Vakataka Empire: Political and cultural contribution
वाकाटक साम्राज्य: राजकीय व सांस्कृतिक योगदान
प्राचीन काळी दक्षिण भारतात जी अत्यंत बलाढ्य व समृद्ध अशी साम्राज्ये अस्तित्वात आली त्यामध्ये वाकाटक साम्राज्याचा समावेश होतो.
इ.स. 250 ते इ.स. 550 पर्यंत वाकाटकांनी विदर्भावर राज्य केले. या 300 वर्षांच्या काळात वाकाटकांनी आपली सत्ता नर्मदे पासून तुंगभद्रेपर्यंत व अरबी समुद्रापासून बंगालच्या उपसागरापर्यंत पसरविली होती.
राजकीय प्रभावाबरोबरच या राजवंशाचे सांस्कृतिक क्षेत्रातही फार मोठे योगदान राहिलेले आहे.
वाकाटकांच्या काही राजांनी स्वतः काव्ये रचली होती. वाकाटक राजांनी संस्कृत व प्राकृत कवींना आश्रय दिला होता.
वाकाटकांच्या मांडलिकांनी व अमात्यांनी अजिंठा व गुलवाडा येथील डोंगरात जे विहार व चैत्य लेणी कोरविली व शिल्पचित्रादिकांनी भूषित केली ती संपूर्ण जगात प्रसिद्ध आहेत.
अजिंठा येथील महायान गुंफा वाकाटकांच्याच काळात साकार झाल्या आहेत. त्यापैकी गुंफा क्रमांक 1,2,16,17 व 19 ही स्थापत्य व चित्रकला यादृष्टीने संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत.
एक फ्रेंच इतिहासकार प्रा. जुव्हो डुब्रुइल 'Ancient History of Deccan ' या ग्रंथात लीहतो,
“इ.स. तिसऱ्या शतकापासून सहाव्या शतकापर्यंत दक्षिणेत जे राजवंश झाले त्यामध्ये वाकाटक राजवंश हा सर्वश्रेष्ठ असून त्याच्या कामगिरीने अखिल दक्षिण भारताच्या संस्कृतीवर फार मोठा परिणाम झाला आहे."
X X
1836 पूर्वी वाकाटक घराणे हे इतिहासाला ज्ञात नव्हते. मागील 250 वर्षांत वाकाटकांवर मोठ्या प्रमाणात संशोधन होऊन संशोधकांनी वाकाटकांच्या इतिहासाचे धागेदोरे जुळविण्यात यश मिळवले आहे.
महामहोपाध्याय वा. वि. मिराशी यांनी 'वाकाटक नृपती आणि त्यांचा काळ' हा ग्रंथ 1957 मध्ये प्रकाशित केला.
वाकाटक राजे त्यांचे मांडलिक व सचिव यांचे एकूण 26 ताम्रपट व शिलालेख यांची माहिती या ग्रंथात समाविष्ट आहे.
वाकाटकांचा अभ्यास करण्यासाठी प्रामुख्याने उपलब्ध साधने:
1. पुणे ताम्रपट, वाशीम ताम्रपट, शिवनी ताम्रपट, जांब ताम्रपट.
2.वराहदेवाचा अजिंठा येथील लेख, वराहदेवाचा घटोत्कच लेण्यांतील लेख.
3. अजिंठा येथील लेणी क्र. 1,2,16,17 व 19 .
4. पुराणग्रंथातील वाकाटकांची माहिती.
5. नागपूरजवळील रामटेक व पवनार येथील मूर्ती.
6. राजा प्रवरसेनाचे 'सेतुबंध' हे काव्य.
वाकाटकांचे मूळ स्थान:
वाकाटकांच्या मूळ स्थानाबद्दल इतिहासकारांत मतभेद आहेत.
1. डॉ. के.पी. जयस्वाल यांच्या मते,
"उत्तर भारताच्या झाशी जिल्ह्यातील पूर्वीच्या ओच्छ संस्थानातील वाकाट हे गाव वाकाटकांचे मूळ स्थान आहे. पण हे मत चुकीचे आहे. कारण वाकाटकांचे आद्य शिलालेख किंवा माहिती उत्तर भारतात कोठेही उपलब्ध होत नाही". के. पी. जयस्वाल यांनी वाकाटकांच्या उज्ज्वल इतिहासाकडे विद्वानांचे लक्ष वेधले.
2. व्ही. ए. स्थिम या ब्रिटिश इतिहासकाराने एका लेखात वाकाटकांचे मूळ स्थान मध्यभारतात कोठेतरी शोधले पाहिजे असे मत मांडले होते. पण हे मत चुकीचे असल्याचे डॉ. वा. वि. मिराशी यांनी सिद्ध केले आहे.
3. डॉ. अजयमित्र शास्त्री यांच्या मते, "वाकाटकांचे मूळ स्थान वर्तमान मध्य प्रदेशातील विंध्य विभागात होते व ते वाकाटकांच्या बऱ्याच पिढ्यांपर्यंत तेथेच राहिले."
4. ए. एस. अळतेकर यांच्या मते, "वाकाटक दक्षिण भारतीय होते."
5. डॉ. वा. वि. मिराशी यांनी
"वाकाटकांचे मूळ स्थान विदर्भात असावे असे मत मांडून ते समप्रमाण सिद्ध केले आहे.
विदर्भात रामटेकजवळ नंदीवर्धन हे वाकाटकांचे मूळ स्थान होते हे आता सिद्ध झाले आहे.
वाशीम ताम्रपटाने वाकाटकांच्या वत्सगुल्म शाखेचाही इतिहास प्रकाशात आला असून अकोला जिल्ह्यातील वाशीम (सध्याचे वाशीम हे जिल्ह्याचे स्थळ) हेच वाकाटकांची राजधानी वत्सगुल्म होय हे आता सर्वमान्य असे मत आहे.
वाकाटकांचे सर्व कर्तृत्व महाराष्ट्रात घडले व महाराष्ट्र हीच त्यांची कर्मभूमी होती हे आता सर्वमान्य आहे.
X X
वाकाटकांचा राजकीय इतिहास :
1. प्रथम विंध्यशक्ती :
प्रथम विंध्यशक्ती ( 250-270 )हा वाकाटक वंशातील पहिला राजा होय. याचे नाव पुराणात तसेच अजिंठ्याच्या 16 व्या क्रमांकाच्या लेण्यातील लेखात आले आहे व त्यास त्या लेखात ब्राह्मण म्हटले आहे. त्याने धार्मिक कृत्ये केल्याचा उल्लेख त्या लेखात आहे. विंध्यशक्ती प्रथम हा सातवाहन राजवटीत मोठ्या अधिकारपदावर असावा व त्यामुळे त्याला पुढे राज्यसत्ता बळकावणे शक्य झाले असावे असा एक अंदाज व्यक्त केला जातो.
विंध्यशक्ती प्रथम हा मूळचा कुठला याबद्दलही विद्वानांत एकमत नाही. पुराणांतील वर्णनावरून तो विदिशा येथील असावा असे अनुमान काहींनी काढले आहे; पण ते बरोबर नाही.
अजिंठ्याच्या लेण्यांत विंध्यशक्तीची मोठी स्तुती आहे ती याप्रमाणे त्याने मोठमोठ्या लढायात विजय मिळवून आपले सामर्थ्य वाढविले होते. तो क्रुद्ध झाला म्हणजे प्रत्यक्ष देवांनाही अनिवार्य होत असे. त्याच्या घोड्यांच्या टापांनी घडविलेल्या धुळीने आकाशात सूर्य झाकून जात असे. त्याच्या शौर्याने पराभूत झालेले शत्रू त्याच्यापुढे विनम्र होत." त्याच्या राज्याचा विस्तार किती होता हे समजण्यास आज साधन नाही.
काही विद्वानांच्या मते, त्याने आपली सत्ता विंध्य पर्वतापर्यंत पसरविली होती म्हणून त्याने 'विंध्यशक्ती' हे विरुद' धारण केले होते.
इ.स. 250 ते इ.स. 270 या काळात विंध्यशक्ती होऊन गेला असावा. वाकाटकांच्या दानपत्रांत विंध्यशक्तीचा उल्लेख येत 'नाही. याचे कारण. वाकाटकांच्या साम्राज्याचा खरा संस्थापक विंध्यशक्ती नसून त्याचा पुत्र प्रवरसेन होता, असे वा. वि. मिराशी लिहितात.
डॉ. एस. एस. अळतेकर यांच्या मते, विंध्यशक्तीचा कोणत्याही धार्मिक पद्धतीनुसार राज्याभिषेक झाला नव्हता. त्यामुळे तो अभिषेक राजा नव्हता तर केवळ सामंत होता.
X X
2. प्रवरसेन पहिला :
विंध्यशक्तीनंतर गादीवर आलेला प्रथम प्रवरसेन हा वाकाटक वंशातील सर्वश्रेष्ठ सम्राट होय. "प्रवरसेन प्रथम हाच वाकाटक घराण्याचा खरा संस्थापक होय" असे मत वा. वि. मिराशी यांनी मांडले आहे.
प्रथम प्रवरसेन याने 60 वर्षे राज्य केले असे पुराणे सांगतात. त्याने वाकाटक साम्राज्याला मान्यता मिळावी म्हणून वैदिक परंपरेतील अश्वमेघ यज्ञ केला होता. त्याच्या वंशजांच्या बहुधा सर्व ताम्रपटांत त्याने केलेल्या चार अश्वमेधांचा व सप्तसोमसंस्थेचा (सात यज्ञ) उल्लेख आला आहे.
घटोत्कच लेणीतील शिलालेखात त्याने केलेल्या अश्वमेध यज्ञांचा स्पष्ट उल्लेख आहे. या अश्वमेध यज्ञामुळेच अनेक राजांनी महाराजांनी त्याचे मांडलिकत्व स्वीकारले होते.
काही विद्वानांनी म्हटले आहे की, प्रवरसेन प्रथम याने आपले समकालीन सौराष्ट्र व माळवा येथील पश्चिम क्षत्रप द्वितीय रुद्रसिंह आणि द्वितीय रुद्रदामन यांचा पराभव केला होता.
तो धार्मिक वृत्तीचा राजा असून वैदिक धर्माचा मोठा पुरस्कर्ता होता. त्याने आपल्या धर्मविजयीत्वाची निदर्शक अशी 'धर्ममहाराज' ही उपाधी धारण केली होती. तो स्वतःला हारितीपुत्रही म्हणून घेई. त्याने आपल्या सत्तेला बळकटी आणण्याकरिता उत्तर भारतातील भारशिवाशी वैवाहिक जोडला होता.
भारशिव हे नागवंशी असून ते मूळचे विदर्भातील असावेत.असे वा. वि. मिराशी म्हणतात. भारशिवनृपती भवनाग याने आपली मुलगी प्रवरसेनचा ज्येष्ठ मुलगा गौतमीपुत्र यास दिली होती. या वैवाहिक संबंधाने उत्तर भारतातील प्रबळ नाग राजसंघाचे पाठबळ मिळाल्यामुळे वाकाटक राजसत्ता दृढमूल होण्यास मदत झाली.
प्रवरसेन प्रथम याने 60 वर्षे राज्य केले असे पुराणे सांगतात. प्रवरसेन प्रथम याने चार अश्वमेध यज्ञ केले. यावरून त्याची कारकीर्द दीर्घकाळ चालली असावी. प्रवरसेन प्रथम याच्या दैवनामक प्रधानमंत्र्याचा उल्लेख घटोत्कच लेण्यांत आहे.
प्रवरसेन प्रथम यास 4 पुत्र होते व ते सर्व राजे झाले असे पुराणांत म्हटले आहे. सन 1939 पर्यंत वाशीम ताम्रपट मिळण्यापूर्वी या विधानावर कोणी विश्वास ठेवत नसे.
प्रवरसेनच्या निधनानंतर त्याच्या विस्तृत साम्राज्याची वाटणी त्याच्या 4 पुत्रांत झाली. ज्येष्ठ पुत्र गौतमीपुत्र हा अगोदरच मृत्यू पावला असल्याने त्याचा दुसर मुलगा रुद्रसेन हा गादीवर आला. त्याने आपली राजधानी नागपूरपासून 28 मैलांव असलेल्या नंदीवर्धन या नगरीत नेली. त्याच्या तिसरा मुलगा सर्वसेन याने अकोला जिल्ह्यातील वत्सगुल्म (सध्याचे वाशीम हे जिल्ह्याचे ठिकाण) येथे नेली.
X X
नंदीवर्धन : वाकाटकांची ज्येष्ठ शाखा
प्रथम प्रवरसेन याच्या मृत्यूनंत वाकाटकांच्या राज्याचे विघटन झाले व वाकाटकांच्या दोन शाखा कार्यरत झाल्या.
1. नंदीवर्धन
2. वत्सगुल्म.
प्रवरसेन प्रथमनंतर त्याचा नातू प्रथम रुद्रसेन हा इ.स. 33 च्या आसपास वाकाटकांच्या ज्येष्ठ शाखेचा अधिपती झाला. तो गुप्त सम्राट समुद्रगुप्ताचा समकालीन होता.
समुद्रगुप्ताने दक्षिणेकडील 12 राजांना मांडलिक केल्याचा उल्लेख हैदराबादच्या शिलालेखात आहे. पण वाकाटकांना मांडलिक केल्याचा उल्लेख नाही. म्हणजेच त्याने समुद्रगुप्तापुढे आपली मान वाकविली नाही.
दक्षिणेतील क्षत्रपांचा पराभव करण्यासाठी युद्धाचा प्रसंग आलाच तर वाकाटकांची मदत बहुमोल ठरेल असे त्यास वाटले असावे.
1. प्रथम पृथ्वीषेण :
प्रथम रुद्रसेनचा हा पुत्र होता. इ.स. 350 च्या सुमारास तो सत्ताधीश झाला. गुप्त सम्राट चंद्रगुप्त दुसरा यास पश्चिमी क्षत्रपाची सत्ता नष्ट करण्यामध्ये प्रथम पृथ्वीषेण याने सहकार्य केले.
प्रथम पृथ्वीषेण याने दीर्घकाळ म्हणजे इ.स. 350 ते 400 या काळात राज्य केले. गुप्त वाकाटक यांच्या राजकीय युतीमुळे पश्चिमी क्षत्रपांचे उच्चाटन झाले. तो शिवोपासक होता. त्याने नंदीवर्धन (नागपूरपासून 28 मैल अंतरावरील नगरधन) येथे राजधानी स्थापन केली. नंदीवर्धन हे शहर त्यास संरक्षणाच्या दृष्टीने अधिक उपयुक्त वाटले असावे. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र द्वितीय रुद्रसेन हा सत्तेवर आला.
2. द्वितीय रुद्रसेन व प्रभावती गुप्त:
प्रथम पृथ्वीषेणनंतर द्वितीय रुद्रसेन हा सत्तेवर आला. त्याचा विवाह चंद्रगुप्त दुसरा या गुप्त सम्राटाची कन्या प्रभावती गुप्ता हिच्याशी झाला होता. पण रुद्रसेन दुसरा 5 वर्षांच्या अल्प कारकीर्दीनंतर मृत्यू पावला. त्याला दोन पुत्र होते.
एक दिवाकरसेन व दुसरा दामोदरसेन (ऊर्फ प्रवरसेन दुसरा) पण दिवाकरसेन या ज्येष्ठ पुत्रास गादीवर बसवून प्रत्यक्ष कारभार 13 वर्षे मात्र प्रभावती गुप्ता हिने पाहिला.
चंद्रगुप्ताने (द्वितीय) तिला राज्यकारभारात मदत करण्याकरिता आपल्या पदरचे विश्वासू अधिकारी व मुत्सद्दी पाठविले होते. त्यात कवी कालिदास असावा.
विदर्भात असताना त्याने आपले सर्वोत्कृष्ट 'मेघदूत' हे काव्य लिहिले. दुर्दैवाने दिवाकरसेनही अल्पायुषी ठरला.
इ.स. 420 मध्ये त्याचा धाकटा भाऊ दामोदरसेन हा गादीवर आला. त्याने आपले पूर्वज प्रवरसेन हे नाव धारण केले होते. तो प्रवरसेन द्वितीय या नावाने ओळखला जातो. त्याचे 13 ताम्रपट उपलब्ध आहेत. त्यानुसार विदर्भातील विविध जिल्ह्यांतील गावे दान दिल्याचा उल्लेख आहे. (या 13 ताम्रपटांचा जशाचा तसा उल्लेख वा. वि. मिराशी यांच्या 'वाकाटक नृपती आणि त्यांचा कालखंड' या ग्रंथात आहे.)
प्रवरसेन द्वितीय याने इ.स. 420 ते 450 पर्वत राज्य केले. त्याने आपल्या कारकीर्दीची पहिली 11 वर्षे नंदीवर्धन येथून राज्य केले. त्यानंतर त्याने वर्धा जिल्ह्यातील प्रवरपूर (पवनार) येथे राजधानी हलवली. तो शिवोपासक होता व दानशूर होता. त्याचे 13 ताम्रपट हे त्याचा दानशूरपणा स्पष्ट करतात.
वाकाटक वंशाच्याच नव्हे तर इतर कोणत्याही प्राचीन भारतीय राजवंशाने त्याच्याएवढी दानपत्रे दिलेली नाहीत. त्याची आई म्हणजे प्रभावती गुप्ता ही विष्णूपासक होती.
आईच्याच आज्ञेवरून त्याने 'सेतुबंध' हे काव्य लिहिले. हे काव्य महाराष्ट्री प्राकृत भाषेत आहे. हे काव्य रचण्याच्या कामी त्यास महाकवी कालिदासने सहकार्य केले असावे. 'सेतुबंध' हे महाकाव्य भगवान रामचंद्राच्या जीवनावर आधारलेले आहे.
आपली आई प्रभावती गुप्ता हिच्याच आज्ञेवरून पवनार किंवा प्रवरपूर या आपल्या राजधानीच्या गावी भगवान रामचंद्राचे उत्तुंग देवालय त्याने बांधले व त्यास सुंदर शिल्पांनी भूषित केले होते.
X X
3. नरेंद्रसेन :
हा द्वितीय प्रवरसेनचा पुत्र होता. त्याचा विवाह अज्झितभट्टरिका या कुंतल देशाच्या राजकन्येशी झाला होता.
कुंतल देश म्हणजे सातारा, कोल्हापूर, सोलापूर या कृष्णा नदीच्या उत्तर खोऱ्यातील प्रदेश होय.
इ.स. 440 ते 455 पर्यंत तो सत्तेवर होता. बालाघाट ताम्रपटात नरेंद्रसेनने शौर्याने आपल्या शत्रूंचा पराभव केला होता व कोसला, मेकला व मालव या देशांचे अधिपती त्याच्या आज्ञा मानत होते असे म्हटले आहे.
कोसला म्हणजे दक्षिण कोसल किंवा छतीसगड त्यामध्ये रायपूर, दुर्ग, विलासपूर या जिल्ह्यांचा समावेश होतो. त्याच्या राजवटीच्या शेवटी वाकाटक राज्यावर संकट आले होते, ते म्हणजे नलवंशी भगवतवर्मा याने वाकाटकांच्या मुलखावर स्वाऱ्या करून त्याचा बराचसा भाग काबीज केला होता.
नल राजे कोसल देशात राज्य करीत होते असा पुराणात उल्लेख आहे.
4. द्वितीय पृथ्वीषेण :
हा नरेंद्रसेनचा पुत्र होता. त्याने आपली राजधानी प्रवरपूर हलवून भंडारा जिल्ह्यातील आमगावजवळ पद्मपूरनगरी येथे नेली होती.
पृथ्वीषेण द्वितीय याने आपले सामर्थ्य वाढवून नल राजास विदर्भातून हाकलून लावले होते.
एवढेच नव्हे तर नल राजाची राजधानी पुष्पनगरी ही युद्ध करून उद्ध्वस्त केली होती.
पद्मपूरनगरी हे राजधानीचे शहर भवभूती या सुप्रसिद्ध संस्कृत कवीचे जन्मस्थान होते असे मत वा. वि. मिराशी यांनी मांडले आहे.
द्वितीय पृथ्वीषेणने उत्तरेतही आपली सत्ता दृढ केली व मेकला देशाच्या उत्तरेच्या चेदीपर्यंत आपले साम्राज्य वाढविले. द्वितीय पृथ्वीषेण हा विष्णूचा उपासक होता.
बालाघाटाच्या शिलालेखात पृथ्वीषेण दुसरा यास 'परमभागवत' असे म्हटले आहे. इ.स. 490 च्या सुमारास वाकाटकाची नंदीवर्धन या शाखेचा प्रदेश वत्सगुल्म शाखेने जिंकून घेतला व वाकाटकांची नंदीवर्धन ही शाखा अस्त पावली.
X X
वत्सगुल्म: वाकाटकांची शाखा
सन 1939 पर्यंत म्हणजे वाशीम ताम्रपट मिळेपर्यंत वत्सगुल्म शाखेविषयी फारशी माहिती नव्हती. या शाखेतील कित्येक राजांची नावे अजिंठ्याच्या 16 नंबरच्या लेण्यातील लेखात आली आहेत. पण तो लेख झिजल्याने ती नावे बरोबर वाचता येत नव्हती. पण ती नावे खरी असल्याचे वाशीम ताम्रपटावरून स्पष्ट झाले आहे.
1. सर्वसेन (इ.स. 330-355) :
सर्वसेन हा प्रवरसेनचा पुत्र होता. त्याचे नाव वाशीम ताम्रपटात तसेच अजिंठ्याच्या लेखांतही आले आहे. त्याचे राज्य विंध्य पर्वतापासून दक्षिणेस गोदावरी नदीपर्यंत पोहोचले होते. त्याने वत्सगुल्म या शहराची आपल्या राजधानीसाठी निवड केली होती.
वत्सगुल्म हे पवित्र क्षेत्र म्हणून प्रसिद्ध होते. दक्षिण भारतातील प्रथेला अनुसरून त्याने 'धर्ममहाराज' ही पदवी धारण केली होती. त्याने 'हरिविजय'नामक काव्य महाराष्ट्री प्राकृतात रचले होते. त्याची स्तुती अनेक संस्कृत कवींनी केली आहे.
सर्वसेनने सुंदर प्राकृत गाथाही लिहिल्या होत्या. काही प्राकृत गाथांचा समावेश 'गाथा सप्तसई' या काव्यात आहे.
2. द्वितीय विंध्यसेन :
सर्वसेननंतर विंध्यसेन गादीवर आला. वाशीम ताम्रपटात त्याचे नाव द्वितीय विंध्यसेन आहे. त्याने इ.स. 355 ते 397 म्हणजे ३७ वर्षे राज्य केले. त्याने कुंतल देशाचा पराभव केला" असे अजिंठ्याच्या एका लेखात म्हटले आहे.
त्यानेही 'धर्ममहाराज' ही पदवी धारण केली होती. त्याचे शिलालेख व ताम्रपट पाकृतऐवजी संस्कृत भाषेत आहेत. त्यावरून त्याच्या काळात संस्कृत भाषेला राजदरबारी भाषा म्हणून महत्त्व प्राप्त झाल्याचे दिसते.
3. द्वितीय प्रवरसेन :
हा द्वितीय विंध्यसेनचा पुत्र होता. त्याने इ.स. 400-415 या काळात राज्य केले असावे. अजिंठ्याच्या लेखात म्हटले आहे की, हा उत्कृष्ट व उदार प्रशासनाने प्रसिद्ध झाला होता. तो मृत्यू पावला तेव्हा त्याचा मुलगा 8 वर्षांचा होता.
4. देवसेन :
देवसेन हा 450 च्या सुमारास वत्सगुल्म शाखेचा अधिपती बनला.
देवसेनचा हस्तिभोज या नावाचा अत्यंत दक्ष, गुणी, उदार असा सचिव होता. देवसेनने त्याच्यावर कारभार सोपवून स्वतः ऐषआरामात काळ घालविला.
हस्तिभोजच्या प्रजाहितदक्ष कारभाराचे वर्णन अजिंठा व घटोत्कच येथील लेण्यांत आले आहे. तो इ.स. 475 पर्यंत सत्तेवर होता.
बीदर ताम्रपटावरून त्याने 'धर्म महाराज' ही पदवी धारण केल्याचे दिसते.
5. हरिषेण :
इ.स. 475 मध्ये सत्तेवर आला. वत्सगुल्म शाखेचा तो ज्ञात शेवटचा राजा होय. त्याचे वर्णन एका मांडलिकांच्या शिलालेखात 'प्रजेचा हितकरी' असे आले आहे. मातापित्याप्रमाणे तो प्रजेच्या हिताची काळजी घेई. तो शूर व महत्त्वाकांक्षी होता. त्याने वाकाटकांच्या सत्तेचा फार मोठा विस्तार केला होता.
मध्य प्रदेशचा पूर्व भाग, दक्षिणेचा संपूर्ण पूर्व समुद्रकिनारा, माळवा, दक्षिण गुजरात, कोकण व उत्तर कर्नाटक या प्रदेशात त्याची सत्ता होती. या विस्तीर्ण प्रदेशातील काही राजांनी त्याचे मांडलिकत्व स्वीकारले होते की त्या प्रदेशावर त्याची प्रत्यक्ष सत्ता होती हे मात्र निश्चित सांगता येत नाही. त्याने नंदीवर्धनच्या वाकाटक शाखेचे राज्य जिंकून घेतले होते.
हरिषेणचा वराहदेव हा अत्यंत धार्मिक, उदार व दक्ष सचिव होता. तो राजास व प्रजेलाही फार आवडे तो हस्तिभोजचा पुत्र होता व बौद्ध धर्माचा अनुयायी होता. त्याच्याच प्रेरणेने वाकाटक राजांनी अजिंठा येथे काही लेण्या कोरविल्या.
याचा अभ्यास याच प्रकरणात आपण 'वाकाटकांचे सांस्कृतिक योगदान' या भागात करणार आहोत. हरिषेणनंतर एक-दोन राजे झाले असावेत पण त्यांची माहिती उपलब्ध होत नाही.
इ.स. 550 च्या सुमारास वाकाटकांचे राज्य नष्ट झाले असावे.
वाकाटकांच्या प्रदेशावर कलचुरी वंशाने सत्ता प्रस्थापित केली व वाकाटक राजवंश हा काळाच्या पडद्याआड गेला.
हरिषेणनंतर वाकाटक सत्तेचा अस्त कसा झाला याचा अधिकृत पुरावा किंवा इतिहास उपलब्ध नाही.
वाकाटकांच्या अस्तानंतर 100-125 वर्षांनी दण्डी याने लिहिलेल्या 'दशकुमारचरित' यात 8 व्या उच्छवासांत जी कथा आली आहे त्यावरून वाकाटकांच्या -हासाची प्रक्रिया काही प्रमाणात लक्षात येते.
दण्डीच्या कथेवरून असे स्पष्ट दिसते की, उत्तरेस नर्मदेपासून दक्षिणेस तुंगभद्रेपर्यंत पसरलेले विशाल वाकाटक साम्राज्य हरिषेणाच्या पुत्राच्या आणि सामंताच्या फितुरीमुळे एकाएकी कोलमडून पडले.
अशा प्रकारे 300 वर्षांची उज्ज्वल राजकीय परंपरा व वैभवशाली असा सांस्कृतिक वारसा असणारे वाकाटकांचे राज्य 550 च्या सुमारास नामशेष झाले.
वाकाटकांचे सांस्कृतिक योगदान
(Cultural Contribution of Vakatakas ) :
1. वाकाटकांचे कार्यक्षम प्रजाहितदक्ष प्रशासन :
इ.स. 220 ते 550 हा वाकाटकांचा एकूण कालखंड होय. वाकाटकांच्या दोन शाखा,
1. नंदीवर्धन
2. वत्सगुल्म
वाकाटकांचे अभ्यासक वि. वा. मिराशी यांनी 'वाकाटक नृपती आणि त्यांचा कालखंड' या संशोधनपर ग्रंथात म्हटले आहे की,
“तत्कालीन इतर राजवंशांप्रमाणे वाकाटक वंशात कधी गृहकलह झाल्याचे नमूद नाही. वाकाटकांचे राज्य शासन कार्यक्षम असून त्यायोगे प्रजाजनांस समृद्धी, शांतता, सुव्यवस्था यांचा लाभ झाला होता असे दिसते."
अजिंठ्याच्या लेणी क्रमांक 16 व्या लेखात म्हटल्याप्रमाणे वाकाटकांचे सचिव हे आपल्या उत्कृष्ट शासनायोगे प्रजाजनांना त्यांचे मातापिता व मित्र यासारखे वाटू लागले.
वाकाटक राजांनी न्यायाने राज्यकारभार चालविला व आपल्या गुण, पुण्यकर्माने व कीर्तीने स्वतःला उज्ज्वल केले.
कवी कालिदासने 'रघुवंश'मध्ये वाकाटकांच्या उत्कृष्ट राज्य शासनाची प्रशंसा केली आहे.
वाकाटकांच्या काळात भारतातील इतर प्रदेशांप्रमाणेच वाकाटकांच्या राज्यातही राजसत्ताक पद्धत होती.
राजाच्या हाती मुख्य सत्ता होती. पण त्या सत्तेला स्मृतीतील नियमांचे नियंत्रण असे. वाकाटकांच्या लेखांत मंत्रिपरिषदेचा, लोकसभेचा कोठेही उल्लेख नाही. तथापि तत्कालीन राजांचा कारभार केवळ स्वेच्छेनुसार किंवा जुलमी होता असे नाही. वाकाटकांच्या राज्यकारभाराची फारशी माहिती आपणास मिळत नाही द्वितीय रुद्रसेन याची पत्नी प्रभावती गुप्ता व नरेंद्रसेनची पत्नी अज्झितभट्टरिका या दोन राण्यांचा अपवाद वगळता इतर राण्यांनी राज्यकारभारात भाग घेतला असे दिसत नाही.
वाकाटकांनी आपल्या राज्याचे विविध विभाग पाडले होते त्यास विषय, भुक्ती ही नावे होती व त्यावर विविध अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या होत्या.
2. वाकाटकांच्या काळातील सामाजिक स्थिती :
वाकाटकांच्या कोरीव लेखांवरून तत्कालीन सामाजिक परिस्थितीवर फारसा प्रकाश पडत नाही.
वाकाटक नृपती हे स्वतः ब्राह्मण असूनही द्वितीय रुद्रसेन या वाकाटक राजपुत्राचा विवाह प्रभावती गुप्ता या चंद्रगुप्त दुसरा, जो वैश्य होता त्याच्या कन्येशी झाला होता.
पण एकूण समाजजीवनाचा विचार करता आंतरवर्णीय विवाहांचे प्रमाण समाजात फारसे नव्हते.
वाकाटक हे ब्राह्मण असल्याने राज्य शासनात ब्राह्मण उच्चपदांवर असावेत. क्षत्रिय, वैश्य व शूद्र यांचे समाजातील स्थान कोणते होते याविषयी माहिती मिळत नाही. तत्कालीन वाङ्मय, शिल्पे, चित्रकला यांच्या आधारे वाकाटककालीन लोकांची राहणी, वस्त्रे, अलंकार, केशभूषा, वेशभूषा, घरे आदींची माहिती मिळते.
अजिंठ्याची 16,17 व 19 क्रमांकाची लेणी वाकाटक काळात कोरली गेली. अजिंठा लेणीतील चित्रांवरून तत्कालीन समाजातील भिन्न भिन्न वंशांच्या लोकांची आपणास कुल्पना येते.
त्यात काही आर्य, मूळचे आदिवासी व कुशाण, पल्लव व ग्रीक हे परदेशी लोकही आहेत हे त्यांची शरीरयष्टी, चेहरेपट्टी व वस्त्रे यावरून लक्षात येते.
अजिंठ्याची शिल्पे व चित्रे यावरून वाकाटककालीन स्त्री-पुरुषांच्या वस्त्रे व अलंकारांची उत्तम कल्पना येते. समाजातील वरच्या घरातील स्त्री-पुरुष राजे-राण्या वगैरे तलम किंवा पारदर्शक कपडे वापरत.
अजिंठ्याच्या वाकाटककालीन लेण्यांत स्त्री-पुरुषांच्या विविध वेशभूषा, केशभूषा दाखविल्या आहेत.
केशरचेनेचे इतके विविध व सुंदर प्रकार दिसतात की, त्यांनी प्रेक्षकांचे मन आश्चर्यचकित होते.
वाकाटककालीन स्त्री-पुरुषांना अलंकाराची मोठी आवड होती असे दिसते.
व्यापारी, सामान्य व गरीब लोक यांच्या अंगावर दागिने दिसत नाहीत; पण राजे, राजपुत्र, उच्चपदस्थ अधिकारी, राण्या, श्रीमंत लोकांच्या स्त्रिया, दासी यांनी विविध प्रकारचे अलंकार घातलेले अजिंठ्याच्या चित्रांत दिसून येते.
अंगठ्या, केयूर, मणि मेखला, कर्णकुंडले, हार, शिरोभूषणे, बाहुभूषणे इ. शेकडो उत्कृष्ट सुंदर प्रकार अजिंठ्याच्या लेण्यांत दाखविलेले आहेत.
X X
वाकाटककालीन धार्मिक स्थिती :
वाकाटक राजे हे भिन्न भिन्न धर्मांचे अनुयायी होते.
विंध्यशक्ती हा वाकाटकांचा संस्थापक वैदिक धर्माचा अनुयायी असावा. कारण त्याने शत्रूंचा पाडाव केल्यानंतर अनेक यज्ञयाग केले होते.
विंध्यशक्तीचा मुलगा प्रथम प्रवरसेन याने विजयप्राप्तीनंतर चार अश्वमेध यज्ञ केले तसेच त्याने 7 सोमयागही केले होते.
त्याच्या वाजपेय यज्ञांचा व त्याने दिलेल्या उदार दक्षिणांचा उल्लेख पुराणात आला आहे.
वाकाटकांच्या काळी पौराणिक हिंदू धर्माचाही मोठा उत्कर्ष झाला होता. त्यांच्या राज्यात सर्वत्र अनेक हिंदू देवांची देवालये बांधली गेली.
बहुतेक वाकाटक राजे शिवोपासक असल्याने इतर देवांपेक्षा भगवान शंकराची देवालये पुष्कळच निर्माण झाली असावीत. पण कोरीव लेखांच्या अभावी त्यांची फारशी माहिती मिळत नाही.
दुसरा रुद्रसेन याने विदर्भात भागवत संप्रदाय लोकप्रिय केला. नागपूरजवळ मोंदा या गावी त्याने वैष्णव मंदिर उभारले. तो बहुधा आपली पत्नी प्रभावती गुप्ता हिच्या प्रभावाखाली शैव पंथाकडून वैष्णव पंथाकडे वळला असावा.
वाकाटकांच्या अनेक दानलेखांवरून त्यांनी अनेक दाने एकादशीच्या दिवशी दिल्याचे दिसते. तेव्हा एकादशी व्रताला त्या काळी महत्त्व असावे असे दिसते. प्रभावती गुप्ता ही रामभक्त होती.
रामगिरीवरील राममंदिरात ती नित्य दर्शनास जात असे. तिच्या इच्छेला अनुसरूनच मातृभक्त प्रवरसेनने प्रवरपूरला (वर्ध्याजवळ) श्रीरामचंद्राचे भव्य मंदिर उभारले होते.
वत्सगुल्म शाखेच्या राजांचे अनेक ताम्रपट सापडले आहेत. त्यामध्ये त्यांनी सबंध गाव किंवा त्यातील काही जमीन ब्राह्मणास दिल्याचा उल्लेख आहे.
वाकाटकांच्या काळात त्रिपुरी रामटेक व वाशीम ही पवित्र स्थळे गणली जात होती.
वाकाटकांच्या काळात बौद्ध पंथाचाही विकास झाला. वाकाटकांचे मंत्री व मांडलिक यांनी बौद्ध धर्माचा पुरस्कार केला होता.
वाकाटकांचा मूळ पुरुष गृहपती वाकाटक हा बौद्ध मतानुयायी होता.
वाकाटकांच्या काळात महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा प्रसार झाला होता. यावरून वाकाटक सम्राटांचा धर्मसहिष्णुपणाच स्पष्ट होतो.
वाकाटकांचा कालखंड हा विदर्भाच्या इतिहासातील सुवर्णयुग होते :
वाकाटकांच्या काळात विद्या व कला यांचा विकास झाला. नंदीवर्धन, प्रवरपूर, आणि पद्मपूरनगरी या वाकाटकांच्या 4 राजधान्या विदर्भातील होत्या.
वत्सगुल्म हे विद्या, कला व संस्कृतीचे फार मोठे केंद्र होते. वाकाटकांनी साहित्याच्या निर्मितीला प्रोत्साहन दिले. त्यांच्या काळात संस्कृत व प्राकृत वाङ्मय मोठ्या प्रमाणात निर्माण झाले.
वाकाटकांच्या मांडलिकांनी व अमात्यांनी अजिंठा, घटोत्कच व गुलवाडा येथील टेकड्यात जे विहार व चैत्य लेणी कोरविली त्याची भारतातच नव्हे तर जगात स्तुती होते.
के. पी. जयस्वाल यांनी 1933 मध्ये प्रसिद्ध केलेल्या ख्रिस्तोत्तर 150 ते 350 या काळातील ‘भारतीय इतिहास' या इंग्रजी ग्रंथाला नाग-वाकाटकांच्या साम्राज्याचा काळ असे नाव देऊन समुद्रगुप्ताच्या उदयापूर्वी 60 वर्षे वाकाटक नृपती हेच भारतात 'सम्राट' पदवीचे अधिकारी होते असे प्रतिपादले.
साहित्य, कला-स्थापत्य इ. क्षेत्रांत वाकाटकांनी जी प्रगती केली ती लक्षात घेता वाकाटकांचा कालखंड हा विदर्भाच्या इतिहासातील सुवर्णयुगाचा कालखंड मानला जातो.
वाकाटकांचे साहित्याच्या क्षेत्रातील योगदान :
वाकाटक राजे विद्या व कलांचे भोक्ते होते. वाकाटक राजे काव्यरचनेत मागे नव्हते. वाकाटक राजांनी त्यांच्या दरबारी इतर ललितकलांप्रमाणे काव्यनिर्मितीला उत्तेजन दिले होते. वाकाटकांच्या पूर्वचे सातवाहनादी राजांचे लेख हे प्राकृत भाषेत आहेत तर वाकाटकांचे बहुधा सर्व लेख संस्कृतमध्ये आहेत. राजांच्या दानपत्राबाबत संस्कृत भाषा हळूहळू प्राकृत भाषेची जागा घेत होती हे दिसते. वाकाटकांची सर्व दानपत्रे गद्यामध्ये धोपटमार्गाने लिहिली आहेत. वाकाटकांच्या उदार आश्रयामुळे वाकाटक काळी विदर्भात अनेक उत्कृष्ट संस्कृत काव्ये निर्माण झाली. पण ही काव्ये काळाच्या ओघात नष्ट झाली आहेत. वाकाटकांच्या राजवटीत प्राकृत काव्यालाही उत्तम बहर आला होता. स्वतः वाकाटक राजांनी उत्तम काव्ये व सुभाषिते रचली होती. वाकाटकांच्या वत्सगुल्म शाखेचा संस्थापक सर्वसेन याने 'हरिविजय' हे प्राकृत काव्य रचले होते. 'हरिविजय' सध्या उपलब्ध नाही. तथापि त्याचा विषय, भाषा, स्वरूप इ. विषयी बरीचशी माहिती नंतरच्या ग्रंथातील अवतरणांवरून मिळते. दण्डी याने 'हरिविजय' ची प्रशंसा केली आहे. श्रीकृष्णाने इंद्रावर स्वारी करून पारिजात वृक्ष भूतली आणला या कथानकावर 'हरिविजय' काव्याची रचना केली होती.
सर्वसेन या वाकाटक सम्राटाने गाथा लिहिल्या होत्या. त्या गाथा सातवाहन सम्राट हाल याने लिहिलेल्या 'गाथा सप्तसई' या ग्रंथात समाविष्ट करण्यात आल्या आहेत. सर्वसेन व त्याचे वंशज यांच्या राजवटीत वत्सगुल्म हे विद्येचे मोठे केंद्र बनले होते.
वाकाटकांच्या नंदीवर्धन शाखेचा प्रमुख द्वितीय प्रवरसेन याने 'सेतुबंध' हे प्राकृत भाषेत काव्य लिहिले. अनेक संस्कृत कवींनी या काव्याची मुक्तकंठाने स्तुती केली आहे.
बाणभट्ट याने 'हर्षचरित' या ग्रंथात या काव्याची स्तुती केली आहे. बाणभट्टाने 'सेतुबंध' चा गौरव करताना म्हटले आहे की, "ज्याप्रमाणे रामचंद्राची वानरसेना सेतूयोगे समुद्र पार करून गेली, त्याप्रमाणे प्रवरसेनाची कीर्ती 'सेतुबंध' या काव्यसेतूयोगे समुद्र पार करून गेली.” दण्डीनेही या काव्याची स्तुती केली आहे.
वाकाटकांच्या काळातील उत्कृष्ट काव्यरचनेमुळे साहित्यशास्त्रात वैदर्भी काव्यरचनाशैलीस प्राधान्य मिळाले. कालिदासाचे 'मेघदूत' हे काव्य वैदर्भी रीतीचे उत्तम उदाहरण आहे. प्रभावती गुप्ताचा पुत्र दिवाकरसेन याने अनेक संस्कृत सुभाषिते रचली होती.
www.insearchofknowledge.org
View, Comments and share






0 Comments