Savitribai Jyotirao Phule: Indian Social Reformer, Educationalist and poet

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले : भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी, ज्ञानज्योती

जयंती: 3 जानेवरी
स्मृतिदिन :10 मार्च




बालपण आणि शिक्षण:

भारतातील पहिल्या शिक्षिका, मुख्याध्यापिका, स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी, ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती "महिला मुक्ती दिन" व "बालिका दिन "म्हणून सुद्धा साजरा केल्या जातो.

सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी नायगाव तालुका खंडाळा जिल्हा सातारा या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील हे होते. 

1840 मध्ये सावित्रीबाईंचे लग्न महात्मा ज्योतिराव फुले यांच्याशी झाले. 

फुले हे मूळचे सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कडगून गावचे गोरे फुलमाळी होते. 

लग्नानंतर सावित्रीबाईंनी मिसेस मीचेल यांनी चालवलेल्या नॉर्मल स्कूलमध्ये शिक्षण घेतले. तीन ते चार वर्षाचा कोर्स सावित्रीबाईने पूर्ण केला व अध्यापनाचे प्रशिक्षण घेतले .

X X

शैक्षणिक कार्य:

नेटिव्ह फिमेल स्कूल्स पुणे, The society for promoting the Education of Mahars,Mangas and extras या संस्थेच्या वतीने त्यांनी आपले शैक्षणिक कार्य हाती घेतले. या संस्थेची आर्थिक परिस्थिती वाईट होती. 

तरीही इ. सन 1848 मध्ये महात्मा फुले यांनी पुण्यात बुधवार पेठेतील तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. या शाळेसाठी तात्यासाहेब भिडे यांनी मोफत जागा दरमहा 5 रुपये व प्रारंभिक खर्चासाठी 101 रुपये देणगी दिली होती. 

याच शाळेत सावित्रीबाई शिक्षिका होत्या. या शाळेसाठी पालकांच्या भेटी घेऊन मुली मिळविण्याचे काम फुले पती-पत्नीने केले. 

समाजातील अनिष्ठ रूढी, परंपरा, अंधश्रद्धा दूर करावयाच्या असतील तर प्रथम स्त्रियांना शिक्षण दिले पाहिजे हा विचार त्या दोघांनी स्त्रिया समोर ठेवला.

इ.स. 1848 ते 1852 पर्यंत फुले पती-पत्नीने पुणे शहर व सातारा परिसरात एकूण 18 शाळा काढल्या. सावित्रीबाईंचे अध्यापनाचे कार्य सर्वच दृष्ट्या उठावदार व गुणवत्तापूर्ण होते.

 अत्यंत चिकाटीने जिद्दीने फुले पती-पत्नीने शैक्षणिक कार्य केले.त्यांच्या या कार्यास पुण्यातील सनातनी वृत्तीच्या लोकांनी विरोध केला होता. त्यांच्या अंगावर चिखलफेक केली. पण सावित्रीबाईने अत्यंत धैर्याने, जिद्दीने, कळकळीने व कौशल्याने शिक्षिका म्हणून काम चालू ठेवले.

 त्यांच्या कार्याची योग्यता व साहस पाहून ब्रिटिश सरकारने विश्राम बाग वाड्यासमोर 3000 लोकांच्या उपस्थितीत फुले पती-पत्नींचा 16 नोव्हेंबर 1852 रोजी त्यांचा सत्कार व शैक्षणिक कार्याचा गौरव केला.

X X

अस्पृश्यतेविरुद्ध कार्य:

सावित्रीबाईंचे कार्य हे फक्त स्त्री शिक्षणा पुरते मर्यादित नाही. त्याचबरोबर त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध ही कार्य केले.

 इ.स. 1851 मध्ये त्यांनी महार वस्तीत स्वतंत्र शाळा काढली. अस्पृश्यांना पाणी उपलब्ध व्हावे म्हणून आपल्या घरातील पाण्याचा हौद त्यांनी अस्पृश्यांसाठी खुला केला. 

 त्यांनी महिला सेवा मंडळ काढले व त्या मंडळाच्या त्या सचिव होत्या. महीला मंडळाच्यावतीने इ. स. 1852 मध्ये पुण्याच्या कलेक्टरच्या पत्नी ई.सी.जोन्स यांच्या अध्यक्षतेखाली तीळगुळाचा कार्यक्रम आयोजित केला. हा समारंभ सर्व जाती धर्म च्या महिलांसाठी ठेवला होता. जातीभेद व पक्षपात न करता सर्वांना सारखेच हळदीकुंकू लावण्यात येईल व तिळगुळ वाटण्यात येईल अशी पत्रिका काढली होती.

 या कार्यक्रमाला सर्व जाती धर्मातील स्त्रियांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. या कार्यक्रमातून सावित्रीबाईंनी जातीअंताच्या लढाईचा संदेश समाजाला दिला.

X X

स्त्रीमुक्तीचे कार्य:

महाराष्ट्रातील स्त्री मुक्ती आंदोलनाची पहिली अग्रणी म्हणून त्यांचा गौरव, स्त्री शिक्षणाशिवाय स्त्रियांच्या उद्धाराचे मोठे कार्य सावित्रीबाईंनी केले. 

पुनर्विवाहास बंदी असल्यामुळे तरुण विधवा कोणाच्यातरी वासनेला बळी पडत व गरोदर राहत व त्यांच्याकडून नवजात बालकांची हत्या होई.

 अशी टाकून दिलेली मृत नवजात बालके ज्योतिराव व सावित्रीबाईंनी पाहिली होती. म्हणून त्या दोघांनी आपल्या घरातच बालहत्या प्रतिबंधकगृह काढले व बालिकाश्रम चालविला.

  याच बालहत्या प्रतिबंधकगृहात काशीबाई नावाची एक ब्राम्हण विधवा आली तिच्या पोटी मुलगा जन्माला आला हाच यशवंत होय. तो फुले पती-पत्नीने दत्तक घेतला.

  जोतीरावांच्या अग्निसंस्काराच्या वेळी त्यांचा दत्तक मुलगा यशवंत याला अग्नी देण्याबाबत जोतीरावांच्या नातेवाईकांनी अडवणूक केली. तेव्हा सावीत्रीबाईने स्वतः पतीच्या चितेला अग्नी दिला. पत्नीने पतीच्या चितेला अग्नी दिल्याचे हे भारतीय इतिहासातील पहिले उदाहरण आहे.

X X

सत्यशोधक समाजातील कार्य:

24 सप्टेंबर 1873 रोजी महात्मा फुले यांनी पुण्यात सत्यशोधक समाज ची स्थापना केली. त्यांच्या मृत्यूनंतर सत्यशोधक समाज संपला अशी हाकाटी सनातनी लोकांनी पिटली होती.

पण सावित्रीबाईंनी त्यांच्या मृत्यूनंतर मोठ्या हिमतीने व निष्ठेने सत्यशोधक समाजाचे कार्य चालू ठेवले व आपल्या दत्तक पुत्राचा विवाह सत्यशोधक पद्धतीने केला.

 1876 मध्ये महाराष्ट्रात दुष्काळ पडला. या दुष्काळाची तीव्रता व भयानकता सावित्रीबाईंनी जे पत्र ज्योतिरावांना पाठविले होते त्यात दिसून येते.

  या दुष्काळात आनाथ, अपंग,निराधारांची मदत करण्यासाठी त्यांनी कॅम्प तीन वर्षे चालवला. काही स्त्रियांची मदत घेऊन अन्न शिजवून ते दुष्काळग्रस्तांना पोहोचविले.

X X

निधन:

  10 मार्च 1897 रोजी प्लेगचा आजार होऊन त्यातच त्यांचे निधन झाले.

X X

सावित्रीबाईंचे लेखन:

सावित्रीबाईंनी शैक्षणिक, सामाजिक कार्य करीत असताना मौलिक स्वरूपाची साहित्य निर्मिती केली. त्यात 

1. "काव्य फुले" हा कविता संग्रह इ. स. 1854 मध्ये प्रसिद्ध झाला. काव्यफुले या काव्यसंग्रहात एकूण 41 कविता आहेत. त्यात निसर्ग विषयक ,सामाजिक बोधपर, प्रार्थनापर ,आत्मपर कविता आहेत.

2. " ज्योतिबांची भाषणे" यांचा संपादित संग्रह सावित्रीबाई फुले यांनी 1856 मध्ये प्रकाशित केला. यात जोतीरावांची चार भाषणे आहेत.

3. त्यानंतर "सावित्रीबाईची ज्योतिरावस पत्रे" हे साहित्य प्रसिद्ध झाले. ही एकूण तीन असून ती नायगाव व ओतूरहून लिहिलेली आहेत.

4. त्यानंतर "मातुश्री सावित्रीबाईची भाषणे" ही बाबाजी महाघट पानसरे पाटील यांनी संपादित करून हा ग्रंथ 1892 मध्ये बडोदा येथून प्रसिद्ध करण्यात आला.

5. त्यानंतर सावित्रीबाईंनी "बावन्नकशी सुबोध रत्नाकर" या साहित्याची निर्मिती केली. यात देशाचा इतिहास काव्य रुपाने सांगितला असून ज्योतिराव यांच्या कार्याचे चित्रण त्यात केलेले आहे यात 52 रचना आहेत. हा काव्य जोतीरावांच्या मृत्यूनंतर इ.स. 1892 मध्ये प्रकाशित करण्यात आला. हे सर्व एकूण वड़मय 194 पृष्ठांच्या "सावित्रीबाई फुले समग्र वड़मय" या ग्रंथात प्रकाशित एकत्रित करण्यात आले आहे.

सावित्रीबाईनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी ताराबाई यांच्यावर काव्यरचना केली आहे. शूद्र, अतिशूद्र यांच्या अवस्थेचे काव्याच्या माध्यमातून त्यांनी चित्रण केले आहे. शुद्रांच्या प्रश्नावर शिक्षण हाच उपाय आहे. "शिक्षणाने माणसातील पशुत्व नष्ट होते." असा विचार त्या मांडतात. 

3 जानेवारी हा दिवस महाराष्ट्र सरकार "बालिका दिन" म्हणून साजरा करते. सावित्रीबाई फुले यांचे नाव पुणे विद्यापीठाला इ. स. 2014 मध्ये देण्यात आले व त्याचे स्वागत सर्व समाज घटकाकडून करण्यात आले.

X X

धनंजय कीर यांच्या मते,

" एकोणिसाव्या शतकात स्त्रियांच्या उद्धारासाठी व्यतीत केलेले सावित्रीबाई सारखे अन्या आदर्श नी उदात्त उदाहरण क्वचितच आढळून येईल."


महात्मा फुले यांचे आद्य चरित्रकार पंढरीनाथ सिताराम पाटील म्हणतात,

" सावित्रीबाईंच्या भारतीय स्त्रीच्या उत्थानासाठी केलेल्या सूहृदयी कार्याची तुलना करता येणारे एकही उदाहरण एकोणिसाव्या शतकात सापडत नाही."


सावित्रीबाईचा विद्यार्थी लक्ष्मण कराडी यांच्या मते,

"सावित्रीबाई सारखी दयाळू व प्रेमळ अंतकरणाची स्त्री मी अजून सुद्धा पाहिली नाही. ती आपल्या आई पेक्षा जास्त आपल्यावर प्रेम करत आहे .असे त्यावेळी सर्व मुलांना वाटत होते."


डॉ. बाबा आढाव यांच्या मते,

"सावित्रीबाईंचे संपूर्ण जीवन क्रांतिकारक आहे."


प्रा. ग.बा. सरदार यांच्या मते,

" चूल आणि मूल यात गुंतून न पडता घराचा उंबरठा ओलांडनारी व सामाजिक कार्यात भाग घेणारी पहिली स्त्री म्हणजे सावित्रीबाई फुले होत."

                              सावित्रीबाई फुले 
                         🙏

विनम्र अभिवादन.........











X X

Comment and share.......