अण्णाभाऊ साठे : साहित्यसम्राट, लोकशाहीरलेखक, कवी व समाजसुधारक
जयंती: 1आगस्ट
स्मृतिदिन: 18 जुलै
लोकनाट्ये, नाटके व नाटिका
भाग-4
महाराष्ट्रात तमाशा ही अशा प्रकारची खास मराठी मातीतली कला आहे. अण्णा भाऊंनी लोकप्रिय केलेल्या, तमाशाच्या सुसंस्कृत प्रकाराला 'लोकनाट्य' म्हणून ओळखले जाते.
तमाशा या कलेला अण्णा भाऊंनी प्रेक्षक, काळ, परिस्थिती आणि संदर्भ यांना शोभेल, असे स्वरूप दिले. अशा प्रकारे अण्णा भाऊंनी तमाशा या पारंपारिक लोककला प्रकाराला एक नवीनच परिमाण दिले.
अण्णा भाऊंच्या घराण्याचा अनेक पिढ्यांपासून तमाशा कलेशी संबंध होता. स्वः अण्णा भाऊंनी नाना मानवेकर आणि बापू साठे यांच्या तमाशांमध्ये अभिनय केला होता.
याशिवाय 1960 पासून या कलाप्रकाराशी त्यांचा लेखक, दिग्दर्शक, अभिनेता अशा अनेक नात्यांनी अगदी जवळचा संबंध होता. त्यामुळे या कलाप्रकाराचे गुण, दोष आणि त्यातील अडचणी त्यांनी जवळून अनुभवल्या होत्या.
अण्णा भाऊंनी एकूण पंधरा लोकनाट्ये लिहिली. त्यांनी कलापथकासाठी लोकनाट्ये लिहिली व कलापथकाच्या कलाकारांसमवेत सादर केली.
'लाल बावटा' कलापथकासाठी अण्णा भाऊंनी लोकनाट्य, लावण्या, पोवाडे असे वाङ्मयप्रकार हाताळले. या कला पथकाने 1946 साली लोकनाट्यांचे प्रयोग करणे सुरू केले.
1947 ते 1962 या कालखंडात अण्णा भाऊंच्या लोकनाट्यांनी मराठी भाषक नाट्यरसिकांना वेड लावले होते.
X X
अण्णा भाऊंची उपलब्ध लोकनाट्ये, नाटके व नाटिका
1. अकलेची गोष्ट (1945)
1945 सालच्या अखेरीस अण्णा भाऊंनी 'अकलेची गोष्ट' हे आपले पहिले लोकनाट्य लिहून पूर्ण केले होते. ते 1946 साली रंगमंचावर आले. 'अकलेची गोष्ट' या लोकनाट्याच्या कलात्मक गुणवत्तेबाबत असे म्हटले जाते, की विषय, संवाद, प्रस्तुतीकरण, कलात्मकता व परिणामकारकता यांच्याबाबतीत ते उत्कृष्ट होते. शारीरिक श्रम करणाऱ्या कामगारांना अगदी सहज समजेल अशा भाषेत, शास्त्रीय परिभाषा न वापरता कार्ल मार्क्सची इतिहासाच्या उत्क्रांतीची संकल्पना समजावून सांगणे व सामाजिक बदलाच्या प्रक्रियेमधील कामगारांचे स्थान त्यांच्या मनावर ठसवणे हा या लोकनाट्याचा मुख्य उद्देश होता.
2. खापऱ्या चोर (1946)
ग्रामीण भागातील जमीनदार, सावकार आणि पारंपरिक व्यापारी यांचा अण्णा भाऊंना संताप होता, कारण बरेचदा हेच लोक सामान्य माणसाची पिळवणूक करीत. 'खापऱ्या चोर' या लोकनाट्यात अण्णा भाऊंनी या पिळवणूक करणान्यांना आपल्या टीकेचे व थट्टेचे लक्ष्य बनवले आहे.
3. देशभक्त घोटाळे (1946)
'देशभक्त घोटाळे' या लोकनाट्यात काँग्रेस पक्षाचे एक नेते श्री. घोटाळे यांच्यावर ताशेरे ओढलेले आहेत. देशभक्त घोटाळे हे पात्र पाखंडी, ढोंगी, वर्गदंभी आणि स्वार्थी असे आहे.
4. निवडणुकीत घोटाळे (1946)
'देशभक्त घोटाळे' या लोकनाट्यातील घोटाळे यांच्याच हास्यास्पद कारवायांचे वर्णन 'निवडणुकीत घोटाळे' या लोकनाट्यातही पुढे चालू रहाते. त्यामुळे, या दोन लोकनाट्यांना एकत्रितपणे 'घोटाळे संच' असे म्हणता येईल. 'निवडणुकीत घोटाळे' मध्ये श्री. घोटाळे कशा प्रकारे निवडणूक लढवतात व आणखीच गुंता करून ठेवतात हे दाखवले आहे.
X X
5. शेठजीचं इलेक्शन (1946)
'शेठजीचं इलेक्शन' हे लोकनाट्य 1946 सालच्या, स्वातंत्र्यपूर्व भारतातील निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर लिहिलेले आहे. या काळात भारत स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा होता. ती निवडणूक स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवरील पहिली निवडणूक असल्याने तिला खूप महत्व प्राप्त झाले होते.
6. बेकायदेशीर (1947)
'बेकायदेशीर' हे नाटक 1947 च्या निवडणुकांवर प्रकाश टाकते. पैशांचे पाठबळ असलेला शेठ मगरचंद हा उमेदवार निवडून येतो व पुढे मंत्रीसुद्धा होतो. तो ज्या मालक आणि भांडवलदार वर्गातून आलेला असतो, त्या वर्गाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी मगरचंद हा रघुनायकमल याच्या मालकीच्या गिरण्यांमधील कामगारांनी पुकारलेला संप बेकायदेशीर आहे असे जाहीर करतो. कामगारांना न्याय नाकारण्याचा प्रयत्न करतो. परंतु, शेवटी कामगार आपला संप अधिक तीव्र करतात व त्यामुळे सगळे गिरणीमालक घाबरून कामगारांच्या मागण्या मान्य करतात.
7. माझी मुंबई (1948)
'माझी मुंबई' हे लोकनाट्य भाषावार प्रांतरचनेच्या प्रश्नाच्या पार्श्वभूमीवर लिहिलेले आहे. त्या-त्या प्रदेशातील प्रमुख भाषेनुसार भाषावार प्रांतरचना व्हावी व ती प्रमुख भाषा ही त्या राज्याची भाषा असावी असे सरकारचे धोरण होते. त्यामुळे, मुंबई महाराष्ट्रात असावी की गुजरातमध्ये हा तीव्र वादाचा मुद्दा बनला. औद्योगिकदृष्ट्या प्रगत अशा या बेटावर दोन्हीही राज्ये आपला हक्क सांगत होती. भारताचे माजी पंतप्रधान कै. मोरारजी देसाई हे तेव्हा मुंबई राज्याचे मुख्यमंत्री होते. तत्कालीन मुंबई राज्यात आजची, महाराष्ट्र व गुजरात म्हणून ओळखली जाणारी दोन्ही राज्ये समाविष्ट होती. श्री. देसाई हे मूळचे गुजराती असल्याने, ते मुंबई गुजरातमध्ये समाविष्ट व्हावी या मताचे होते, पण मुंबई महाराष्ट्राला मिळावी हा महाराष्ट्रीयांनी आपल्या जीवन-मरणाचा प्रश्न बनवला व या मुद्द्यावर लढा देण्यासाठी महाराष्ट्रभर 'संयुक्त महाराष्ट्र चळवळ' ही सर्वमान्य चळवळ तीव्रपणे सुरू झाली.त्यातील 'काळ्या बाजाराचा पोवाडा' हा पोवाडा मात्र आजही ताजा व सद्य परिस्थितीला लागू पडणारा वाटतो. आपल्या देशातील सामान्य माणसाच्या वेदना अण्णा भाऊंनी या पोवाड्यात अतिशय परिणामकारकपणे व योग्यपणे चित्रित केल्या आहेत.
X X
8. मूक मिरवणूक (1949)
'मूक मिरवणूक' हे लोकनाट्य सामाजिक, आर्थिक आणि तत्सम समस्यांना उत्तरे शोधण्याच्या समाजवादी व साम्यवादी पक्षांच्या कार्यपद्धतींमधील फरक स्पष्ट करण्यासाठी अण्णा भाऊंनी लिहिले.
9. लोकमंत्र्याचा दौरा (1952)
'लोकमंत्र्याचा दौरा' हे लोकनाट्य 1952 साली महाराष्ट्रात झालेल्या राजकीय घडामोडींवर लिहिलेले आहे. 1952 मध्ये महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार पहिल्यांदा सत्तेवर आले. परंतु असे दिसले, की या मंत्रिमंडळातील बऱ्याचशा मंत्र्यांना सामान्य जनतेच्या समस्यांचे ज्ञान नव्हते. ते संधिसाधू होते आणि सामान्य जनतेच्या जीवनाशी त्यांचा प्रत्यक्ष संपर्क नव्हता. त्यामुळे मंत्री खऱ्या समस्यांऐवजी दुसऱ्याच प्रश्नांबद्दल बोलत व त्यांचा कळवळा खोटा असे. अशा प्रकारे 'लोकमंत्र्यांचा दौरा' मध्ये महाराष्ट्रातील 1952 सालच्या पहिल्या कॉंग्रेस मंत्रिमंडळाचे दोष दाखवलेले आहेत.
10. पुढारी मिळाला (1952)
'पुढारी मिळाला' या लोकनाट्याच्या जन्मामागे थोडा इतिहास आहे. प्रख्यात मराठी लेखक श्री. पु. ल. देशपांडे यांनी 'पुढारी पाहिजे' हे नाटक लिहिले होते. पु. लं. च्या या नाटकाला उत्तर म्हणून अण्णा भाऊंनी 'पुढारी मिळाला' हे नाटक लिहिले. कृष्णा नदीकाठच्या वाघिरे या गावातील गावकरी पुढाऱ्याच्या निवडीबाबत संभ्रमात असतात. शेवटी काँग्रेस, समाजवादी व इतर पक्षांनी देऊ केलेल्या पुढाऱ्यांऐवजी ते सत्तू नांवाच्या एका क्रांतिकारकाला आपला पुढारी म्हणून निवडतात.
X X
11. बिलंदर बुडवे
'बिलंदर बुडवे' ही नाट्यरचना 'बुडवे' आडनांवाच्या एका कावेबाज माणसाच्या फसवणुकीच्या कारवाया चित्रित करते. विनोदाची फोडणी असल्याने ही नाटिका अण्णा भाऊंच्या काळातील कामगारांमध्ये खूप लोकप्रिय होती.
12. पेंग्याचं लगीन
महाराष्ट्रातील कोकण विभागात रहाणाऱ्या व काम करणाऱ्या तिल्लोरी समाजाच्या कलाकारांसाठी अण्णा भाऊंनी 'पेंग्याचं लगीन' ही नाटिका कोकणी भाषेत लिहिली. या नाटिकेचा मूळ उद्देश भारतात आणि विशेषतः महाराष्ट्रात विवाहासंदर्भात प्रचलित असलेल्या अनिष्ट प्रथांचा उपहास करणे हा आहे. या अनिष्ट प्रथा म्हणजे लग्नसमारंभावर करावा लागणारा अनावश्यक असा प्रचंड खर्च आणि हुंड्याची प्रथा.
13. दुष्काळात तेरावा
14. इनामदार (नाटक, 1948)
1948 साली अण्णा भाऊंनी आपल्या लेखन-कारकीर्दीतील पूर्ण लांबीचे असे एकमेव नाटक लिहिले. ते नाटक म्हणजे 'इनामदार' हे नाटक त्यांच्याच 'वैर' या कादंबरीवर आधारीत आहे. एक जमीनदार आणि ज्यांच्या जमिनी जमीनदाराने बळकावल्या आहेत असे त्यांच्या गावातील अनेक गावकरी यांच्यामधील संघर्ष व शेवटी गावकऱ्यांचा जमीनदारावर विजय ही या नाटकाची मध्यवर्ती कल्पना आहे.
वगनाट्ये ही मुख्यतः दंतकथा, पुराणकथा, ऐतिहासिक कथा व महाराष्ट्रातील लोकप्रिय प्रेमकथांवर आधारलेली असत. अण्णा भाऊंच्या लोकनाट्यांपूर्वीची जुनी वगनाट्ये नल-दमयंती, हरिश्चंद्र-तारामती यांच्या कथांवर आधारित असत.
वगनाट्य हा तमाशाचा एक घटक असतो. तमाशाच्या प्रस्तुतीकरणाचा क्रम पुढीलप्रमाणे असे प्रथम 'गण' होई 'गण' म्हणजे कला आणि संस्कृतीचे दैवत असलेल्या गणेशाची प्रार्थना. त्यानंतर असे 'गवळण' कृष्ण आणि गवळणी यांच्यातील नर्मविनोदी भाषेतील तसेच हावभावांसहित थट्टामस्करी. गवळणी नंतर असे 'बतावणी' एकमेकांना फसवण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन व्यक्तींमधील विनोद निर्माण करणारा संवाद, आणि शेवटी 'वग' किंवा वगनाट्य.
अण्णा भाऊंनी आपल्या लोकनाट्यांमध्ये पारंपारिक तमाशापेक्षा मूलतःच वेगळेपण जपले व जोपासले. तमाशाचे कल्पनारम्य, अंधश्रद्धांचे समर्थन करणारे, धार्मिक आणि आध्यात्मिक असे मूळचे स्वरूप त्यांनी बदलले. त्यांनी भौतिक तसेच सामान्य लोकांसमोरील चालू व ज्वलंत समस्यांवर लोकनाट्ये लिहिली. तमाशामध्ये त्यांनी लोकांच्या समस्यांना उत्तरे शोधताना बोलणे आणि वागणे यांच्यातील सुसंगतपणा, शास्त्रीय दृष्टिकोण, निर्भयता या तत्त्वांचा समावेश केला, आणि तमाशाला समकालीन समस्यांच्या चर्चेसाठीचे एक खुले व्यासपीठ बनवले.
X X
देव-देवतांना 'गणा'च्या केंद्रस्थानी ठेवण्याचा तमाशाच्या पारंपारिक प्रथेऐवजी अण्णा भाऊंनी आपल्या लोकनाट्यांतील 'गणा' मध्ये छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक यांच्यासारख्या लोकनेत्यांना, तसेच सामाजिक बांधिलकी मानत असल्याने लोकांना आदरणीय वाटणाऱ्या ज्ञानेश्वर, तुकाराम यांच्यासारख्या संतकवींना केंद्रस्थानी ठेवले. आपल्या लोकनाट्यांमधून त्यांनी पारंपारिक तमाशातील सोंगाड्याला वगळले.
महिलांची थट्टामस्करी हा पारंपारिक तमाशाचा एक अविभाज्य भाग असे. परंतु अण्णा भाऊंनी आपल्या लोकनाट्यांमधून या प्रकारालाही पूर्णपणे काट दिली. महिलांनाही स्वाभिमान असतो व तो आपण जपायला हवा हे केवळ मान्य करून किंवा प्रतिपादन करून चालणार नाही, तर त्याप्रमाणे वर्तनही करायला हवे, या ठाम भूमिकेतूनच त्यांनी लोकनाट्यांमधून महिलांची मस्करी करणे थांबवले.
तमाशाचा अविभाज्य भाग असलेल्या, कृष्ण आणि गवळणी यांच्यामधील सूचक अर्थ असलेल्या शृंगारिक संवादांनाही अण्णा भाऊंनी आपल्या लोकनाट्यांमधून फाटा दिला. त्यांच्या ठिकाणी अण्णा भाऊंनी ताज्या व महाराष्ट्राच्या लोकजीवनाशी संबंधित अशा काळा बाजार, युद्ध, संप, निवडणुका, राजकीय पक्षांचे जाहीरनामे, मोर्चे, टाळेबंधा, दुष्काळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ अशा समस्यांवरील चर्चांना स्थान दिले.
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/08/3-3.html
👆
अण्णाभाऊ साठे : साहित्यसम्राट, लोकशाहीरलेखक, कवी व समाजसुधारक
स्मृतिदिन: 18 जुलै
लघुकथा
भाग-3
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/08/5-5.html
👆
अण्णाभाऊ साठे : साहित्यसम्राट, लोकशाहीरलेखक, कवी व समाजसुधारक
जयंती: 1आगस्ट
स्मृतिदिन: 18 जुलै
पद्य रचना (पोवाडे, लावणी, पदे, गीते, गण,छक्कड)
(भाग-5)
View, Comment and share..
X X


0 Comments