Abul Kalam Ghulam Muhiyuddin Ahmed bin Khairuddin Al-Hussaini Azad : Indian independence activist
मौलाना अबुल कलाम आझाद : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील नेते
जन्मदिन: 11 नोव्हेंबर
स्मृतिदिन: 22 फेब्रुवारी
बालपण आणि शिक्षण:
मौलाना अबुल कलाम आझाद यांचे संपूर्ण नाव मोहिउद्दीन अहमद खैरूद्दीन बख्त आहे. त्यांचा जन्म 11 नोव्हेंबर 1888 मध्ये मक्का या ठिकाणी झाला त्यांच्या वडिलांचे नाव मौलाना खैरूद्दीन व आईचे नाव आलिया बेगम हे होते.
अधिकतर त्यांचे शिक्षण घरीच झाले. इ.स. 1903 मध्ये 'दर्स-ए-निजामिया' ही फारसी भाषेतील परीक्षा उत्तीर्ण होऊन 'अलीम' हे प्रमाणपत्र मिळविले. त्यांचा विवाह जुलेखा बेगमसोबत 1907 मध्ये झाला.
X X
प्रारंभिक कार्य:
मक्केतील मुल्ला मौलवींनी इ. स. 1906 मध्ये त्यांचा सत्कार केला तेव्हा त्यांना 'अबुल कलाम' ही पदवी देण्यात आली. 'अबुल कलाम' याचा अर्थ 'विद्या वाचस्पती' असा होतो. आझाद हे त्यांचे टोपणनाव; ते त्यांनी लिखाणासाठी घेतले होते. आपल्या लिखाणात उर्दू काव्याच्या शेवटी ते 'आझाद' या नावाचा वापर करीत. अशा पद्धतीने मौलाना आझादांची मूळची नावे मागे पडली आणि ते मौलाना आझाद या नावाने ओळखले जाऊ लागले. 'आझाद' हे नाव लिहिण्यामागे त्यांची जुन्या बंधनातून मुक्त होण्याची प्रेरणा होती.
आझादांच्या वडिलांनी इ. स. 1905 मध्ये त्यांना मध्य आशियात पाठविले. मौलाना आझादांनी इराक, इजिप्त, सीरिया, तुर्कस्तान इत्यादी देशांना भेटी दिल्या. त्यांनी कैरो येथील 'अल-अझर' विद्यापीठाला भेट दिली. तसेच ते योगी अरविंदांना जाऊन भेटले व ते एका क्रांतिकारी गटात सामील झाले होते परंतु नंतर त्यांनी हा मार्ग सोडून दिला होता. कारण क्रांतिकारकांचे गट मुस्लिमविरोधात क्रियाशील होते, असा अनुभव आझादांना येत होता. मुस्लिम हे ब्रिटिशांचे हस्तक आहेत, असाही समज त्या वेळी मोठ्या प्रमाणात पसरलेला होता.
X X
पत्रकारिता:
मौलाना आझादांनी इ.स. 1912 मध्ये कलकत्ता येथे 'अल्-हिलाल' हे उर्दू वृत्तपत्र सुरू केले होते. त्यात त्यांनी ब्रिटिशविरोधी भूमिका घेतली होती, तसेच भारतीय मुसलमानांच्या ब्रिटिश निष्ठेवर टीका केली होती. त्यामुळे सरकारने इ. स. 1914 मध्ये 'अल हिलाल' वर बंदी घातली परंतु पुढे इ.स. 1915 मध्ये 'अल-बलाग' या नावाचे दुसरे वृत्तपत्र त्यांनी सुरू केले होते.
X X
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान:
दिल्ली येथे इ. स. 1920 मध्ये आल्यावर त्यांनी महात्मा गांधींची भेट घेतली होती आणि त्यांनी काँग्रेसचे सभासदत्व स्वीकारले होते. मौलाना आझादांनी महात्मा गांधीजींच्या असहकाराच्या चळवळीत भाग घेतल्यामुळे आणि ब्रिटिश शासनाच्या विरोधात भाषण केल्यामुळे त्यांना 10 डिसेंबर, 1921 रोजी अटक करण्यात आली होती आणि नंतर दोन वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागली होती.
मौलाना आझादांनी हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी केलेले कार्य लक्षात घेऊन त्यांची इ. स. 1922 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.
भारतीय मुसलमानांत राष्ट्रीय भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसअंतर्गत राहून कार्य करण्यासाठी इ.स. 1929 मध्ये 'नॅशनल मुस्लिम पक्षाची' स्थापना करण्यात आली होती आणि त्याचे अध्यक्षपदही मौलाना आझादांकडे सोपविण्यात आले होते. या पक्षाने मुस्लिम लीगसारख्या जातीय संघटनेला विरोध केला. संमिश्र राष्ट्रवादावर त्यांची श्रद्धा होती.
सविनय कायदेभंगाच्या चळवळीत इ. स. 1930 मध्ये ते स्वतः उतरले होते. तसेच त्यांनी इतर भारतीय मुसलमानांना कायदेभंगाच्या चळवळीत सहभागी व्हायला प्रवृत्त केले होते. मौलाना आझादांचे या चळवळीवरचे नेतृत्व आणि प्रभुत्व लक्षात घेऊन ब्रिटिश शासनाने आझादांवर अनेक प्रांतांत प्रवेशबंदी केली होती.
आझाद इ. स. 1940 मध्ये पुन्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 1946 पर्यंत ते त्या पदावर होते.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे इ. स. 1942 मध्ये मुंबई येथे भरलेल्या ऐतिहासिक अधिवेशनाचे मौलाना आझाद अध्यक्ष होते. त्यांच्या अध्यक्षतेखाली 'छोडो भारत' चा ठराव मंजूर केला होता.
कॅबिनेट मिशनशी इ. स. 1946 मध्ये चर्चा करीत असताना मौलाना आझादांनी वेगळ्या पाकिस्तानच्या मागणीला कसून विरोध केला. वेगळ्या पाकिस्तानमुळे प्रश्न सुटणार नाही, उलट प्रश्नाचा गुंता वाढेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
पं. नेहरूंनी अंतरिम सरकार इ. स. 1947 ला तयार केले होते. त्यात आझादांचा शिक्षणमंत्री म्हणून समावेश झाला होता. मृत्यूपावेतो ते त्या पदावर होते.
X X
ग्रंथसंपदा:
1. इंडिया विन्स फ्रीडम (आत्मचरित्र)
2. दास्ताने करबला
3. गुब्बा रे खातिर
4. तजकिरह
X X
पुरस्कार:
भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान इ. स. 1992 मध्ये 'भारतरत्न' (मरणोत्तर) प्रदान करण्यात आला.
X X
निधन:
22 फेब्रुवारी 1958 रोजी त्यांचे निधन झाले.
X X
View, comments and share..


0 Comments