Shantaram Rajaram Vankudre ( V. Shantaram or Shantaram Bapu): Indian filmmaker, film producer, and actor
व्ही. शांताराम : चित्रपटमहर्षी
१८ नोव्हेंबर: जन्मदिन
बालपण आणि शिक्षण:
'चित्रपटमहर्षी' म्हणून ओळखले जाणारे व्ही. शांताराम यांचा जन्म 18 नोव्हेंबर 1901 रोजी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे संपूर्ण नाव शांताराम राजाराम वनकुद्रे असे होते. त्यांचे शिक्षण राजाराम हायस्कूलमध्ये चालू असता ते शाळेच्या नाटकांत कामे करीत परंतु पुढे इ. स. 1916 मध्ये मॅट्रिकच्या वर्गात असताना परिस्थितीमुळे त्यांना शाळा सोडावी लागली.
कार्य:
बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीत ते इ. स. 1920 मध्ये दाखल झाले. तेथे त्यांना अभिनयासह सर्व प्रकारचे उत्तम शिक्षण मिळाले आणि त्यांच्या भावी आयुष्याच्या यशाचा पाया घातला गेला. इ. स. 1921 मध्ये त्यांनी प्रथम 'वत्सलाहरण' मध्ये कृष्णाचे व इ. स. 1923 मध्ये 'सिंहगडा'त शेलारमामाचे अशी कामे केली. इतकेच नव्हे तर इ. स. 1927 मध्ये 'नेताजी पालकर'चे दिग्दर्शन केले.
व्ही. शांताराम यांनी दामले, फत्तेलाल यांच्या सहकार्याने इ. स. 1929 मध्ये 'प्रभात फिल्म कंपनी' ची स्थापना केली व चित्रपट निर्मितीला प्रारंभ केला. इ. स. 1932 मध्ये त्यांनी 'अयोध्येचा राजा' हा पहिला बोलपट काढला. प्रभात कंपनीचा आणि मराठी भाषेतील तो पहिलाच बोलपट होता. त्यानंतर सिंहगड, अमृतमंथन, संत तुकाराम, माणूस, कुंकू, शेजारी, धर्मात्मा इत्यादी अनेक बोलपट प्रभात कंपनीने काढले आणि ते सर्वच्या सर्व कमालीचे लोकप्रिय झाले. प्रभात कंपनीने भारतीय मराठी चित्रपटसृष्टीत खऱ्या अथनि इतिहास घडविला. ही कंपनी नावारूपाला आणण्यात व्ही. शांताराम यांचा सिंहाचा वाटा होता.
पुढे व्ही. शांताराम यांनी प्रभात फिल्म कंपनी सोडली आणि इ. स. 1941 मध्ये 'राजकमल' या नावाने स्वतःची वेगळी चित्रपट संस्था काढली. नंतरच्या काळातही त्यांनी उत्तमोत्तम चित्रपट निर्माण करण्याची 'प्रभात'ची परंपरा कायम राखली. त्यांच्या हिंदी चित्रपटांपैकी 'डॉ. कोटनीस की अमर कहानी' (एका भारतीय डॉक्टरने चीनमध्ये जाऊन मानवतावादी दृष्टिकोनातून केलेले सेवाकार्य) आणि 'दो आँखे बारह हाथ' (गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांखाली शिक्षा झालेल्या कैद्यांना नवजीवन प्राप्त करून देण्यासाठी एका आदर्शवादी तुरुंग अधिकाऱ्याने केलेले प्रयत्न) या चित्रपटांना अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय सन्मान प्राप्त झाले होते. याखेरीज 'बुंद जो बन गये मोती' 'गीत गाया पत्थरोंने' 'नवरंग' यांसारखे अनेक चित्रपट त्यांनी निर्माण केले होते. 'दो आँखे बारह हाथ' या चित्रपटाला राष्ट्रपती पारितोषिक मिळाले होते.
निर्माता, दिग्दर्शक व अभिनेता या सर्वांगांनी व्ही. शांताराम यांनी चित्रपटसृष्टीची सेवा केली.
ग्रंथसंपदा:
1. शांताराम (आत्मचरित्र).
सन्मान आणि पुरस्कार:
1. इ. स. 1985 मध्ये चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पारितोषिक दादासाहेब फाळके पारितोषिक त्यांना देण्यात आले.
2. भारत सरकारने त्यांना 'पद्मश्री' हा किताब देऊन त्यांच्या कार्याचा यथोचित गौरव केला.
निधन:
इ. स. 1990 मध्ये त्यांचे निधन झाले.
View, comments and share.....


0 Comments