Ancient India: Cultural Contribution - 5
प्राचिन भारत: सांस्कृतिक योगदान
( स्मृति वाङमय, महाकाव्ये, पुराणे ) - 5
स्मृति वाङमय:
आर्यांचा सर्वांगिण विकास होऊ लागला व नवनवीन भूप्रदेश ते व्यापू लागले.
अनार्याशी त्यांचा वारंवार संपर्क होऊ लागला. त्यामुळे वर्णसंकर अटळ ठरला. त्यातून अनेक सामाजिक व धार्मिक प्रश्न निर्माण झाले. त्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न स्मृतिग्रंथातून करण्यात आला.
यात मनुस्मृति, याज्ञवल्क्यस्मृति, विष्णू स्मृति, नारद स्मृति हे स्मृतिग्रंथ महत्त्वाचे आहेत.
X X
1. मनू स्मृति किंवा मानवधर्म शास्त्र :
सर्व स्मृति ग्रंथात मनू स्मृति हा सर्वात प्राचीन व महत्त्वाचा ग्रंथ होय. या ग्रंथाचा काळ इ.स.पू. दुसरे शतक असावा.
या ग्रंथात नवीन काही सांगण्याचा अट्टाहास नाही, तर निरनिराळ्या धार्मिक ग्रंथात सांगितलेले नितीनियम संकलित करून ते कायद्याच्या स्वरूपात मांडण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे. हा ग्रंथ भृगू ऋषींनी लिहिला. तो मनू वंशाचा असावा म्हणून या ग्रंथाला मनुस्मृति म्हणतात.
या ग्रंथात 12 अध्याय व 2694 श्लोक आहेत. यात दिवाणी व फौजदारी कायदा, क्रय-विक्रय, दान, करार, जमिनीसंबंधीचे कायदे, चोरी, मारामारी, घरफोडी, व्यभिचार याचबरोबर वर्णाश्रम व्यवस्था, स्त्री स्वातंत्र्य, राजा व प्रजा यातील संबंध, विधवांची कर्तव्ये यासंबधी सविस्तर चर्चा करण्यात आली आहे.
नवव्या शतकात मेधातिथीने आणि 11 शतकात गोविंद राजाने मनुस्मृतिवर टीका लिहिली.
X X
2. याज्ञवल्क्य स्मृति :
याज्ञवल्क्य ऋषींनी लिहिलेल्या या ग्रंथात निव्वळ कायद्याचाच विचार करण्यात आला आहे.
स्त्रीधन, विधवेचा वारसा हक्क, विवाहासंबंधी नियम इ. ची चर्चा यात आहे. याज्ञवल्क्याने साक्षीपुरावा म्हणून लिखित कागदपत्रांचे महत्त्व विषद केले आहे.
हा ग्रंथ इ.स. तिसऱ्या शतकात रचल्या गेला.
3. नारद स्मृति :
यात विधवेच्या पुनर्विवाहाचा विचार मांडला आहे. परंतु पतीच्या संपत्तीवरील तिचा हक्क अमान्य करण्यात आला आहे. यात काही व्यावसायिक संघ व त्यांच्या नियमांची चर्चा आहे.
X X
4. विष्णू स्मृति :
यात सामाजिक समस्यांचा विचार करण्यात आला असून, सती प्रथेचीही त्यात चर्चा करण्यात आली आहे.
आज स्मृतिग्रंथ कालबाह्य झाले असले तरी, त्यांचे ऐतिहासिक महत्त्व त्रिकालाबाधित आहे.
महाकाव्ये:
रामायण आणि महाभारत ही दोन महाकाव्ये आहेत.
या महाकाव्यात इतिहास, कल्पना आणि रुपक कथा इतक्या एकमेकांत मिसळल्या आहेत की त्यातून नेमका इतिहास शोधून काढणे कठीण आहे.
१. रामायण :
रामायणाचा निर्माता वाल्मिकी ऋषी मानल्या जातो.
इ.स.पू. 600 ते इ.स.पू.500 हा रामायण ग्रंथाचा रचनाकाळ मानल्या जातो. या ग्रंथात आर्यांचा दक्षिण भारतात प्रवेश, त्यांचा अनार्यांशी झालेला संघर्ष व दक्षिण भारतात आर्य संस्कृतीचा प्रसार यावर भर टाकण्यात आला आहे.
रामायणातील राम हा श्रेष्ठ आदर्श आहे. आदर्श पुत्र, पती, बंधू, पिता, राजा, शत्रू यांचे राम हे प्रातिनिधीक रूप आहे.
रामाचे राज्य हे आदर्श राज्य रामराज्य समजले जाते.
सीता ही आदर्श भारतीय स्त्रीचे मनोहारी रूप होय. ती त्याग आणि पावित्र्याची प्रतिमा आहे. सतीत्व म्हणजेच सीता हे समिकरण आजही सर्वसामान्य भारतीय माणसाच्या मनात घर करून आहे.
लक्ष्मण व भरत म्हणजे आदर्श बंधू तर हनुमान आदर्श भक्त व सेवक आहे. या सर्व आदर्शाना पराक्रमाचे कोंदण आहे.
हे आदर्श दुबळेपणातून निर्माण झाले नाहीत तर त्यामागे निश्चित असे जीवन विषयक तत्वज्ञान आहे.
२. महाभारत :
सर्वसामान्यपणे व्यास महाभारताचे रचनाकार मानले जातात.
महाभारताची मूळ आवृत्ती म्हणजे "जय". त्यातील श्लोकांची संख्या 8800 मानली जाते. “भारत” ही त्याची दुसरी आवृत्ती. त्यात 24000 श्लोक होते.
आज उपलब्ध असलेल्या महाभारतात एक लाख श्लोक असून, जगातील सर्व प्राचीन महाकाव्यात हा विस्ताराने सर्वात मोठा असलेला ग्रंथ होय.
महाभारताचे वर्णन करतांना असे म्हटले जाते की, मानवी जीवनातील सुख-दुःखाचा असा एकही प्रसंग, महत्त्वाचा विचार व भावना नसेल की ज्याची छटा महाभारतात दिसून येत नाही.
महाभारतात जे नाही ते अन्यत्र कुठेही नाही. महाभारतात जे आहे ते इतरत्रही आहे असे महाभारताविषयी बोलले जाते.
महाभारताच्या सर्वसमावेशकतेमुळेच तो सामान्य जनतेचा पाचवा वेद समजल्या जातो.
इ.स.पू. 400 ते इ.स.400 हा महाभारताचा रचनाकाळ मानला जातो.
महाभारतातील युधिष्ठिर हा धर्म, सत्य, सदाचरणाचे तर कर्ण पराक्रम व उदारतेचे, भीम अर्जुन शौर्य व विरश्रीचे, भीष्म संयम, पराक्रम व त्यागाचे, विदूर धर्मवेत्त्याचे, तर द्रौपदी, गांधारी या आदर्श भारतीय स्त्रीचे प्रतिक आहेत.
द्रौपदी तर आदर्श पत्नी, भगिनी, सखी व रणरागिणी आहे.
या सर्वांवर कडी करणारे व्यक्तिमत्व श्रीकृष्णाचे आहे. तो अर्जुनाचा सखा, पांडवांचा हितचिंतक, राजकारण धुरंधर, जीवनाची गीता सांगणारा महामानव व प्रत्यक्ष परमेश्वर आहे.
या दोन्ही महाकाव्यातील पात्रांनी भारतीय जीवनाला एक आकार दिला आहे. या सर्वांच्या आदर्शाचे पालन करण्यात भारतीय स्वतःच्या जीवनाची इतिकर्तव्यता मानतात.
थोडक्यात हे दोन्ही ग्रंथ म्हणजे जीवनातील सर्व आदर्शांचे, श्रेष्ठ जीवनमूल्यांचे प्रचंड भांडार आहे. ते भारतीय संस्कृतीचा प्रेरणास्रोत आहेत.
X X
पुराणे:
पुराणांची रचना महाकाव्यानंतर झाली.
त्यांची सुरुवात दंतकथांनी होत असली, तरी त्यांचे सांस्कृतिक मूल्य अनन्यसाधारण आहे.
पुराणात सृष्टीचा उदय विकास, देव-दानव संघर्ष, निरनिराळया राजांच्या वंशावळ्या, त्यांचे पराक्रम, राज्याभिषेक, समाजाचे नितीनियम इत्यादींची चर्चा आहे.
पुराणे 18 असून, तितकीच उपपुराणे आहेत.
1. विष्णू, 2. नारद, 3. गरुड, 4. वराह, 5. पद्म, 6. भागवत, 7. ब्रह्म, 8. बह्मांड, 9. भविष्य, 10. ब्रह्मवैवर्त, 11. मार्कंडेय, 12. मत्स्य, 13. वामन, 14. वायु, 15. स्कंद, 16. कूर्म, 17. लिंग, 18. अग्नि.
विष्णू, मत्स्य आणि ब्रम्हांड ही पुराणे ऐतिहासिक महत्त्वाची आहेत.
Comment and share



3 Comments
Nice sirji
ReplyDeleteVery nice
ReplyDeleteVery useful information sir
ReplyDelete