Tools of Ancient Indian History: Writting tools-2
प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने: लिखित साधने -2
( वैदिक साहित्य,पुराणे,बौद्ध साहित्य,जैन साहित्य,निधर्मी साहित्य,परकीयांचे इतिवृत्त )
प्राचीन भारताचा इतिहास जाणून घेण्यासाठी पुरातत्त्वीय साधने, नाणी, आलेख, लिखित साधने, परकीयांचे इतिवृत्त इ. साधनांचा उपयोग होतो.
लिखित साधने:
इ.स.पू. 2500 च्या आसपास भारतीयांना लेखन कला अवगत असली तरी आपली सर्वात प्राचीन हस्तलिखिते इ.स. चौथ्या शतकापेक्षा जुनी नाहीत. ती प्रामुख्याने मध्य आशियात आढळून आली आहेत.
भारतात आढळून आलेली हस्तलिखिते ही भूर्जपत्रे व ताड वृक्षाच्या पानांवर लिहिलेली आहेत.
काही हस्तालिखिते मेंढ्यांच्या कातड्यांवर तसेच लाकडाच्या पृष्ठभागावर लिहिली आहेत.
वास्तविक हे आलेखच आहेत परंतु त्यांना हस्तलिखिते म्हणतात. जेव्हा छापण्याच्या कलेचा शोध लागला नव्हता तेव्हा हस्तलिखितांना अनन्यसाधारण महत्त्व होते.
प्राचीन संस्कृत हस्तलिखिते भारतभर आढळून आली असली तरी दक्षिण भारत, काश्मीर, नेपाळ मध्ये ती विपुल प्रमाणात आढळून आली आहेत.
आज आलेख वस्तुसंग्रहालयात तर हस्तलिखिते ही वाचनालयात जतन करून ठेवण्यात आली आहेत.
X X
वैदिक साहित्य:
बहुतेक प्राचीन भारतीय ग्रंथांचा विषय धार्मिक आहे. भारतीयांच्या प्राचीन धार्मिक साहित्यात वेद, रामायण, महाभारत, पुराणे इ. ग्रंथांचा प्रामुख्याने समावेश होतो.
या ग्रंथांतून तत्कालीन भारताच्या सामाजिक व सांस्कृतिक जीवनावर पर्याप्त प्रकाश टाकण्यात आला असला तरी त्यातील घटनांचा काळ आणि स्थळ ठरविण्यात अनेक अडचणी येतात.
इ.स.पू. 1500 ते इ.स.पू. 1000 हा ऋग्वेद रचनेचा काळ मानला जातो. परंतु अथर्ववेद, यजुर्वेद, ब्राह्मणे, उपनिषदे यांची रचना इ.स.पू. 1000 ते इ.स.पू. 500 या कालखंडात झाली असावी, असा विद्वानांचा कयास आहे.
ऋग्वेदात प्रामुख्याने ऋचा (प्रार्थना) आहेत तर इतर वैदिक साहित्यात प्रार्थनेबरोबर, धार्मिक विधी, जादूटोणा आणि पौराणिक कथांचा अंतर्भाव आहे.
उपनिषदांमध्ये तात्त्विक विषयांवर चर्चा करण्यात आली आहे. वैदिक साहित्याचे आकलन होण्यासाठी वेदांगाचा अभ्यास करणे आवश्यक आहे.
X X
वेदांग म्हणजे वेदांची पूरक शास्त्रे होत.
1. शिक्षा: यात वेदातील ऋचांच्या उच्चारांजे नियम सांगितले आहेत.
2. कल्प: यात यज्ञाचे विधी व नियम आहेत.
3. व्याकरण: यात भाषेचे नियम आहेत.
4. निरुक्त: हे शब्दव्युत्पत्ती शास्त्र होय.
5. छंदस किंवा छंद: हे वृत्तविषयक शास्त्र आहे आणि
6. ज्योतिष : हा फल ज्योतिष ग्रंथ आहे.
यापैकी शिक्षा व कल्प ही सर्वात महत्त्वाची वेदांग मानली जातात. या सर्व विषयांच्या संदर्भात सूत्रबद्धपद्धतीने बरेच लिखाण झाले. हे सारे लिखाण गदयात्मक होते.
इ.स.पू.400 च्या सुमारास लिहिले गेलेले पाणीनीचे व्याकरण याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. यात व्याकरणाच्या नियमाबरोबर तत्कालीन समाज, आर्थिक जीवन व संस्कृतीवर भरपूर प्रकाश टाकण्यात आला आहे.
X X
रामायण व महाभारत ही महाकाव्ये आणि महत्त्वाची पुराणे ही अंतिमत: इ.स. 400 च्या सुमारास संकलित केली गेली.
दोन महाकाव्यांपैकी महर्षी व्यास रचित 'महाभारत' या महाकाव्याची रचना अगोदर झाली. यात इ.स.पू.10 वे शतक ते इ.स. 4 थे शतक या काळातील घटनांचा आढावा घेण्यात आला आहे. या महाकाव्याच्या सर्वात प्राचीन आवृत्तीत 8800 श्लोक असून त्याचे नाव 'जय' होते. त्यात भर पडून ते 24,000 श्लोकांचे झाले. त्याला 'भारत' असे म्हणण्यात येऊ लागले. या महाकाव्याची अंतिम आवृत्ती म्हणजे 'महाभारत'. त्यात 100,000 श्लोक आहेत. याला 'शतसहस्री संहिता' असेही म्हणतात. कौरव-पांडव संघर्ष हा या महाकाव्याचा मुख्यकथा भाग असून त्यातील वर्णनात्मक भाग उत्तर वैदिक काळाशी तर नीतिवचनाचा भाग मौर्योत्तर व गुप्तकाळाशी संबंधित आहे.
महर्षी वाल्मिकी रचित रामायणात मूळ 6000 श्लोक असून त्यात भर पडून ते 12,000 व अंतिमत: 24,000 श्लोकांचे झाले. रामायण हे महाकाव्य महाभारतापेक्षा जास्त एकीकृत आहे. रामायणाच्या रचनेला इ.स.पू. 5 व्या शतकात सुरवात झाली. त्यानंतर त्याचा पाच टप्प्यात विकास होत गेला. शेवटचा व पाचवा टप्पा इ.स. 12 व्या शतकात पूर्ण झाला. संपूर्ण रामायणाचा एकत्रित विचार केला तर त्याची रचना महाभारताच्या पश्चात झाल्याचे दिसून येते.
वेदोत्तर काळात निरनिराळ्या धार्मिक विधी संदर्भात भरपूर साहित्य रचल्या गेले.
श्रौतसूत्रात राजांनी करावयाच्या मोठ्या प्रमाणावरील यज्ञांचा तसेच पहिल्या तीन वर्णाच्या लोकांनी करावयाच्या यज्ञांचा विधी सांगितला आहे.
X X
जन्म, नामकरण, व्रतबंध किंवा मौंज, विवाह अंत्यक्रिया इ. समयी करावयाच्या विधीसंबंधी माहिती गृह्यसुत्रात सांगितली आहे.
श्रौतसूत्र आणि गृह्यसूत्र यांचा रचनाकाळ इ.स. पू. 6 वे ते इ.स.पू. 3 रे शतक असा मानला जातो.
शुल्व सूत्रात यज्ञकुंड, त्याची जागा, मोजमाप, बांधकाम यांचे सूक्ष्म विवेचन करण्यात आले आहे.
शुल्व सूत्रही भूमिती व अंकगणिताची सुरवात मानली जाते.
X X
पुराणे:
प्राचीन भारताचा अभ्यास करण्यासाठी पुराणे ही उत्तम साधने आहेत.
त्यात प्राचीन भारतातील राजघराण्यांच्या वंशावळ्या तसेच परंपरा यांचे उल्लेख आढळतात.
पुराणे 18 असून विष्णू, वायु, ब्रह्म, भागवत, मत्स्य ही प्रमुख पुराणे आहेत. याशिवाय 18 उपपुराणे आहेत.
X X
बौद्ध साहित्य:
बौद्ध साहित्याच्या 'जातक' 'पिटक' आणि 'निकाय' या तीन शाखा आहेत. त्यापैकी सर्वात महत्त्वाची शाखा म्हणजे 'त्रिपिटक'.
त्रिपिटकाचे विनय पिटक, सुत्तपिटक आणि अभिधम्मपिटक हे तीन भाग असून ते पाली भाषेत लिहिण्यात आले. त्यात बौद्ध धर्माच्या तत्त्वांची चर्चा करण्यात आली आहे.
या शिवाय पाली भाषेतील ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचे बौद्ध साहित्य म्हणजे 'मिलिंदपन्हा', 'दीपवंश' आणि 'महावंश' हे ग्रंथ.
मिलिंदपन्हा मध्ये ग्रीक राजा मिनॅण्डर (मिलिंद) आणि बौद्ध भिक्षू नागसेन यातील संवाद आहे.
दीपवंश आणि महावंश या ग्रंथांची रचना सिलोनमध्ये झाली असली तरी त्यात इ.स. पू. सहाव्या ते इ.स.पू. चौथ्या शतकातील भारताच्या इतिहासाची चर्चा करण्यात आली आहे. या ग्रंथातून आपल्याला चंद्रगुप्त मौर्याचा इतिहास समजण्यास मदत होते.
'अंगुत्तर निकाय' या बौद्ध धर्माच्या महत्त्वाच्या ग्रंथात इ.स.पू. सहाव्या शतकातील भारताच्या राजकीय, सामाजिक आणि धार्मिक जीवनाची चर्चा करण्यात आली आहे.
याशिवाय अश्वघोषचे 'महाविचस्य', नागार्जुनचे "तसहस्रिका', 'प्रज्ञापरिमित ' आणि 'माध्यमिकासूत्र',
असंगचे 'महायान सूत्रालंकार' आणि वसूबंधूचे ‘अभिधम्म कोश' हे महत्त्वाचे बौद्ध ग्रंथ आहेत.
'बुद्धचरित्र' आणि 'सुंदरानंद'चा लेखक अश्वघोष हा सम्राट कनिष्काचा समकालीन होता.
बौद्ध साहित्यामुळे सम्राट अशोक, कनिष्क, पुष्यमित्रशुंग, चंदगुप्त मौर्य इ.राज्यकर्त्याच्या इतिहासावर प्रकाश पडतो.
जातक कथांमधून गौतम बुद्धाच्या जन्मापूर्वीची भारतातील सामाजिक स्थिती फजण्यास मदत होते.
आजतागायत 549 जातक कथा प्रकाशित झाल्या आहेत. त्यातून भारताच्या इ.स. पूर्व तिसऱ्या व दुसऱ्या शतकातील राजकिय, सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक परिस्थितीवर पर्याप्त प्रकाश पडतो.
X X
जैन साहित्य:
जैन साहित्यात हेमचंद्र सूरीचा 'परिशिष्ट पर्व ' हा ग्रंथ मौलिक आहे.
भद्रबाहूच्या लिखाणातून चंद्रगुप्त मौर्याचा इतिहास समजण्यास मदत होते. या शिवाय 'कथा कोश' 'कलीकापुराण' 'लोक विभाग' हे महत्त्वाचे ऐतिहासिक ग्रंथ आहेत.
जैन धर्माचे अंग आणि उपांग हे महत्त्वाचे धार्मिक ग्रंथ असले तरी त्यातही काही महत्त्वाचे ऐतिहासिक संदर्भ आहेत.
जैन वाङ्मय हे प्राकृत भाषेत असून ते अंतिमतः सहाव्या शतकात गुजराथमधील वल्लभी येथे संकलीत केले गेले. त्यावरून महावीरकालीन बिहार व पूर्व उत्तर भारताच्या राजकीय परिस्थितीवर प्रकाश पडतो.
X X
निधर्मी साहित्य:
या कालखण्डात निधर्मी साहित्याची मोठ्या प्रमाणात रचना झाली. हे साहित्य कायदयासंबंधी असून त्याला धर्मसूत्र व स्मृतिग्रंथ म्हणतात.
धर्मसूत्र, स्मृतिग्रंथ व त्यावरील टीकाग्रंथ या सर्वांना मिळून धर्मशास्त्र म्हणतात.
धर्मसूत्र इ.स.पू. 500 ते इ.स.पू. 200 या कालखण्डात संकलीत केले गेले तर महत्त्वाच्या स्मृतिग्रंथांचे संहितीकरण इ.स.च्या पहिल्या सहा शतकात झाले. यात राजा, त्याचे अधिकारी व निरनिराळ्या वर्णाच्या कर्तव्यांची चर्चा आहे.
संपती, तिचा वारसा, विक्री या विषयीच्या नियमांची यात चर्चा असून चोरी, घातक हल्ला, खून, व्यभिचार इ. अपराधांसाठी करण्यात आलेल्या शिक्षेच्या तरतुदीची यात सविस्तर माहिती आहे.
प्राचीन भारतात धर्मसूत्रावर लिहिण्यात आलेला अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे कौटिल्याचे अर्थशास्त्र या ग्रंथाचे 15 विभाग असून दुसरा व तिसरा विभाग सर्वात आधी रचला गेला असावा. हे दोन्ही भाग वेगवेगळ्या लेखकाची रचना असावी.
या ग्रंथाचे अंतिम संकलन इ.स.च्या सुरूवातीला झाले असले तरी या ग्रंथाचा जो भाग सर्वात आधी रचला गेला, त्यात मौर्यकाळातील सामाजिक व आर्थिक परिस्थितीची माहिती देण्यात आली आहे.
प्राचीन भारतातील शासनपद्धती आणि अर्थव्यवस्था जाणून घेण्यासाठी हा ग्रंथ अत्यंत उपयोगी आहे.
भास, शूद्रक, कालिदास, बाणभट यांच्या अजरामर कलाकृतींतून ते ज्या काळात वावरत होते, त्या काळातील परिस्थितीवर उत्तम प्रकाश टाकण्यात आला आहे.
कालिदास हा महान कवी व नाटककार होता. 'अभिज्ञानशाकुंतलम' हे त्याचे नाटक संस्कृत साहित्याचा मेरुमणी असून कालिदासाच्या असाधारण प्रतिभेचे ते नितांत सुंदर उदाहरण आहे.
यात उत्तर व मध्य भारताच्या गुप्तकालीन सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनावर प्रकाश टाकण्यात आला आहे.
बाण चे 'हर्षचरित्र', बिल्हणचे 'विक्रमदेवचरित्र', चांदबरदाईचे 'पृथ्वीराजरासो' इ. चरित्रात्मक ग्रंथ व कल्हणच्या राजतरंगिणी या काश्मीरसंबंधीच्या ग्रंथावरून तत्कालीन इतिहास समजण्यास मदत होते.
पाणीनीचा 'अष्टाध्यायी' हा मौर्याच्या इतिहासाची तर पतंजलीचा 'महाभाष्य' भारतातील ग्रीक आक्रमणांची माहिती देतो.
विशाखादत्तच्या 'मुद्राराक्षस' नाटकात चंद्रगुप्त मौर्यानि नंदांचा कसा नायनाट केला तर कालिदासाच्या 'मालविकाग्निमित्र' नाटकात पुष्यमित्र आणि ग्रीक यांच्यातील युद्धांचे वर्णन आहे.
कालिदासाच्या 'रघुवंशी' नाटकातील रघु हा एक तर समुद्रगुप्त किंवा चंद्रगुप्त द्वितीय असावा.
X X
परकीयांचे इतिवृत्त:
प्राचीन भारतात ग्रीक, रोमन, चिनी लोक एक तर प्रवासी म्हणून नाही तर धर्मप्रसारक म्हणून आले. त्यांनी भारत भेटीत जे पाहिले त्याचा सविस्तर वृत्तांत लिहून ठेवला आहे.
त्यामुळे अलेक्झांडरच्या भारतावरील स्वारीविषयी व त्याच्या भारतातील विजयांसाठी सर्वस्वी ग्रीक साधनांवर अवलंबून राहावे लागते.
ग्रीक प्रवासी अलेक्झांडरचा समकालीन सॅण्ड्रोकोटसचा उल्लेख करतात. हा सॅण्ड्रोकोटस म्हणजे चंद्रगुप्त मौर्य होय.
इ.स.पू. 322 ही त्याची राज्यारोहण तिथी होय. ग्रीक प्रवाशांच्या या उल्लेखामुळे प्राचीन भारतीय इतिहासाचा कालानुक्रम ठरविण्यास मदत होते.
मेगॅस्थनिस हा सेल्युकस निकेटरचा चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारातील राजदूत होता. त्याने 'इंडिका' नावाचा ग्रंथ लिहिला. इंडिका आज मूळ स्वरूपात उपलब्ध नाही. परंतु ग्रीक लेखकांच्या ग्रंथांत त्याचा अधूनमधून उल्लेख येतो.
निरनिराळ्या ग्रीक लेखकांच्या लिखाणातील हे उल्लेख एकत्र केले तर मौर्यकालीन प्रशासन, सामाजिक व आर्थिक परिस्थिती यावर भरपूर प्रकाश पडतो.
इ.स. च्या पहिल्या आणि दुसऱ्या शतकातील ग्रीक आणि रोमन ग्रंथात भारतातील बंदरे आणि भारत व रोम यांच्यात चालणाऱ्या निरनिराळ्या वस्तूंच्या व्यापाराचा उल्लेख येतो.
'पेरीप्लस ऑफ दि एरिथ्रिन सी' आणि टॉलेमीच्या 'जिऑग्राफी ' या ग्रीक भाषेतील ग्रंथात जी माहिती मिळते त्यावरून प्राचीन भारताच्या भूगोल व व्यापाराच्या अभ्यासास मोलाची मदत होते.
पहिला ग्रंथ हा इ.स.80 ते 115 व दुसरा ग्रंथ इ.स. 150 च्या सुमारास लिहिला गेला.
इ.स. च्या पहिल्या शतकात लिहिण्यात आलेल्या प्लिनीच्या लॅटिन भाषेतील 'नॅशरलीस हिस्टोरिया' या ग्रंथातून भारत व इटली दरम्यान चालणाऱ्या व्यापाराची माहिती मिळते.
भारतात जे चिनी प्रवासी आले. त्यात फाह्यान आणि ह्यूएनत्संग यांचा आवर्जून उल्लेख करावा लागतो.
हे दोघेही प्रवासी बौद्ध धर्मीय असून ते भारतात बौद्ध धर्माच्या पवित्र स्थानांना भेटी देण्यासाठी तसेच बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी भारतात आले होते.
त्यापैकी फाह्यान हा इ.स. च्या पाचव्या शतकाच्या सुरवातीला तर ह्यूएनत्संग हा सातव्या शतकाच्या पहिल्या अर्धशतकाच्या दुसऱ्या चरणात आला होता.
फाह्यानच्या इतिवृत्तातून गुप्तकाळतील सामाजिक, धार्मिक व आर्थिक जीवनाची माहिती मिळते तर ह्यूएनत्संगच्या प्रवासवर्णनातून हर्षवर्धनच्या काळातील सामाजिक, धार्मिक व आर्थिक जीवनावर प्रकाश पडतो.
अशा रीतीने इतिहासाच्या निरनिराळ्या साधनांमुळे प्राचीन भारताचा इतिहास समजण्यास बरीच मदत इतिहास संशोधक व अभ्यासकांना झाली.
X X
Comment and share

3 Comments
Nice
ReplyDeleteNice
ReplyDeleteUseful Information
ReplyDelete