Pandita Ramabai Sarasvati: Indian social reformer
पंडिता रमाबाई:
जन्मदीन :23 एप्रिल
स्मृतिदीन: 5 एप्रिल
बालपण आणि शिक्षण:
पंडिता रमाबाई यांचा जन्म 23 एप्रिल 1858 रोजी कर्नाटकातील मंगळूर जिल्ह्यातील माळहेरंजी गावानजीकच्या गंगामूळ या डोंगरमाथ्यावरील वस्तीत राहणाऱ्या ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अनंतशास्त्री व आईचे नाव लक्ष्मीबाई असे होते. पंडिता रमाबाई यांचे पूर्ण नाव रमा अनंतशास्त्री डोंगरे असे होते. अनंतरशास्त्री डोंगरे हे वेदशास्त्रसंपन्न व संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक होते. अनंतशास्त्र्यांनी आपल्या दोन मुलांना- रमाबाई व श्रीनिवास यांना संस्कृत व प्राचीन हिंदूशास्त्रे यांचे उत्तम शिक्षण दिले. रमाबाईनी वेद व इतर हिंदू धर्मग्रंथ यावर प्रभुत्व मिळविले. त्या संस्कृत भाषेतही पारंगत झाल्या.
X X
आपल्या आई-वडिलांच्या निधनानंतर रमाबाई व श्रीनिवास या दोघांनी आपला मुलूख सोडला. या दोघांनी सुमारे सहा वर्षे संपूर्ण हिंदुस्थानात संचार केला. अनेक प्रकारच्या हालअपेष्टा सहन करीत अनेक वेळा उपासमारीची पाळीही त्यांच्यावर आली. अखेरीस ते कलकत्ता येथे आले. त्या ठिकाणी रमाबाईंनी आपल्या विद्वत्तेने मोठमोठ्या पंडितांनाही चकित केले. तिथे असलेल्या प्रगत विचारांच्या लोकांनी तिच्या विद्वत्तेचा गौरव करून 'पंडिता' ही पदवी बहाल केली. त्यामुळे त्यांची कीर्ती सर्व देशभर पसरली.
कलकत्त्यातील वास्तव्यात पंडिता रमाबाईंचे बाबू बिपिनबिहारी दास या ब्राह्मो समाजी वकिलाशी लग्न झाले. लवकरच त्यांना एक मुलगी झाली. त्यांनी तिचे नाव मनोरमा असे ठेवले. पुढे इ. स. 1882 मध्ये पती निधनानंतर त्या पुण्यास आल्या. ख्रिस्ती मिशनन्यांनी केलेल्या साहाय्यामुळे त्यांना इंग्लंड व अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली. इंग्लंडमध्ये त्यांनी एका महाविद्यालयात संस्कृतच्या अध्यापिका म्हणून काम केले, तेथेच त्यांनी आपल्या मुलीसह खिस्ती धर्माचा स्वीकार केला.
X X
कार्य:
रमाबाईनी पुणे येथे 'आर्य महिला समाज' या नावाची संस्था पुरोगामी विचारी लोकांच्या सहकार्याने स्थापन केली. इ. स. 1889 मध्ये त्यांनी मुंबई येथे 'शारदा सदन' नावाची संस्था स्थापन केली. या संस्थेत निराश्रित विधवा व अनाथ स्त्रिया यांच्या राहण्या-जेवणाची व शिक्षणाची मोफत व्यवस्था करण्यात आली होती. पुढे ही संस्था मुंबईहून पुण्यास हलविण्यात आली. रमाबाईनी पुण्यापासून थोड्या अंतरावर असलेल्या केडगाव या गावी जमीन खरेदी केली व त्या जमिनीवर आपली स्वतंत्र वसाहत उभी केली. त्या ठिकाणी त्यांनी 'मुक्तिसदन' नावाची संस्था सुरू केली. या संस्थेतही अनाथ मुली व विधवा स्त्रिया यांच्या राहण्या-जेवणाची तसेच शिक्षणाची मोफत सोय करण्यात आली होती.
इ. स. 1897 च्या दुष्काळात त्यांनी गरिबांना मदत तर केलीच पण दुष्काळामुळे निराधार झालेल्या मुली व स्त्रिया यांना आपल्या संस्थेत त्यांनी आश्रय दिला.
X X
ग्रंथसंपदा:
1. 'बायबल' या खिस्ती धर्मग्रंथाचे मराठीत भाषांतर केले होते.
2. स्वधर्म नीती,
3. हाय कास्ट हिंदू वुमन,
4. युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती व प्रवासवृत्त
X X
सन्मान आणि पुरस्कार:
1. कलकत्त्यातील लोकांनी त्यांचा जाहीर सन्मान केला व त्यांना 'पंडिता' अशी पदवी बहाल केली.
2. सरकारने त्यांना 'कैसर-ए-हिंद' ही पदवी बहाल केली.
X X
निधन:
5 एप्रिल 1922 रोजी त्यांचे निधन झाले.
X X
View, comments and share....


0 Comments