Koutilyache Arthshastra
कौटिल्याचे अर्थशास्त्र
विष्णुगुप्त चाणाक्य ऊर्फ कौटिल्य याने लिहिलेला अर्थशास्त्र हा ग्रंथ प्राचीन भारतीय राजनीतीवरील एक महत्त्वपूर्ण ग्रंथ होय.
कौटिल्याने चंद्रगुप्त मौर्याला सत्ता प्रस्थापित करण्याच्या कामी मौलिक सहकार्य केले होते. या ग्रंथात 15 भाग, 180 उपविभाग व एकूण 6000 श्लोक आहेत.
इ.स. 1909 मध्ये पं. श्यामशास्त्री यांनी या ग्रंथाचा शोध लावला व त्याचे इंग्रजी भाषांतर केले.
त्या ग्रंथाचे नाव अर्थशास्त्र असले तरी अर्थशास्त्रापेक्षा राजकीय विषयांचीच चर्चा यात अधिक आहे. याग्रंथात राज्य, राजा, मंत्री, परिषद हेरपद्धती, करपद्धती, परराष्ट्र संबंध, युद्ध व शांततेच्या काळात राज्याच्या विविध संस्थांची भूमिका व कर्तव्ये कोणती असावीत याची माहिती देण्यात आली आहे.
विशेष म्हणजे या ग्रंथात चंद्रगुप्ताचे नाव नाही याचे आश्चर्य वाटते. राजाने आपले मंत्री व अधिकारी कसे निवडावेत, त्यांची परीक्षा कशी घ्यावी. देशाचे अर्थनियोजन कसे करावे, विदेशी नीती आदींची तात्त्विक चर्चा या ग्रंथात केली आहे.
कौटिल्याच्या अर्थशास्त्रात प्रामुख्याने पुढील विषयांची चर्चा आहे.
1) राज्याच्या व राजपदाच्या उत्पत्तीचा सिद्धांत.
2) राज्याच्या घटकांविषयी सप्तांग सिद्धांत..
3) आंतरराज्य संबंध मंडल सिद्धांत.
4) धर्म व राज्य यांचे संबंध
5) विदेशी नीतीसंबंधी राजाला मार्गदर्शन.
6) प्रशासकीय खाती.
7) हेरयंत्रणा.
8) मंडल सिद्धांत.
कौटिल्याच्या अर्थशास्त्रातील विचारात कालसापेक्ष काही दोष व उणीवा आहेत पण त्याचे बरेच विचार हे शास्त्रशुद्ध चिरंतन व मौलिक आहेत.
कौटिल्याचा राजसंस्थेकडे व शासन संस्थेकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा प्लेटोप्रमाणे स्वप्नाळू नसून शास्त्रीय व वस्तुनिष्ठ आहे.
कौटिल्याने 'अर्थशास्त्र' हा ग्रंथ लिहिताना पूर्वीच्या आचार्यांनी त्याच शास्त्रावर लिहिलेल्या ग्रंथाचा उपयोग करून हा ग्रंथ लिहिल्याचे स्वतः सांगितले आहे.
कौटिल्याचा हा ग्रंथ महाभारतानंतरचा असावा.या ग्रंथाचे नाव अर्थशास्त्र असले तरी त्यातील 15 प्रकरणांपैकी फक्त एकच प्रकरण अर्थव्यवस्थेवर आहे. ही बाब वैशिष्ट्यपूर्णच म्हणावी लागेल.
शेतसारा आयात निर्यात मालावरील जकात, खनिज द्रव्यांच्या खाणी, सरकारी कारखान्यांतील उत्पन्न यो सरकारच्या उत्पन्नाच्या साधनांचा तपशीलही त्याने दिला आहे.
बाजारावर देखरेख ठेवणाऱ्या पक्षाध्यक्षाची कामेही तो सांगतो. तसेच वजने मापे यांची कोष्टकेही तो या ग्रंथात देतो.
X X
कौटिल्याचा राज्यासंबंधीचा सप्तांग सिद्धांत राज्याच्या रचनेसंबंधी कौटिल्याने 7 अंगे सांगितली.
1) राजा किंवा स्वामी
2) अमात्य किंवा मंत्री
3) जनपद किंवा (देश)
4) दुर्ग किंवा किल्ले
5) राजकोष
6) दंड किंवा सैन्यशक्ती
7) मित्र
प्रत्येक घटकाची विस्ताराने चर्चा:
1) राजा किंवा स्वामी :
राजाची दिनचर्या, राजवाड्याचा बंदोबस्त आदी संबंधीही कौटिल्याने लिहिले आहे. कौटिल्याच्या राज्यरचनेत राजाचे स्थान सर्वात महत्त्वाचे आहे. राजा कुलवान, सत्यवादी शीघ्र कार्य करणारा असावा. तो शूरवीर विचारशील, आत्मासंपन्न, प्रतिभासंपन्न, दूरदर्शी असावा. कौटिल्याच्या मते, हे गुण असणारी व्यक्तीच अराजकाचा नाश करील, शांतता व सुव्यवस्था प्रस्थापित करील. हीन किंवा कनिष्ठ कुळातील व्यक्ती राजा होण्यास पात्र नाही असे त्याचे मत होते.
राजाची कर्तव्ये कौटिल्याने सांगितली आहेत.
1) राज्याचे अंतर्गत वा बाह्य शत्रूपासून संरक्षण करणे.
2) राज्यात शांतता व सुव्यवस्था ठेवणे.
3) नैसर्गिक संकटांपासून राज्याचे संरक्षण करणे.
4) कृषि क्षेत्राची उन्नती करणे.
5) व्यापारी, वाणिज्य, पशुसंवधीकडे लक्ष देणे.
6) राज्याचा विस्तार करणे.
2) अमात्य किंवा मंत्री :
अमात्य म्हणजे प्रशासनाची महत्त्वाची कार्ये करणारा अधिकारी वर्ग, अमात्यांच्या या वर्गात राजकोषाचा प्रमुख, जिल्हाधिकारी, राजदूत, किंवा प्रशासनातील उच्चपदस्थ अधिकारी किंवा आजच्या भाषेत सचिव होत.
मुख्य अमात्याची निवड करताना राजाने त्याची परीक्षा घ्यावी. मंत्र्यांची संख्या आवश्यकतेनुसार कमी जास्त असावी असे तो म्हणतो.
मंत्री देशाचे नागरिक असावेत, उत्तम कुळातील असावेत. चरित्र्यसंपन्न, राजावर निष्ठा असणारे, बुद्धिमान असावेत, मानसिकदृष्ट्या आरोग्यवान असावेत असे तो म्हणतो.
अतिगुप्त बाबतीत फक्त 3 ते 4 मंत्र्यांचाच सल्ला घ्यावा असे तो सुचवितो. राजाला मंत्री व मंत्री परिषद यांची नितांत आवश्यकता आहे असे कौटिल्याचे प्रतिपादन होते.
3) जनपद (देश) :
लोकसंख्या व भूमी या दोन्ही घटकांना एकत्रितपणे जनपद म्हणून संबोधले जाई. भूप्रदेशाचे हवामान चांगले असावे.
अतिथंड, अतिउष्ण असू नये. गुरांसाठी चराऊ कुरणे असावीत. जमीन सुपीक असावी. 100 ते 500 माणसांचे कुटुंब प्रत्येक खेड्यात असावे.
एका जिल्ह्यात 800 खेडी असावीत. जनपदाची सुबकता व सुरक्षितता यास कौटिल्याने महत्त्व दिले होते. ग्रामीण जनेच्या सुखासाठी चाणक्याने जे मार्गदर्शन केले ते आजही मार्गदर्शक आहे.
4) दुर्ग :
दुर्ग हा संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जाई.दुगांचे चार प्रकार तो सांगतो.
अ) पर्वत दुर्ग
ब) औदुक दुर्ग
चारही बाजूंनी पाणी असते.
क) धान्वत दुर्ग वाळवंट किंवा आसोड प्रदेशांतील दुर्ग.
ड) वनदुर्ग राजाची सुरक्षितता ही किल्ल्यांवर अवलंबून असते. महसूल संरक्षण व शत्रूच्या आक्रमणापासून संरक्षण यासाठी किल्ल्यांची गरज असते असे सांगून किल्ल्याच्या आतील नगररचना कशी असावी याबद्दलही तो लिहितो.
5) अधिकोष:
अधिकोषाच्या संपन्नतेचा विचार कौटिल्याने मांडला. अधिकोष सतत भरलेला ठेवण्याच्या दृष्टीने त्याने अनेक उपाय सुचविले. अधिकोष नेहमी सोने, चांदी, माणके, रत्ने आदींनी खच्चून भरलेला असावा.
राज्यासाठी सर्वस्व अर्पण करणारे सैनिक तयार करावयाचे असतील तर त्यांच्यासाठी विपुल धन खर्च करण्याची तयारी ठेवली पाहिजे असे तो लिहितो.
खजिन्यात येणाऱ्या रत्नांची पारख कशी करावी हेही तो सांगतो. सैन्य पैशावर अवलंबून असते. पैशाच्या अभावी सैन्य शत्रूस जाऊन मिळते.
राजाला मारते व अनेक विघ्ने उत्पन्न करते. पैशाची आपत्ती भयंकर होय असे तो म्हणतो.
6) दंड किंवा सैन्यशक्ती:
राज्याच्या अंतर्गत शत्रूंपासून समाजाचे संरक्षण करणे, बाह्य शक्तीपासून राज्याचे संरक्षण करणे यासाठी दंडशक्ती (सैन्यशक्ती) आवश्यक असते असे सांगून सैन्यात पहाडी, अरण्यवासी, परंपरागत शस्त्रोपजीवी लोकांची राजाने भरती करावी असे तो लिहितो.
सैन्यात शूरवीर राजनिष्ठ लोक असावेत. उत्तम सैन्यच राज्याला अधिक बलशाही बनवते असे कौटिल्याचे मत होते.
7) मित्र :
राज्याच्या सरहद्दीबाहेरच्या मित्र राष्ट्रांचा उपयोग राज्याने करून घ्यावा. शत्रू व मित्र ओळखूनच या राज्यांशी मैत्री करावी. मित्र विश्वासू व निःस्वार्थी असावेत, वेळप्रसंगी राजाच्या मदतीस येणारे असावेत असे तो म्हणतो.
हेरयंत्रणा :
गुप्तहेरांद्वारे राजाला जनतेवर, कर्मचारी व शत्रू यांच्यावर नियंत्रण ठेवता येते. गुप्तहेरांनी राजाविरुद्ध एखादे कटकारस्थान रचणे सुरू आहे काय याची माहिती राजास पुरवावी. तसेच कर्मचारी व अधिकारी यांच्या हालचाली, विद्रोही वृत्ती व भ्रष्ट वृत्ती यांची माहिती राजास पुरवावी असे कौटिल्य लिहितो.
हेरांचे 9 प्रकार कौटिल्य सांगतो. विद्यार्थी हेर, ज्योतिषी हेर, संन्यासधारी हेर, शेतकरी हेर, व्यापारी हेर, तपस्वी हेर, धाडसी हेर, भिक्षुकी हेर, रसद हेर वगैरे. कौटिल्य म्हणतो, शत्रू राज्यात गुप्तहेर पाठवून त्यांच्याकडून शत्रूराजाचे सैन्य, संपत्ती, दारूगोळा आदींची माहिती मिळवावी. तसेच शत्रू राजाबद्दल जनतेच्या मनात असंतोष निर्माण करावा. गुप्तहेरांची नियुक्ती मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार करावी. त्यांना भरपूर पैसा द्यावा पण त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवू नये.
गुप्तहेर निवडताना तो शत्रुच्या लोभाला बळी पडणार नाही याची खात्री करून घ्यावी. हेरासंबंधी कौटिल्याने ज़े विवेचन केले आहे ते पाहता हेरांचे प्रस्थ त्याकाळी फारच असावे असे दिसते.
राजदूत :
दोन राज्यांत मैत्रीपूर्ण संबंध ठेवावयाचे असतील तर राजदूताची भूमिका महत्त्वाची असते असे मत मांडून राजदूतांचे प्रकार, राजदूतांची कार्ये व त्यांच्या जबाबदाऱ्या, अधिकार आदींची विस्ताराने चर्चा कौटिल्याने केली आहे.
राष्ट्राराष्ट्रांत तह घडवून आणणे किंवा तह मोडून युद्ध उपस्थित करणे हे दूतांच्या कर्तृत्वावरच अवलंबून असते असे तो म्हणतो.
विदेश नीतीसंबंधी कौटिल्याचे मार्गदर्शन:
राजाला विदेशी नीतीसंबंधी मार्गदर्शन करताना नैतिक संकल्पना तो बाजूस ठेवतो. शत्रू राजे ज्या मंदिरास भेटी देतात तेव्हा त्यांचा नाश करावा; त्याच्या डोक्यात अचानक दगड घालावेत हे तो सुचवितो.
देवा धर्माच्या निमित्ताने शत्रू राजास बोलावून त्यांच्या अन्नात विष देऊन मारावे वगैरे. शत्रू राजास कसे मारावे यासंबंधीच्या अनेक योजना कौटिल्याने सुचविल्या होत्या.
विदेश नीती व आंतरराष्ट्रीय संबंध समजून घेण्यासाठी कौटिल्याने परराष्ट्र नीतीचे ६ प्रकार सांगितले आहेत व योग्य ते मार्गदर्शन केले आहे.
1) संधी (तह) केव्हा करावा.
2) युद्ध - सैन्यबळ वाढवून शक्तीत वाढ करणे.
3) शत्रूपक्षावर चाल केव्हा करावी..
4) तटस्थता केव्हा करावी.
5) समर्पण केव्हा करावे.
6) शक्तिमान राजाशी मैत्री तर दुर्बल राजावर विजय प्राप्त करण्याची महत्त्वाकांक्षा. शत्रूंचा प्रांत कसा काबीज करावा यासंबंधी कौटिल्याने विस्ताराने लिहिले आहे.
X X
युद्धात विजय मिळवण्यासाठी कौटिल्याने सांगितलेल्या उपाययोजना :
1) शत्रूच्या हद्दीत आगी लावणे, धान्य कोठारे नष्ट करणे.
2) शत्रू राज्यातील हत्ती व घोड्यांना विष देणे.
3) शत्रू राज्याची युद्ध व युद्धसामुग्रीची खरी माहिती मिळवणे.
4) शत्रूराज्याचे असंतुष्ट अधिकारी पैसे देऊन फितवणे.
5) शत्रूराज्याच्या जनतेत फूट पाडणे व त्यांना त्यांच्या राजाविरुद्ध बंड करण्यास चिथावणी देणे.
6) शत्रूराज्याच्या शेजारील राष्ट्रांना त्याविरुद्ध चिथावणी देणे.
आर्य चाणक्याने शासकीय खाती (विभाग) कोणती असावीत व त्या प्रत्येक विभागात कोणती कामे चालावीत हे विस्ताराने मांडले आहे.
चाणक्याने सांगितलेली शासकीय खाती व त्यांचे प्रमुख
1) भांडाराध्यक्ष
2) समाहर्ता
3) अष्टपटलाध्यक्ष
4) कोषाध्यक्ष
5) आकाराध्यक्ष
6) सुवर्णाध्यक्ष
7) कोष्ठागाराध्यक्ष
8) पण्याध्यक्ष
9) कुप्याध्यक्ष
10) आयुधागाराध्यक्ष
11) पौतवाध्यक्ष
12) शुल्काध्यक्ष
13) सीताध्यक्ष
14) सुराध्यक्ष
15) नावाध्यक्ष
16) गोपाध्यक्ष
17) अश्वाध्यक्ष
18) हस्त्यध्यक्ष
19) रथाध्यक्ष
X X
वरील सर्व अधिकाऱ्यांनी कोणती कामे कशी करावीत, त्यांच्या जबाबदाऱ्या व कर्तव्ये आदींची तात्त्विक माहिती कौटिल्याने दिली आहे.
चाणक्याने त्यावेळसच्या न्यायपद्धतीचे विस्तृत वर्णन केले आहे. लष्करी व्यवस्थेबद्दलही तो विस्ताराने लिहितो. मुलकी व्यवस्थेबद्दलही कौटिल्याने लिहिले आहे.
ग्रामसंस्था हा राज्यव्यवस्थेचा पाया आहे असे मत तो देतो. जनपद विभाग व नागर विभाग हे दोन तो पाडतो. गुन्ह्यांचे प्रकार व त्या त्या गुन्ह्यांनुसार द्यावयाच्या शिक्षा इ. बद्दल कौटिल्याने खूप विस्ताराने लिहिले आहे.
व्यापाऱ्यांपासून होणाऱ्या लबाड्या, आकस्मिक आपत्ती निवारणाचे उपाय, समाजकंटकांचा बंदोबस्त कसा करावा, कारागिरांवर देखरेख कशी ठेवावी याबद्दल तो लिहितो.
14 व्या प्रकरणात मंत्रतंत्रादी जादूटोण्याचे प्रयोग तो सांगतो. शत्रूचा प्रांत कसा काबीज करावा व जिंकलेला मुलुख कसा पचनी पाडावा याची चर्चा कौटिल्याने प्रकरण 13 त केली आहे.
कौटिल्याच्या 'अर्थशास्त्रा'त शिक्षण पद्धतीबद्दल व शिक्षणाच्या व्यवस्थेबद्दल मात्र सविस्तर विवेचन केलेले आढळत नाही. त्याने सांगितलेल्या अधिकाऱ्यांच्या यादीत शिक्षणाधिकारी कोठेच नाही म्हणजेच शिक्षणाची जबाबदारी सरकारमार्फत न होता तिची जबाबदारी समाजावरच टाकलेली होती.
वैवाहिक संबंध व स्त्रीधन, भाऊबंदांच्या वाटण्यांची पद्धत, पुत्रांचे प्रकार, घर कसे बांधावे यासंबंधीचे नियम, स्थावर गहाण ठेवण्यासंबंधीचे नियम आदीसंबंधीही कौटिल्याने लिहिले आहे.
9 व्या प्रकरणात लष्कराची उभारणी, लष्कराचे शिक्षण, सैन्यांच्या हालचाली व्यूहरचना, जखमी सैनिकांची शुश्रूषा, युद्धप्रसंगी सैन्यास द्यावयाचे प्रोत्साहन याची माहिती आहे.
10 व्या प्रकरणात युद्धप्रसंगी छावणी कशी असावी, कोठे असावी, युद्धाच्या वेळी राजाने कोठे उभे राहावे, सैनिकांना लागणाऱ्या वस्तूंचा पुरवठा, राखीव लष्कर इ. संबंधी कौटिल्याने विस्ताराने लिहिले आहे.
पायदळ, घोडदळ, रथदळ व हत्तीदल यांच्यासाठी कशा प्रकारची युद्धभूमी यासंबंधीचा तपशीलही कौटिल्याने दिला आहे.
कौटिल्याच्या अर्थशास्त्र या ग्रंथाच्या शेवटी चाणाक्य सूत्रे दिली आहेत. त्यांची संख्या 571 आहे. या सूत्रांच्या साहाय्याने कौटिल्याचे मत कोणत्या विषयावर काय आहे हे चटकन लक्षात येते.
कौटिल्याने 2300 वर्षापूर्वी लिहिलेला हा ग्रंथ आजही राजकारणी व्यक्तीने क्रमिक पुस्तकासारखा अभ्यासावा इतका महत्त्वाचा आहे.
भारतीय, समाजरचना, इतिहास व संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी आजही हा ग्रंथ उपयुक्त असा साधनग्रंथ आहे.
Comment and share


3 Comments
Very nice information
ReplyDeleteNice
ReplyDeleteVery nice
ReplyDelete