Madgulkar G. D.: Marāthi poet, lyricist, writer and actor
ग. दि. माडगूळकर तथा गजानन दिगंबर : प्रसिद्ध गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते व "महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी"
जन्मदिन: 1 ऑक्टोबर
स्मृतिदिन: 14 डिसेंबर
बालपण आणि शिक्षण:
प्रसिद्ध गीतकार, कवी, लेखक, पटकथाकार, अभिनेते व गीतरामायणा'मुळे "महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी" गजानन दिगंबर माडगूळक साहित्यक्षेत्रात आणि जनमानसात 'गदिमा' म्हणून प्रसिद्ध होते.
माडगूळकरांचा जन्म 1 ऑक्टोबर 1919 रोजी शेटेफळ ता. आटपाडी, जि सांगली येथे झाला. वडील दिगंबर बळवंत माडगुळकर व आई बनुताई दिगंबर माडगुळकर होत्या.
शिक्षण आटपाडी, कुंडल, औंध संस्थानात झाले. आटपाडी हे सोळाव्या शतकापासून विजापूरच्या आदिलशाही राज्यात होते. नंतर ते औंध संस्थानात आले. हे गाव आटपाडी-महाल म्हणून ओळखले जात होते.
आटपाडीने महाराष्ट्राला 'गदिमा' त्यांचे कथाकार आणि ग्रामीण जीवनदर्शन घडविणारे धाकटे भाऊ व्यंकटेश आणि शंकरराव खरात असे तीन साहित्यिक दिले.
आयुष्यभर त्यांच्यावर आईच्या (बनुबाई) अभंग, ओव्यांचा, स्वाभिमानी असण्याचा व वडिलांच्या प्रामाणिकपणाचा, कष्टाळू पणाचा, अशा सर्व सुसंस्कारांचा खोल परिणाम होता.
माडगूळला, महाराष्ट्रात त्या काळी असलेली बारा बलुतेदार पद्धती होती. गल्ल्यांची नावेही जातिवाचक ब्राह्मणगल्ली, वाणीगल्ली, कासारगल्ली, कुंभारगल्ली, परीटगल्ली अशी होती. माडगूळकरांचे शेतातले घरही 'बामणाचा पत्रा' म्हणून ओळखले जायचे.
X X
लहानपणी माडगूळकरांचे सायन्स व गणिताशी सख्य नव्हते; पण प्रतिभेचे लेणे होते. अंगात अभिनय व नाट्यगुण होते. त्याची औंधच्या महाराजांना व शिक्षकांना कल्पना होती. ह्या प्रतिभेमुळे आणि कष्ट, जिद्द व सुसंस्कारांमुळे ते महाकवी म्हणून ओळखले गेले.
घरी अठराविसे दारिद्र्य. घरामध्ये 'गदिमा' सगळ्यांत मोठे. आईवडिलांचे कष्ट कमी करायला हवेत, भावंडांना आर्थिक मदत करून कुटुंब वर आणायला हवे हा विचार लहानपणापासून त्यांच्या मनात होता.
वडिलांचे पायी जायचे कष्ट वाचावे म्हणून लक्ष्मणराव किर्लोस्करांकडे 'हिशेबाचे काम मला द्या. वडिलांऐवजी मी ते काम करीन', असे सांगायला 'गदिमा' गेले, तेव्हा ते फक्त इयत्ता चौथीत होते.
अभ्यासाची ठरावीक पठडी पार न करू शकल्याने गदिमा मॅट्रिक उत्तीर्ण होऊ शकले नाहीत. त्यांच्या तरुणपणाचा काळ हा स्वातंत्र्यपूर्व काळ होता. स्वातंत्र्यचळवळीने भारण्याचे ते दिवस होते. शिवाय औंधच्या शाळेचे संस्कार होते.
X X
जीवनप्रवासात महात्मा गांधीजींचा प्रभाव :
फैजपूर काँग्रेसला शेतकऱ्यांची प्रचंड उपस्थिती व त्यांचे गांधीजींवरील प्रेम बघून ते प्रभावित झाले. मित्रामुळे त्यांनी नीरा आश्रमात सूतकताईपासून मैला वाहण्यापर्यंत सर्व सेवाभावी कामे केली.
बेळगाव काँग्रेसला गांधीजी जात असताना नीरा स्टेशनवर त्यांची प्रत्यक्ष भेट झाली. गांधीजींनी निधी मागितला, तर तिथल्यातिथे थोड्या घोषणा, थोडे भाषण असे करून त्यांनी निधी जमवून दिला. शंकरराव देवांनी सांगितल्यावरून कुंडलला जाऊन त्यांनी प्रौढशिक्षणाचे वर्ग चालविले.
गांधी व काँग्रेस यांच्या संयुक्त सहवासाचा परिणाम म्हणून 'वंदे मातरम्' सिनेमासाठी 'वेदमंत्राहुनी आम्हां वंद्य वदे मातरम्'अशी गीते पुढे लिहिली गेली.
कुंडलमध्ये समाजकार्य चालू होते पण अर्थार्जनाचा पत्ता नव्हता. 'हरिश्चंद्राचे पुण्य गाठीला मारायला आधी धन जमवावे लागते' अशा अर्थाचे आईचे बोलणे व कमवत नाही म्हणून हितचिंतकाचे त्याच दिवशी बोलणे मनाला लागून त्यांनी पुण्याचा रस्ता धरला.
पुण्यात 'दीनबंधू' साप्ताहिकात त्यांनी नोकरी धरली; पण गांधीजींच्या विरोधात न लिहिण्याची तत्त्वनिष्ठा आड आली. त्यांनी स्वतःच्या मतांसाठी नोकरी सोडली. पराडकरांची 'सुगंधी धूप सोंगटी' ते विकू लागले.
अशा वेळी त्यांना त्यांचे पूर्वीचे औंधच्या शाळेचे मुख्याध्यापक भा. वि. काळे भेटले. काळे सरांनी माडगूळकरांमधील कलागुण ओळखलेले होते. त्यांनी आचार्य अत्र्यांना गदिमांसाठी चिठ्ठी दिली.
X X
कोल्हापूरला मराठी चित्रपसृष्टीतील कर्तृत्व:
अत्र्यांची व गदिमांची भेट मार्च 1938 मध्ये झाली. आचार्य अत्रे 'झेंडूच्या फुलां'मुळे कीर्तीच्या शिखरावर पोहोचले होते. त्यांनी माडगूळकरांना कोल्हापूरला मा. विनायकांकडे जायला सांगितले. आणि 'ब्रह्मचारी' सिनेमापासून गदिमांची चित्रपट कारकीर्द सुरू झाली.
येथून पुढे 157 मराठी आणि 23 हिंदी चित्रपटांच्या श्रेयनामावलीत पटकथालेखक, संवाद, अभिनेते, कशात ना कशात श्रेयनामावलीत आणि रसिकांच्या हृदयात गदिमांचे नाव कायम विराजमान झाले.
कोल्हापूरमध्ये असतानाच प्रसिद्ध लेखक वि. स. खांडेकर यांचे लेखनिक म्हणून काम करण्याची संधी गदिमांना मिळाली. त्या निमित्ताने त्यांच्या पाठीवर शाबासकीचा हात व 'लेखन करा, यशस्वी व्हाल' हा आशीर्वाद त्यांना मिळाला.
लेखनाबद्दल ओढ, व्यासंगाची गोडी वाढली. 'ब्रह्मचारी'त बाबूराव पेंढारकरांच्या बापाची भूमिका केली. त्याचे पुढे व्ही. शांताराम यांनी कौतुक केले.
बाबूरावांनी त्यांना 'नवहंस' या संस्थेत स्टाफवर 'कवी' म्हणून घेतले, तेथे नव्या विचारांचे व अभ्यासू दिग्दर्शक विश्राम बेडेकरांशी त्यांचा संपर्क आला.
'पहिला पाळणा' या चित्रपटासाठी गदिमांनी लिहिलेली सर्व गीते बाबूराव व विश्राम बेडेकरांना पसंत पडली. रसिकांकडूनही पसंतीची पावती मिळाली.
'हंस' नंतर मा. विनायकांनी 'प्रफुल्ल पिक्चर्स' काढले. त्यातही त्यांनी गदिमांना स्थान दिले. एच. एम. व्ही. कडून म्हणून त्यांना मागणी होतीच. शिवाय हंसमधील पूर्वीचे खजिनदार वामनराव कुलकर्णी यांनी 'मंगळचित्र' संस्था काढली होती.
त्यात 'जयमल्हार', 'जिवाचा सखा या चित्रपटांचे नामांकन, पटकथालेखन, गीते, संवाद हे सर्व गदिमांवर सोपविले होते.
याच वेळी भालजी पेंढारकरांशी त्यांचा संपर्क आला.
'भक्त दामाजी' या भालजींच्या चित्रपटातील गाणी गदिमांना करायला मिळाली. आणि या वेळेपासून अभिनय, उत्तम शब्दकला आणि देवदत्त प्रतिभेच्या जोरावर वाङ्मयाच्या सर्व क्षेत्रांत माडगूळकरांचा यशस्वी संचार सुरू झाला.
X X
भक्त दामाजी', 'संत जनाबाई'ची गीते लिहिणारे गदिमा आणि 'रामजोशी'मधील सवाल-जवाब लिहिणारे गदिमा एकच का अशी शंका यावी, इतकी प्रतिभेची विविधता त्यांत आहे.
तमाशा चित्रपटांचे एक नवे पर्व 'रामजोशीं'च्या रूपाने गदिमांनी सुरू केले. 'लाखाची गोष्ट', 'पेडगावचे शहाणे' व 'रामजोशी'मधील त्यांच्या भूमिकाही गाजल्या.
'सवाल-जबाब' हा शाहिरी प्रकार रामजोशीत आणून त्यांनी 'रामजोशी' चित्रपटाची सांस्कृतिक बाजू उंचावली.
'माझ्या व्हटाचं डाळिंब फुटलं', 'काठेवाडी घोड्यावरती पुढ्यात घ्या हो मला'
ह्या त्यांच्या लावण्या गाजल्या.
'जगाच्या पाठीवर' मधील
'उद्धवा, अजब तुझे सरकार',
'एक धागा सुखाचा'मधील
'थकले रे नंदलाला',
'बाई मी 'विकत घेतला श्याम',
'विठ्ठला तू वेडा कुंभार'
इत्यादी गीतांमधून त्यांची नादमधुरता, गेयता, लयकारी ही सारी वैशिष्ट्ये दिसतात.
कोल्हापूरच्या 'हंस', 'नवहंस', 'प्रमुख चित्रपटकंपन्या बंद पडल्या.
1948 साली पेंढारकरांचा सुसज्ज स्टुडिओ आगीत जळाला आणि मराठी चित्रपटसृष्टी पुण्याकडे वळली.
X X
हिंदी चित्रपटांसाठी कथा लेखन:
गदिमांनी मराठी चित्रपटांसोबत हिंदी चित्रपटांसाठीही लेखन केले.
यामध्ये व्ही. शांताराम यांचा
1.‘दो आँखे बारह हाथ’
2. ‘नवरंग’
3. ‘गुंज उठी शहनाई’
4. ‘आदमी सडक का’
5. ‘तुफान और दिया’
यासारख्या हिंदी चित्रपटांचा समावेश होतो.
1. गुरुदत्त यांच्या गाजलेल्या ‘प्यासा’
2. राजेश खन्नाचा ‘अवतार’ व
3. अमिताभ-राणी मुखर्जीच्या ‘ब्लॅक’ची मूळ कथाही गदिमांचीच होती.
X X
गीतरामायणची निर्मित:
'संत जनाबाई' च्या वेळी प्रभातच्या स्टाफवर गदिमा होते.
प्रभात समये पातला आता जाग बा विठ्ठला
ही काकड आरती गाजली होती.
कोल्हापूरपासूनच राम ऊर्फ सुधीर फडके त्यांच्या बहुतेक गीतांचे संगीत दिग्दर्शक होते.
पुण्याच्या श्रीविजय पिक्चर्सने 'सीतास्वयंवर' काढले.
त्यातील
'मनोरथा चल त्या नगरीला,
एक गुपित सांगते गई,
है बदन तुझे की कमळ निळे?'
ही गदिमांची गाणी म्हटली जात असत.
शब्दसुरांची एक अलौकिक गीतांची वीणा गदिमा सुधीर फडके यांनी लावणी, काकड आरती, अभंग, भावगीत या सर्वांमध्ये दाखविली.
याच सुमारास पुण्यात रेडिओ स्टेशन सुरू झाले. आपली लेखणी पैसा देते; पण काळावरती कायमचा ठसा उमटवत नाही ही रुखरुख ह्या महाकवीला होती.
X X
'रामायणा'वर गीते करायला सीताराम लाडांनी भाग घातले व या रामभक्ताने भारतीय आदर्शांची ओळख करून देणारे, 56 गीते असलेले व्यक्तिचित्र, समूहगीत या विविध प्रकारांनी भरलेले 'गीतरामायण' लिहिले. त्यातील सर्वच गीते एकापेक्षा एक सुरेख, भारतीय संस्कृतीची ओळख करून देणारी आहेत.
स्वये श्रीरामप्रभू पासून शेवटपर्यंत बहुतेक गीते महाराष्ट्राच्या पिढीच्या ओठांवर आहेत.
गदिमांचे गीत रामायण हे फार गाजले 1 एप्रिल 1955 ते 19 एप्रिल 1956 पर्यंत पुणे आकाशवाणीने तो कार्यक्रम प्रसारित केला.
गीतरामायणाच्या गायनाचे शेकडो कार्यक्रम झाले. अन्य भारतीय भाषांत त्याचे अनुवादही झाले. त्यांना यासाठीच ‘महाराष्ट्र वाल्मीकी’ ही सन्माननीय पदवी लोकांनी स्वयंस्फूर्तीने दिली.
सुगंधी धूप विकणान्या ह्या महाकवीने पुढील पिढीसाठी भारतीय संस्कृतीचा हा धूप महाराष्ट्राच्या घराघरांतून दरवळत ठेवला आहे.
X X
साहित्य निर्मिती:
गदिमांनी त्यांच्या कारकिर्दीत 157 पटकथा आणि 2000 गाणी लिहिली.
उल्लेखनीय पुस्तकांमध्ये,
काव्यसंग्रह -
1. चार संगीतिका (1956)
2. काव्यकथा (1962)
3. गीत रामायण (1957)
4. गीत गोपाल (1967)
5. गीत सौभद्र (1968).
कथासंग्रह–
1. कृष्णाची करंगळी (1962)
2. तुपाचा नंदादीप (1966)
3. चंदनी उदबत्ती (1967)
कादंबरी–
1. आकाशाची फळे (1960)
आत्मचरित्रपर–
1. मंतरलेले दिवस (1962) आणि
2. वाटेवरल्या सावल्या (1981).
शिर्डीच्या साई बाबांची काकड आरती ही माडगूळकरांनी लिहिलेली आहे, या आरतीला सी. रामचंद्र यांनी अतिशय उत्तम चाल लावली आहे. या काकड आरतीसाठी गदिमांनी ‘रामगुलाम’ हे टोपणनाव घेतलं होतं.
X X
सन्मान व पुरस्कार:
1. 1957 मध्ये संगीत नाटक अकादमी चा उत्कृष्ट नाट्य लेखक पुरस्कार
2. 1969 मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार प्रदान केला.
3. 1969 मध्ये ग्वालेरला झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष
4. 1971 मध्ये विष्णुदास भावे सुवर्णपदकाचे मानकरी
5. 1973 मध्ये यवतमाळला झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष
त्यांच्या बऱ्याच गाण्यांना व चित्रपटांना महाराष्ट्र राज्य सरकारचे पुरस्कार मिळाले आहेत,सुगंधी वीणा, जोगिया (राज्य पुरस्कार), पूरिया, काव्यकथा, चार संगीतिका, चैत्रबन (राज्य पुरस्कार) दोन नृत्यनाटिका (राज्य पुरस्कार),
6. गीतसौभद्रः हिंदी, बंगाली, कानडी, तेलगू यांत भाषांतर झालेले 'गीतरामायण', 'वैशाखी' हे काव्य 14 लघुकथासंग्रह, 'मंतरलेले दिवस' हे राज्य पुरस्कारित आत्मचरित्र .
7. 'द टाळी ग घ टाळी' (बालवा केंद्र 3 पुरस्कार, दोन कादंबन्या, नाटक, असे विविध प्रकारचे वाङ्मय त्यांनी लिहिले.)
8. संगीत नाटक अकॅडमीने 1957चे अवॉर्ड ही त्यांना मिळाले होते. परंतु, सर्वसामान्यांना 'गदिमा' ज्ञात आहेत ते आधुनिक वाल्मिकी गीतरामायणकार म्हणूनच.
9. महाराष्ट्रात राज्यपाल नियुक्त आमदार, महाराष्ट्र विधान परिषद (1962-1974) मधिल कार्यकाल.
X X
निधन:
आधुनिक वाल्मिकी गीतरामायणकार महाकवी ग. दि. माडगूळकर तथा गजानन दिगंबर यांचे 14 डिसेंबर 1977 रोजी वयाच्या 59 व्या वर्षी त्यांच्या पुण्यातील निवास स्थानी निधन झाले.
त्यांच्या जन्मगावी, शेटेफळ येथे त्यांचे स्मारक आहे. दरवर्षी तेथे स्मृतिदिन साजरा होतो आणि महाराष्ट्राच्या मनामनांत ते गीतरामायणाने भरून उरले आहेत.
View, comments and Share.....


1 Comments
Nice
ReplyDelete