Buddhism: Sect ( Panth) and Literature in
बौद्ध धर्मातील पंथ आणि वाङमय
गौतम बुद्धा नंतर त्याच्या अनुयायांत मतभेद निर्माण होऊन बौद्ध धर्मात अनेक गट पडले .कारण मूळ महापुरुषांच्या ततज्ञानाचा स्वमताप्रमाणे अर्थ लावण्याच्या अनुयायांच्या प्रवृत्तीमुळे असे पक्षोपपक्ष धार्मिक किंवा राजकीय क्षेत्रात पडताना आपण नेहमी पाहत असतो.
त्यांचे पक्षोपपक्ष ( डावे -उजवे )व लहान लहान गट पडतात .असेच अनेक पंथ व पंथोपपंथ बौद्ध धर्मात पडले. त्यापैकी महायान व हीनयान हे दोन पंथ प्रमुख आहेत.
बुद्धाने आपल्या अनुयायांचे भिक्खू ( संन्यासी) व उपासक (संसारी) असे दोन प्रमुख गट पाडून त्यांच्यासाठी वर्तणुकीचे वेगवेगळे नियम केले होते. भिक्खू व भिक्खूनीसाठी संघशिस्त अत्यावश्यक असे .उपासकावर संघशिस्तीचे बंधन नव्हते .संसार करून निर्वाण प्राप्त करण्यासाठी शक्य होतील असे सुलभ नियम उपासकांसाठी होते.
अशा तऱ्हेने बुद्धानंतर बौद्ध धर्मातील महान स्थित्यंतर घडविणार्या सुधारक पंथाला महायान पंथ असे म्हणतात. या पंथाचे स्पष्ट स्वरूप इ. स. चे पहिल्या शतकात कनिष्काचे कारकिर्दी पासून दिसू लागते.
नागार्जुन नामक विद्वान या पंथाचा पहिल्या प्रतीचा पुरस्कर्ता असून हा आसंग, आर्यदेव, वसूबंधू वगैरेनी महायान पंथाचा हिरीरीने प्रचार केला. बुद्धाच्या मूळ शिकवणीला चिकटून राहिलेल्या सनातनी पंथाला हीनयान पंथ म्हणतात.
X X
महायान व हिनयान पंथातील मुख्य भेद
1. मूर्तिपूजा व धर्म समारंभ:
महायान पंथाने बुद्धाला व बोधिसत्वाला देव मानून त्यांची पूजा करण्यास प्रारंभ केला . तसेच प्रार्थना धर्मविधी व समारंभ वगैरेचा अवलंब केला. या उलट हीनयान पंथाने देवावर विश्वास न ठेवता सदाचाराने निर्वाण प्राप्त करण्याचा मूळ मार्ग सोडला नाही.
2. निर्वाण :
सर्वांच्या मुक्तीचा सरसकट प्रयत्न करणे हे महायान पंथाचे ध्येय आहे. या उलट वैयक्तिक प्रयत्नाने निर्वाण प्राप्त होते असे हीनयान पंथाचे मत आहे.
3. नवतत्त्वे :
विश्वनिर्मिती, मोक्ष ,बुद्ध वगैरे संबंधी नवकल्पना . प्रथा व तत्वे स्थलकलपरत्वे महायान पंथात प्रविष्ट झाली. ह्या गोष्टी हीनयान पंथात आढळत नाहीत.
4. भाषा:
महायान पंथाने धर्म प्रचारार्थ धर्मवाङमयनिर्मितीसाठी संस्कृत व इतर स्थानिक भाषांचा अवलंब केला. हीनयान पंथाने आपल्या धर्मवाङमयासाठी पाली भाषेचा उपयोग केला.
5. प्रयत्न :
बौद्ध धर्माला महान स्वरूप देण्याचा प्रयत्न महायान पंथाने केला. तर बुद्धाच्या मूलभूत धर्मकल्पना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न हीनयान पंथाने केला.
X X
बौद्ध वाङमय
1. त्रिपिटक :
त्रिपिटक हे पवित्र धर्म धर्मग्रंथ असून त्यात बौद्ध धर्माची मूळ शिकवण दिलेली आहे .बुद्धाच्या मृत्यूनंतर त्याची धर्मतत्वे, वचने, वक्तव्य, उपदेश व उत्तरे यांचा संग्रह व अर्थ या तीन पीठकात समाविष्ट केला आहे. बौद्ध महासभेत या पिटकांची रचना करण्यात आली.
1. विनयपिटक 2. सुत्तपिटक व 3. अभिधम्मपिटक तीन पिटके आहेत.
1. विनयपिटक
यामध्ये भिक्खूंनी पाळावयाचे नियम व शिस्त यांची माहिती दिलेली आहे.
2. सुत्तपिटक
या घटकात बौद्ध धर्मातील नीतीतत्त्वांचा समावेश आहे. सुत्तपिटकात दिघ , मझिम, संयुत्त, अंगुत्तर व खुद्दक ह्या पाच निकायांचा समावेश होतो .ह्यात बुद्धाचे संदेश ,उपदेश ,उत्तरे, प्रवचने व वचने दिलेली आहेत.
निकायात बुद्धांची प्रवचने, मझिम नीकायात बुद्धसुक्ते , संयुत्त निकायात धर्मासंबंधी नावे व अंगुत्तर निकायात इतर विषय हाताळलेले आहेत .
खुद्दक निकायात महत्त्वाचे बौद्ध तत्वज्ञान आहे .खुद्दक नीकायातील धम्मपद हा काव्यग्रंथ फार महत्त्वाचा व बौद्धांचा आवडता असून त्यात बुद्धाच्या 423 वचनांचा संग्रह आहे .
तसेच थेरगाथा नमक भिक्खूच्या कवणांचा संग्रह आहे. थेरीगाथा नावाचा भिक्खूनीच्या कवणांचा संग्रह आहे.
बुद्धाच्या पुनर्जन्माविषयीच्या 500 कथांचा संग्रह जातककथा या नावाने प्रसिद्ध आहे .जातक कथात वाड्मय, कला, शिल्प यांची माहिती मिळते.
3. अभिधम्मपिटक -
यात विनय व सुत्तपिटकातील बौद्ध तत्त्वांचे स्पष्टीकरण व विवेचन करणाऱ्या सात ग्रंथांचा समावेश होतो.
X X
2. इतर भाषातील बौद्ध धर्म ग्रंथ
पाली भाषेशिवाय बौद्ध धर्माचा जेथे प्रसार झाला तेथील भाषांतील विपुल वाङमय उपलब्ध आहे. त्यापैकी मागधी ,संस्कृत, प्राकृत, चिनी,तिबेटी या प्रमुख भाषांत विपुल प्रमाणात बौद्ध विद्वानांनी ग्रंथरचना केली.
सिलोन मधली दीपवंश व महावंश प्रसिद्ध आहे.
मिलिंदप्रश्न, नेत्तीप्रकरण ,ललितबिहार (वैपुल्य सूत्र ) ,मुलकल्प वगैरे धर्मग्रंथ महत्त्वाचे आहेत.
त्याचप्रमाणे बुद्धदत्त, आनंद, धम्मपाल, उपसेन, नागार्जुन , वसुबंधु , अश्वगोषाल वगैरे विद्वानांच्या वाङमयकृती फार प्रसिद्ध आहेत .सर्वच धर्मग्रंथ सर्वच बुद्धपंथ अनुसरत नसून आपापल्या पंथाचे धर्मग्रंथ अनुसरतात.
Comment and share..

2 Comments
nice
ReplyDeleteVery excellent information
ReplyDelete