Indo-Greek (Alexander's) Invasions
इंडो-ग्रीकांची (अलेक्झांडरची) आक्रमणे
प्राचीन भारतातील गणराज्यांच्या (16 महाजनपदे) च्या कालखंडाबाबत इतिहासकारांत मतभेद असले तरी इ.स.पू. 8 वे शतक ते इ.स.चे 4 थे शतक हा गणराज्यांचा कालखंड मानला जातो.
विशेषतः इ.स.पू. 6 वे शतक ते इ.स. दुसरे शतक या कालखंडात गणराज्यांचे अस्तित्व प्रभावीपणे जाणवते. या गणराज्याच्या स्पर्धेतून मगधचा एक बलाढ्य शक्ती (राज्य) म्हणून इ.स.पू. 6 व्या शतकात उदय झाला.
शिशुनाग व नंदाने तेथे राज्य केले. ही राजकीय प्रक्रिया घडत असतानाच भारताच्या वायव्य भागात छोटी छोटी राज्ये होती. ती आपापसांत लढत. त्याचा फायदा परकियांनी घेतला.
भारतावर आक्रमण करणारा पर्शिया हा पहिला देश होय. वायव्य भारताच्या समृद्धीकडे पर्शिया आकर्षित झाला होता.
खालील पर्शियन सम्राटांनी भारताच्या वायव्य भागावर आक्रमणे केली.
1) सायरस (इ.स.पू. 558-530) -
गांधारवर आक्रमण केले.
X X
2) दारियस प्रथम (इ.स.पू. 522- 486) -
गांधार, पंजाबचा काही प्रदेश जिंकला. सिंध व राजस्थानचाही काही भाग जिंकला.
पर्शियात दारियस प्रथमनंतर त्याचा पुत्र क्षर्षस (इ.स.पू.486- 465), दारियस द्वितीय, दारियस तृतीय वगैरे राजे झाले.
परंतु इ.स.पू. 331 मध्ये ग्रीकच्या अलेक्झांडरने पर्शिया जिंकला. त्यामुळे भारतातील प्रदेशांवरील पर्शियाचे वर्चस्व संपुष्टात आले.
ग्रीक आक्रमण - अलेक्झांडरचे आक्रमण :
ग्रीस देशातील मॅसिडोनियाचा राजा फिलीप दुसरा हा इ.स.पू. 336 मध्ये मृत्यू पावला. त्याच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र अलेक्झांडर हा वयाच्या 20 व्या वर्षी मॅसिडोनियाचा राजा झाला. तो अत्यंत धाडसी, महत्त्वाकांक्षी होता.
सर्वप्रथम त्याने ग्रीसमध्ये जी लहान-लहान राज्ये होती ती जिंकून घेतली.
युरोपवर आक्रमण न करता तो पर्शियाकडे वळला. याचे कारण 150 वर्षापूर्वी पर्शियाने ग्रीसवर आक्रमण केले होते तेव्हा पर्शियाला धडा शिकवावा असे त्याला वाटले असावे.
प्रथम पर्शियन साम्राज्यातील आफ्रिकेतील इजिप्त देश त्याने जिंकला. आशिया मायनर, सिरिया हे पश्चिमेकडील देश त्याने जिंकले.
इ.स.पू. 331 मध्ये अरवेलच्या लढाईत पर्शियाचा पराभव करून पर्शियाचा मालक बनला, त्यामुळे साहजिकच जग जिंकावे अशी एक महत्त्वाकांक्षा त्याच्या मनातं निर्माण झाली.
ग्रीस संस्कृतीचा प्रसार सर्वत्र करावा असेही त्याला वाटत होते. इ.स.पू. 327 मध्ये अलेक्झांडरने बॅक्ट्रिया, इराण वगैरे राज्यांत लष्कर पाठवले व तो लष्करासह भारताच्या दिशेने निघाला.
अलेक्झांडरच्या आक्रमणाच्या वेळची भारताची राजकीय स्थिती
अलेक्झांडरच्या आक्रमणाच्या वेळेच्या भारताच्या राजकीय परिस्थितीचे वर्णन जस्टिन, एरियन या ग्रीक इतिहासकारांनी लिहून ठेवले आहे.
भारतात तेव्हा लहान लहान 150 राज्ये होती व त्यांच्यात संघर्ष चालू होता.
X X
तत्कालीन भारताचे राजकीय चित्र खालीलप्रमाणे होते.
1) काबूल नदीच्या उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशात अश्वक व अश्वकायनांचे राज्य होते. मशकावती ही त्यांची राजधानी होती. त्यांनी एक किल्ला बांधला होता व त्यांचे सामर्थ्यही प्रचंड होते.
2) सिंधू नदीपासून झेलम नदीपर्यंतच्या प्रदेशात तक्षशिलेचे राज्य होते. अंभी हा तेथे राज्य करत होता. तक्षशिलेचा प्रदेश सुपीक होता. अंभीचे लष्करी सामर्थ्यही प्रचंड होते.
3) तक्षशिलेच्या उत्तरेस अभिसारांचे राज्य होते. त्यांचे व तक्षशिलेचा राजा अंभी यांचे वैर होते.
4) तक्षशिलेच्या पूर्वेला पोरसचे राज्य होते. झेलम व चिनाब या दोन नद्यांच्या दुआबात हे राज्य होते. हे राज्य अत्यंत समृद्ध होते व लष्करीदृष्ट्याही अत्यंत सामर्थ्यसंपन्न होते.
5) हस्तीचे राज्य खैबरखिंडीच्या तोंडाशी व सिंधू नदीच्या पश्चिमेला वसलेले होते. पुष्कलावती ही त्यांची राजधानी होती.
6) चिनाब व रावी या दोन नद्यांच्या दुआबात शिवीचे राज्य होते. शिवीच्या दक्षिणेकडील प्रदेशात अग्रश्रेणीचे राज्य होते.
7)अग्रश्रेणीच्या दक्षिणेकडील भागात मालवांचे गणराज्य होते.
8) रावी नदीच्या पलीकडे शूद्रकांचे राज्य होते. तक्षशिलेचा राजा अंभी व पोरस यांचे वैमनस्य होते. तेव्हा अलेक्झांडरच्या सहकायनि पोरसचा पराभव करावा ही योजना त्याने आखली व पोरसवर आक्रमण करण्यासाठी अंभीने अलेक्झांडरला निमंत्रित करण्याचे ठरविले.
अलेक्झांडरने आपल्यासोबत 1 लक्ष 20,000 पायदळ व 15000 घोडेस्वर आणले होते. हे सर्व सैन्य निवडक ताज्या दमाचे व शस्त्रसंपन्न होते.
एका भारतीय राजाने दुसऱ्या भारतीय राजाचा पाडाव करण्यासाठी परकीय राजाची मदत घेण्याचा भारतीय इतिहासातील हा पहिलाच प्रसंग होय. त्यामुळे अंभी हा पहिला राष्ट्रद्रोही राजा मानला जातो.
अलेक्झांडरला भारताकडे आगेकूच करीत असताना प्रथम त्याला काबूल नदीच्या उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशातील अश्वकाशी मुकाबला करावा लागला.
सिकंदर व अश्वक यांच्यात जे युद्ध झाले त्यात सिकंदरला 40,000 अश्वक युद्धकैदी म्हणून मिळाले.
अलेक्झांडरला अश्वकायनांशीही संघर्ष करावा लागला. अश्वकायनाची राणी किलओफिस हिने अलेक्झांडरचा प्रतिकार केला. तिच्याजवळ 38,000 पायदळ, 30 हजार घोडदळ होते तरीही ती पराभूत झाली.
किलओफिस राणीकडे असलेल्या पायदळ व घोडदळाचे जे आकडे ग्रीस इतिहासकारांनी दिले आहेत ते खोटे असावेत असे एक मत आहे.
X X
झेलमचे युद्ध (इ.स.पू. 323)
अलेक्झांडर सिंधू नदी पार करून तक्षशिलेला पोहोचला तेव्हा अंभीने त्याचे स्वागत केले.
अलेक्झांडर व अंभी यांच्यात मैत्रीचा तह झाला. अंभीचे जे मांडलिक राजे होते त्यांनीही अलेक्झांडरला नजराणे देऊन त्याचे स्वागत करून मांडलिकत्व स्वीकारले.
राजा पोरस हा स्वाभिमानी असल्याने त्याने अलेक्झांडरचे मांडलिकत्व स्वीकारण्यास नकार दिला. तेव्हा त्याच्यावर आक्रमण करण्यासाठी अलेक्झांडर झेलम नदीच्या काठी लष्करासह थांबला.
राजा पोरस याच्याजवळ 30,000 पायदळ, 4000 घोडदळ, 300 रथ व 200 हत्ती होते. राजा पोरस व अलेक्झांडर यांचे सैन्य दोन महिने परस्परांसमोर निष्क्रिय अवस्थेत पडून होते. कारण झेलम नदी दुथडी भरून वाहत होती.
अलेक्झांडरने झेलम नदीच्या उत्तरेस जाऊन जेथे झेलमचे पात्र अरुंद होते तेथून ते ओलांडून राजा पोरसच्या सैन्यावर अचानक हल्ला केला.
पावसामुळे पोरसचे रथदल निकामी झाले. अलेक्झांडरच्या प्रचंड घोडदळापुढे राजा पोरसचा निभाव लागला नाही.
राजा पोरसला सिकंदरपुढे उभे करण्यात आले. राजा पोरस व सिकंदर यांच्यात जी प्रश्नोत्तरे झाली त्यात सत्य किती हा एक प्रश्नच आहे.
राजा पोरसचे शौर्य, बाणेदारपणा व पराक्रम पाहून अलेक्झांडरने त्याला सोडून दिले. राजा पोरसला मारून टाकले किंवा त्याचे राज्य बरखास्त केले तर त्याच्या राज्यातील लोक उठाव करतील अशी भीती त्याला वाटली असावी.
राजा पोरसने अलेक्झांडरशी मैत्री केली व त्याचे वर्चस्वही मान्य केले.
अलेक्झांडरच्या विजयाची व राजा पोरसच्या पराभवाची कारणे
1) राजा पोरसपेक्षा अलेक्झांडरचे सैन्य जास्त होते व शस्त्रास्त्रेही प्रगत होती.
2) पोरसच्या तुलनेत अलेक्झांडरला लढाईचा अनुभव जास्त होता. कारण अनेक देश जिंकतच तो भारताकडे आला होता. पावसामुळे राजा पोरसचे हत्तीदल निकामी ठरले.
3)वायव्य भारतातील एकही राजा पोरसच्या मदतीला आला नाही.
4) सेनापती या नात्यानेही अलेक्झांडर हा राजा पोरसापेक्षा श्रेष्ठच होता.
झेलमनंतरचे अलेक्झांडरचे विजय अलेक्झांडरचा मायदेशी प्रवास
झेलमच्या युद्धानंतर राजा पोरसने अलेक्झांडरचे मांडलिकत्व स्वीकारले. अभिसारच्या राजानेही अलेक्झांडरचे मांडलिकत्व स्वीकारले.
त्यानंतर त्याने मद्र जनपद जिंकले. 'हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या कठ गणराज्याला त्याने पराभूत केले.
कठ हे मोठे योद्धे होते. त्यांनी अलेक्झांडरशी अत्यंत प्रखर लढा दिला. त्यात 17,000 कठ योद्धे मृत्यू पावले. त्याकामी राजा पोरसने मदत केली हे दुर्दैव होय. तो बियास नदीजवळ येऊन पोहोचला. तेथून फक्त 80 मैलांवर मगधच्या राज्याची सीमा होती. तेथे नंद वंश सत्तेवर होता.
जग जिंकण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या अलेक्झांडरने झेलमच्या युद्धात यश मिळवूनही पुढे भारतीय राजांशी युद्ध करण्याचे का टाळले हा प्रश्नच आहे. त्यासंदर्भात खालील खुलासा करता येईल.
1) नंद वंशाचा सम्राट धनानंद याच्या लष्करी सामर्थ्याची कल्पना होतीच. धनानंदाकडे 2 लक्ष पायदळ, 80,000 घोडदळ, 8000 रथदल व 6000 लढाऊ हत्ती होते. त्याच्या प्रचंड लष्करी सामर्थ्यापुढे आपला निभाव लागणार नाही हे अलेक्झांडर ओळखून होता.
2) झेलमच्या युद्धातच अलेक्झांडरच्या सैन्याची ताकद कमी झाली होती.
3) भारतीय योद्धयांचा पराक्रम पाहून अलेक्झांडरच्या लष्कराचे मनोधैर्य खचले होते.
4) अलेक्झांडरच्या लष्कराला मायदेशी जाण्याची ओढ लागून राहिली होती. कारण 10 वर्षांपासून मातृभूमीपासून 3000 मैल अंतरावर अलेक्झांडरचे लष्कर होते.
5) अलेक्झांडरच्या लष्कराने कठ जमातीचा पराक्रम पाहिला होता.
6) अलेक्झांडरने जिंकून घेतलेल्या भारतीय प्रदेशात त्याच्याविरुद्ध बंडे होती. सुरू झाली
7) ग्रीक देशात अलेक्झांडरच्या सत्तेविरुद्ध बंडाळ्यांना प्रारंभ झाला होता.
8) सततच्या युध्दांमुळे अलेक्झांडरचे लष्कर थकले होते..
वरील सर्व बाबींचा विचार करून अलेक्झांडर परतीच्या प्रवासाला निघाला. या परतीच्या प्रवासात मालव, शिबी व शूद्रक यांनी अलेक्झांडरच्या लष्करावर हल्ले केले.
या हल्ल्यात खुद अलेक्झांडर जखमी झाला. या गणराज्यांनी एकत्र येऊन 1 लक्ष सैन्यानिशी अलेक्झांडरवर आक्रमण केले; पण शेवटी त्या गणराज्यांना अलेक्झांडरने पराभूत केले.
अर्जुनायन जमातीने अलेक्झांडरला अयशस्वी विरोध केला. शेवटी सप्टेंबर 323 (इ.स.पू) मध्ये त्याने भारतभूमी सोडली व मकराणच्या वाळवंटातून तो बाबिलोनियाला गेला.
परतीच्या प्रवासात पडलेले कष्ट, मालव व शूद्रक यांच्याशी झालेल्या लढतीत त्याला झालेली जखम याचा परिणाम होऊन तो. इ.स.पू. 323 मध्ये मृत्यू पावला.
अलेक्झांडरने परत जातानाच जिंकून घेतलेल्या प्रदेशांची व्यवस्थाही लावली होती. जिंकून घेतलेल्या प्रदेशांचे 6 विभाग पाडून त्यावर अंभी, फिलीप (दक्षिण पंजाब), पायथॉन (सिंध) आदींच्या नेमणुका केल्या होत्या.
X X
अलेक्झांडरच्या आक्रमणाचे परिणाम
अलेक्झांडरच्या आक्रमणाचे भारतावर जे परिणाम झाले त्याबाबत इतिहासकारांत एकमत नाही. काही इतिहासकारांच्या मते, या आक्रमणाचा काहीच परिणाम झाला नाही. कारण अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर केवळ 6 वर्षांनीच चंद्रगुप्त मौर्याने वायव्य भारत जिंकून घेतला.
तत्कालीन भारतीय साहित्यातूनही या आक्रमणाचे उल्लेख येत नाहीत.
अलेक्झांडरचे वास्तव्य भारतात फक्त 18 महिनेच होते. त्यापकी तो 16 महिने युद्धभूमीवर होता. म्हणून या आक्रमणाचा भारताच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक जीवनावर मुळीच परिणाम झाला नाही असे एक मत आहे. पण ते चूक आहे.
अलेक्झांडरच्या आक्रमणाचे भारतावर झालेले परिणाम
1) प्राणहानी
या आक्रमणामुळे उत्तर व वायव्य भारतात फार मोठी मनुष्यहानी झाली. तेव्हाच्या लोकसंख्येचा विचार करता युद्धात मरण पावलेल्यांची संख्या निश्चित जास्त होती. अलेक्झांडरच्या आक्रमणाच्या मार्गावर झालेला प्रतिकार, झेलमचे युद्ध व परतीचा प्रवास या तिन्ही वेळेस जी युद्धे झाली त्यात किमान एक लक्ष तरी सैनिक मारले गेले असावेत.
2) वित्तहानी
या आक्रमणकाळात वित्तहानीही व्यापक प्रमाणात झाली. लुटालूट, जाळपोळ, अत्री टंचाई इ. प्रकार घडले. ग्रीकांनी पश्चिम पंजाबातील जनावरांची लूट केली त्यामुळे तेथील टोळ्यांच्या जमात जीवनावर त्याचे वाईट परिणाम झाले.
3) या आक्रमणामुळे भारतीय गणराज्ये नामशेष झाली. त्यामुळे माँयांच्या सत्तेखाली राजकीय एकीकरणाचा मार्ग मोकळा झाला.
4) ग्रीकांनी जिंकलेल्या प्रदेशातून असंख्य लोकांना गुलाम म्हणून नेले.
5) ग्रीक नाण्यांचा भारतीय नाण्यावर प्रभाव पडला. ग्रीकांच्या आक्रमणापूर्वीची भारतीय नाणी व आक्रमणानंतरची ग्रीक नाणी यात वजन, आकार, गुळगुळीतपणा इ. बाबत निश्चित फरक पडल्याचा जाणवतो.
6) ग्रीकांबरोबर ग्रीक लेखक, इतिहासकार व साहित्यिक भारतात आले होते. त्यामुळे साहाजिकच त्यांचा प्रभाव भारतीयांवर पडला. ग्रीसमध्ये इतिहासलेखनाची एक परंपरा होती. कालगणनेकडे पाहण्याचा ग्रीकांचा एक दृष्टिकोन होता.त्याचा प्रभाव भारतीयांवर पडल्याचा दिसतो.
7) ग्रीक स्थापत्य, शिल्प याची ओळख भारतीयांना झाली.
8) भारतीय खगोलशास्त्राचा प्रभाव ग्रीकांवर पडला.
9) या आक्रमणामुळे ग्रीक व भारत यांच्यातील व्यापार व दळणवळण वाढले. भारत व पश्चिमेकडील देशांचे व्यापारी संबंध वाढले.
10) भारतीय शिल्पकला व ग्रीक शिल्पकला यांच्या संयोगातून गांधार शिल्पकला निर्माण झाली.
11) अलेक्झांडरच्या आक्रमणामुळे भारतीय संस्कृतीचे महत्त्व ग्रीकांना पटले. विशेषतः भारतीय तत्त्वज्ञानाकडे ग्रीक तत्त्वज्ञांचे लक्ष वेधले गेले. ते किती उच्च दर्जाचे होते याची त्यांना कल्पना आली. पुढे तर एका ग्रीक राजाने भारताकडे तत्त्वज्ञ व योगी यांची मागणी केली.
व्ही. ए. स्मिथच्या मते,
“या आक्रमणामुळे भारताचे ग्रीकीकरण झाले नाही. भारतीय परिस्थिती तशी बदललीच नाही. अलेक्झांडरचे आक्रमण हे केव्हाच भारतीय विस्मृतीत गेले. हिंदू, बौद्ध किंवा जैन कुणीही लेखकांनी त्याची फारशी नोंद घेतली नाही."
Comment and share


2 Comments
Nice
ReplyDeleteVery nice
ReplyDelete