स्वामी रामानंद तीर्थ ऊर्फ व्यंकटेश भगवानराव खेडगीकर : हैदराबाद मुक्तिसंग्रामाचे प्रणेते
3 ऑक्टोबर - जयंती
22 जानेवारी: स्मृतिदिन
बालपण आणि शिक्षण:
स्वामीजींचे मूळ नाव व्यंकटेश भगवानराव खेडगीकर, विजापूर जिल्ह्यातील सिंदगी हे तालुक्याचे गाव त्यांचे जन्मस्थळ. त्यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1903 रोजी झाला.
स्वामीजींचे मूळ घराणे विजापूर जिल्ह्यातील हंडी तालुक्यातील खेडगी या गावचे. खेडगी या नावावरूनच खेडगीकर हे नाव रूढ झाले. स्वामीजींच्या वडिलांना चार मुली व तीन मुले एवढी अपत्ये होती. त्यांचे वडील भवानराव खेडगीकर हे त्यावेळचे व्हर्नाक्युलर फायनल (सातवी) झालेले होते व सिंदगी येथे कानडी प्राथमिक शाळेत बरीच वर्षे मुख्याध्यापक म्हणून काम करीत होते.
स्वामीजींचे प्राथमिक शिक्षण सिंदगी व गाणगापूर येथील प्राथमिक शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण हे सोलापूरच्या नॉर्थकोट हायस्कूलमध्ये झाले. ते सरकारी हायस्कूल होते. तेथील वसतिगृहात वाढप्याचे काम करून त्यांनी आपला खर्च भागवला.
स्वामीजी देशभक्तीची ज्वलंत भावना घेऊनच अमळनेरच्या राष्ट्रीय महाविद्यालयात शिक्षणासाठी जुलै 1921 मध्ये आले. त्या महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. ज. ग.गुणे हे ब्रह्मचारी व आध्यात्मिक प्रवृत्तीचे होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा व कृतीचा फार मोठा प्रभाव स्वामीजींवर पडला. अमळनेर येथेच स्वामीजींना चिंतनाची, वाचनाची व आत्मनिरीक्षणाची सवय जडली. एक वक्ता म्हणून त्यांची जडणघडण तेथेच झाली. अमळनेर येथील संस्था बंद पडल्यामुळे स्वामीजी पुढील शिक्षणासाठी 1923 मध्ये पुण्यास टिळक महाराष्ट्र विद्यापीठात दाखल झाले. स्वामीजी आठवणीत लिहितात, 'अमळनेरने माझा आध्यात्मिक व मानसिक घाट घडविला तर पुण्यातील वास्तव्याने माझे बौद्धिक अस्तित्त्व साकार झाले?
x x
स्वामीजींचे उच्च शिक्षण :
पुणे येथील टिळक महाराष्ट्र विद्यापीठात बी. ए. साठी इतिहास, अर्थशास्त्र व राजनीतिशास्त्र हे त्यांचे ऐच्छिक विषय होते. पुढे 'लोकशाहीचा विकास' या विषयावर त्यांनी प्रबंध लिहिला व एम. ए. ची पदवी संपादन केली. पुण्यातील वास्तव्यात त्यांचे बौद्धिक अस्तित्त्व आकारास आले. पुण्यात शिक्षणकाळात स्वामीजींचे वाचन, लेखन, चिंतन, वक्तृत्व यास निश्चितच एक आकार प्राप्त झाला होता. याच वेळी पुण्यात गांधीजींवर उपचार चालू होते. गांधींची रुग्णालयात जाऊन स्वामीजींनी भेट घेतली होती.
स्वामीजींच्या लहानपणी झालेल्या संस्कार संस्कारामुळे अनेक कौटुंबिक पार्श्वभूमी यामुळे त्यांनी संन्यास घेतला व त्यानंतर भारतीय स्वातंत्र्यलढ्याकडे त्यांनी सहभाग घेऊन अतिशय चांगल्या पद्धतीने स्वातंत्र्यलढ्यात कामगिरी बजावली.
X X
स्वामी रामानंद तीर्थ यांच्यावरील संस्कार :
स्वामीजी चे कुटुंब कडवे वैष्णव पंथीय होते त्यामुळे वैष्णव पंथांचा जीवनावर खूप मोठा प्रभाव पडला.
स्वामीजींना विद्वत्तेबद्दल खूप आदर आणि कुठवर होते लहान वयात त्यांच्या गावी साधू वैरागी येत होते त्यामुळे त्यांची खूप गोड होती त्यांना ते नेहमी विचारायचे मला तुमच्यासारखा साधू व्हायचे आहे आणि ही त्यांची सुप्त इच्छा 1932 मध्ये पूर्ण झाली.
भारतातील विद्वान व स्वातंत्र्य लढ्यातील जे नेते होते त्यांचा स्वामीजींच्या जीवनावर खूप मोठा प्रभाव पडला लहानपणी त्यांनी स्वामी विवेकानंद आणि स्वामी रामतीर्थ यांचे चरित्र पुण्यात असताना विद्यार्थी दहशतच वाचले व त्यांच्या जीवनावर लोकमान्य टिळक महात्मा गांधी विनोबा भावे यांचा सुद्धा खूप प्रभाव पडला.
टिळकांच्या सोलापूर येथील सभेला (1919) जाण्यास मुख्याध्यापकांनी बंदी घातली असतानाही पेपर लवकर सोडून ते सभेला गेले होते. टिळकांच्या देशभक्तीने ते प्रभावीत झाले होते. असहकार चळवळीस प्रारंभ होताच त्यांनी 'गांधी टोपी' विकत घेतली होती. शाळेतील मुख्याध्यापकांनी ती काढण्याची सक्ती केली व छड्यांचा मारही दिला. पण यामुळे देशभक्तीचा संस्कारच त्यांच्यावर झाला. गांधींजी सोलापूरमार्गे दक्षिणेत जात असताना रेल्वे स्टेशनवर गांधीजींच्या चरणाला त्यांचा स्पर्श करता आला. देश स्वतंत्र होईपर्यंत स्वस्थ बसू नका, हे साध्य करण्यासाठी वाटेल तो त्याग करण्याची तयारी ठेवा या गांधीजींच्या उपदेशाचा त्यांच्या मनावर प्रभाव पडला होता.
लोकमान्य टिळकांचे निधन झाले त्यावेळेस ते खूप अस्वस्थ झाले होते टिळकांचा संदेश व त्यांचे कार्य याबद्दल त्यांना खूप प्रचंड आकर्षण होते व त्यांनी असा संकल्प केला की मी या क्षणापासून माझे पुढील जीवन पूर्णपणे मातृभूमीच्या सेवेसाठी अर्पण करील सर्वांग परित्या करून जन्म ब्रह्मचारी राहील व त्यानंतर त्यांचा जीवन प्रवास सुरू झाला
स्वामीजींनी विद्यार्थी दशेतच 300 ते 400 विद्यार्थ्यांची संघटना एका अध्यायाने उभे केली व या संघटनेत मातृभूमीच्या मुक्ततेसाठी आत्मसमर्पण करण्यासाठी तरुणांना देशभक्तीचे धडे व इतर मार्गदर्शन नेहमी करत असत सोलापूरला जेव्हा महात्मा गांधी येत असत त्यावेळेस ते वारंवार त्यांच्या दर्शनासाठी व भेटीसाठी जात असत.
x x
उत्कृष्ट कामगार संघटक (1926-28) :
भारतीय मजूर चळवळीचे जनक श्री. ना. म. जोशी यांना मदतनीस हवा होता. त्यासाठी त्यांनी 'भांडवल व श्रम' या विषयावर निबंध मागवले होते. स्वामीजींचा मार्क्सचा तत्त्वज्ञानाचा अभ्यास होता. अर्थशास्त्राचाही अभ्यास होता. स्वामीजींनी प्रस्तुत विषयावर लेख लिहून पाठवला. त्या निबंधावरच ना. म. जोशींनी स्वामीजींची सहायक म्हणून निवड केली. एप्रिल 1926 मध्ये मुंबईत गिरणी कामगारांची संघटना उभारण्याचे व केंद्र कार्यालयाचे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले. याच काळात कामगार संघटनेतील महत्त्वाच्या व्यक्तींशी त्यांचा संबंध आला होता. ना. म. जोशी यांना विधिमंडळात कामगारविषयक विधेयक मांडण्यास आवश्यक असणारी माहिती गोळा करण्यासाठी ते दिल्लीस गेले होते. आजारपणामुळे ना. म. जोशींचे मदतनीस हे काम त्यांना सोडून द्यावे लागले. पण हे आजारपण त्यांना वरदान ठरले. रुग्णशय्येवरील 18 महिन्यांचा काळ अंतर्मुख होऊन आत्मनिरीक्षण करून जीवनाचा अर्थ समजून घेण्यात गेला. पूर्ण एकांताची सवय झाली. ब्रह्मचाऱ्याचे जीवन जगावे अशी आंतरिक ओढ होती. वैवाहिक जीवनाचे आकर्षण त्यांना वाटत नव्हते म्हणूनच लग्नासंबंधीचे प्रस्ताव त्यांनी फेटाळले होते. आजारपणातून उठल्यानंतर ते पुन्हा गिरणी कामगारांच्या लढ्यात (सोलापूर) सामील झाले. परंतु कामगार कार्यकर्त्यांतील दुफळी, कामगार संघाची भरभराट न होणे यामुळे त्यांनी कामगार क्षेत्राचा त्याग करण्याल ठरवून शिक्षणक्षेत्रात प्रवेश केला.
x x
शैक्षणिक कार्य : हिप्परगा व अंबाजोगाई (1929-38)
जून 1929 मध्ये स्वामीजींनी सोलापूर सोडले व ते हैदराबाद संस्थानातील उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील हिप्परगा येथील राष्ट्रीय माध्यमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून दखल झाले.ते 6 वर्षे त्या पदावर होते. या सहा वर्षांत त्यांना मिळणारे महिना 50 रु. वेतन त्यांनी स्कूल फंडात जमा केले. पैशाची गरजच पडत नसे. हिप्परगा येथे दररोज 5 घरी भिक्षा मागून मंदिरात ते जेवण घेत. हिप्परगा येथे अनंतराव व व्यंकटराव कुलकर्णी यांनी हे निवासी हायस्कूल 1921 मध्ये सुरू केले होते. गुरुकुल पद्धतीवर ही संस्था सुरू होती. निझाम सरकाराची विविध क्षेत्रांतील दडपशाही स्वामीजी बारकाईने पाहत होते. स्वामीजींसह सर्व शिक्षक मंडळी रात्रीचे वर्ग प्रौढांसाठी चालवत आणि विद्यार्थ्यांना राष्ट्रभक्तीची व जनसेवेची प्रेरणा देत. स्वामीजी लिहितात, 'ही संस्था म्हणजे स्फोटक मानवी सामुग्री निर्माण करण्याचा एक जणू मोठा कारखानाच बनली होती. सरकारला हिप्परगा येथील शैक्षणिक प्रयोगाची कल्पना आल्याने शाळेभोवती गुप्तहेरांचे जाळे पसरवण्यात आले होते. हिप्परगा येथील आध्यात्मिक वातावरणाचा परिणाम स्वामीजींवर होत गेला. 14 जानेवारी 1932 रोजी स्वामीजींनी संन्यास घेण्यापूर्वी लखनौ येथे जाऊन संन्यासदीक्षा घेण्यासाठी नारायण स्वामी यांना निमंत्रित केले होते.
स्वामींनी नारायण स्वामी यांच्याकडून संन्यास धर्माची दीक्षा घेतली (1932) व त्यांनीच त्यांचे नाव बदलून 'स्वामी रामानंद तीर्थ' असे ठेवले. कुटुंबभावना गेली.त्याग, अपरिग्रह वाढला. वि.स.खांडेकरांनी या शाळेवर 'हिप्परग्याच्या माळरानावरील बाग' हा लेख 'किर्लोस्करा’त लिहिला. हिप्परग्याच्या शाळेत बाबासाहेब परंजपे, ह. रा. महाजनी, ग धों.देशपांडे, एस.आर.देशपांडे, के. के. देशपांडे, बा.गो. दाते, बाबूराव कानडे ही मंडळी शिक्षक होती. या शाळेत राजद्रोही तयार होतात असा अहवाल उस्मानाबादच्या कलेक्टरने निझामाला पाठवला होता.
स्वामीजी शिक्षक असताना त्यांनी विद्यार्थ्यांची आई होण्याचा प्रयत्न केला. मुलांच्या सुखदुखःशी एकरूप होणारा शिक्षक हाच खरा शिक्षक असतो अशी त्यांची धारणा होती. दारिद्र्य व अज्ञान घालवण्याचा एक उपाय म्हणजे शिक्षण होय असे स्वामीजी म्हणत.
1935 मध्ये स्वामीजी हे त्यांच्या काही सहकाऱ्यांसह बीड जिल्ह्यातील मोमिनाबाद (अंबाजोगाई) येथे आले.
स्वामीजींनी हिप्परगा सोडले यास काही कारणे होती :
1) हिप्परग्याची हवा त्यांना मानवत नव्हती. हिप्परगा येथे प्लेगची साथ आल्याने शाळा सोलापूरला हलविण्याचे ठरले होते.
2) हिप्परगा येथे अध्यात्माच्या नावावर बुवाबाजी सुरू झाली होती.
3) संस्थेचे चालक व शिक्षक यांच्यात मतभेद वाढत चालले होते.
4) स्वामीजींनी खेडे सोडून मोठ्या कार्यक्षेत्रात प्रवेश करावा असा त्यांच्या सहकाऱ्यांचा आग्रह होता.
5) संस्थाचालकांकडून काही अनिष्ट, अनैतिक प्रकार घडले होते.
X X
संस्था स्थापनेत योगदान:
अंबाजोगाई येथे श्री योगेश्वरी प्राथमिक विद्यालय 1918 मध्ये स्थापन झालेल्या पण मोडकळीस आलेल्या व हजेरी पटावर फक्त 12/15 विद्यार्थी असलेल्या पण शिक्षणखात्यातील नोंदीनुसार सुरू असलेल्या शाळेचे पुनरुज्जीवन त्यांनी केले. म्हणून शाळेचे नाव ‘श्री योगेश्वरी नूतन विद्यालय' असे ठेवले. व्यवस्थापक मंडळाच्या घटनेचा आराखडा त्यांनी तयार केला. वकील व काही व्यापारी मंडळीचे (18 जण) व्यवस्थापक मंडळ तयार केले. देणग्या मिळविल्या व विद्यार्थीही मिळवले. शाळेला सरकारी मान्यता मिळावी म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. शाळेच्या संख्येत दरवर्षी वाढ होत गेली. स्वतः स्वामीजी संस्थेसाठी भिक्षा मागत. शिक्षकवृंद हा अत्यंत विद्वान, अभ्यासू व कडवा राष्ट्रभक्त होता. हे विद्यालय राष्ट्रीय शिक्षण देणारे एक महत्त्वाचे केंद्र बनले. अनेक शिक्षकांना तुरुंगवास, हद्दपारीच्या शिक्षा व आर्थिक कोंडी करून ही संस्था नष्ट करण्याचा प्रयत्न निझाम सरकारने केला. संस्थेचा विकास होतच गेला.
पुढे याच संस्थेने 1956 मध्ये अंबाजोगाई येथे योगेश्वरी महाविद्यालय सुरू केले.1961 मध्ये कला-वाणिज्य शाखाही सुरू झाली.
स्वातंत्र्यपूर्व काळात मराठवाड्यात 10-12राष्ट्रीय शाळांना स्वामीजींची प्रेरणा होती.
नांदेडचे पीपल्स कॉलेज (1950)
मराठवाडा विद्यापीठ (1957)
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद येथे सुरू करण्यात त्यांचा पुढाकार होता.
शिक्षणातून मौलिक, भौतिक व नैतिक शक्तीचा विकास झाला पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. शिक्षणाने मनाची बौद्धिक प्रगती तर व्हावीच; पण त्याचबरोबर भावनिक उन्नयन (Maturity) व्हावे असे त्यांचे मत होते. शाळा-महाविद्यालयांच्या प्रांगणात संकुचित विचारांना मुळीच थारा असू नये असे त्यांनी म्हटले आहे.
x x
राजकीय क्षेत्रात कामगीरी :
राजकीय क्षेत्रात स्वामीजींनी ठरवून प्रवेश केला नव्हता. त्यांनी स्वत:च्या आत्मचरित्रात लिहिले आहे, 'राजकीय कार्य हे मी स्वतः निवडलेले नाही. मी त्या कार्याच्या शोधात कधीच नव्हतो....मी राजकीय क्षेत्रात ओढला जाईल अशी मला अंधुकशीसुद्धा कल्पना नव्हती.सभोवतालच्या परिस्थितीने मला त्या क्षेत्रात नेले. मी प्रत्येक गोष्ट जगन्नियंत्यावर सोपविली होती. हैदराबाद स्वातंत्र्य आंदोलनामुळे मी राजकीय चळवळीत पडलो. स्वामीजींचे स्नेही व सहकारी यांचा असा आग्रह होता की, स्वामीजींनी प्रत्यक्ष राजकारणात यावे. स्वामीजींनी आठवणीत असे म्हटले आहे की, 'त्यांना राजकारणात आणणारे आ. कृ. वाघमारे हेच पहिले गृहस्थ आहेत.
1937-38 मध्ये स्वामीजी हे शैक्षणिक कार्याकडून राजकीय कार्याकडे वळले. महाराष्ट्र परिषदेच्या माध्यमातून त्यांचा संपर्क वाढत गेला. कर्नाटक परिषद, आंध्र परिषद त्याचप्रमाणे महाराष्ट्र परिषद ही 1937 मध्ये स्थापन झाली.
काँग्रेसवर बंदी टाकल्यानंतर महाराष्ट्र परिषदेचे पहिले अधिवेशन परतूर येथे गोविंदराव नानल यांच्या अध्यक्षतेखाली 1937 मध्ये झाले.
महाराष्ट्र परिषदेचे दुसरे अधिवेशन लातूरला (1938), तिसरे उमरीला (1941), चौथे, पाचवे व सहावे अनुक्रमे औरंगाबाद (1943), सेलू (1945) व लातूर (1946) येथे भरले.
श्रीनिवास शर्मा, दिगंबरराव बिंदू, श्रीधर नाईक, आ.कृ.वाघमारे वगैरेंनी या परिषदांचे अध्यक्षपद भूषविले.या सर्व अधिवेशनांतून शेती व शेतकरी, कुळ कायदा, शिक्षण, सावकारशाही, नागरिक स्वातंत्र्यावरील बंधने, लेव्हीची सक्ती, विणकरांचे प्रश्न आदी विषयांवर चर्चा झाली.
लातूरच्या महाराष्ट्र परिषदेच्या अधिवेशनातच स्वामीजींना महाराष्ट्र परिषदेचे चिटणीसपद स्वीकारावे लागले.
9 जून 1938 रोजी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना झाली. त्यानंतर लगेचच निझाम सरकारने त्यावर बंदी घातली. स्वामीजींनी अंबाजोगाई सोडले आणि राजकीय क्षेत्रात प्रवेश केला.
राजधानीत जाऊन संघटना उभी करण्याचा विचार होता; पण हैदराबादला कोणी खोली देईना, पैसाही नव्हता. पण एक मित्र न्यायाधीश होते. त्यांनी जागा दिली. मराठवाड्यातील कार्यकर्ते स्वामीजींच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊ लागले. प्रांतीय परिषदांची अधिवेशने होत असली तरी राज्यव्यापी राजकीय संघटना स्थापन करण्याची गरज कार्यकर्त्यांना वाटत होती. त्यातूनच हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना झाली. पण जुलै 1938 मध्ये निझाम सरकारने त्यावर बंदी घातली.
मराठवाड्यात सत्याग्रहींची नोंदणी मोठ्या प्रमाणावर झाली होती. स्वामीजींनीच गोविंदराव नानल यांना स्टेट कॉंग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्याची विनंती केली. ती त्यांनी मान्य केली. स्टेट काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. 27 ऑक्टोबर 1938 रोजी गोविंदराव नानल यांच्या अध्यक्षतेखाली सत्याग्रह करण्यात आला होता. सत्याग्रहींना एक महिना तुरुंगवासाची शिक्षा झाली. पण स्वामीजींना मात्र दीड वर्षाची सक्तमजुरी झाली. परंतु हिंदुत्ववाद्यांनी ‘हिंदू नागरिक हक्क मंडळ व आर्य समाजाने 'आर्यन डिफेन्स लीग' तर्फे सत्याग्रह सुरू केल्यामुळे गांधीजींनी हैदराबाद स्टेट काँग्रेसच्या नेत्यांना वर्ध्याला बोलावून घेतले व सत्याग्रह स्थगित करण्यास सांगितले. स्टेट काँग्रेसने सत्याग्रह स्थगित करून आपले वेगळेपण सिद्ध केले. निझाम सरकारने सर्व सत्याग्रहींची सुटका केली. स्वामीजींनाही 10 एप्रिल 1938 रोजी तुरुंगातून सोडून देण्यात आले.
स्टेट कॉंग्रेस व तिचे कार्यकर्ते यांची दडपशाही करण्यासाठी निझाम सरकारने 'इतेहादुल मुसलमीन' या राजकीय व जमातवादी संघटनेत नवा प्राण ओतला. नवाब बहादूर यारजंग हे या संघटनेचे अध्यक्ष होते. बिदर शहर या संघटनेचा बालेकिल्ला होता. याच संघटनेमार्फत हिंदू-मुस्लिम यांच्यातील जातीय तणाव वाढवण्याचे प्रयत्न झाले.
ऑगस्ट 1940 मध्ये स्वामीजी वर्ध्याला गांधीजींसमवेत 8 दिवस होते. हैदराबादच्या प्रश्नावर विस्तृत चर्चा झाली. स्वामीजी म्हणतात, 'माझ्या ठिकाणीची अर्धवट, अस्थिर चंचल असलेली श्रद्धा महात्माजींनी दसपट दृढ केली. स्वामीजी हैदराबादला परत आले; परंतु 11 सप्टेंबर 1940 रोजी त्यांना व्यक्तिगत सत्याग्रही म्हणून अटक करण्यात आली. स्वामीजींच्या अटकेनंतर अनेकांनी सत्याग्रही म्हणून नावे नोंदविली; पण गांधीजींनी अच्युतराव देशपांडे, बीडचे हिरालाल कोटेचा, मोतीराम मंत्री व देवराम चव्हाण व जे.के.प्राणेशाचार्य (कर्नाटक) यांनाच वैयक्तिक सत्याग्रही म्हणून परवानगी दिली. स्वामीजी 15 महिने वैयक्तिक सत्याग्रही म्हणून तुरुंगात होते.
गांधीजींनी ऑगस्ट 1942 ला 'करा अथवा मरा' हा संदेश दिला. स्वामीजींनी सर्व शक्तीसह 42 च्या 'छोडो भारत' चळवळीत भाग घेण्याचे आवाहन केले. स्वामीजींना 16 ऑगस्ट 42 रोजी हैदराबाद येथे अटक झाली. त्यांच्या अटकेचा निषेध म्हणून हैदराबाद शहरात कडकडीत हरताळ पाळला गेला. संस्थानात इतर ठिकाणीही जनतेच्या संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. 16 डिसेंबर 1643 पर्यंत स्वामीजी हे हैदराबादच्या चंचलगुडा जेलमध्ये होते.
भारताप्रमाणे हैदराबादच्या मुक्तिलढ्यातही मवाळ व जहाल असे दोन गट पडले होते. स्वामीजी हे जहाल गटाचे नेतृत्व करीत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली बिगर कम्युनिस्ट राष्ट्रवादी परंतु जहाल शक्ती संघटित होऊ लागल्या. स्वामीजींचे नेतृत्व मानणारे कर्नाटक, तेलंगणा व मराठवाड्यात अनेक नेते होते मवाळांनी मात्र स्वामीजींच्या नेतृत्वास विरोध केला. त्यांना निझाम सरकारचा पाठिंबा होता. महाराष्ट्र, आंध्र व कर्नाटक या तीनही राजकीय परिषदांना एकत्र आणण्याचा प्रयत्न स्वामीजी व त्यांच्या अनुयायांचा होता. या तीन परिषदांची मिळून एक जॉइंट कोऑर्डिनेशन कमिटी नेमण्यात आली होती. बी. रामकृष्ण राव हे तिचे अध्यक्ष होते. जहाल व मवाळांच्या मतभेदांचे हे एक व्यासपीठ बनले होते. स्वामीजी व त्यांच्या जहाल गटाला वगळून मवाळांना वाटाघाटीस बोलावणे यामागे ब्रिटिशांची 'फोडा व झोडा' नीती होती.
1945-56नंतर स्वामीजींचा नेहरू-पटेल-आझाद या नेत्यांशी परिचय वाढत गेला. 1946 मध्ये हैदराबाद स्टेट काँग्रेसवरची बंदी उठवल्यानंतर स्टेट काँग्रेसच्या शाखा संपूर्ण संस्थानात स्थापन झाल्या. स्वामीजींचा जहाल किंवा पुरोगामी गट व मवाळ गट यांच्यात स्टेट काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी स्पर्धा सुरू झाली; पण स्वामीजी बी. रामकृष्ण राव यांचा 72 विरुद्ध 69 मतांनी पराभव करून स्टेट कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी निवडून आले. 1946-50 या काळात स्वामीजी हैदराबाद स्टेट कॉंग्रेसचे अध्यक्ष होते
16,17,18 जून 1947 रोजी हैदराबाद येथे स्टेट कॉंग्रेसचे अधिवेशन भरले. त्यास 10 ते 15 हजार लोकांची उपस्थिती होती. स्वामी रामानंद तीर्थ हे अधिवेशनाचे अध्यक्ष होते. ‘हैदराबाद संस्थान भारतीय संघराज्यात सामील झाले पाहिजे' असे त्यांनी भाषणात आग्रहाने मांडले. निझाम राज्य कायमचे स्वतंत्र होण्यासाठी जो लढा द्यायचा तो आताच द्या असे आवाहन त्यांनी केले. हैदराबादचे राज्यपाल नवाब अलियावर जंग यांनी स्वामीजींच्या भाषणातील काही मुद्यांवर आक्षेप घेतला होता.
नेहरू व पटेल यांच्या सल्ल्याप्रमाणे स्वामीजींनी हैदराबाद संस्थानातील जनतेस 7 ऑगस्ट 1947 हा दिवस हिंदी संघराज्यात संस्थान सामील करण्याचा दिन पाळण्याचा आदेश दिला. त्यास फारच उत्तम प्रतिसाद मिळाला. खुद्द स्वामीजींनी खांद्यावर तिरंगा ध्वज घेऊन हैदराबाद शहरात मिरवणूक काढली होती. 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वामीजींसह अनेकांनी तिरंगा ध्वज फडकावला म्हणून निझाम सरकारने त्यांना तुरुंगात टाकले. 30 नोव्हेंबर 1947 ला तुरुंगातून त्यांची सुटका झाली.
x x
स्वामीजी व तेलंगणा :
तेलंगणातील जमीनदारी, प्रचंड आर्थिक विषमता, शेतमजुरांचे प्रचंड शोषण या पार्श्वभूमीवर तेथे कम्युनिस्ट चळवळ सुरू झाली. तेलंगणातील शेतकरी-शेतमजूर हे अत्यंत कष्टाळू व विनम्र होते. ते दारिद्र्यात जीवन कंठत होते. कम्युनिस्टांनी सशस्त्र गनिमी पथके उभारून जमीनदार व मध्यमवर्गावर दहशत बसविली होती. कम्युनिस्टांनी भूमिहीन शेतमजुरांना संघटित केले.त्यांनी किसान दले उभारली व जमीनदारांना जमिनीवरून हुसकावून लावण्याचा प्रयत्न चालविला. कम्युनिस्ट हिंसा करतात म्हणून सर्वत्र लष्कर पेरले गेले. साम्यवाद्यांचा बीमोड करण्याची मोहीम लष्कराने हाती घेतली. लष्कर व कम्युनिस्ट या दोघांच्या कचाट्यात जनता सापडली होती.स्वामीजी शेतकरी-शेतमजुरांची दुःखे जाणून घेण्यासाठी तेलंगणात धावून गेले. कम्युनिस्टांना जनता आश्रय देते म्हणून लष्कर जनतेला मारहाण करी.
स्वामीजींच्या मते, 'भारत सरकारने लष्कर मागे घ्यावे. कारण तेलंगणाचा प्रश्न आर्थिक विषमता व जमीनदारी आहे. ती दूर होत नाही तोपर्यंत कम्युनिस्टांवर बंदी घालून व त्यांना पकडून काही उपयोग नाही. साम्यवाद्यांचे मार्ग हे हिंसक व लोकशाहीविरोधक आहेत.' परंतु त्यांच्या विरोधकांनी स्वामीजी हे कम्युनिस्टधार्जिणे आहेत असा जाहीर आरोप केला. स्वामीजींना काँग्रेसमधून हाकलून देण्याचा तो डाव होता.परंतु स्वामीजी हे कधीच कम्युनिस्ट नव्हते तर ते अहिंसावादी म. गांधींचे अनुयायी होते.
स्वामीजींनी 'The Vision' हे इंग्रजी साप्ताहिक 1951-57 या वर्षात चालवले. वृत्तपत्र स्वातंत्र्याचे ते पुरस्कर्ते होते. प्रांत पुनर्रचनेचा आग्रह त्यांनी धरला. तेलंगणात जमिनीच्या मालकीची कमाल मर्यादा निश्चित करावी व 'कसेल त्याची जमीन' हे तत्त्व अमलात आणावे असे त्यांनी सुचविले. या दोन्ही बाबतीत कायदे करण्याचा मान हैदराबाद राज्याला आहे. भारतातील पहिला कुळ वाहिवाटीचा कायदा हैदराबाद राज्याने पास केला. त्यामागे स्वामीजींची प्रेरणा होती. पूज्य विनोबा भावे यांच्याशी स्वामीजींनी तेलंगणाच्या जमीनदारीच्या प्रश्नावर चर्चा केली. विनोबाजींनी भूदान यज्ञाची चळवळ तेलंगणापासूनच सुरू केली. भूदान चळवळीतही ते सहभागी झाले.
x x
स्वामीजी लोकसभा सदस्य :
स्वामीजी 1952 व 1957 मध्ये लोकसभेवर अनुक्रमे गुलबर्गा व औरंगाबाद येथून निवडून गेले.1952 मध्ये पं. नेहरूंनी स्वामीजींची काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीवर नियुक्ती केली होती. 1962 मध्ये लोकसभा निवडणूक लढवावी असा पं. नेहरूंचा त्यांना आग्रह होता. स्वामीजींना राज्यसभा सदस्यत्व देण्यासही नेहरूजी तयार होते; पण स्वामीजींनी नकार दिला होता व एका अर्थाने राजकारणातून निवृत्तीच घेतली होती. स्वामीजींचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होते म्हणूनच लोकसभेत ते प्रभाव पाडू शकले. स्वामीजी लोकसभेत बोलत तेव्हा सभागृहात सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित राहत. 'परराष्ट्र धोरण' हा त्यांचा आवडता विषय हाता. त्या विषयावरील लोकसभेतील चर्चेत ते भाग घेत. पं. नेहरूही स्वामीजींच्या भाषणाच्या वेळी लोकसभेत आवर्जून उपस्थित राहत. लोकसभेत स्वामीजींनी पं. नेहरूंच्या तटस्थतेच्या धोरणाचा सतत पुरस्कार केला. तरीही परराष्ट्र धोरणाच्या संबंधात 'हंगेरी'च्या बाबतीत पं. नेहरूंशी स्वामीजींचे मतभेद झाले होते.
X X
स्वामीजी व प्रांत पुनर्रचना :
भाषिक तत्त्वानुसार मराठवाडा महाराष्ट्रात, तेलंगणा आंध्र प्रदेशात व कानडी भाषिक प्रदेश कर्नाटकात विलीन व्हावा ही स्वामीजींची प्रारंभापासूनची भूमिका होती. 'एक भाषा एक प्रांत' या तत्त्वाचे स्वामीजी पुरस्कर्ते पण पं. नेहरूंची भूमिका मात्र भिन्न होती. ते म्हणत, बहुभाषिक हैदराबाद संस्थानाची एक वेगळी विशाल मानवतावादी संस्कृती निर्माण झाली आहे. भारतीय संस्कृतीचे एक छोटे रूप म्हणजे हैदराबाद संस्थान होय. हैदराबाद संस्थान विविध भाषा, धर्म, भिन्न चालीरीती, आदिवासींची संस्कृती (दख्खन संस्कृती) हे सर्व वैशिष्ट्यपूर्ण असून त्याचे जतन करावे या मताचे पं. नेहरू होते. विलीनीकरणाच्या प्रश्नावरून स्वामीजी व पं. नेहरू यांचे तीव्र मतभेद झाले. हैदराबादच्या विभाजनास पंडितजींचा विरोध होता. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक म्हणून ते हैदराबादकडे पाहत होते. 1953 मध्ये अ.भा. काँग्रेसचे अधिवेशन हैदराबादला भरले असता स्वामीजीनी स्वागताध्यक्ष म्हणून केलेल्या भाषणात पं. नेहरूंच्या उपस्थितीत हैदराबादचे शेजारच्या राज्यात विलीनीकरण करावे असे मत आग्रहाने मांडले.
14 डिसेंबर 1955 रोजी स्वामीजींनी लोकसभेत भाषण केले. या भाषणात त्यांनी भाषिक राज्याच्या मागणीचा पुरस्कार केला. विलीनीकरण व संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती या दोन्ही मुद्यांवर त्यांचे नेहरूंशी मतभेद होते. विरोधी भूमिका घेताना त्यांना मानसिक यातना सहन कराव्या लागल्या होत्या हे त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी मराठवाडा महाराष्ट्रात बिनशर्त सामील झाला. स्वामीजींनी नागपूर करारास मान्यता दिली. एवढेच नव्हे तर तिन्ही विभागांच्या प्रतिनिधींकडून तो मंजूर करून घेतला. स्वामीजींनीच नागपूर करारांतर्गत वैधानिक विकास मंडळाची मागणी केली होती. हैदराबाद विधानसभेने मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीला पाठिंबा देणारा ठराव एकमताने संमत केला होता. त्यामागे स्वामीजीच होते. लोकसभेतही मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्य कायम करण्यासाठी त्यांनी भाषणे केली होती. त्यांच्याच प्रयत्नांमुळे मराठवाड्यास पहिल्या पंचवार्षिक योजनेत 3 कोटींऐवजी 27 कोटी रु. अनुदान मिळाले.
x x
स्वामीजींचे विधायक कार्य :
1962 नंतर स्वामीजींनी स्वतःला विधायक कार्याला वाहून घेतले. त्यांनी खादी ग्रामोद्योग समितीचे काम हाती घेतले व हैदराबाद खादी समितीचे ते अध्यक्ष बनले. मेटपल्ली व औसा येथे खादीचे उत्पादन सुरू केले. स्वामीजींनी नांदेडचे पीपल्स कॉलेज व अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयाकडे विशेष लक्ष दिले होते. विनोबाजींनी तेलंगणात जी भूदान चळवळ केली त्याचा प्रारंभ स्वामीजींनी केला. तेलंगणाचा प्रश्न विनोबाजींनी स्वामीजींकडूनच समजावून घेतला होता.
गांधीवादी कार्यकर्ते व सर्वोदयी नेते पू. अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे म्हणतात की, 'आध्यात्मिक जीवनसाधनेचा मार्ग या दृष्टिकोनातून स्वामीजी विधायक कार्याकडे पाहत आले आहेत. वैचारिक दृष्टीने खादीच्या क्षेत्रात अखिल देशाला एका नवीन दिशेला नेण्याचे कार्य बोटावर मोजण्याएवढे लोक करीत आहेत. त्यात स्वामीजी आहेत. त्यांनी हैदराबाद खादी समितीचे काम उत्कृष्टपणे केले.
खादीशिवाय राष्ट्रभाषा प्रसार कार्यातही त्यांनी रस घेतला. कुष्टरोग निर्मूलनाच्या कार्यानेही त्यांचे लक्ष वेधून घेतले.1965 नंतर सक्रिय राजकारणातून जीवन निवृत्तीची तीव्रता त्यांच्या मनात वाढत गेली.ते निवृत्त झाले व ते केरळमधील पितापुरम आश्रमात अध्यात्म साधनेसाठी निघून गेले.
जयप्रकाश नारायण व विनोबाजींच्या सहाकार्याने त्यांनी केरळमध्ये पितापुरम येथे 'स्वामी रामतीर्थ इन्स्टिट्यूट ऑफ पीस' या संस्थेची स्थापना केली.
x x
निधन:
1971 मध्ये स्वामीजी पक्षाघाताच्या आजारास बळी पडले. त्यांना केरळातील हवामान मानवत नाही म्हणून अंबाजोगाईला हलवावे असा डॉक्टरांनी सल्ला दिला. पण अंबाजोगाईलाही त्यांची प्रकृती बिघडली म्हणून त्यांना हैदराबादला हलवले.डॉ.मेलकोटे, आंध्रचे तेव्हाचे मुख्यमंत्री पी. व्ही. नरसिंह राव यांनी औषधोपचार देऊन प्रकृती सुधारण्याची पराकाष्ठा केली; पण त्यांना यश आले नाही. मृत्यूपूर्वी त्यांनी औषधोपचार बंद करावा असा आग्रह धरला होता. आपला अंतकाळ जवळ आल्याचे त्यांना कळून चुकले होते. 22 जानेवारी 1972 रोजी त्यांचे निधन झाले. स्वामीजी हैदराबादेत बेगमपेठ येथे राहत होते.त्याच जागी त्यांची समाधी बांधली गेली.
स्वामीजींनी सर्वधर्मसमभावासह धर्मनिरपेक्षतेचा विचार निष्ठा म्हणून स्वीकारला होता. धर्मनिरपेक्षता, लोकशाही, समाजवाद, व्यक्तिस्वातंत्र्य, मूल्याधिष्ठित राजकारण इ. चा त्यांनी सतत आग्रह धरला. स्वामीजी ऋजू व विनयशील असले तरी 'मोडेन पण वाकणार नाही' अशी त्यांची निष्ठा होती. शिक्षणातून सामाजिक जाणिवा, मानवतावादी दृष्टिकोन निर्माण झाला पाहिजे असे ते म्हणत.
मराठवाडा महाराष्ट्रात बिनशर्त सामील केला. एस. एम. जोशींच्या मते, 'स्वामी रामानंद तीर्थ यांचे नाव भारतात प्रादेशिक ऐक्य आणि लोकशाही यांच्यासंदर्भात सुवर्णाक्षरांनी लिहावे लागेल. त्यांची स्वत:ची मते होती. पं. नेहरूंच्या उपस्थितीत नेहरूजी विलीनीकरणास अनुकूल नसतानाही तशी जाहीर मागणी त्यांनी केली होती.
हैदराबादच्या मुक्तीनंतर स्वामीजी व त्यांच्या गटाला कॉंग्रेस व सत्तेपासून मुद्दामच दूर ठेवले होते. हैदराबादमधील मवाळ गटाला सरदार पटेलांचा पाठिंबा होता. स्वामीजी स्वतः निर्भयपणे जगले व 'निर्भयपणे जगा' हा संदेश त्यांनी दिला. मराठवाड्यात शैक्षणिक चळवळ उभी करून संस्थात्मक जीवनाचा पाया त्यांनी घातला. स्वामीजी हे हैदराबादच्याच नव्हे तर भारतीय इतिहासात आधुनिक काळात अमर ठरलेले, इतिहासावर स्वत:चा प्रभाव व ठसा निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व होते यात शंकाच नाही.
स्वामीजी हाडाचे शिक्षक होते. राष्ट्रीय शिक्षण संस्थांच्या (हिप्परगा, अंबाजोगाई) माध्यमातून देशभक्तांची एका पिढी त्यांनी तयार केली. ते दृष्टे राजकीय नेते होते. राजकारणाला नीतिमत्तेचा पाया असला पाहिजे अशी स्वामीजींची श्रद्धा होती. ते एक कुशल संघटक होते. म्हणूनच एकनिष्ठ कार्यकर्त्यांची एक फौजच त्यांनी चळवळीच्या काळात उभी केली. 'हैदराबाद मुक्तिलढ्यातील माझ्या आठवणी' या आत्मचरित्रपर ग्रंथात त्यांनी निष्ठावंत सहकारी या शीर्षकाचे एक प्रकरण लिहिले आहे त्यागी व समर्पित अशा कार्यकर्त्यांचा एक संचच त्यांनी निर्माण केला. होता. स्वामीजींमुळेच मराठवाडा म्हणजे 'स्वातंत्र्यशक्तीचे स्त्रोत' संबोधला जाऊ लागला. स्वामीजींच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्यशक्तीचे भिन्न भिन्न विचारसरणीचे कार्यकर्ते हैदराबाद मुक्ती आंदोलनात काम करू शकले.
खा. अंकुशराव घारे यांनी, 'स्वामीजी हे हैदराबाद संस्थानचे गॅरिबाल्डी होते' असे म्हटले आहे.
संसद सदस्य डॉ. मेलकोटे यांनी स्वामीजींचा उल्लेख 'कर्मयोगी' या शब्दांत केला आहे.
'कर्मयोगी संन्यासी' या ग्रंथात न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर लिहितात, 'स्वामीजींच्या हातून जे घडले होते ते इतिहासाने नोंद घेण्यासारखे आहे. अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्याची प्रेरणा देऊन एक हतबल समाजाला त्यांनी जागे केले होते.
विचारवंत व प्राचार्य नरहर कुरुंदकर यांच्या मते, 'स्वामी रामानंद तीर्थ हे स्वामी विवेकानंद, स्वामी दयानंद, स्वामी रामतीर्थ यांच्या परंपरेतील संन्यासी होते.'
एस. एम. जोशी यांच्या मते, 'स्वामी रामानंद तीर्थ यांचे नाव भारतात प्रादेशिक ऐक्य आणि लोकशाही यांच्यासंदर्भात सुवर्णाक्षरांनी लिहावे लागेल.'
प्राचार्या ताराबाई परांजपे यांच्या मते, 'स्वामीजी हे निर्मोही, निर्लोभी, निःस्पृह, निष्कलंक तसेच स्वच्छ चारित्र्याचे व निगर्वी वृत्तीचे होते.' स्वामीजी जसे गांधीवादी होते तसेच लोकशाही समाजवादीही होते. जबाबदार राज्यपद्धतीच्या कल्पनेत राजकीय आशयाच्या बरोबर सामाजिक व आर्थिक आशय भरण्याचे प्रयत्न स्वामीजींच्या नेतृत्वाखाली झाले. हैदराबाद मुक्तिलढा शेवटपर्यंत राष्ट्रवादी व धर्मनिरपेक्ष राहिला याचे श्रेय स्वामीजींच्या नेतृत्वाला आहे. स्वामीजींचे नेतृत्व उदयास आले नसते तर मराठवाडा मुक्त होण्यासाठी किंवा हैदराबाद संस्थानांचे विसर्जन होण्यासाठी किमान 10-15वर्षे वाट पाहावी लागली असती. भा
पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांनी म्हटले होते, 'स्वामीजी माझे सर्वस्व होते.
view, Comments and Share.....


7 Comments
Very nice information
ReplyDelete👍
ReplyDeleteखूप छान माहिती दिली सर
ReplyDelete👍
ReplyDeleteVery nice👍
ReplyDeleteReally the author has published detailed information on Swami Ramanand Teerth which is a good collection, compilation and evidential presentation.
ReplyDeleteवाह सर, आपले लेखन कौशल्य, ब्लॉग लेखनातील सातत्य त्यासाठी चा रिसर्च आणि मुद्देसूद मांडणी नेहमीचं प्रेरक ठरते 🙏
ReplyDelete