सातवाहन : महाराष्ट्राचा पहिला ज्ञात ऐतिहासिक राजवंश
(इ.स.पू. 230 ते इ.स. 230)
सातवाहन राजवंश हा महाराष्ट्राचा पहिला ज्ञात ऐतिहासिक राजवंश होय.
सातवाहनांच्या पूर्वीच्या महाराष्ट्राचा इतिहास आपणास फारसा माहीत नाही. सातवाहनांच्या उदयापासूनच महाराष्ट्राचा राजकीय इतिहास, सामाजिक व धार्मिक स्थिती, आर्थिक स्थिती, साहित्य-कला व स्थापत्य इ. ची थोडीबहूत माहिती मिळू लागते.
इ.स. पू. 230 ते इ.स. 230 हा सातवाहनांचा एकूण कालखंड होय.
मौर्याच्या राजकीय इतिहासाला उत्तर भारताच्या इतिहासात जे स्थान आहे तेच स्थान दक्षिण भारताच्या इतिहासात सातवाहनांना आहे.
सातवाहनांचा कालखंड हा प्राचीन भारताच्या इतिहासातील सुवर्णयुगाचा कालखंड होय. कारण सातवाहनांनी सलग 460 वर्षे राज्य केले.
X X
राजकीय सत्तेचा केंद्रबिंदू सातवाहनांनी मगधहून (उत्तर भारत) महाराष्ट्रात पैठण (प्रतिष्ठान) येथे आणला.
त्यांच्या राजवटीत संस्कृत व प्राकृत भाषेचा विकास होऊन या विपुल साहित्यनिर्मिती झाली.
कला व स्थापत्य या क्षेत्रात सातवाहनांचे योगदान मोठे होते. सातवाहनांच्या काळात 500 लेण्या कोरल्या गेल्या.
सातवाहन राजांनी परकियांशी प्राणपणाने लढून आपले स्वातंत्र्य मिळवले. शक, यवन व पल्लव या परकियांना त्यांनी पराभूत केले.
दक्षिण भारताच्या बहुतेक भागावर व मध्य भारतातही काही काळ सातवाहनांचे राजकीय वर्चस्व होते.
सातवाहनांच्या काळात आर्थिक भरभराट होऊन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यापारास चालना मिळाली.
सातवाहन काळात पैठण, तेर, भोगवर्धन व नाशिक या शहरांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा दर्जा प्राप्त झाला होता.
सातवाहन राजांची विविध धातूंची नाणीही विपुल प्रमाणात उपलब्ध झाली आहेत.
सातवाहनांचे मूळ स्थान :
सातवाहनांच्या मूळ स्थानासंबंधी इतिहासकारांत मतभेद आहेत. सातवाहनांचे मूळ स्थान व त्यांचा वर्ण यासंबंधीच्या वादात डॉ. रा.मो. भांडारकार, डॉ. सुखठणकर, स. आ. जोगळेकर, डॉ. के. गोपालाचारी, डॉ. डी. सी. सरकार, वा. वि. मिराशी, राजवाडे वि. का. इ. नी भाग घेतला आहे.
पुराणग्रंथात 'आंध्र' असे सातवाहनांना म्हटले आहे.
डॉ. रा. गो. भांडारकर, बुलहर, रॅपसन, व्ही. ए. स्मिथ, गुटी व्यंकटराव, ओ. रामचंद्रय्या, जेम्स बर्जेस वगैरे संशोधकांनी सातवाहन हे मूळचे आंध्र प्रदेशातील होते असे म्हटले आहे.
या इतिहास संशोधकांनी आपल्या मताच्या पुष्ट्यर्थ शिलालेख व तत्कालीन साहित्यातील पुरावे दिले आहेत.
सातवाहनांच्या इतिहासाचे गाढे अभ्यासक डॉ. वा. वि. मिराशी, डॉ. मोरवंचीकर, डॉ. प्रभाकर देव यांनी सातवाहनांचे मूळ स्थान महाराष्ट्र होते, असे म्हटले आहे.
डॉ. वा. वि. मिराशी हे विदर्भ मूळ स्थान असे म्हणतात, तर बाकी इतिहासकार प्रतिष्ठान, जुन्नर, नंदीग्राम (नांदेड) ही स्थळे सुचवितात.
त्यांनी आपल्या मतांच्या पुष्ट्यर्थ खालील युक्तिवाद मांडले आहेत.
1) सातवाहनांच्या कोरीव लेखांपैकी 75 पेक्षा अधिक शिलालेख पश्चिम महाराष्ट्रात सापडले आहेत.
2) सातवाहनांची राजधानी नंदगिरी (नांदेड) येथे होती असा उल्लेख एका शिलालेखात आहे.
3) ग्रीक प्रवासी टॉलेमी याने पुलुमावी राजा प्रतिष्ठाननगरीत राज्य करतो असे म्हटले आहे.
4) सातवाहनांची नाणी नाशिक, तेर, पैठण, भोगवर्धन येथे मोठ्या प्रमाणात सापडली आहेत.
इतिहासकारांतील मतभिन्नता विचारात घेऊन सातवाहन राजकुळ हे मूळचे महाराष्ट्रातील होते. त्यांनी उत्तर काळात आंध्र प्रदेशात राज्य केले असा निष्कर्ष निघतो.
X X
सातवाहनांचा कालखंड :
सातवाहनांनी किती वर्षे राज्य केले व सातवाहन वंशाला सातवाहन हे नाव का पडले याबाबत विद्वानांत मतभेद आहेत.
सातवाहनांच्या एकूण कालखंडाबाबत पुराणग्रंथांनी मतभिन्नता व्यक्त केली आहे. मत्स्य पुराण, ब्रह्मांड पुराण, वायुपुराण यांनी अनुक्रमे 460, 456 व 411 वर्षे अशी आकडेवारी दिली आहे तर विष्णुपुराणात सातवाहनांनी 300 वर्षे राज्य केले असे म्हटले आहे.
सातवाहनांच्या एकूण कालखंडाबाबत इतिहासकारांत मतभेद असले तरी इ. स. पू. 230 ते 460 वर्षांचा सातवाहनांचा एकूण कालखंड होय हे ग्राह्य मत आहे.
सातवाहन वंशाला 'सातवाहन' हे नाव का पडले याबद्दलही काही तर्क आहेत. दुसऱ्या कोणी इतर राजांनी त्यांना मानचिन्ह रूपाने वाहने दिली म्हणून सातवाहन हे नाव दिले असे एक मत आहे. त्या वंशातील राजांनी त्यांना वाहने (सात) दिली म्हणून सातवाहन हे नाव पडले असे दुसरे मत आहे.
अलीकडच्या संशोधकांच्या मतानुसार सातवाहन हे व्यक्तिनाम होते. तो या घराण्याचा कुलपुरुष होता व तेच नाव या वंशाला मिळाले असे तिसरे मत आहे.
सात या नावाचा यक्ष पौराणिक दंतकथांमधून येतो. सात या यक्षाचा व या कुलनामाचा काही संबंध असावा असे चौथे मत आहे.
सातवाहन हे घराणे सूर्याचेही आहे. सातवाहन हे घराणे सूर्योपासक असल्याने 'सातवाहन' हे नाव पडले असावे असेही एक मत आहे.
सातवाहनांचे वर्णव्यवस्थेतील स्थान :
सातवाहन राजे ब्राह्मण जातीय होते. वशिष्ठीपुत्र पुलुमावीच्या नाशिक येथील शिलालेखात सातवाहन सम्राट गौतमीपुत्राचा उल्लेख 'अद्वितीय ब्राह्मण व क्षत्रियांचा गर्व व अभिमान यांचे दमन करणारा या शब्दांत केला आहे. म्हणजेच सातवाहनांना ब्राह्मण असल्याचा अभिमान होता.
सातवाहन ब्राह्मण असले तरी त्यांनी नागवंशी व शक स्त्रियांशी वैवाहिक संबंध जोडले होते याचे आश्चर्य वाटते.
सातवाहन राजकुळात पुरुषांची मातृनामदर्शक नावे ठेवण्याची पद्धत होती.
डॉ. कुमारी भ्रमर घोष यांनी एका लेखात (इंडियन कल्चर ऑक्टोबर 1934) सातवाहन हे क्षत्रिय होते असे अनुमान काढले आहे.
X X
सातवाहनांच्या इतिहासाची साधने :
सातवाहनांचे भारतीय संस्कृतीला फार मोठे योगदान आहे. त्यांच्या कालखंडातील राजकीय, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक जीवनाचा अभ्यास करण्यासाठी खालील साधने उपलब्ध आहेत.
1) सातवाहन व पश्चिमी क्षत्रप यांचे कोरीव लेख.
2) सातवाहनकालीन शिल्प, स्थापत्य व चित्रकलेचे अवशेष.
3) गुणाढ्याची 'बृहत्कथा', क्षेमेंद्रची 'कथामंजिरी' हे ग्रंथ.
4) पुराणग्रंथ.
5) 'मृच्छकटिक' हे नाटक.
6) हालचा 'गाथासप्तसई' हा ग्रंथ.
7) टॉलेमीचा 'जिऑग्राफिया' हा ग्रंथ व 'पेरिप्लस ऑफ दी युरेश्रियस सी' या अनामिक ग्रंथातील नोंदी.
8) पैठण, भोकरदन, तेर व आंध्र प्रदेशात नागार्जुनकोंडा आणि अमरावती येथील उत्खननात सापडलेले अवशेष.
9) सातवाहनांची नाणी.
View, Comment and share
View, Comment and share....


3 Comments
Very nice information
ReplyDeleteअगदी सोप्या समजलं अशा भाषेमध्ये आहे. Thanks sir 🤗
ReplyDeleteSuperb
ReplyDelete