व कावेरीच्या मुखाजवळील पुहार बंदराच्या बांधणीच्या कामास लावले.

चेरन शेंगटटुवान नावाचा एक प्रतापी राजा इ. स. च्या तिसऱ्या शतकात चौल वंशात होऊन गेला. 

तो शैव पंथाचा होता. त्याने तामिळनाडूत अनेक शिवालये बांधली. त्यानेही चेर व पांड्य राजांचा पराभव करून आपले वर्चस्व कायम राखले.

 त्यानंतर मात्र चौल वंशाची सत्ता क्षीण होत गेली व तिच्या जागी पांड्य वंशाचे प्रभुत्व प्रस्थापित झाले.

पांड्य व चेर या वंशांची सत्ता तामिळनाडूत प्रस्थापित झाली तरी चौल वंशातील काही पुरुष लहान लहान राज्ये सांभाळत असावेत. त्यांचा राजकीय व लष्करी प्रभाव मुळीच नसावा.

 इ.स. 9 व्या शतकात पांड्य व पल्लव हे आपापसांत झगडून दुबळे झाले असता पल्लव राजांचा एक सामंत विजयालय चौल याने स्वतंत्र राज्य स्थापन  केले. 

तंजावर येथे एक राजधानी स्थापन केली. तेथे एक दुर्गेचे मंदिर बांधले. तो स्वतः शिवभक्त होता.







View, Comment and share


Post a Comment

1 Comments