अण्णाभाऊ साठे : साहित्यसम्राट, लोकशाहीरलेखक, कवी व समाजसुधारक
जयंती: 1आगस्ट
स्मृतिदिन: 18 जुलै
लघुकथा (भाग 2 )
अण्णा भाऊंनी अनेक साहित्यप्रकार हाताळले असले, तरी त्यांची अंगभूत प्रतिभा ही एका कथालेखकाची होती, असे त्यांच्या साहित्याच्या जाणकार वाचकांचे व संशोधकांचे मत आहे.
अण्णा भाऊंनी कथालेखनाला 1949 मध्ये आरंभ केला व 18 जुलै 1969 मध्ये आपल्या मृत्यूपर्यंत ते कथा लिहीत होते.
1949 पासून त्यांनी बऱ्याच कथा लिहिल्या असल्या, तरी त्यांचा संग्रह मात्र 1957 पर्यंत निघू शकला नाही. याला अनेक कारणे होती- अण्णा भाऊ तेव्हा लेखक म्हणून नवीन होते आणि तेव्हाच्या प्रकाशकांचा आणि समीक्षकांचा तथाकथित 'कलात्मक मूल्यां'साठी आग्रह होता.
तरीही, या अडचणींवर मात करून अण्णा भाऊंचा 'खुळंवाडी' हा कथासंग्रह 1957 साली प्रकाशित झाला. उपलब्ध माहितीनुसार त्यानंतर अण्णा भाऊंचे एकूण वीस कथासंग्रह प्रकाशित झाले.
अण्णा भाऊंच्या कथांबद्दल समीक्षक आणि काही नागरी वाचकांचे मत काहीही असले, तरी मराठी साहित्याच्या सर्वसाधारण व सहृदय वाचकांनी मात्र त्यांच्या कथांचे खूप स्वागत केले, त्यांना त्या कथा खूप आवडल्या. नंतर त्या कथा फक्त मराठी वाचकांपर्यंतच मर्यादित राहिल्या नाहीत, तर अनुवादांमधून त्या सर्व प्रमुख भारतीय भाषांतील वाचकांपर्यंत पोचल्या. त्यांचे जर्मन, झेक, इंग्लिश, पोलिश, रशियन आणि स्लोवाक इत्यादी विदेशी भाषांतही अनुवाद झाले.
X X
अण्णा भाऊंनी लेखन सुरू केले, कारण ज्याबद्दल लिहिले जाऊ शकते आणि लिहिले जायला हवे असे आपल्याजवळ बरेच काही आहे याची जाणीव त्यांना होती. आपण अगदी वेगळ्या प्रकारे लिहू शकतो; आणि आपण जे जगलो, जे भोगले ते त्याच्या सर्व पैलूंनिशी नोंदवणे हे आपले जीवितकार्य आहे असेही त्यांना वाटत होते.
मराठी साहित्यातील एक कथालेखक म्हणून त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे.
अण्णा भाऊंच्या कथांची साधारणपणे खालील प्रकारांमध्ये विभागणी होते.
1. सामाजिक, ऐतिहासिक, राजकीय व दलित जीवनावरील कथा.
2. कलात्मक व विनोदी कथा.
3. शोकान्त व हृदयद्रावक कथा.
4. आत्मचरित्रात्मक कथा.
5. गुन्हेगारी जीवनाचे चित्रण करणाऱ्या कथा.
6. अंधश्रद्धांविरुद्धच्या कथा.
7. प्रेमकथा.
8. कौटुंबिक कथा
X X
1.'सामाजिक, ऐतिहासिक, राजकीय व दलित जीवनाचे चित्रण करणाऱ्या कथा
ज्या कथांनी अण्णा भाऊंच्या शिरपेचात अनेक मानाचे तुरे खोवले, त्यांना लेखक म्हणून प्रतिष्ठा मिळवून दिली आणि समाजाच्या सर्व थरांतील तसेच विविध देशांतील वाचकांना प्रभावित केले अशा अण्णा भाऊंच्या सर्वश्रेष्ठ कथा या प्रकारामध्ये येतात.
या कथांमधील व्यक्तिरेखा अन्यायाविरुद्ध लढताता किंवा कोणीतरी त्यांच्यासाठी अन्यायाविरुद्ध लढते.
आचार्य प्र. के. अत्रे यांनी अण्णा भाऊंच्या या प्रकारच्या कथांचे पुढील शब्दांत कौतुक लेले आहे:
"अण्णा भाऊ साठे यांच्या कथेचे एका वाक्यात वर्णन करावयाचे झाल्यास असे सांगता येईल की, ही जगण्यासाठी लढणाऱ्या माणसाची कथा आहे. ही कच खाणारी, हरणारी माणसे नाहीत. या सर्वांना मानाने जगायचे आहे आणि आक्रमक वृत्तींशी निकराने लढून त्या सामन्यात त्यांना जिंकायचेही आहे... वार झेलायला त्यांची छाती नेहमीच ताठ्याने उभारलेली आहे... त्यांच्या कथांमध्ये इथून तिथून एकच झुंजार मराठवाणा आवेशाने स्फुरताना दिसून येतो. या पराक्रमाच्या कथा अण्णा भाऊंनी तितक्याच तेजस्वी भाषेत रंगविलेल्या आहेत."
X X
1. 'खुळंवाडी' या कथेत जेव्हा दलितांना अडचणी येतात आणि सामाजिक न्यायाचा प्रश्न येतो, तेव्हा एरवी मवाळ असणाऱ्या दलितेतर व्यक्तीसुद्धा जहाल पवित्रा घेतात, असे अण्णा भाऊ आपल्या कथांमधून दाखवतात.
2.'बंडवाला' या कथेत अन्यायाविरुद्ध उभा रहाणारा मांग समाजातील एक तरुण आपल्याला दिसतो.
3.'रामोशी' ही कथा दोन उद्दाम जमीनदारांमधील भांडणामध्ये गरीब, प्रामाणिक आणि निष्पाप लोकांची जीवने कशी भरडून निघतात, सरकारी यंत्रणा कशी भ्रष्ट असते आणि त्यामुळे होणारा छळ कशा प्रकारे संवेदनशील अशा सामान्य माणसाला कायदा हातात घ्यायला भाग पाडतो हे दाखवते.
4.'कोंबडीचोर' ही कथा गरिबीच एखाद्या व्यक्तीला चोरी करायला भाग पाडते आणि गरिबी व भूक नष्ट केल्याशिवाय चोरी आणि तत्सम गुन्हे थांबणार नाहीत हे दाखवते. स्वतंत्र भारताचे सरकार भूक आणि दारिद्र्य कमी करील अशी जनतेची अपेक्षा होती, पण अद्यापही सरकारला या कामी यश आलेले नाही अशी टिप्पणी या कथेत अण्णा भाऊंनी या कथेत केली आहे.
5.'बरबाद्या कंजारी' अण्णा भाऊंच्या दुसऱ्या कथासंग्रहात जगण्यासाठी लढणाऱ्या माणसांच्या अनेक कथा आहेत. त्यांच्यापैकी बऱ्याचशा कथांचे स्वरूप व्यक्तिचित्रणात्मक आहे. लेखकाला ती पात्रे प्रत्यक्षात कुठे ना कुठे भेटलेली आहेत. या माणसांच्या जीवनातील दुःखे, गरिबी, असहायता, व्यसने, धाडसे, चतुराई, संघर्ष, अंधश्रद्धा - या सान्या गोष्टी अण्णा भाऊंना अगदी चांगल्या ठाऊक होत्या. त्या गोष्टींकडे अण्णा भाऊ पांढरपेशे विरुद्ध श्रमजीवी (बूर्वा विरुद्ध प्रॉलेटेरिएट) या आपल्या कम्युनिस्ट दृष्टिकोनातून पहातात.
6.'बरबाद्या कंजारी' संग्रहातील त्याच नांवाच्या कथेत आपल्याला मुंबईच्या झोपडपट्ट्यांमध्ये रहाणाऱ्या भटक्या, अशिक्षित आणि गरीब अशा कंजारी समाजातील बरबाद्या नांवाच्या एका व्यक्तीच्या जीवनाचे चित्रण आढळते. बरबाद्या ज्या कंजारी समाजातला आहे, त्या समाजाची दयनीय अवस्था आणि त्या समाजात प्रचलित अमानुष प्रथाही या कथेत चित्रित करण्यात आल्या आहेत.
7.'सुलतान' ही कथा मार्क्सवादी दृष्टिकोनातून लिहिलेली आहे. एका माणसाचा केवळ पोट भरण्यासाठीचा आयुष्यभरचा वीस वर्षांचा संघर्ष आणि त्यामधील त्याचा पराभव हा या कथेचा विषय आहे.
X X
8.भारतीय संस्कृतीचा एक निराशाजनक पैलू 'भोमक्या' ही कथा दाखवते. भारतीय संस्कृती ही सात्त्विक, पवित्र आहे असे प्रतिपादन करणारे काही लोक भारतात आहेत; पण अण्णा भाऊ भारतीय संस्कृतीच्या या अवाजवी उदात्तीकरणाशी नेहमीच सहमत होत, असे नाही. याचे कारणे म्हणजे, या देशात लाखो लोक दारिद्र्यात आणि अनेक प्रकारच्या गुलामगिरीमध्ये भरडून निघताना ते पहात होते. त्यांना जरी 'माणसे' म्हटले जात असले, तरी त्यांना समाजात काहीही स्थान नसते. अण्णा भाऊंचा हा दृष्टीकोण 'भोमक्या' या कथेत दिसतो.
9.'मकुल मुलाणी' ही कथा बेकारी, आणि उपजीविका कमावण्यामधली स्पर्धा ही रक्ताच्या नातेवाईकांनाही एकमेकांचे कट्टर शत्रू कसे बनवते, आणि अखेर आर्थिक स्थैर्य हाच मानवी जीवनातील आनंदाचा पाया कसा आहे, हे दाखवते. बेकारीच्या गर्तेत सापडलेल्या मकुल मुलाण्याच्या कुटुंबाची ही कथा आहे. आर्थिक समस्या मकुलला माणसातून उठवतात, हे या कथेचे सार आहे.
10. या जगात सत्य हे कधीकधी कल्पितापेक्षाही विचित्र असते असे अण्णा भाऊ एकदा म्हणाले होते. या विधानाला पुरावा म्हणून त्यांच्या 'स्मशानातील सोन' या कथेचा उल्लेख करता येईल. केवळ अण्णा भाऊंच्या कथांपैकीच नव्हे, तर एकूणच मराठी कथासाहित्यामध्ये 'स्मशानातील सोनं' ही एक अजरामर कथा आहे असे म्हणता येईल. भारतातील गरीब, अशिक्षित आणि बेकारांचे नष्टचर्य या कथेत चित्रित करण्यात आले आहे. गरिबी आणि बेकारी माणसाला दहन आणि दफन केलेल्या प्रेतांचे अवशेष उकरून, प्रेतांची राख चाळून प्रेतावरील सोन्याचे काही कण किंवा किरकोळ दागिने शोधायला भाग पाडते हे या कथेत दाखवले आहे.
11.काही कथांमध्ये आपण सत्यामध्ये कल्पनेचे मिश्रण केलेले आहे असे अण्णा भाऊंनी एके ठिकाणी म्हटलेले आहे. 'सापळा' ही कथा त्यांच्या वरील विधानाचे उदाहरण आहे. या कथेतील काही मूलभूत घटक वास्तववादी वाटत नाहीत. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांना आवाहन करून जागृती निर्माण केली. त्यामुळे पूर्वी महार असलेल्या दलितांनी मेलेल्या गुरांची विल्हेवाट लावणे व मेलेल्या जनावरांचे मांस खाणे सोडून दिले. त्यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील दलितेतरांमध्ये वर्णाभिमानामुळे जो संताप उसळला, त्याचे चित्रण 'सापळा' या कथेत सापडते.
12.काही काळापूर्वी दलितांमधील विविध जातींमध्येही उच्चनीचतेचा भेद कसा मानला जात असे, हे 'उपकाराची फेड' ही कथा दाखवते. या कथेतील चांभार स्वतःला मांगापेक्षा श्रेष्ठ मानतो व मांगाला अस्पृश्य मानतो. भारतीय समाजरचनेत अस्पृश्यता हा उच्चवर्णीय, निम्नवर्णीय व त्यांच्यापेक्षाही निम्नवर्णीय अशा स्तरांमध्ये झिरपत जाणारा जणू एक संसर्गजन्य रोगच होता.
13.महाराष्ट्राच्या सेंट्रल जेलमध्ये अण्णा भाऊंना जे कैदी भेटले, त्यांच्यावरील कथा 'गजाआड' या संग्रहात एकत्रित केलेल्या आहेत. गरिबी आणि असहायतेमुळे गुन्हेगार बनलेल्या संवेदनशील व्यक्तींवरच्या या कथा आहेत.
14.इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा आपले विचार सर्वात महत्त्वाचे असतात. ते माणसाने कधीही दुसऱ्याकडे गहाण ठेवू नयेत हा 'शेरखान' या कथेचा संदेश आहे.
15. 'काळू' ही कथा 'रानगा' या दुसऱ्या एका संग्रहात 'दारुबंदी' या शीर्षकानेही प्रकाशित झालेली आहे. या कथेत कायदा आणि सुव्यवस्था राखणारी यंत्रणा आणि दारू विक्री व्यवसायाच्या भरभराटीमधील तिचा हात यांच्यावर जहाल टीका आहे.
16.धाडस माणसाचे जीवन सार्थक बनवते, तर भित्रेपणा जीवनाला निराशाजनक बनवतो. त्यामुळे हे जग भेकडांसाठी नाही हे 'भेकड' ही कथा दाखवते.
17."येडा नाऱ्या' ही 'नवती' या कथासंग्रहातील कथा जवळजवळ 'भेकड' या 'कथेसारखीच आहे. 'भेकड' प्रमाणेच 'येडा नाऱ्या' ही कथासुद्धा अति सहनशील व्यक्तीची पिळवणूक करतात असे सांगते. त्यामुळे, कुणीही आपली पिळवणूक काहीएका मर्यादेपलीकडे सहन करू नये.
18.सामाजिक अन्याय आणि मागासलेपण दूर करण्यासाठी डॉ. आंबेडकरांनी आंदोलन सुरू केले. त्या आंदोलनाच्या परिणामांच्या विविध पैलूंचे चित्रण करणारी 'वळण' ही आणखी एक कथा. डॉ. आंबेडकरांचे आंदोलन होते ते दलित आणि दलितेतर समाजातील पूर्वग्रह आणि वर्तणूक यांच्याविरुद्ध. त्यांचे आंदोलन होते.
X X
19.'जिवंत काडतूस' या कथासंग्रहातील त्याच शीर्षकाची कथा ही भारताचा स्वातंत्र्यलढा 1942 साली जेव्हा उत्कर्षबिंदूवर पोचला होता, तेव्हाच्या पार्श्वभूमीवरील आहे. अण्णा भाऊंचा मित्र असलेला नरसू स्वातंत्र्यसैनिक कसा बनला.नरसूलाच रूपकात्मक अर्थाने 'जिवंत काडतूस' असे म्हटलेले आहे.
'जिवंत काडतूस' या संग्रहातली 'डोंगरचा राजा' हीच कथा 'सावळा मांग' या शीर्षकाने 'कृष्णाकाठच्या कथा' या कथासंग्रहातही दिसते. सावळा मांग हीच व्यक्तिरेखा 'फकिरा' या अण्णा भाऊंच्या सर्वात लोकप्रिय कादंबरीतही आढळते. इतर अनेक कथांप्रमाणेच, 'डोगरचा राजा' ही कथासुद्धा भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या पार्श्वभूमीवरील आहे.
20.'फरारी' या कथेचा नायक आहे शूर आणि संवेदनशील असा शिवा मांग आपला दुष्ट सासरा येमाजी मांग याच्याशी झालेला भांडणामुळे तो आधिच वैतागलेला असतो. त्यात गावच्या चांभाराने शिवाकडून दोन रुपये आगाऊ घेऊनही त्याच्या चपला तयार केलेल्या नसतात. त्यामुळे तो चांभाराला मारहाण करतो. त्यानंतर शिवा तुरुंगवास भोगून बाहेर आल्यावर त्याला दिसते की आपल्या कुटुंबाची घडी विस्कळित झालेली आहे. आपल्या कुटुंबाची घडी तो पुन्हा नीट कशी बसवतो याचे वर्णन या कथेत पुढे करण्यात आलेले आहे.
21.‘आबी’ हे दुर्दैवी आणि कष्टमय परिस्थितीतही निराश न होणाऱ्या एका ग्रामीण मुलीचे व्यक्तिचित्र आहे. ती हताश न होता तिला उपद्रव देणाऱ्यांचा धाडसीपणे बदला घेते.
'खुळंवाडी', 'कृष्णाकाठच्या कथा' आणि 'स्वप्नसुंदरी' या कथासंग्रहांतील अनुक्रमे 'रामोशी', 'सावळा मांग' आणि 'फरारी' यांच्याप्रमाणेच 'जिवंत काडतूस' या कथासंग्रहातील 'निळू मांग' हेसुद्धा मुळात नम्र असलेल्या एका धाडसी माणसाचे व्यक्तिचत्र आहे.
22.'निखारा' या कथासंग्रहात 'चोरांची संगत' या शीर्षकाची कथा आहे. भाऊ माळवदीकर या धाडसी माणसाचे जीवन या कथेत चित्रित करण्यात आले आहे.
23.'निखारा' या कथासंग्रहातील 'निखारा' या कथेत श्रीमंतांची गुंडगिरी, गरिबांची पिळवणूक आणि असहायता व पोलिसांचा भ्रष्टाचार यांचे वास्तववादी चित्रण आहे.
24.'चिरागनगरची भुतं' हा कथासंग्रह असूनही तो कादंबरीसारखा वाटतो, ही 'भुतं' म्हणजे खरे तर माणसेच असतात. पण जेव्हा आपण त्यांचे जिणे पहातो, तेव्हा ती माणसांच्या रूपांतील भुतेच वाटतात. ही माणसे मुंबईमधल्या आग्रा रोड, चिरागनगर, आझादनगर अशा भागांमधल्या नरकतुल्य झोपडपट्ट्यांमध्ये रहाणारी आहेत. असहायता, गरिबी, अंधश्रद्धा, पिळवणूक, मद्यपान-वेश्यागमनासारखी व्यसने, उपेक्षा, व्यभिचार, चोऱ्यामाऱ्या या गोष्टींनी ती वेढलेली आहेत. त्यांचे जिणे पाहून अगदी भुतांनासुद्धा स्वतःची शरम वाटेल, असे अण्णा भाऊ म्हणतात. सामाजिक, राजकीय आणि आर्थिक अन्यायामुळे ही 'भुतं' वेडी झाली आहेत. ती आनंद आणि दुःख या संकल्पनांचा अर्थ बदलून जगत आहेत. तुरुंगवास, फसवणूक, खून, दरोडे हे त्यांच्या आयुष्याचे अभिन्न भाग आहेत.
25.'वेताळ' या कथेमध्ये राजा मोहन शेठ उर्फ फासी शेठ उर्फ आग्या वेताळ याचे व्यक्तिचित्र रेखाटलेले आहे. राजा मोहन शेठ हाच वेताळ (भुतांचा राजा) सतो. या कथेत गणादादा आणि मोहन शेठ यांच्यामधील मारामारीचे वास्तववादी चित्रण आहे.
26'मानकी' या कथेत लैंगिकदृष्ट्या आक्रमक, चंचल स्वभावाच्या व सरळसरळ पूर्णपणे व्यवहारी अशा मानकी नांवाच्या स्त्रीचे चित्रण आहे. आधी तिचे बाबू चाकूवाला नांवाच्या अट्टल गुन्हेगारावर प्रेम असते. बाबू चाकूवाल्याला अटक झाल्यावर ती बाबू धावड्यावर प्रेम करू लागते.
27.'चंगीजखान' या कथेतील चंगीजखान हा पराकोटीचा धाडसी माणूस असतो. अफू विकणे हा त्याचा व्यवसाय असतो. दारू पिल्यानंतरच तो हा व्यवसाय करू शकतो. पोलिसखात्यातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार यांच्याकडे ही कथा अंगुलिनिर्देश करते.
28.'रम्मी' या कथेतील 'रम्मी' ही एक अल्पवयीन मुलगी असते, पण दारूचा व्यवसाय करणाऱ्या जगाने तिला विश्वास बसू नये, इतके धाडसी, चलाख आणि कावेबाज बनवलेले असते. ती देशी दारूचे दुकान चालवत असते.
29.'काळे मास्तर' या कथेतील काळे मास्तर हे अट्टल दारूबाज आहेत. त्यांचे जीवन उद्ध्वस्त झालेले आहे. त्यांच्या बायकोने त्यांना सोडून दिलेले असल्याने ते मद्यपानाकडे वळलेले आहेत.
30.'अडीच आंधळे' या कथेत, पूर्णपणे आंधळे असलेले भिकारीसुद्धा भीक मागून मिळालेल्या पैशांची दारू कशी पितात, हे दाखवले आहे. ते आंधळे असले, तरी मारामाऱ्यासुद्धा करतात. एका शांतताप्रिय, नजर कमजोर असलेल्या चष्मेवाल्या माणसाला दोन आंधळ्यांच्या मारामारीमुळे कसा त्रास होतो, हेसुद्धा या कथेत सूचित केलेले आहे.
31.'येसू' या कथेतील येसू हा दारूची ने-आण करून आपल्या जीवनाला आकार देण्याचा प्रयत्न करीत असतो. तारा ही त्याची प्रेयसी असते. तिचे दुसऱ्याही एका तरुणाबरोबर प्रेमप्रकरण चालू असते. ती येसूविरुद्ध पोलिसात तक्रार नोंदवण्यापर्यंत जाते.
32.'गेंडा' ही एका झोपडपट्टीच्या पार्श्वभूमीवरील कथा झोपडपट्टीतील वास्तवाचे चित्रण करते. गेंडा हा प्राणी डोक्याने धडक देण्यासाठी जसा प्रसिद्ध आहे, तसाच या कथेतील सखाराम सकट हासुद्धा आपल्या डोक्याने लोकांना धडक देण्यासाठी प्रसिद्ध असतो. म्हणूनच त्याला लोक 'गेंडा' म्हणत असतात.
33.'परमू' ही कथा परमू नावाच्या एका दारुड्या वायरमनच्या आयुष्याच्या दशेचे चित्रण करते. परमूचे इब्राहिमबरोबरचे भांडण, एका वडाराच्या खुनावरून परमूची अटक, नंतर तो वडार जिवंत असल्याचे समजणे, परमूची मुक्तता होणे व भांगेच्या सेवनामुळे परमूची दशा-दशा होणे या घटना कथेमध्ये कधी पुढे रंगवण्यात आल्या आहेत.
34.'भुतांचा शिमगा' या कथेत होळीभोवती भुतांनी बोंब कशी मारली याचे चित्रण आले आहे.
35.'मेलेला लखपती' ही एक विनोदी कथा आहे. 'लखपती' म्हणून ओळखला जाणारा हा माणूस प्रत्यक्षात लखपती नसतो. खरे तर तो इतका गरीब असतो, की जगण्यासाठी त्याला दगड फोडण्याचे काम करावे लागत असते. परंतु, त्याच्या गरीबीची थट्टा करण्यासाठी लोग गमतीने त्याला 'लखपती' म्हणत असतात.
36.'भुतांची धुळवड' या कथेत ही 'भुतं' धुळवड कशा भयानक प्रकारे साजरी करतात याचे चित्रण आहे. अंतोन आणि पेंटर ही दोन 'भुतं' दारू चढलेल्या अवस्थेत घोड्यावर बसून पोलिस स्टेशनवर जातात आणि तिथल्या पोलिस इन्स्पेक्टरला सॅल्यूट ठोकतात. ही धाडसी कृती ते करतात याचे कारण ते साहसी असतात.
X X
2. कलात्मक आणि विनोदी कथा
अण्णा भाऊंकडे एक दलित लेखक, एक उपेक्षित व अशिक्षित लेखक, ग्रामीण जीवन, झोपडपट्टीतील जीवन चित्रित करमारा लेखक आणि वर्गभेदाची जाणीव असलेला व समाजवादाचा प्रचार-प्रसार करणारा लेखक असा विविध दृष्टीकोनांतून पाहिले जाते.
अण्णा भाऊंचा विनोद वाचकांना सुन्न करतो. आपल्या जीवनातील दुःख, दारिद्र्य, असहायता आणि अस्थिरता यांची तमा न बाळगता जगणाऱ्या माणसांच्या जीवनातून हा विनोद निर्माण झाला आहे. या कथांचा आढावा या विभागात घ्यायचा आहे.
1.'शिकार' या कथेत एका संस्थानिकाच्या शिकारीच्या मोहिमेचे चित्रण आहे. हा संस्थानिक शिकारीला जातो. हाकाऱ्यांनी त्याच्यासमोर आणलेल्या रानडुकरांना मारायला जाताना अनेकदा नेम चुकतो. रानडुकरांना मारण्यासाठी जेव्हा तो रायफल उचलतो, तेव्हा तिच्यात काडतुसेच नाहीत असे त्याच्या लक्षात येते. संपूर्ण दिवस घालवूनसुद्धा त्याला एकही शिकार मिळत नाही. शेवटी दुसऱ्या कुणीतरी मारलेली रानडुकरे तो आपण केलेली शिकार म्हणून मिरवण्यासाठी आपल्या वाड्यावर नेतो.
2.'कृष्णाकाठच्या कथा' मधील 'अमृत' ही कथा जुन्या वैदूंच्या आपली औषधे गुप्त राखण्याच्या वृत्तीची थट्टा करते. अमृत हे एक पौराणिक पेय ते जी व्यक्ती प्राशन करते, ती अमर होते असा समज आहे. पण 'अमृत' या कथेतील अमृत म्हणजे सर्पदंशावर रामबाण उपाय ठरणाऱ्या, विष उतरवणाव्या 'आराटी' या जंगली झुडुपाच्या मुळ्यांचा रस. निवेदकाच्या 'जिवा' नांवाच्या मित्राला हे औषध माहीत असते, पण निवेदकाने कितीही पिच्छा पुरवला, तरी ते औषध कोणते याचा काही जिवा पत्ता लागू देत नसतो. अतिशय मजेशीर निवेदनातून व संवादांतून लेखकाने ही कथा फुलवली आहे.
3.'राम-रावण युद्ध' या कथेत एका गावातील एकमेकांविरुद्ध असलेले गट रामलीला सादर करताना रामायणातील राम-रावण युद्धाचा प्रसंगाचा उपयोग एकमेकांचा बदला घेण्यासाठी कसा करून घेतात, याचे विनोदी अंगाने चित्रण करण्यात आले आहे.
4.'गुन्हाळ' या संग्रहातील 'खोड' ही कथा बबन्या या अतिशय खोडसाळ अशा मुलाची गोष्ट आहे. बबन्या हा रामू आणि लक्ष्मी ढमाले यांचा मुलगा. बबन्याचा खोडसाळपणा हा खलनायकाच्या पातळीवर जाणारा आहे, कारण तो आपल्या खलप्रवृत्तीच्या बापाचे अंधानुकरण करीत असतो. इतरांचे अंधानुकरण करण्याचे घातक परिणाम या कथेत चित्रित करण्यात आले आहेत.
5.'पैलवानांचा गाव' ही 'निखारा' या संग्रहातील कथा या गावाने वाद मिटवण्यासाठी स्वीकारलेल्या एक विनोदी निर्णयाचे चित्रण करते. अण्णा भाऊंच्या कथांतील इतर खेड्यांप्रमाणे या कथेतील खेड्यामध्येसुद्धा एकमेकाविरुद्ध असलेले दोन गट आहेत - खंडू चव्हाण याच्या नेतृत्त्वाखालील चव्हाणांचा गट, तर रामजी खोताच्या नेतृत्त्वाखालील खोतांचा गट. चव्हाण आणि खोत यांच्या मुलींवरून या दोन गटांमध्ये एकदा वाद सुरू होतो. तेव्हा या दोन गटांपैकी वरचढ कोण आहे हे ठरवण्यासाठी एकजण एक गमतीशीर मार्ग सुचवतो. तो मार्ग असाः चव्हाणांच्या गटातील सर्व पुरुषांनी खोतांच्या गटातील आपापल्या वयाच्या पुरुषांशी कुस्त्या करावात, आणि ज्या गटातील विजयी पहिलवानांची संख्या अधिक असेल, तो गट वरचढ म्हणून जाहीर केला जावा. या विनोदी निर्णयामुळे अनेक हास्यकारक प्रसंग उद्भवतात.
6.'मचका' ही 'निखारा' या संग्रहातील कथा. बोटाऱ्याची वाडी या गावातील गावकरी आपल्या गावात जत्रा भरवण्याचे ठरवतात, पण पुरेशी वर्गणी न जमल्याने त्या योजनेचा 'मचका' (पचका, बोऱ्या) होतो, आणि ती योजना कायमची निकालात काढली जाते.
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/08/1.html
👆
अण्णाभाऊ साठे : साहित्यसम्राट, लोकशाहीरलेखक, कवी व समाजसुधारक
स्मृतिदिन: 18 जुलै
भाग 1
XX
https://gyaaniinfo.blogspot.com/2022/08/3-3.html
👆
अण्णाभाऊ साठे : साहित्यसम्राट, लोकशाहीरलेखक, कवी व समाजसुधारक
स्मृतिदिन: 18 जुलै
लघुकथा
भाग-3
View, Comment and share..
X X


5 Comments
Very nice information
ReplyDeleteNice
ReplyDeleteVery nice
ReplyDelete👍👍👍👍
ReplyDeleteNice
ReplyDelete